अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ९

Rutuja accepts abhiraj's interest on matrimony site

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ९

मागील भागाचा सारांश: अभिराजने एका आजी आजोबांना रस्ता ओलांडण्यात मदत केली. अभिराजला मनासारखा फ्लॅट मिळाला होता. अभिराजच्या भावाला पंकजला बी ई ला फर्स्ट क्लास मिळाला होता. प्रतिकला अभिराजने लग्न करणार असल्याचे घरच्यांना कळवण्याबद्दल सुचवले.

आता बघूया पुढे… 

ऋतुजा व वैशाली घरी पोहोचल्यावर त्यांनी बघितले की, रणजीत, अर्पिता व आरव घरी आलेले होते. ऋतुजाला दारात बघताच आरवने पळत येऊन तिला मिठी मारली. ऋतुजाने त्याला उचलून घेऊन त्याची पप्पी घेतली. मग आरव वैशाली कडे गेला.

"दादा, वहिनी तुम्ही कधी आले?" ऋतुजाने विचारले.

"सकाळी बाबांचा फोन आला होता, त्यांना आरवची आठवण येत होती, तर म्हटलं चला आपणच जाऊन येऊयात." रणजीतने उत्तर दिले.

"सुलभा मावशी, मनोहर काका, पियू सगळे कसे आहेत?" अर्पिताने विचारले.

वैशाली म्हणाली,

"मजेत आहेत. दोघी मायलेकींमध्ये जरा मनमिटाव चालू होते. ऋतूने त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याचे काम केले. जनरेशन गॅपमुळे आई व मुलीत प्रॉब्लेम येतात."

"आई तुमच्यात व ऋतूमध्ये असे कधी गैरसमज निर्माण झाले नाहीत का?" अर्पिताने विचारले.

"आमच्या दोघींमध्ये अशी कधी वेळच आली नाही. कारण ऋतू मला सगळं सांगायची. मी कधी तिच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावला नाही. मला कधी शंका आलीच तर मी त्याबद्दल तिला सरळ विचारुन टाकायचे. सुलभा माझ्यापेक्षा थोडी वेगळी आहे." वैशालीने सांगितले.

ऋतुजा फ्रेश होण्यासाठी रुममध्ये निघून गेली. पियू आणि सुलभा सोबत जरा जास्तच बोलणं झाल्याने तिला थकवा जाणवत होता. ऋतुजा बेडवर शांत डोळे झाकून जरावेळ पडली. तेव्हा तिच्या अचानक अभिराज काळेच्या रिक्वेस्ट लक्षात आली, म्हणून तिने पुन्हा एकदा मॅट्रिमोनीची साईट ओपन केली. तर सकाळपासून तिला पाच ते सहा मुलांच्या रिक्वेस्ट आल्या होत्या. ऋतुजाने एकेक प्रोफाईल चेक केली. ऋतुजाने विचार केला की, दादा घरी आला आहेच, ते त्याच्या समोर हा विषय घेऊयात. सगळ्यांना जी प्रोफाईल आवडेल, त्याची रिक्वेस्ट मी ऍक्सेप्ट करेल.

ऋतुजा हॉलमध्ये आली, तेव्हा वैशाली व अर्पिता किचनमध्ये स्वयंपाक बनवत होत्या. रणजीत लॅपटॉप घेऊन बसला होता, तर आरव शरद सोबत खेळत होता. ऋतुजा रणजीतच्या शेजारी जाऊन बसली.

"ऋतू जॉब कसा सुरु आहे?" रणजीतने लॅपटॉप मध्ये बघून विचारले.

"चांगला चाललाय." ऋतुजाने उत्तर दिले.

रणजीत म्हणाला,

"बाबा म्हणत होते की, तू मॅट्रिमोनी साईटवर अकाउंट अपडेट केले म्हणून. तर त्यावर काही रिस्पॉन्स आला आहे का? तुला ज्या प्रोफाईल आवडतील त्या शॉर्टलिस्ट करुन ठेव, मग आपण विचार करुन ठरवूयात."

यावर ऋतूजा म्हणाली,

"दादा मी त्याच विषयावर तुझ्याशी बोलायला आले होते, पण तू कामात दिसतो आहेस म्हणून मी लगेच विषय काढला नाही."

रणजीत लॅपटॉप बंद करत म्हणाला,

"हे बघ हातातील काम बाजूला ठेऊन देतो. बोल काय बोलायचंय?"

मग ऋतुजाने रणजीतला इंटरेस्ट आलेल्या मुलांच्या प्रोफाईल दाखवल्या. रणजीतने सर्व प्रोफाईल बारकाईने बघितल्या.

"ऋतू ह्या सगळ्यांमध्ये अभिराज काळे मला जरा बरा वाटतोय. हे बघ त्याची फॅमिली मिडल क्लास आहे. तीन भाऊ आणि एक बहीण असा मोठा परिवार आहे. नोकरीला तो पुण्यातचं आहे. सो तुझी पुण्यात रहाण्याची इच्छाही पूर्ण होईल. अभिराज दिसण्यावरुन तरी संस्कारी वाटतोय. एकदा भेट घेतल्या शिवाय त्याचा स्वभाव समजणार नाही. मला तरी वाटतंय की, एकदा त्याची भेट घे. मग पुढे ठरवूयात." रणजीतने सांगितले.

ऋतुजा म्हणाली,

"दादा मलाही त्याचीच प्रोफाईल आवडली होती. मी त्याचा इंटरेस्ट ऍक्सेप्ट करु का?"

"कर आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन भेटायचं ठरवून घे. तू पहिले त्याला भेट. तुला आवडला तरचं आम्ही त्याला भेटू. आता सगळेच भेटायला गेलो, तर तो गोंधळेल आणि तुम्हाला दोघांना आमच्या समोर व्यवस्थित बोलता येणार नाही." रणजीतने सांगितले.

ऋतुजाने मान हलवून होकार दिला. 

"आई तुला सुखद धक्का देणारी एक बातमी आहे." रणजीतने आईला आवाज देऊन सांगितले.

आई घाईघाईने किचनमधून येऊन म्हणाली,

"काय रे, काय बातमी आहे?"

"आपल्या ऋतूला एका मुलाने इंटरेस्ट पाठवला होता आणि तो मुलगा ऋतू व मला बरा वाटलाय. ऋतू त्या मुलाला भेटायला जायला तयार झाली आहे." रणजीतने सांगितले.

यावर आई म्हणाली,

"अरे मग आपण त्याला घरी बोलवूयात ना. ऋतूला बाहेर भेटायला का पाठवायचे?"

रणजीत म्हणाला,

"आई थोडं शांतीने घेऊयात ना. लग्न ऋतूला करायचं आहे, तर आधी त्या दोघांना भेटू देऊयात. मग आपण भेटू. आपल्या समोर ते दोघे अवघडतील."

"रणजीत बोलतो ते बरोबर आहे. आधी या दोघांना भेटू देऊयात. मग पुढे काय करायचं? हे ठरवू. वैशाली थोडी शांतता घे. लगेच लग्न फिक्स झालं, असं होणार नाही. मुलगा व्यवस्थित वाटला, तरचं आपण पुढे जाऊयात." शरदने सांगितले.

वैशालीने मान हलवून होकार दर्शवला. ऋतुजाने अभिराजची रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली. जेवण करण्यासाठी आईने आवाज दिल्यावर ऋतुजाने मोबाईल बाजूला ठेऊन दिला. सगळ्यांनी मिळून हसतखेळत गप्पा मारत जेवण केले. जेवण झाल्यावर ऋतुजा आरव सोबत खेळत बसली होती.

---------------------------------------------------- 

पंकज सोबत बोलून झाल्यावर अभिराजने मोबाईलचे नेट ऑन केले तर, त्याला नोटिफिकेशन आले की, 'युअर इंटरेस्ट इज ऍक्सेप्टेड बाय ऋतुजा सोनवणे.'

नोटिफिकेशन बघून अभिराजच्या पोटात गुदगुल्या झाल्या. आता पुढे बोलणं चालू करण्यासाठी अभिराजने ऋतुजाला मॅसेज करण्याचे ठरवले. पण काय मॅसेज करावा? ह्या विचारात पुढील पंधरा ते वीस मिनिटे निघून गेली. मॅसेज कोणत्या भाषेत करावा? हाही गोंधळ त्याच्या मनात निर्माण झाला होता.

शेवटी अभिराजने मॅसेज केला की, "हाय इफ यू आर ओके विथ माय प्रोफाईल, प्लिज फिल फ्री टु कॉन्टॅक्ट ऑन माय व्हाट्सएप नंबर." 

अभिराजने ऋतुजाला त्याचा नंबर पाठवला. ऋतुजाच्या रिप्लायची वाट अभिराज बघत बसला होता. अर्धा तास होऊन गेला, तरी ऋतुजाचा काहीच रिप्लाय आला नव्हता. मग कंटाळून अभिराज वेब सेरीज बघत बसला. दुपारी एवढी झोप काढल्याने त्याला झोप काही लवकर लागणार नव्हती. अभिराजने मोबाईलचे इंटरनेट मात्र चालूच ठेवले होते. ऋतुजाच मॅसेज आल्यावर त्याला लगेच समजले पाहिजे, हा त्यामागील हेतू होता.

साधारणपणे रात्री ११ च्या दरम्यान ऋतुजाने अभिराजच्या व्हाट्सएप वर मॅसेज आला,

"हाय, ऋतुजा सोनवणे हिअर. माझ्या दादाला तुमची प्रोफाईल आवडली आहे, तर आपण दोघांनी पहिले भेटून बोलावे, असं दादाने सुचवलं आहे. यावर तुमचं काय मत आहे?"

अभिराजने लगेच रिप्लाय केला,

"हाय. माझा बायोडाटा पाठवू का? माझ्या बद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी असेल, तर मी सांगतो."

ऋतुजा ऑनलाईन असल्याने तिने लगेच रिप्लाय केला,

"बायोडाटा पाठवून ठेवा. तुमच्या बद्दल डिटेलमध्ये भेटूनच बोलूयात. उद्या मला सुट्टी आहे, तर आपण भेटू शकतो का? म्हणजे उगाच टाईमपास करण्यात काहीच अर्थ नाहीये."

'अरे बापरे. ह्या मुलीने तर उद्या डायरेक्ट भेटायलाच बोलावलं आहे. एका अर्थाने ते बरंच आहे. उद्या भेटायला जाऊ की नको? काहीच कळत नाहीये.' अभिराज काय रिप्लाय द्यावा याचा विचार करत बसला होता, मग शेवटी त्याने विचार करुन रिप्लाय केला,

"मलापण सुट्टी आहे. तर आपण भेटू शकतो. वेळ आणि प्लेस मॅसेज करुन ठेवा. मी वेळेत पोहोचेल."

"हो चालेल. आणखी एक गोष्ट तुमचा जर पत्रिकेवर विश्वास असेल, तर आपली पत्रिका जुळवून बघा. पुढे जाऊन उगाच पत्रिकेचे कारण ऐकून नकार दयायला नको, म्हणून सांगतेय." ऋतुजाने मॅसेज केला.

अभिराजने विचार न करता रिप्लाय केला,

"माझा पत्रिकेवर विश्वास नाहीये. लग्न करताना पत्रिका जुळण्यापेक्षा मनं जुळायला हवे, असं माझं मत आहे."

ऋतुजाने मॅसेज बघून सुद्धा काहीच रिप्लाय केला नाही. ऋतुजाने रिप्लाय न दिल्याने अभिराजचे टेन्शन वाढले होते. आपलं बोलणं तिला आवडलं नसेल का? हा विचार अभिराजच्या डोक्यात येत होता.

अभिराज व ऋतुजाची पहिली भेट कशी होईल? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all