अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४३
मागील भागाचा सारांश: अभिराज आईच्या वागण्याने दुखावला गेला होता, तो ऋतुजा कडे व्यक्त झाला. आईची बाजू ऋतुजाने त्याला समजावून सांगितली. ऋतुजा कंपनीत जात असताना तिला निशा व पंकज सोबत दिसले. बोलता बोलता सहज निशाकडून पंकज व तिच्या नात्याबद्दल ऋतुजाने काढून घेतले, तेव्हा पंकज हा फक्त तिचा मित्र असल्याचे निशाने सांगितले.
आता बघूया पुढे….
ऋतुजा व रश्मी आपापल्या डेस्कवर जाऊन काम करत बसल्या होत्या. रश्मीने ऋतुजाला आवाज दिला, पण ती कसल्या तरी विचारात हरवलेली होती. रश्मीने ऋतुजाच्या हाताला धरून हलवले तेव्हा ती दचकली.
“ऋतू, एवढा कसला विचार करत आहेस?” रश्मीने विचारले.
“काही नाही असच.” ऋतुजा अजूनही विचारात होती.
“आता माझ्यापासून तू लपवायला लागली आहेस का?” रश्मीने रुसण्याचा नाटकी सूर लावला.
“निशा आणि तिचा तो मित्र त्या दोघांमध्ये मैत्री असेल की अजून काही, तुला काय वाटत?” ऋतुजा.
“हल्ली मैत्रीची व्याख्या व्यक्तिप्रमाणे बदलत चालली आहे. आता आमच्या शेजारी एक मुलगी राहते, तिला आणि एका मुलाला मी सोबत बघितले. बरं ते एकमेकांना किस करताना मला दिसले. मी त्याच्या बद्दल तिला विचारले, तर ती म्हणाली, तो तिचा बेस्ट बडी आहे आणि त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला किस करायचं होतं, पण त्याला भीती वाटत होती, म्हणून हिच्यासोबत त्याने ट्राय केलं.
आता तुच सांग, याला मैत्री म्हणता येईल का? ते सोड, पण तू त्या निशाचा एवढा विचार का करत आहेस? तिचं आणि त्या मुलाचं नात काहीही असो, आपल्याला काय फरक पडतो.” रश्मीला प्रश्न पडला होता.
“कारण ती ज्या मुलासोबत होती, तो माझा दिर होता. समजा, त्या दोघांमध्ये काही असेल तर ही आमच्या फॅमिलीत मॅच व्हायला हवी ना. एकतर आधीच बरेच प्रॉब्लेम्स सुरू आहेत, त्यात ही अजून एक भर नको.” ऋतुजा.
“ओह! म्हणून तुला एवढा इंटरेस्ट आहे तर….” रश्मी.
“तू तिच्याकडून सगळं काढल्याने मला काही विचारण्याची गरजच पडली नाही.” ऋतुजा.
“मी अधून मधून तिच्याकडून अशीच अपडेट घेत जाईल. तू विचारलं तर उगाच तिला शंका यायची. पण मला हे कळत नाहीये. पंकजने तिला तू ह्याच कंपनीत जॉबला असल्याचे सांगितले नसेल का?” रश्मी.
“त्याने जर तिला सांगितलं असत, तर एकतर ती माझ्यापासून लांब राहिली असती किंवा आज पंकज बद्दल बोलताना ती इतक्या उघडपणे बोलली नसती.” ऋतुजा.
“बरोबर. जे असेल ते असेल. तू हैद्राबादला जाण्याची तयारी केली का?” रश्मीने विचारले.
“आज आईकडे जाईल. तिच्याकडे माझे काही कपडे आहेत, ते घेऊन मग घरी जाईल. माझ्या पॅकिंगला जास्त वेळ लागत नाही. अर्ध्या तासात पॅकिंग होऊन जाईल.” ऋतुजाने सांगितले.
संध्याकाळी ऋतुजा कंपनीतून डायरेक्ट आईकडे गेली. आईकडे जात असताना ऋतुजाची कॅब सिग्नलवर थांबली होती, तेव्हा तिच्या नजरेला आरती एका मुलासोबत दिसली. आरती त्याच्या सोबत खूप खुश दिसत होती. आरतीला बघून ऋतुजा मनातल्या मनात म्हणाली,
‘आता हा मुलगा कोण असेल? आरतीच्या स्वभावामध्ये बदल यामुळे झालाय की ट्रीटमेंट मुळे. पंकज आणि आरतीच नेमकं सुरू तरी काय आहे. आरती एखाद्या चुकीच्या मुलाच्या जाळ्यात अडकायला नकोय. डायरेक्ट विचारण बर वाटत नाही. हैद्राबाद वरून जाऊन आल्यावर अभीला या सगळ्याची कल्पना देईल.’
बऱ्याच दिवसांनी ऋतुजाला बघून आईला बरे वाटले.
“म्हणायला फक्त मुलगी याच शहरात राहते. लवकर दर्शन सुद्धा देत नाही.” आईने टोमणा मारला.
“आई, जरा निवांत बसुदेत. कंपनी, घर या गोष्टी करता करताच माझा वेळ निघून चालला आहे. आज निमित्त होत म्हणून आले, नाहीतर आता एखादा विकेंड तुझ्यासाठी राखीव ठेवावा लागेल.” ऋतुजा सोप्यावर बसत म्हणाली.
“जावई बापू येणार आहेत का?” बाबांनी विचारले.
“माहीत नाही. मी त्याला चल काही म्हटलं नाही. फक्त इकडे येणार असल्याचे फोन करून कळवले.” ऋतुजाने उत्तर दिले.
“मी फोन करून बोलावतो.” बाबांनी अभिराजला फोन करून घरी जेवायला बोलावले.
ऋतुजा किचनमध्ये गेली. आई चहा करत होती. आईने ऋतुजाच्या हातात चहाचा कप दिला. ऋतुजा तिथल्याच खुर्चीत बसली.
“आई, बरी आहेस का? घरी काय सुरू आहे?” ऋतुजाने विचारले.
“मी बरी आहे. घरी काय सुरू असणार. रणजीत व अर्पिता त्यांच्या त्यांच्या कामात. आरवचा काही वेळ शाळेत जातो, तर बाकीचा डे केअर मध्ये. संध्याकाळी तुझे बाबा त्याला घेऊन येतात. आज अर्पिताच्या कलीगची पार्टी असल्याने ती आरवला तशीच घेऊन जाणार होती.
बाबांचं रुटीन तर तुला माहीत आहेच. त्यांचा हास्य क्लब, त्यांचे मित्र यातच त्यांचा सगळा वेळ जातो. मी तेवढी घरात एकटी राहते.” आई बोलण्यावरुन थोडी नाराज वाटली.
“आई, तुझ्या नाराजीचा रोख कळेल का?” ऋतुजा.
“अर्पिताच्या स्वभावात बऱ्यापैकी बदल झाला आहे. मी तिला बोलले होते, आता आम्ही घरी आहोत तर आरवला डे केअर मद्धे नको ठेवूस. तेवढाच आमचाही वेळ जाईल. पण तिचं म्हणणं आलं की, तुम्ही त्याच्यामुळे अडकून रहायला नको. तुम्ही तुमच आयुष्य एन्जॉय करा.
अर्पिताच्या बोलण्यावरून आरवला आम्ही सांभाळावे अशी तिची इच्छा नाही, हे जाणवलं. प्रत्येक विकेंडला कुठेतरी जात असते. रणजीत पण घरात थांबत नाहीत. मला म्हणून इकडे रहायला यायची इच्छाच नव्हती.
आता तू येणार असल्याचे मी तिला कालच सांगितले होते, पण तिने पार्टीला महत्त्व दिले ना.” आईने सांगितले.
“आई, या सगळ्याकडे एका वेगळ्या दृष्टीने बघ ना. हे बघ आरव लहान आहे. त्याच तुला भरपूर करावं लागेल. तुझं आणि बाबांचं वय बघता तुम्हाला, तुमच्या तब्येतीला हे सगळं झेपणार आहे का?
शिवाय त्याला सांभाळण्याची ड्युटी आल्यावर तुम्हाला दोघांना बाहेर कुठे फिरायला जाता येणार नाही, त्यासाठी तुला त्यांच्या सुट्टीची वाट बघावी लागेल.
आता वहिनीने पार्टीला महत्त्व दिले यात मला वावग काहीच वाटल नाही. मी काय नेहमी येत जातच आहे. पार्टी आधीपासून ठरल्याने वहिनीला तो प्लॅन कॅन्सल करता आला नसेल.
आई, तू त्या दोघाना त्यांचं आयुष्य जगुदेत आणि तुमचं तुम्ही जगा. बाबांसारखे ग्रुप जॉईन कर. घरातील सगळ्या कामाला बाई लावून टाकायची. बाबा आणि तू छानपैकी कुठेतरी फिरायला जात जा. तुम्ही बायका ना, नको त्या गोष्टींना जास्त महत्त्व देत बसतात.” ऋतुजा.
“मी पण तिला हेच सांगतो, पण तिला ऐकायचेच नाहीये. सतत डोक्यात तेच तेच घेऊन बसली आहे. आमचा काळ आणि आत्ताचा काळ यात खूप मोठा फरक आहे. रणजीत व अर्पिताला त्यांच्या पद्धतीने त्यांचं आयुष्य जगू द्यावे या विचाराचा मी आहे. आपलं राहिलेलं आयुष्य आनंदाने जगावं.” इतक्या वेळ बाबा दोघी मायलेकीच संभाषण ऐकत उभे होते.
“आई, बाबा बरोबर बोलत आहेत. आता एकच विचार कर, अर्पिता वहिनीच्या जागेवर मी असते आणि तुझ्या जागेवर माझ्या सासूबाई, तेव्हाही तुला आईंचीच बाजू पटली असती का?” ऋतुजा.
“ऋतू, मला सगळं कळतंय ग, पण माझं मन काही गोष्टी स्विकारायला तयार नाहीयेत.” आई म्हणाली.
“तू तुझं स्वतःच रुटीन सुरू कर. कोणासाठीच ते रुटीन बदलू नकोस. आपोआप तू सगळ्या गोष्टी स्वीकारायला तयार होशील. इथे जवळपास एखादा योगा क्लास असेल तर तो जॉईन कर. वेगवेगळ्या वयोगटातील लोकांशी तुझी ओळख होईल. तुझा दृष्टीकोन बदलेल आणि तू सगळं काही स्वीकारुन आनंदी जगायला लागशील.” ऋतुजाने आईला समजावून सांगितले.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe