Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ३७

प्रवास लग्नानंतरचा
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ३७

मागील भागाचा सारांश: अभिराजचे हैद्राबादला असणाऱ्या ट्रेनिंग साठी सिलेक्शन झाले होते. अभिराजने ऋतुजाला न विचारता ट्रेनिंगसाठी होकार दिल्याने तिला वाईट वाटले होते. अभिराज आपल्याला गृहीत धरतो आहे हे तिला आवडले नाही.

आता बघूया पुढे….

दुसऱ्या दिवशी सकाळी ऋतुजाला थोडी उशीराच जाग आली. घड्याळात वेळ बघून ती उठून पटकन किचनमध्ये गेली तर आरती किचनमध्ये नाश्ता बनवत होती. आरतीला तिथे बघून ऋतुजा मागे वळणार तर आरती तिला म्हणाली,
"ऋतू, आज तुला उठायला उशीर झाला आहेच, तर तू अंघोळ करून ये. मी आपल्या सर्वांसाठी चहा आणि नाश्ता बनवते. तुला माझ्या हातचा डबा चालणार नसेल तर मी डबा बनवणार नाही. फक्त आता नाश्ता व चहाला नाही म्हणू नकोस."

ऋतुजा काही न बोलता बाथरूम मध्ये अंघोळ करण्यास गेली. अभिराज तोपर्यंत उठला असल्याने आरतीने त्याला चहा दिला. रात्री तो आरती सोबत रूढ बोलला असल्याने आता त्याने काहीच न बोलता चहाचा कप तोंडाला लावला.

अंघोळ करून आल्यावर आरतीने ऋतुजाच्या हातात चहाचा कप टेकवला.

"आरती ताई, तुमचा स्वयंपाक करून झाला आहे का?" ऋतुजाने विचारले.

"भाजी झाली आहे, अजून पोळ्या करायच्या बाकी आहेत." आरतीने उत्तर दिले.

"बरं, मी भाजी एका गॅसवर शिजायला टाकते. तुम्ही दुसऱ्या गॅसवर पोळ्या भाजा." ऋतुजाने फ्रीज मधून भेंडी काढली.

चहा थंड होईपर्यंत ऋतुजाने भेंडी चिरली. आरती दुसऱ्या गॅसवर पोळ्या करत असताना एका गॅसवर ऋतुजाने मसाला भेंडी बनवली. आरतीने ऋतुजा व अभिराजच्या वाटेच्या पोळ्या बनवल्या. तोपर्यंत ऋतुजाने घरातील बाकीचा पसारा आवरला.

काही न बोलता ऋतुजा व आरतीने घरातील सकाळची सर्व कामे मिळून केले. आपलं आवरुन झाल्यावर आरती ऑफिसला जायला घराबाहेर पडली.

"दादा, कालपासून आरती ताईवर काहीतरी जादू झाली आहे. ती जरा जास्तच चांगली वागायला लागली आहे." पंकजच्या डोळयात आश्चर्य होते.

"चांगलं वागण्याचं भूत असेल तर लवकरच जाईल आणि पुन्हा आरतीला सायकॉलॉजिस्ट कडे घेऊन जावं लागेल. यात मला काहीच बोलायचं नाहीये. तुझ्याशी गप्पा मारत बसलो, तर मला ऑफिसला जायला उशीर होईल." अभिराज पुढच्या दहा मिनिटांत आपलं आवरुन ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ ऋतुजाही घराबाहेर पडली.

ऋतुजाने बुक केलेल्या कॅब मध्ये बसून ती ऑफिसच्या दिशेने निघाली होती. थोडं पुढे गेल्यावर तिला बस स्टॉपवर निशा उभी दिसली, म्हणून तिने ड्रायव्हरला कॅब थांबवायला सांगितली. ऋतुजाने निशाला आवाज देऊन कॅब मध्ये बसायला बोलावले.

"मॅडम, मी बसने आले असते." निशाला कॅब मध्ये बसायला संकोच वाटत होता.

"तू पहिले बस, मग आपण बोलू." ऋतुजाने निशाला कॅबमध्ये बसण्याचा आग्रह केला.

निशा कॅबमध्ये बसल्यावर कॅब ऑफिसच्या दिशेने मार्गस्थ झाली.

"आपण दोघी तर एकाच एरियात राहतो. काल आपण याबद्दल काहीच बोललो नाही." ऋतुजा म्हणाली.

"हो. तुम्ही दररोज कॅबने जाता का?" निशाने विचारले.

"हो, सध्यातरी कॅबनेच जात आहे. लग्नाच्या आधी माझ्याकडे गाडी होती. आता इकडे अजून गाडी घ्यायची आहे. मलाही दररोज कॅबने जायला नकोच वाटत, पण ऑप्शन नाहीये." ऋतुजाने सांगितले.

"तुमचं लग्न आत्ताच झालं आहे का?" निशाने पुढील प्रश्न विचारला.

"हो, आत्ता म्हणजे एक महिना झाला आहे." ऋतुजाने उत्तर दिले.

"मॅडम, मग लग्नाच्या आधी तुमच्याकडे जी गाडी होती, ती तुम्ही लग्नानंतर इकडे का घेऊन आल्या नाहीत? मला जस्ट प्रश्न पडला." निशाने विचारले.

यावर ऋतुजा हसून म्हणाली,
"निशा, ते कसं आहे ना. ती गाडी पप्पांनी घेऊन दिली आहे, सो ती त्यांची होती. मी गाडी इकडे घेऊन आले असते तर पप्पांना काहीच प्रॉब्लेम झाला नसता, पण माझ्या नवऱ्याचा स्वाभिमान दुखावला गेला असता, म्हणून मी गाडीचा विषयच काढला नव्हता. आताही मी बसने ये-जा करू शकते, पण ते त्याला आवडणार नाही.

लग्न झाल्यावर या सगळ्याचा विचार करावा लागतो. तुझं लग्न झाल्यावर मी काय बोलते आहे याचा अर्थ कळेल बघ."

"हो, तुम्ही बोलता ते बरोबर आहे. या सगळ्याकडे मी ह्या अँगलने बघितलेच नव्हते." गप्पा मारता मारता ऑफिस कधी आले हे त्यांना कळलेच नव्हते.

ऑफिसमध्ये गेल्यावर ऋतुजाने मीनाक्षी मॅडमला ती ट्रेनिंगला जाणार असल्याचे कळवले.
—---------------------------------------------------

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर आरती व राघव आधी भेटले होते त्याच कॅफेत भेटले.

"आरती सॉरी, काल मी स्वतःहून तुला कॉफी ऑफर केली होती आणि मला अचानक निघून जावे लागले होते." राघव म्हणाला.

"इट्स ओके. तुला काम होत म्हणून तर तू गेला असशील. पण तुझ्या कॉफी मुळे माझं डोकं दुखणं थांबलं होतं." आरती म्हणाली.

"अरे ही तर चांगली गोष्ट झाली." राघव हसून म्हणाला.

"हो. आता घरी असताना जरी डोकं दुखल तरी मी कॉफी करून पीत जाईल." आरती म्हणाली.

"बरं, मला एक सांग. तू इकडे पुण्यात कशी? तुम्ही दोघे इकडे शिफ्ट झाले का?" राघवला जे प्रश्न पडले होते, ते त्याने विचारले.

"आमचा डिवोर्स झाला. मी इकडे दादा आणि वहिनी सोबत राहते." आरतीने उत्तर दिले.

"ओह, आय एम सॉरी, पण मला एक सांग, तुमच्या दोघांकडे बघून तर कधी काहीच प्रॉब्लेम वाटला नाही, मग डिवोर्स का?" राघवला प्रश्न पडला होता.

वैभवने तिला कसे फसवले हे आरतीने राघवला थोडक्यात सांगितले.

सगळं ऐकल्यावर राघव म्हणाला,
" बापरे! हे सगळं तर भयानकच आहे. वैभव असा असेल असं कधीच वाटलं नव्हतं."

"स्नेहल पण तशी वाटत नव्हतीच ना. ह्या लोकांचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात." आरती वैतागून बोलली.

"पण तू एका बाबतीत नशीबवान आहेस की, तुझ्या या वाईट फेजमध्ये तुझी फॅमिली तुझ्यासोबत आहे." राघव म्हणाला.

"मी नशीबवान आहे, पण मला माती खाण्याची सवय असते. आताही विचित्र वागून आपल्या माणसांचा विश्वास गमावला आहे." आरतीने ती कस वागली हे तिने त्याला सांगितले.

"तुला तुझी चूक कळली आहे, बरोबर ना. तर आता घरी गेल्यावर दादा, वहिनीची माफी माग. एकवेळ दादाची माफी मागितली नाहीस तरी चालेल, पण वहिनीची माग.

नशीबाने तुझी माणसं तुझ्या आसपास आहे, तर तुला एकटं राहण्याच दुःख काय आहे, हे तुला जाणवणार नाही. आणि तू अशीच वागत राहिलीस, तर त्या सगळ्या माणसांना गमावून बसशील." राघवने आरतीला समजावून सांगितले.

"राघव, काल जेव्हा तुझ्याकडून तुझी व्यथा ऐकली तेव्हाच मला माझ्या फॅमिलीचे महत्व कळले होते. दादा व ऋतू माझ्यावर रागावले आहेत, पण आता त्यांचा राग कधी निवळेल हे सांगू शकणार नाही. आता आज पुन्हा रात्री त्यांच्याशी बोलून माफी मागण्याचा प्रयत्न करून बघेल. ते दोघेही मला नक्कीच मोठ्या मनाने माफ करतील याची कल्पना मला आहे." आरती म्हणाली.

"गुड. काही गोष्टी बोलल्याशिवाय आणि फॉलोअप केल्याशिवाय कधीच पूर्ण होत नाहीत हे लक्षात ठेव. आपल्या कुटुंबातील सगळी माणसं आपलीच असतात. ते सगळं आपल्या चांगल्या साठीच बोलत असतात. समजा तुझा दादा तुला लागेल अस बोलला तरी ते सहन करण्याची ताकद तुला ठेवावी लागेल." राघवने सांगितले

यावर आरती म्हणाली,
"राघव, तू सगळं किती भारी बोलतो आहे. मला ते सगळं पटल आहे. कळतंय पण वळत नाही अशी गत माझी झाली आहे. मी तुझं सगळं बोलणं लक्षात ठेवेल."

आरतीला अभिराज व ऋतुजा लगेच माफ करतील का? बघूया पुढील भागात….