Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ३६

प्रवास लग्नानंतरचा
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ३६

मागील भागाचा सारांश: राघव सोबत बोलल्यावर आरतीला आपली माणसं आपल्या आयुष्यात असल्याने जगणं किती सोपं जातं हे तिला समजले. आरतीने सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला होता. आरतीला ऋतुजा व अभिराजची माफी मागायची होती, पण ऋतुजा व अभिराज तिच्या सोबत तुटकपणे वागले, त्याचा तिला त्रास झाला.

आता बघूया पुढे….

"अभी, तू आरती ताईंसोबत जरा जास्तच रूढ बोलला अस नाही वाटत." ऋतुजा त्याच्या पाठोपाठ चालताना बोलत होती.

अभिराज बिल्डींगच्या खाली घेऊन थांबला. ऋतुजा त्याच्या जवळ येऊन उभी राहिल्यावर तो म्हणाला,
"ऋतू, आरतीला मी अस बोललो की त्याच मलाही वाईट वाटत आहे. पण तिच्यात जर कायमची सुधारणा व्हावी अस वाटत असेल तर मला तिच्याशी तसं बोलणं भाग होतं."

"हो, पण आत्ताच बोलणं जरा अतीच झालं." ऋतुजा म्हणाली.

"आता आपण याच विषयावर बोलत बसलो तर मला जे बोलायचं होत ते बोलणं राहून जाईल." अभिराज म्हणाला.

"बरं आता तो विषय बंद. आपण आईस्क्रीम खायला कुठे जाऊयात?" ऋतुजाने विचारले.

"मी माझी बाईक घेऊन येतो, मग मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो." अभिराज.

"पायी जाऊयात ना." ऋतुजा.

"ते आईस्क्रीम पार्लर थोडं लांब आहे." अभिराज बोलून बाईक आणण्यासाठी पार्किंग मध्ये गेला.

अभिराज बाईक घेऊन आल्यावर ऋतुजा त्याच्या खांद्याचा आधार घेत बाईकवर बसली. ऋतुजाला अभिराजच्या मागे बसून प्रवासाचा आनंद घ्यायला आवडत असल्याने ती त्याच्याशी काहीच बोलली नाही. आपले डोकं तिने त्याच्या पाठीला टेकवून हातांनी कंबरेला विळखा घालून ती बसली होती.

पुढील काही वेळात अभिराजने गाडी एका आईस्क्रीम पार्लर जवळ नेऊन थांबवली. ऋतुजा गाडीवरून खाली उतरली. दोघेजण आईस्क्रीम पार्लर मध्ये गेले आणि एक रिकामा टेबल बघून तिथे ते जाऊन बसले.

टेबल वरील मेन्यू कार्ड बघत अभिराज म्हणाला,
"ऋतू, तुला कोणतं आईस्क्रीम हवं आहे?"

मेन्यूकार्ड मध्ये बघून ती म्हणाली,
"मला डच चॉकलेट."

"मी युनिकॉर्न व्हॅनिला आईस्क्रीम घेतो." अभिराजने वेटरला बोलावून दोन आईस्क्रीमची ऑर्डर दिली.

"अभी, मला तुझ्याशी एका विषयावर बोलायचं आहे, पण त्याआधी तुला काय बोलायचं आहे ते सांग." ऋतुजा म्हणाली.

"आधी तू सांग." अभिराज.

"नाही, आधी तू. तुला बोलायचं होत म्हणून आपण बाहेर आलो आहे " ऋतुजाने सांगितले.

"बरं मी सांगतो. माझ्याकडे एक गुड न्यूज आणि बॅड न्यूज आहे. आधी कोणती सांगू?" ऋतुजा कडे बघत अभिराजने विचारले.

"गुड न्यूज." ऋतुजाने सिलेक्ट केलं.

"एका स्पेशल ट्रेनिंग साठी कंपनीने माझी निवड केली. ट्रेनिंग झाल्यावर मला लगेच प्रमोशन मिळणार आहे. पोस्ट आणि पगार दोन्हींची इन्क्रीमेंट होणार आहे." अभिराज खूप खुश होता.

"वाव! कॉंग्रेच्यूलेशन्स. आय एम वेरी प्राउड ऑफ यू डिअर." ऋतुजालाही खूप आनंद झाला होता.

"ऋतू, ही सगळी तुझ्या पायगुणाची कमाल आहे. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं काही चांगल घडत आहे." अभिराज म्हणाला.

"अस काही नाहीये. पायगुण वगैरे काही नसतं. हे तुझ्या हार्डवर्कच फळ आहे. बरं बॅड न्यूज काय आहे?" ऋतुजाला अचानक लक्षात आले.

"त्या ट्रेनिंग साठी मला पंधरा दिवस तुझ्यापासून दूर रहावे लागेल आणि ते मला खूप जड जाणार आहे." अभिराज उदास चेहरा करून म्हणाला.

"ट्रेनिंग कुठे आहे?" ऋतुजाने विचारले.

"हैद्राबाद." अभिराजने उत्तर दिले.

"अच्छा. चांगलं आहे ना, तेवढंच तुला पंधरा दिवस पुन्हा एकदा बॅचलर लाईफ जगता येईल. माझ्यापासून तेवढीच सुटका." ऋतुजा गालातल्या गालात हसत म्हणाली.

वेटर आईस्क्रीम घेऊन आल्याने त्या दोघांमधील बोलणं थांबल.

"इथे तुझ्यापासून दूर राहण्याच्या कल्पनेने मला इतका त्रास होतो आहे आणि तू माझी मजा घेत आहे." अभिराज नाराज झाला होता.

आपल्या समोरील आईस्क्रीमचा एक स्कुप त्याला भरवत ऋतुजा म्हणाली,
"अरे माझ्या राजा, इतका का नाराज होत आहेस, पंधरा दिवसांचा तर प्रश्न आहे. इतक्यात भुर्रकन दिवस निघून जातील. शेवटी आपली नोकरीही तितकीच महत्त्वाची असते."

"हो, पण मला तुझ्यापासून दूर राहण्याची कल्पना करवत नाहीये. तू काहीतरी सांगणार होतीस, ते राहिलचं." अभिराज म्हणाला.

"ते सांगते, पण त्याआधी मला एक सांग. ट्रेनिंग साठी तुझी निवड झाल्यावर बॉसने तुला ऑर्डर दिली की तुला ट्रेनिंगला जायला जमेल का? असे विचारले." ऋतुजा म्हणाली.

"नरेंद्र सर, आमचे टीम मॅनेजर त्यांनी मला केबिनमध्ये बोलावून सांगितले की, 'अभिराज, तुझी एका ट्रेनिंग साठी निवड झाली आहे, ते ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तुझे प्रमोशन होईल. तुला जायला जमेल का? यावर मी लगेच हो असे उत्तर दिले.

मी चांगल्या कामासाठी जाणार असल्याने तू मला अडवलं थोडच असतं, म्हणून मी लगेच माझा होकार कळवला." अभिराज अगदी सहजपणे बोलून गेला.

ऋतुजा यावर मिश्किल हसली.

"तुझ्या या हसण्याचा आणि बोलण्याचा अर्थ मी काय घ्यायचा?" अभिराज गोंधळला होता.

यावर ऋतुजा म्हणाली,
"ज्या ट्रेनिंग साठी तुझी निवड झाली, त्याच ट्रेनिंग साठी माझीही निवड झाली आहे."

तिचं अर्ध वाक्य मध्येच तोडत अभिराज म्हणाला,
"अरे, ही तर आनंदाची बातमी आहे. आपण दोघे सोबत असल्यावर किती मजा येईल."

" आनंदाची बातमी आहेच, पण मी तुला न विचारता परस्पर निर्णय घेतला नाही. उद्या सकाळी अभिराज सोबत बोलून माझा निर्णय सांगेल अस मी मॅडमला सांगितले.

दुसरीकडे तुला मला एकदाही विचारावं वाटलं नाही. अर्थात मी तुला नकार दिला नसता, पण मी तुला कुठेही गृहीत धरलं नाही, तू मात्र आतापासूनच मला गृहीत धरलं आहे. मी एवढया दिवस हैद्राबादला जाणे तुला आवडेल की नाही हा विचार डोक्यात येत होता.

लग्न झाल्यावर फक्त मुलीनेच तिच्या पार्टनरचा विचार करायचा असतो का? मुलगा त्याच्या पार्टनरचा विचार का करत नाही?" ऋतुजा दुखावली गेली होती.

"ऋतू यार, मला तुला दुखवायच नव्हतं ग. मी तुला गृहीत धरलं हे मान्य करतो, इथून पुढे ही चूक पुन्हा कधीच करणार नाही. उद्या मॅडमला तू ट्रेनिंगला जाणार असल्याचे कळवून टाक. आपण मस्तपैकी सोबत हैद्राबाद फिरुयात. तसंही आपलं फिरणं बाकी आहेच." अभिराज ऋतुजाला नॉर्मल करण्यासाठी म्हणाला.

"आईस्क्रीम खाऊन झालं आहे, तर आपण घरी जाऊयात. मी बाहेर उभी आहे, तू बिल देऊन बाहेर ये." ऋतुजा गाल फुगवून बाहेर निघून गेली.

अभिराजने बिल दिले आणि तोही ऋतुजा जवळ जाऊन उभा राहिला. ऋतुजा काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती हे अभिराजला कळल्याने तिथे थांबून वेळ न घालवता त्याने आपली बाईक सुरू केली. ऋतुजा थोडं तुटक अंतर ठेवून त्याच्यामागे बसली. ऋतुजाच्या या कृतीतून तिला आलेला राग त्याला जाणवत होता.

बिल्डींगच्या खाली आल्यावर त्याने बाईक उभी केली. ऋतुजा बाईक वरून उतरली. अभिराजची वाट न बघता ती घरात निघून गेली. अभिराजही तिच्या मागोमाग पटकन घरी गेला. पंकज हॉलमध्ये झोपलेला होता, तर आरती तिच्या रुममध्ये झोपलेली होती.

आपल्या रूममध्ये गेल्यावर ऋतुजाने ड्रेस चेंज केला आणि अभिराज सोबत काही न बोलता ती बेडवर जाऊन पडली. अभिराज कपडे चेंज करून तिच्या शेजारी जाऊन झोपला. ऋतुजा त्याच्यापासून थोडी दूर जाऊन दुसरीकडे तोंड वळवून झोपली.

"ऋतू, इतकं काही झालं आहे का? एवढं चिडण्याचं काही कारण आहे का? तुझी परमिशन घ्यायला हवी होती हे माझ्या लक्षात आलं नाही. इथून पुढे अस होणार नाही, हेही बोललो तरी तू अजून चिडलेली आहेस." अभिराज तिला आपल्या जवळ ओढत म्हणाला.

ऋतुजाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला थोडं दूर ढकलल. अभिराजने तिला पुन्हा जवळ ओढलं, यावेळी त्याची मिठी इतकी घट्ट होती की तिला त्यातून बाहेर पडता आलं नाही. अभिराजने तिच्या कपाळावर ओठ टेकवून तिला गुड नाईट किस केलं. ऋतुजाचा राग त्याच्या मिठीत विरघळला होता.