Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ३९

लग्नानंतरची कथा
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ३९

मागील भागाचा सारांश: ऋतुजाला कॅब न मिळत असल्याने ती निशा सोबत बसने घरी गेली. बसचा प्रवास किती धकाधकीचा असतो, हे तिला जाणवले. गर्दीत तिला अभिराजचे फोन आलेले समजले नव्हते. ऋतुजाच्या हातावरील ओरखडे बघून आपण उद्याच गाडी बघायला जाऊयात, असे अभिराजने ठरवले. आरतीने ऋतुजा व अभिराजची माफी मागितली.

आता बघूया पुढे….

नेहमीप्रमाणे सकाळी मोबाईलचा अलार्म वाजल्यावर ऋतुजाला जाग आली. डोळ्यावर प्रचंड झोप होती. हाताने मोबाईलचा अंदाज घेत डोळे न उघडता तिने अलार्म बंद केला.

“जरावेळ झोप.” अभिराज तिला मिठी मारत म्हणाला.

ऋतुजा हसून म्हणाली,
“मला उठण्याची इच्छा नाहीये हे तुला डोळे न उघडता कसं समजलं?”

ऋतुजा आता पूर्णपणे जागी झाली होती.

“माझ्या मनाचे डोळे कायम उघडे असतात.” अभिराज ऋतुजा भोवतालची मिठी घट्ट करत म्हणाला.

“अभी, सोड मला. उठायला उशीर झाल्यावर पुढची सगळी कामे उशीरा होतात.” ऋतुजा मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती.

“आपण बाहेरून नाश्ता मागवू. जेवण तू कॅन्टीनला कर.” अभिराज ऋतुजाला सोडायला तयार नव्हता.

“दररोज बाहेरच खाण आपल्याला परवडणार नाही.” ऋतुजा.

“तुझा नवरा चांगले पैसे कमावतो.” अभिराज.

“तुझ्या खिशाला ते परवडत असेल तरी आपल्या दोघांच्या तब्येतीला बाहेरचं खाणं परवडणार नाहीये. सोड मला.” ऋतुजाला शेवटी अभिराजने आपल्या मिठीतून सोडले.

“तुझ्या रोमान्सपाई माझे पंधरा मिनिटे वाया गेले.” ऋतुजा बेडवरून खाली उतरताना म्हणाली.

“तू जवळ असली की प्रिये, तुझ्यापासून लांब मी राहूच शकत नाही.” अभिराज बेडवर उठून बसला.

“मी माझं आवरून किचनमध्ये जाते. तू बेडरूम आवरून घे.” ऋतुजा बाथरूममध्ये गेली.

अभिराजने उठून बेडवरील बेडशीट व्यवस्थित केले. ब्लॅंकेट घडी करून ठेवले. ऋतुजाच्या व स्वतःच्या ड्रेसला इस्त्री केली.

ऋतुजा किचनमध्ये गेली, तर आरती आधीच उठलेली होती. दोघींनी कामं वाटून घेतली. पंकज, अभिराज, आरती व ऋतुजा या चौघांनी एकत्र बसून गप्पा मारता मारता नाश्ता केला.

“पंकज, आरती पुढच्या आठवड्यात आम्ही दोघेही ट्रेनिंग साठी हैद्राबादला जाणार आहोत. तेही पंधरा दिवसांसाठी.” अभिराजने सांगितले.

“तुम्हाला दोघांना एकाच वेळी ट्रेनिंगची संधी कशी मिळाली?” पंकजने त्या दोघांकडे बघत विचारले.

“पंकज, आम्ही दोघे वेगवेगळ्या कंपनीत काम करतो, शिवाय आम्ही दोघेही स्कॉलर आहोत.” अभिराज एक भुवई उडवत म्हणाला.

“दादा, तू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. हा निव्वळ योगायोग आहे की, तुम्ही घडवून आणला आहे अश्या अर्थाने मी बोललो.” पंकजने स्पष्टीकरण दिले.

“हा योगायोग आहे. आम्ही घडवून आणला नाहीये.” ऋतुजाने किचनमध्ये जाताना उत्तर दिले.

“तुमचं चालुदेत. मला उशीर होतोय.” आरती आपली पर्स घेऊन घराबाहेर पडली.

“पंकज, आरती मध्ये बराच बदल झालेला दिसतोय.” अभिराज.

“हो, फक्त आता हा बदल कायम असाच रहावा बस.” पंकज.

“राहील अशी आशा ठेवूयात. तुम्ही दोघे भाऊ जरा जास्तच विचार करतात. अभी, उठ आणि आवर. कंपनीत जायला उशीर होईल.” ऋतुजा बेडरूममध्ये गेली.

अभिराज व पंकज उठून आपापलं आवरायला लागले. ऋतुजा व अभिराज आपलं आवरून घराबाहेर पडले.

“ऋतू, कॅब बुक केलीस का?” अभिराजने खाली उतरता उतरता विचारले.

“हो.” ऋतुजा मोबाईल मध्ये बघत म्हणाली.

“आज संध्याकाळी मी तुला घ्यायला येतो. आपण तिकडून गाडीच्या शोरुम मध्ये जाऊयात.” अभिराज म्हणाला.

कॅब बिल्डिंगच्या गेटजवळ येऊन उभी राहिल्याने ऋतुजा अभिराज सोबत काही न बोलता फक्त बाय बोलून निघून गेली. कॅबमध्ये बसल्यावर ऋतुजाने निशाला फोन करून तिचा बस स्टॉपच्या थोडं पुढे थांबायला सांगितले.

निशा कॅबमध्ये बसली,
“मॅडम, मी बसने गेले असते.” निशाला अवघडल्यासारखे वाटत होते.

“तू माझ्या सोबत कॅबने आल्यावर कॅबचे पैसे जास्त द्यावे लागत नाहीत.” ऋतुजा हसून म्हणाली.

“ तसं नाही मॅडम, पण मला जरा ऑकवर्ड वाटतंय.” निशा बोलत असतानाच तिचा फोन वाजला.

निशा फोनवर बोलत होती. तिचा फोन झाल्यावर ऋतुजा म्हणाली,
“घरून फोन होता का?”

“नाही, माझा एक मित्र आहे, तोही माझ्या गावकडीलच आहे म्हणजे आम्ही तसे दूरचे नातेवाईक आहोत.” निशा.

“अग, इतकं एक्स्प्लेनेशन नाही दिलं तरी चालेल. मी अगदी सहज विचारलं होतं.” ऋतुजा हसून म्हणाली.

कंपनीत पोहोचल्यावर निशा तिच्या व ऋतुजा तिच्या डेस्कवर जाऊन बसल्या. रश्मी अजून आली नसल्याने ऋतुजा आपला पी सी चालू करून काम करत बसलेली होती.

“आज जाम धावपळ झाली.” रश्मी आपल्या खुर्चीत बसत पी सी चालू करत म्हणाली.

“थोडा खोल श्वास घे आणि पाणी पी.” ऋतुजा आपलं काम करता करता बोलत होती.

रश्मीने आपल्या समोरील पाण्याची बाटली तोंडाला लावून घटघट ती पाणी प्यायली.

“आज उशीर का झाला?” ऋतुजाने विचारले.

“विक्रम सोबत चॅटींग करताना वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. आई रूममध्ये बोलवायला आली तेव्हा आपल्याला उशीर झाला हे कळले, त्यात ही पुण्याची ट्रॅफीक, नको त्यावेळी आडवी येते.” रश्मी वैतागलेली होती.

“पहला पहला प्यार हैं, पहली पहली बार हैं.” ऋतुजा मिश्किल हसून म्हणाली.

“इथे माझी वाट लागली आणि तू हसतेय.” रश्मी चिडून म्हणाली.

“प्रेमात पडल्यावर अश्या गोष्टी होत असतात.” ऋतुजा अजूनही तिला चिडवत होती.

“ऋतू, प्लिज नको चिडवू ना. आम्ही बोलतच अश्या विषयावर होतो की, वेळ समजलीच नाही.” रश्मी.

“ओके. आता तू तुझं काम कर. मी माझं काम करते. राहिलेल्या गप्पा आपण लंच ब्रेकमध्ये मारुयात.” ऋतुजा म्हणाली.

लंच ब्रेक झाल्यावर ऋतुजा व रश्मी आपापले डबे घेऊन कॅन्टीन मध्ये जाऊन बसल्या.

“आज ती निशा आपल्या सोबत जेवायला आली नाही म्हणजे बर होईल.” रश्मी डबा उघडता उघडता म्हणाली.

“का ग.” ऋतुजा म्हणाली.

“मग आपल्या दोघींना नीट बोलता येत नाही.” रश्मी.

“ती येईपर्यंत तू बोल. ती आलीच तर आपण आपल्या डेस्कवर गेल्यावर बोलू.” ऋतुजा व रश्मीने जेवायला सुरुवात केली.

“ऋतू, मला सांग. आई-वडील आपल्या मुलांना वेगवेगळी वागणूक का देत असतील?” रश्मीने विचारले.

“माहीत नाही. परिस्थिती काय असेल त्यावर ते डिपेंड असेल.” ऋतुजा.

“या प्रश्नाचं उत्तर मी देऊ का?” हातात राईसप्लेट घेऊन निशा उभी होती.

निशाला बघून रश्मीचा चेहरा पडला होता, तिला ऋतुजा सोबत गप्पा मारायच्या होत्या, पण निशा आल्याने ते शक्य नव्हते.

“तू जेवण करता करता उत्तर दे. आधी इथे बस.” ऋतुजा बाजूला सरकत म्हणाली.

निशा बसली व तिने बोलायला सुरुवात केली,

“मला दोन बहिणी आहेत, एक माझ्यापेक्षा मोठी व एक लहान. लहान बहिणीचे सगळे हट्ट पुरवले जायचे. मोठ्या बहिणीच्या वस्तू, कपडे मला वापरायला दिले जायचे. ताई आणि माझ्यात भांडण झाले की, ती तुझ्यापेक्षा मोठी आहे, तिला अस बोलू नको असं मला सांगितलं जायचं. लहान बहिणीशी भांडण झालं की ती तुझ्यापेक्षा लहान आहे, तिला काही कळत नाही, अस मला सांगितलं जायचं.

मला नेहमी वाटायचं की, माझ्यावर आई वडील प्रेम करत नाहीत. मी कोणालाच आवडत नाही. माझ्या मनात लहानपणापासून तेच बिंबल होतं. पण पुढे जाऊन लक्षात आले की, परिस्थिती तशी असायची म्हणून मला सगळे ओरडायचे.

मी माझ्याच अनुभवावरून सांगते, आई वडील सगळ्यांचा समान विचार करतात, सगळ्या मुलांवर सारखेच प्रेम करतात, फक्त त्यावेळी आपण रागात असतो म्हणून आपल्याला तसे वाटत असते. थोडं शांत झाल्यावर मग अस काही वाटत नाही.”

“तू बरोबर बोलते आहेस. परिस्थितीचा दोन्ही बाजूने विचार केल्यावरच आपण निष्कर्षावर पोहोचायला हवे.” रश्मीला निशाचं बोलणं पटलं होत.