Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४१

गोष्ट लग्नानंतरची
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४१

मागील भागाचा सारांश: विक्रम व त्याच्या वडिलांमध्ये काहीतरी बिनसलं होतं. ऋतुजाने रश्मीला सांगितले की, त्यांच्यातील वादामुळे तू विक्रमच्या वडिलांबद्दल मनात गैरसमज निर्माण करून घेऊ नकोस. ऋतुजा व अभिराजने गाडी बुक केली. इंटेरिअर वाल्यासोबत चर्चा केली. पंकजने अभिराजला सांगितले की, तू एकदा आईसोबत बोलून घे. आईच्या मनात तुझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाला आहे.

आता बघूया पुढे….

जेवण झाल्यावर ऋतुजा व आरती किचनमध्ये भांडी आवरत होत्या.

“ऋतू, मी खाली जाऊन वॉक करतो.” अभिराज घरातून बाहेर पडताना ऋतुजाला दरवाजातून सांगून गेला.

ऋतुजा कामात असल्याने तिने त्याच्या बोलण्याकडे जास्त लक्ष दिलं नाही.

“ऋतू, हैद्राबादला जाण्यासाठी शॉपिंग केलीस का?” आरतीने विचारले.

“आम्ही हनिमूनला जाणार होतो, तेव्हा शॉपिंग केली होती. तो प्लॅन कॅन्सल झाल्याने ते कपडे तसेच पडून आहेत. सो नवीन शॉपिंग करण्याची गरज नाहीये.” ऋतुजाने उत्तर दिले.

“आज दादा एकटाच वॉक करायला का गेला? तुम्हाला सोबत घेऊन जायचं ना, तेवढाच तुम्हाला तुमचा वेळ मिळतो.” आरती.

“आरती, नात्यात थोडी मोकळीक प्रत्येकाला हवी. लग्न झालंय म्हटल्यावर प्रत्येक ठिकाणी आपण सोबतच हवं अस होत नाही ना. आम्ही दोघे एकमेकांना त्यांची त्यांची स्पेस देतो. त्याला कोणाशी फोनवर बोलायचं असेल किंवा त्याला त्याचा मी टाईम हवा असेल, म्हणून तो एकटा गेला असेल.” ऋतुजा.

“ऋतू, दादा खरच खूप लकी आहे, त्याला तुझ्यासारखी समजदार मुलगी जोडीदार म्हणून मिळाली आहे. एखादी मुलगी असती, तर माझ्या बोलण्याला दुजोरा दिला असता.” आरती हसून म्हणाली.

“आरती, कोणतंही नात बनवण सोपं असतं, पण ते टिकून ठेवणं अवघड असतं. नवरा-बायकोचं नातं वाटत तेवढं सोपं नसतं. तुला तर आधी एक अनुभव येऊन गेलाच आहे. मी माझी सगळी नाती जपते.” ऋतुजा.

“हो.” आरती.

“आपल इथलं काम आवरलं आहे. मी आईला फोन करते, तिच्याशी बोलणंच झालं नाहीये.” ऋतुजा आपल्या रूममध्ये निघून गेली.

आरती हॉल मध्ये जाऊन बसली.

“पंकज, ही ऋतू किती समजदार आहे.” आरती.

“वहिनींच्या समजदारीचा गैरफायदा घेऊ नकोस.” पंकज.

“पंकज, मी त्या पॉईंटने बोलत नाहीये. ती दादाला किती छान पद्धतीने समजून घेते, अस मला म्हणायचं होतं.” आरती.

“आपला दादाही वहिनीला समजून घेतोच आहे. आता वहिनींच्या स्वभावा बद्दल बोलायचं झालं तर वहिनी सॉरटेड आहेत, पण एकदा का त्यांचं सटकल ना, मग समोरच्याची खैर नसेल. दादा आणि वहिनी दोघेही एकमेकांसाठी कॉम्पॅटीबल आहेत.” पंकज.

“बरं चल. मी रूममध्ये जाऊन झोपते.” आरती रूममध्ये गेली.

आरतीला राघव यावेळी मॅसेज करतो ही आठवण आल्याने ती रूममध्ये गेली होती. पंकज समोर ती चॅटींग करत बसली असती, तर त्याने खूप प्रश्न विचारले असते, हा विचार करून ती तिच्या रूममध्ये गेली. आरतीने मोबाईलचे नेट ऑन केले. राघवचा पंधरा मिनिटांपूर्वी मॅसेज आलेला होता.

आरतीने पटकन त्याच्या मॅसेजला रिप्लाय दिला.

“इतक्या वेळ कुठे होतीस?” राघव ऑनलाइन असल्याने त्याने लगेच मॅसेज केला.

“घरातील कामं आवरत होते.” आरती.

“मी तुझी केव्हापासून वाट बघत आहे.” राघव.

“सगळ्यांसमोर तुला मॅसेज करता येत नाहीत, त्यासाठी रूममध्ये यावं लागतं.” आरती.

“का?” राघव.

“तुझ्याशी बोलताना माझ्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बदलतात, ते कोणाच्या नजरेत आले, तर तुझ्याबद्दल चौकशी करतील.” आरती.

“त्यात काय एवढं? मित्राशी बोलतेय, अस सांगायचं.” राघव.

“राघव, मला ते सांगणच अवघड वाटतं.” आरती.

“तुझ्या भावांना आपली मैत्री असलेली आवडणार नाही का?” राघव.

“माझ्या मते त्यांना आपल्या मैत्रीशी काहीच प्रॉब्लेम नसेल, पण मला इतक्यात त्यांना आपल्या मैत्रीबद्दल सांगायचं नाहीये.” आरती.

“पण का?” राघव.

“राघव, सारखे प्रश्न विचारू नकोस ना. त्या विषयावर आपण नंतर बोलूयात.” आरती.

“ओके मॅडम. उद्या संध्याकाळी भेटुयात का?” राघव.

“राघव, मला दररोज तुला भेटणं शक्य होणार नाही. मी थोडं उशिरा आले तरी पंकज लगेच फोन करतो.” आरती.

“तू ना एक अजीब मुलगी आहेस. बरं ऐक, शनिवारी तुला सुट्टी असते ना, तर कलीग सोबत फिरायला जाणार आहे हे सांगून एक दिवस माझ्यासोबत फिरायचं.” राघव.

“शनिवार यायला अजून वेळ आहे, तेव्हाच तेव्हा बघू.” आरती.

“बघू नाही, मला प्रॉमिस हवं आहे.” राघव.

“बरं, प्रॉमिस.” आरती.

राघव व आरती मध्ये पुढील बराच वेळ चॅटींग सुरू होती.

बिल्डींगच्या खाली गेल्यावर अभिराजने आईला फोन केला. चार ते पाच रींग झाल्यावर फोन उचलला.

“हॅलो, आई कशी आहेस?” अभिराज.

“आज बरी तुला माझी आठवण झाली.” आईने टोमणा मारला.

“आई, माझं शेड्युल खूप पॅक आहे. तू इकडे येऊन रहा म्हणजे तुला कळेल.” अभिराज.

“बायकोला दयायला तुझ्याकडे वेळ असतो आणि आईला एक फोन करायला तुझ्याकडे वेळ नसतो.” आई चिडलेली होती.

“आई, तू आधी शांत हो. एकतर तू ऋतू आणि तुझ्यात कम्पेअर करू नकोस. आई, तुझी जागा वेगळी आहे आणि तिची जागा वेगळी आहे.” अभिराज आईला समजावू पाहत होता.

“तू लग्न होण्याच्या आधी असा नव्हता.” आई.

“लग्न होण्याआधी माझ्यावर जबाबदारी कमी होती. आता माझी बायको माझी जबाबदारी आहे. आई, आमचं अलीकडेच लग्न झालंय, मग तिला मी वेळ दयायला नको का? तू माझ्याशी नॉर्मल बोलणार असशील तर ठीक आहे, नाहीतर मी फोन ठेवतो.” अभिराज अस बोलल्यावर आईनेच समोरून फोन कट केला.

अभिराजलाही राग आला होता, त्याने लगेच बाबांना फोन केला.

“हॅलो, बाबा तुम्ही घरी आहात का?” अभिराजने विचारले.

“हो. मी घरीच आहे.” बाबा.

“बाबा, ह्या आईला काय झालंय? ती माझं ऐकून घ्यायला तयार नाहीये की मला ती समजून घेत नाहीये.” अभिराज.

“तुझा फोन चालू होता, तेव्हा ती माझ्या शेजारीच बसलेली होती. आताही ती इथेच आहे. तिला मी दोन दिवसांपासून तुझी बाजू समजावून सांगत आहे, पण ती माझही ऐकत नाहीये.” बाबा.

“बाबा, तुम्ही अस बोलल्यावर मी कोणाशी बोलायचं?” अभिराज.

“तिची चूक तिला जेव्हा कळेल तेव्हा कळेल. आपण काय करू शकतो.” बाबा.

“बाबा, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. आताच जर हिच्या मनात ऋतू बद्दल विष भरलं तर पुढे कस होईल? इथे मी आरतीला सांभाळतो आहे आणि आई तिकडे अस बोलत आहे. ऋतू किती दिवस या सगळ्यांच ऐकून घेईल. बाबा, माझं या सगळ्यात सँडविच होत आहे.” अभिराज.

“अभी, तू शांत हो. सगळं वेळेवर सोडून दे. तुझ्या आईला देव बुद्धी देईल तसं ती वागेल. पंकज सोबत माझ बोलणं झालंय. आरती आता जरा बरी वागायला लागली आहे असं त्याच्या कडून कळलं. आरती मुळे तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम सुरू झाले तर तिला सरळ सुरतला पाठवून दे.” बाबा.

“बाबा, बरं ऐका. मी आणि ऋतू कंपनीच्या ट्रेनिंग साठी पंधरा दिवसांसाठी हैद्राबादला जाणार आहोत. ऋतूचे कंपनीत ये-जा करण्याचे हाल होत होते, म्हणून मी आज तिच्यासाठी गाडी बुक केली. ती नको म्हणत होती.” अभिराज.

“तिच्यासाठी गाडी घेतलीस ते एक चांगल केलंस. अभी, मी तुला एक सांगून ठेवतो, तुमच्या दोघांचं नातं नवीन आहे, या बाकीच्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस. तुमचं नातं जप. काही वाटलं तर बिनधास्त फोन करत जा. आईच्या बोलण्याचा विचार करू नकोस.

आता बराच उशीर झाला. घरात जाऊन झोप. आई काय बोलली ते ऋतूला कळू देऊ नकोस. उगाच तिला वाईट वाटेल आणि तिच्या मनात आईबद्दल गैरसमज निर्माण होईल.” बाबांनी त्याला समजावून सांगितले.

“हो बाबा. गुड नाईट.” अभिराजने फोन कट केला.

बाबांसोबत बोलल्याने अभिराजचे मन हलके झाले होते.