अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४२
मागील भागाचा सारांश: अभिराजला आईशी बोलायचे असल्याने तो एकटाच खाली वॉक करण्यासाठी गेला. आई त्याच्याशी नीट न बोलल्याने अभिराजने फोन कट केला व तो त्याच्या बाबांशी बोलला. बाबांनी त्याला स्पष्टपणे सांगितले की, तू ऋतूला वेळ दे. बाकीच्यांकडे लक्ष देऊ नकोस.
आता बघूया पुढे….
ऋतुजा रूममध्ये अभिराजची वाट बघत होती. अभिराज रूममध्ये आला. आधी तो फ्रेश झाला, मग ऋतुजा शेजारी जाऊन बसला.
“आरती ताई विचारत होत्या, हैद्राबादला जाण्यासाठी शॉपिंग झाली का म्हणून.” ऋतुजा म्हणाली.
“अरे हो, हे तर मी तुला विचारणार होतोच, पण माझ्या लक्षातूनच गेलं. तुला शॉपिंग करायची असेल तर उद्या संध्याकाळी आपण जाऊयात.” अभिराज.
“नको. मी लग्नाच्या वेळी शॉपिंग केली होती आणि आपण हनिमूनला न गेल्याने ते कपडेही आहेच. मला उगाच कपडे खरेदी करायला आवडत नाही. तुझ्याकडे कपडे आहेत ना की मी उगाच तुला गृहीत धरतेय.” ऋतुजा.
“माझ्याकडेही भरपूर कपडे आहेत. चार दिवसांच्या लग्नासाठी भरपूर खरेदी करून झाली आहे.” अभिराज म्हणाला.
“तू इतका उदास का वाटतो आहेस?” ऋतुजाने विचारले.
“नाही ग.” अभिराजने उत्तर दिले.
“अभी, मी तुझी बायको आहे. माझा नवरा उदास आहे आणि हे मला कस समजणार नाही.” ऋतुजा त्याचा हात हातात घेत म्हणाली.
“आईने मनात नको ते ग्रह करून घेतले आहेत. बरं ती माझं ऐकतही नाहीये. बाबा बोलले की, तू आईकडे लक्ष देऊ नकोस, पण मला अस करून चालणार नाही.
तुला माहीत आहे, लहानपणापासून मी आईचा सगळ्यात लाडका होतो. माझ्या आयुष्यात काहीही घडू दे, मी लगेच आईला सांगायचो. शाळेतून घरी गेलो की, आईजवळ बसून शाळेत घडलेल्या गोष्टी सांगायचो. मला ती सवयच झाली. इकडे घरापासून लांब जरी राहिलो, तरी आईला रात्री फोन करून दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा दयायचो.
जॉबला लागल्यावर सुद्धा मी आईशी सगळं शेअर करायचो. पण आता एवढ्यात मी इतका बिजी झालो की आईला फोन करायला आणि तिच्याशी बोलायला मला वेळच मिळत नाही.
पहिले मी फोन केला नाही तरी आईचा फोन यायचा. आता आईही फोन करत नाही. मला आईशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही. आता ती नाराज होऊन बसली. तिला कस समजावू हेच मला कळत नाहीये.” अभिराजच्या मनात जे काही सुरू होत ते त्याने ऋतुजा पुढे मांडल.
“अभी, मला एक सांग. एखादा तुझा मित्र आहे जो दररोज तुला भेटायचा किंवा फोनवर बोलायचा. तो तुझ्याशी सगळं काही शेअर करायचा. तुम्ही दोघे अगदी वर्षानुवर्षे घट्ट मित्र राहिला आहात. पण अचानक त्याच्या आयुष्यात एखादा दुसरा मित्र आला, त्यामुळे त्याने तुला वेळ दिला नाही, तर तुला काय वाटेल?” ऋतुजाने विचारले.
“मला वाईट वाटेल. माझं मन दुखावेल. मी त्याच्याशी बोलणार नाही.” अभिराजने त्वरित उत्तर दिले.
“आता मला एक सांग, या घटनेकडे तू एक तटस्थ म्हणून बघशील तर त्यावर तुझं काय मत असेल?” ऋतुजा.
“बघायला गेलं तर दोघा मित्रांची मैत्री अजूनही तशीच आहे, पण त्याची प्रायोरीटी बदलल्याने त्याच्या मित्राला म्हणजे मला राग आला आहे. प्रत्येकवेळी आपण समोरच्याची प्रायोरीटी असलोच पाहिजे असं नाही ना. कोणत्याही नात्यात एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. बोलणं झालं नाही म्हणून नात तोडणे हा बालिशपणा झाला.” अभिराज.
“आता ही सेम कंडिशन आपल्या बाबतीत उभी राहिली आहे. तू लहानपणापासून आईंसोबत सगळं काही शेअर करायचास, पण आता मी तुझ्या आयुष्यात आल्याने तुझी प्रायोरिटी चेंज झाली आहे. तू तुझ्या जागी बरोबर आहे आणि आईही त्यांच्या जागेवर बरोबर आहेत.
आता आईंना हे स्वीकारावे लागेल की, त्यांच्या मुलाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आली आहे, जिच्याशी त्यांचा मुलगा सगळं काही शेअर करतो. ती व्यक्ती आईंची जागा घेणार नाहीये, पण त्यांचा मुलगा तिच्यात जास्त गुंतला आहे.
आपला मुलगा फक्त आता आपला मुलगा राहिला नसून तो आता कोणाचा तरी नवरा आहे आणि ती जबाबदारी निभावण्यासाठी त्याला वेळ द्यावा लागणार आहे.
तू हे सगळं पहिल्यांदा करतो आहे, सो तुला आमच्या दोघींमध्ये बॅलन्स करणं कठीण होत आहे. तुझी तारांबळ तर उडणार आहेच, पण त्या तुझ्याच आई आहेत, त्यांना कस समजावून सांगायचं हेही तुला माहीत असायला हवं.
आता बाबा जस बोलत आहेत, तसं त्यांना थोडा वेळ दे. तू आता सतत फोन करत राहिलास तर त्याचाही त्या चुकीचा अर्थ घेतील. काही दिवस या विषयावर त्यांच्याशी बोलायला जाऊ नकोस. समजा त्या स्वतःहून काही बोलल्याच तर तू तो विषय टाळ.” ऋतुजाने त्याला समजावून सांगितले.
“तुला आईचा राग आला नाही का?” अभिराजने आश्चर्याने विचारले.
“मला त्यांचा राग का येईल. तुझ्यावर माझ्या आधी त्यांचा अधिकार जास्त आहे. अभी, माझ्या रणजीत दादाच लग्न झाल्यावर मी आईच्या वागण्यातील बदल अनुभवला आहे. आता या सगळ्याचा जास्त स्ट्रेस घेऊ नकोस.” ऋतुजा.
“आय लव्ह यू बायको. आय एम सो लकी.” अभिराज ऋतुजा जवळ जात म्हणाला.
“आता मला झोपायचं आहे. तुझं प्रेम उतू जाऊ देऊ नकोस.” ऋतुजाने त्याला दूर ढकललं आणि ती ब्लॅंकेट ओढून झोपून गेली.
“आज जाऊदेत,पण उद्या तुझा हिशोब बरोबर करतो.” अभिराज दुसरीकडे बघत बेडवर झोपला.
—--------------------------------------------------
—--------------------------------------------------
दुसऱ्या दिवशी घरातील आवरून ऋतुजा कॅबने कंपनीत जायला निघाली होती. निशा तिच्या स्टॉपवर उभी असेल तर आपण तिला लिफ्ट देऊयात, हा विचार करून ती तिच्या स्टॉप कडे बघत होती, तोच तिला निशा दिसली, पण निशा सोबत तिने पंकजला सुद्धा बघितले. पंकज गाडीवर बसलेला होता व निशा खाली उभी होती. दोघेजण हसून गप्पा मारत होते.
‘पंकज दादा व निशा एकमेकांना कसे ओळखत असतील? ते एकमेकांशी असे बोलत होते की, त्यांची बरीच जुनी ओळख असेल. आता डायरेक्ट दोघांशी या विषयावर बोलणं चुकीच आहे. मला काही माहीतच नाही, अस दाखवून बोलाव लागेल.’ दोघांना एकत्र बघून ऋतुजाच्या डोक्यात विचार सुरू होते.
ऋतुजा कंपनीत जाऊन आपल्या कामाला लागली. हैदराबादला जायचे असल्याने पेंडींग कामे तिला वेळेच्या आधीच पूर्ण करावी लागणार होती. रश्मी येऊन तिच्या कामाला लागली. लंच ब्रेक झाल्यावर दोघीजणी कँटीन मध्ये जेवायला जाऊन बसल्या.
“ऋतू, तू बोलत होती तेच खरे होते.” रश्मी जेवण करता करता म्हणाली.
“काय ग.” ऋतुजा.
“विक्रम आणि त्याच्या वडिलांमध्ये गैरसमज झाले होते. विक्रमच्या वडिलांनी त्याला पूर्ण अमाऊंटचा चेक दिला. विक्रम खूप खुश होता.ते दोघे लगेच गोड झाले. मी उगाच त्यांच्या बद्दल नको नको ते विचार करत बसले होते.” रश्मी.
“आता लग्न झाल्यावर पण ही गोष्ट लक्षात ठेव. पटकन कोणालाही जज करायचं नाही आणि केलं तरी ते कोणाकडेच बोलून दाखवायचे नाही. आता काल माझ्याजवळ बोलली ते ठीक होत, पण अस घरातल्या कोणाकडे बोललीस तर तुझ्याबद्दल त्यांची वेगळी मते निर्माण होतील.” ऋतुजा बोलत असतानाच निशा त्यांच्या सोबत येऊन जेवायला बसली.
“निशा, आज जेवायला यायला उशीर झाला.” रश्मी म्हणाली.
“आज मला कंपनीत यायलाच उशीर झाला. बसच वेळेवर आली नाही. उशीर झाल्यावर सगळ्याच कामाचा गोंधळ उडतो.” निशा.
“मी कॅबने आले तेव्हा तू मला स्टॉपवर दिसली, पण तुझ्यासोबत कोणीतरी होत, म्हणून मी कॅब थांबावली नाही. म्हटलं उगाच तुला डिस्टर्ब करायला नको.” ऋतुजा अगदी सहजपणे बोलली.
“मॅडम डिस्टर्ब काय त्यात. तुम्ही मला लिफ्ट दिली असती, तर उशीर झाला नसता. तो माझ्या भावाचा मित्र पंकज होता. तुम्ही ज्या एरियात राहतात त्याच एरियात तो राहतो. ही रूम त्यानेच मला शोधून दिली होती. कधीही काही मदत लागली की तो हजर होतो. त्याचा स्वभाव खूप चांगला आहे.” निशा पंकज बद्दल बोलताना तिच्या डोळ्यातील भाव ऋतुजा टिपत होती.
“त्याच इतकं कौतुक करत आहेस, तो तुझा मित्र आहे की बॉयफ्रेंड?” रश्मीने डायरेक्ट विचारले.
“अजून तरी मैत्रीच्या पलीकडे आमचं नात गेलं नाहीये.” निशाने उत्तर दिले.
“म्हणजे जाऊ शकेल?” रश्मी.
“कदाचित, माहीत नाही. पुढे काय घडेल हे आपल्याला आत्ता थोडीच सांगता येणार आहे. तसा तो चांगला आहेच, बाकी जे घडेल ते बघू.” निशा.
ऋतुजा यावर काहीच बोलली नाही. जेवण झाल्यावर तिघीजणी आपापल्या कामाला गेल्या.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
(मला कल्पना आहे की, या कथेचे सलग भाग येत नसल्याने आपण सर्वजण नाराज आहात. काही वैयक्तिक कारणांमुळे मला ही कथा पुढे लिहायला जमत नव्हते, पण आता अस होणार नाही. या कथेचे भाग आता तुम्हाला सलग वाचायला मिळणार आहेत.)
(मला कल्पना आहे की, या कथेचे सलग भाग येत नसल्याने आपण सर्वजण नाराज आहात. काही वैयक्तिक कारणांमुळे मला ही कथा पुढे लिहायला जमत नव्हते, पण आता अस होणार नाही. या कथेचे भाग आता तुम्हाला सलग वाचायला मिळणार आहेत.)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा