Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ३८

प्रवास लग्नानंतरचा
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ३८

मागील भागाचा सारांश: आरती व ऋतुजाने फार काही न बोलता घरातील काम मिळून आवरले. ऋतुजाला रस्त्यात निशा दिसल्याने त्या दोघी एकत्र कॅबने ऑफिसला गेल्या. आरतीने राघवला तिचा डिवोर्स का आणि कसा झाला हे सांगितले. राघवने तिला फॅमिलीचे महत्व समजावून सांगितले.

आता बघूया पुढे….

ऑफिसमध्ये बरच काम असल्याने दिवसभर ऋतुजाला रश्मी सोबत सुद्धा बोलायला वेळ मिळाला नव्हता. ऑफिस मधून निघायला उशीर झाल्याने तिला कॅब मिळत नव्हती. ऑफिसच्या बाहेर कॅब सर्च करून ती वैतागली होती.

"मॅडम, तुम्हाला कोणी घ्यायला येणार आहे का?" आवाज आल्यावर ऋतुजाने समोर बघितले तर निशा उभी होती.

"अग ते कॅब मिळत नाहीये. केव्हाची शोधते आहे. सगळे ऑफिस सुटण्याची वेळ झाल्याने अस झालं असेल." ऋतुजा वैतागलेली होती.

"दहा मिनिटात बस आहे. बसमध्ये गर्दी असेल, पण इथे उभं राहून वेळ घालवण्यापेक्षा बसमधील गर्दीत उभं राहून घर जवळ केलेलं बर. मी माझ्या स्टॉप वर उतरेल, तुम्ही तुमच्या स्टॉपवर उतरा." निशाने सुचवले.

ऋतुजाला निशाने दिलेले सजेशन पटले होते. ऋतुजा निशा सोबत बस स्टॉप वर जाऊन उभी राहिली. दहा मिनिटाने बस आली. बसमध्ये गर्दी होती, बसायला जागा नव्हती, पण दोघींना एका बाजूला उभं रहायला जागा मिळाली होती. निशाने हात पकडून ऋतुजाला बसमध्ये चढायला मदत केली होती.

"थँक् यू निशा, तुझ्यामुळे बसने प्रवास करण्याची हिंमत तरी मी दाखवू शकले. तुला या गर्दीत चढण्याचा कंटाळा येत नाही का?" ऋतुजाने विचारले.

"मॅडम, कंटाळा का येईल? आता हीच आपली लाइफस्टाइल असेल हे मानून घेतलं आहे. तशीही लहानपणापासून ऍडजस्टमेंट करण्याची सवय असल्याने काही वाटत नाही. गाडी घेऊन त्याचा मेंटेनन्स ठेवणे मला सध्या तरी परवडण्यासारखे नाहीये. घरची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे, सो या सगळ्याची सवय आहे." निशाने हसून उत्तर दिले.

ऋतुजा बसमधील प्रवाश्यांच निरीक्षण करत होती. एकजण चढत होता, तर दुसरा उतरत होता. एकाचा प्रवास सुरु झाला की दुसऱ्याचा संपत होता. सगळेजण घरी परतत असल्याने आपल्या घरी जाण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होताच, पण दिवसभराचा थकवाही चेहऱ्यावर दिसून येत होता.

निशाचा स्टॉप आल्यावर ती उतरुन गेली, त्याच्या पुढील स्टॉपवर ऋतुजा उतरली. स्टॉप पासून घर जवळ असल्याने ती पायीच घरी गेली. दरवाजावरील बेल वाजवल्यावर अभिराजने दरवाजा उघडला.

"ऋतू, किती उशीर आणि तुझा मोबाईल कुठे आहे? किती फोन केले, एकदाही उचलला नाहीस." अभिराजच्या चेहऱ्यावर काळजी दिसून येत होती.

"अभी, मला पाच मिनिट शांततेत बसू दे, मग सांगते." ऋतुजा सोप्यावर बसत म्हणाली.

अभिराजने तिला पाणी आणून दिले. पाणी पिऊन झाल्यावर ती म्हणाली,
"अरे, आज उशीर झाल्याने कॅब मिळत नव्हती. आता शेवटी बसने आले. बसमधील चिवचिवाटात मोबाईलचा आवाज आलाच नाही. बहुतेक ऑफिस मधून बाहेर पडल्यावर मोबाईल सायलेंट वरून काढलाच नसेल."

ऋतुजाने मोबाईल चेक केला, तर अभिराजचे दहा मिस्डकॉल होते आणि मोबाईल सायलेंट वर होता.

"हे तुझ्या हातावर काय झालं आहे?" अभिराजने विचारले.

ऋतुजा हाताचे निरीक्षण करत म्हणाली,
"अरे ते बसमध्ये चढताना गर्दीत ओरखडल असेल."

"ऋतू, मला फोन केला असता तर मी तुला घ्यायला आलो असतो." अभिराज म्हणाला.

"इट्स ओके अभी. माझ्यासोबत निशा होती, मग मला बसने प्रवास करायला काही वाटले नाही. मी फ्रेश होऊन येते." ऋतुजा आपल्या रूममध्ये निघून गेली.

ऋतुजा फ्रेश होऊन येईपर्यंत अभिराजने दोघांसाठी चहा बनवला होता. आयता चहा हातात मिळाल्यावर ऋतुजा म्हणाली,
"थँक्स अभी, मला याचीच गरज होती. पंकज दादा आणि आरती ताई अजून आले नाहीयेत का?"

"पंकज आला होता, आता तो मित्रांसोबत बाहेर जेवायला गेला आहे. आरतीला यायला उशीर होणार आहे, ती येतानाच काहीतरी खाऊन येणार आहे, अस तिने पंकजला सांगितल आहे. आता तू थकली आहेस, तर काहीच करू नकोस. मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो." अभिराज म्हणाला.

"बरं ठीक आहे." चहा पिता पिता त्या दोघांनी मिळून जेवणाची ऑर्डर दिली.

थोड्या वेळ विचार करून झाल्यावर अभिराज म्हणाला,
"ऋतू, आपण उद्याच तुझ्यासाठी गाडी बघायला जाऊयात. तुझी ही धावपळ आणि तुला होणारा हा त्रास मला बघवत नाही. गाडी घेईपर्यंत मीच तुला सकाळी सोडवत जाईल आणि येताना घेऊन येत जाईल."

"अभी, लगेच गाडी कशाला, मी मॅनेज करते आहे ना. आधीच लग्नाला एवढा खर्च झाला आहे. आता आपल्याला घराचे इंटेरिअरही करायचे आहे." ऋतुजा म्हणाली.

" तू बाकीची काळजी करू नकोस. सगळं ऍडजस्ट होत आहे म्हणूनच मी गाडी घ्यायचं म्हणालो. आता यावर मला चर्चा नकोय." अभिराजने तो विषय तिथेच थांबवला. ऋतुजाही पुढे काही बोलली नव्हती.

पुढील काही वेळाने आरती घरी आली, तेव्हा ऋतुजा मोबाईल वर टाईमपास करत बसलेली होती, तर अभिराज लॅपटॉपवर काम करत बसलेला होता. त्या दोघांनी आरतीकडे बघितलेही नाही किंवा स्माईल सुद्धा दिली नव्हती. आरती आपल्या रूममध्ये निघून गेली.

काही वेळात जेवणाचे पार्सल आल्यावर ऋतुजा व अभिराजने जेवण केले. आरती तिच्या रूममध्ये बसलेली होती. आरतीला त्या दोघांशी बोलायचे होते, पण ती त्यांचं जेवण होण्याची वाट बघत होती.

अभिराज व ऋतुजाचं जेवण झाल्याचा अंदाज येताच आरती रूम मधून बाहेर आली.

"दादा, मला तुमच्या दोघांशी थोडं बोलायचं होतं." आरती म्हणाली.

"ह बोल." अभिराज अतिशय तुटकपणे म्हणाला.

"दादा, ऋतू, प्लिज मला माफ करा. माझ्या डोक्यात काहीतरी वेगळेच विचार सुरू होते, त्या विचारांमुळे तुमच्याशी मी काहीतरी विचित्रच वागत होते. मला माझी चूक कळली आहे. आपल्या संकटाच्या काळात आपली माणस सोबत असणं किती गरजेचे असते हे मला समजले आहे.

तुम्ही दोघे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात आणि आहात म्हणून वैभवच्या जाळ्यातून माझी सुटका झाली. शिवाय त्यातून सावरायला तुम्हीच मला खूप मोठी मदत केली. मी इथून पुढे अस कधीच वागणार नाही आणि समजा मी परत तशीच वागले तर दादा, मला सुरतला पोहोचवून दे. मी पुन्हा कधीच पुण्याला येणार नाही. पण प्लिज माझ्याशी अस तुटक वागू नका.

ऋतू, मी तर तुझीच गुन्हेगार आहे. तू मला किती समजून घेतलंस. लग्न झाल्यावर मी तुला सांभाळून घ्यायला हवं होतं, पण उलट मीच तुला त्रास दिलास." आरतीला खूप भरून आल्याने ती पुढे काहीच बोलू शकली नव्हती.

अभिराज काही बोलणार तेवढ्यात ऋतुजाने त्याला नजरेनेच अडवले, कारण तो काहीही बोलला असता आणि त्याने आरती दुखावली गेली असती, हे ऋतुजाला नको होते.

"आरती ताई, जे झालं ते आम्ही विसरलो आहोत आणि तुम्हीही विसरून जा. स्वतःला त्रास करून काही साध्य होणार नाही. तुमच्याशी तुटक वागून आम्हाला काही मिळणार नाही, उलट आम्हालाही त्याचा त्रास होत होताच, पण त्याशिवाय तुम्हाला तुमची चूक स्वतःहून कळली नसती." ऋतुजा एवढं बोलून रूममध्ये निघून गेली.

"दादा, तू काही बोलणार नाहीयेस का?" आरतीने अभिराज कडे बघून विचारले.

"माझ्याकडे बोलायला काही उरलेच नाहीये. मी तुला दुखावू नये ही ऋतूची इच्छा आहे आणि तू तिला दुखावू नये ही माझी इच्छा आहे. जे झालं ते झालं, पण इथून पुढे बोलताना विचार करत जा." एवढं बोलून अभिराज रूममध्ये निघून गेला.

पुढील काहीवेळ आरती सगळ्याचा विचार करत तिथेच बसून राहिली. रूममध्ये गेल्यावर तिने राघवला मॅसेज केला,
"हाय राघव, मी दादा आणि ऋतूला सॉरी बोलले. झालं गेलं विसरून जा अस ते बोलले, पण दोघांपैकी एकाच्या चेहऱ्यावर मला काहीच भाव दिसले नाही."

राघव ऑनलाईन असल्याने त्याने लगेच रिप्लाय केला,
"हे बघ, तू त्यांना सॉरी बोललीस. तुझ्या मनात काय होत हे त्यांच्या समोर मांडलं ना, तर मग आता त्यांना थोडा वेळ दे. ते आतून जास्त दुखावले असतील म्हणून लगेच रिऍक्शन दिली नसेल. ते तुटक वागले तरी तू त्यांच्याशी नॉर्मल वागण्याचा प्रयत्न कर. ते सगळं जाऊदेत, पण आता तुला कस वाटतंय?"

"मला ना खूप बरं वाटत आहे. मनावरील ओझं हलकं झाल्यासारखं वाटत आहे." आरती.

"गुड. हेच तर जास्त महत्त्वाचे आहे. आता निवांत झोप आणि केव्हाही कधीही काहीही शेअर करावंसं वाटलं तर मी आहेच. गुड नाईट." राघव.

आरतीच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली होती.