Login

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ६२

सुरुवात एका नवीन नात्याची
अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ६२

मागील भागाचा सारांश: हर्षलचा अपघात झाला असून तो कोमात गेल्याचे अभिराजने रश्मी व ऋतुजाला सांगितले. अभिराज लगेच हर्षलला भेटायला निघाला होता. ऋतुजाने पंकजला सोबत घेऊन जा, म्हणून सुचवले. आरतीला ऋतुजाने आपल्या घरी बोलावून घेतले होते.

आता बघूया पुढे….

जेवण झाल्यावर ऋतुजा व आरती ऋतुजाच्या रुममध्ये झोपण्यासाठी गेल्या. ऋतुजा फोनकडे व घड्याळाकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावरुन ती काळजीत असल्याचे दिसत होते.

"ऋतू, कोणाच्या फोनची वाट बघत आहेस?" आरतीने विचारले.

"अभीच्या. तो तिथे पोहोचला असेल की नाही? काही कळत नाहीये. मी तरी त्याला बजावून सांगितलं होतं की, तिथे गेल्यावर मला फोन किंवा मॅसेज कर म्हणून. अजून काहीच पत्ता नाहीये." ऋतुजा म्हणाली.

"ऋतू, त्याच्या सोबत पंकज आहे ना. पंकज दादाला बरोबर सांभाळेल. तू दादाची काळजी करु नकोस." आरतीने ऋतुजाला समजावून सांगितले.

"पंकज दादा आहेत, पण हर्षल बद्दल बोलताना अभी जरा जास्तच इमोशनल झाला होता, म्हणून मला त्याची काळजी वाटत आहे." ऋतुजा म्हणाली.

"आपला अभी दादा इमोशनल आहेच. लगेच डोळयात पाणी येतं. हर्षल दादाचा जवळचा मित्र आहे, म्हणून त्याला वाईट वाटत असेल." आरती म्हणाली.

आरती व ऋतुजाचं बोलणं चालू असताना रश्मीचा फोन आला.

"हॅलो, हं रश्मी बोल." ऋतुजा म्हणाली.

"अभिराजचा काही फोन आला होता का?" रश्मीने विचारले.

"नाही ना. मी त्याच्याच फोनची, मॅसेजची वाट बघत आहे." ऋतुजाने उत्तर दिले.

रश्मी म्हणाली,
"तिकडे सगळं ठीक असेल ना?"

"जर तसं काही असतं, तर पंकज दादांनी फोन केला असता. कदाचित अभी तिकडे वेगळ्या गोंधळात असेल किंवा तिकडे नेटवर्क नसेल. तू झोप आता. मला काहीही कळलं की, मी तुला लगेच कळवते." ऋतुजाने सांगितले.

"हो. हवंतर मला मॅसेज करुन ठेव. माझा फोन सायलेंटला असेल तर मी उचलणार नाही." रश्मी म्हणाली.

"तू आता जास्त विचार करत बसू नकोस. हर्षलला काही होणार नाही." ऋतुजाने सांगितले.

फोन कट झाल्यावर आरती म्हणाली,
"रश्मी व हर्षल मध्ये काही चालू आहे का?"

"हर्षलला ती आवडते, पण तिला तो एक मित्र म्हणून आवडतो. कॉलेजमध्ये एकत्र असल्याने एकमेकांची सवय झालेली असते, म्हणून तिला त्याच्या बद्दल कळल्यावर वाईट वाटत असेल." ऋतुजाने सांगितले.

"कदाचित तिचंही त्याच्यावर प्रेम असेल." आरती म्हणाली.

"असूही शकेल. हा प्रश्न त्या दोघांचा आहे. आपण त्यात न पडलेलं बरं." ऋतुजा म्हणाली.

"पण तुम्ही दोघी तर जिवलग मैत्रिणी आहात ना? मग या विषयावर तू तिच्याशी डायरेक्ट बोलूच शकते ना?" आरतीने विचारले.

"आरती दीदी, आमची भेट कंपनीत जॉईन झाल्यावर झाली. आम्ही दोघी एकाच प्रोजेक्टवर काम करत असल्याने आमच्यात बोलणं होतं गेलं, थोडेफार विचार जुळले आणि मैत्री झाली.

आता रश्मीच्या जागेवर शरयू असती, तर मी तिला हा प्रश्न डायरेक्ट विचारला असता. प्रत्येकासोबत होणारी मैत्री वेगवेगळी असते ना? आता शरयू की रश्मी यातील माझी जिवलग मैत्रीण कोण? हा प्रश्न जर तुम्ही विचारला तर माझ्याकडे त्याचं उत्तर नसेल.

रश्मीची माझ्या आयुष्यात एन्ट्री वेगळ्या फेजमध्ये झाली आहे, तर शरयूची वेगळ्या. आता ऑफिस मधील काही बोलायचं असेल, तर ते मी शरयू सोबत बोलू शकत नाही, ते रश्मी सोबतच बोलावं लागतं." ऋतुजा बोलत असताना तिला मध्येच थांबवत आरतीने विचारले,

"आता ही शरयू कोण?"

आपल्या डोक्यात टपली मारत ऋतुजा म्हणाली,
"अरे हो, मी तुम्हाला तिच्याबद्दल काही सांगितलंच नाही ना. शरयू आणि मी शाळेपासून ते कॉलेजपर्यंत सोबत होतो. कॉलेज संपलं आणि तिचं लग्न झालं. शरयू आता नाशिकला राहते. तिच्या नवऱ्याची म्हणजेच पंकज जिजूंची छोटीशी तिथे कंपनी आहे.

शरयूला मागच्या आठवड्यात मुलगा झाला. तिला भेटायला जायचं राहून गेलंय. आम्ही एकमेकांच्या संपर्कात नसलो, तरी आमची मैत्री पहिले जशी होती, तशीच आहे.

मैत्री अशीच असायला हवी ना? शेवटची भेट, फोन होऊन महिने, वर्षे जरी लोटले असतील, तरी पुढच्या बोलण्यात जिथं बोलणं संपलं होतं, तेथूनच सुरुवात व्हावी.

रश्मीही माझी जवळची मैत्रीण आहे, पण प्रत्येकाला त्याची स्पेस आपण द्यायला हवी. ती जेव्हा स्वतःहून हर्षल बद्दल काही बोलेल, तेव्हा मी विचारेल. जोपर्यंत ती त्यावर विचार करणार नाही, बोलणार नाही, तोपर्यंत मी तिच्याशी या विषयावर बोलणार नाही.

आता मैत्री आणि मैत्रिणींचा विषय निघाला आहेच, तर जरा तुमच्याही मैत्रिणींबद्दल कळूद्यात ना?"

आरती हसून म्हणाली,
"तुला जशी जिवलग मैत्रीण आहे, तशी मला नाहीये. कधी गरजही वाटली नव्हती. शाळेत असताना आजूबाजूच्या मुली मैत्रीण म्हणून नावाला होत्या. मला कधी तसा बॉण्ड वाटलाच नाही. कॉलेजमध्ये असतानाही मैत्रिणी होत्याच, पण कॉलेज संपलं आणि मैत्रीही संपली.

आजरोजी भेटल्यावर बोलू, पण संपर्कात राहू असं कोणी नाहीये. मुंबईला कॉलेजमध्ये असतानाही मैत्री झालीच होती, पण त्यानंतर आयुष्यात इतकं काही घडून गेलं की, त्यांच्यातील कोणाशीच कॉन्टॅक्ट ठेवावा वाटला नाही.

मोबाईलमध्ये फोन नंबर नावाला सेव्ह आहेत. माझा स्वभाव तुसडा नाहीये, पण मैत्री आणि माझं समीकरण कधी जुळलंच नाही."

"आता कंपनीत एखादी मैत्रीण तयार करा. जबरदस्तीने नाही, पण जर सहजासहजी होत असेल तर. मला मैत्री करायला आवडते आणि ती निभवायला सुद्धा आवडते. आपण जे कोणासोबत बोलू शकत नाही, ते मैत्रिणी सोबत बोलू शकते. शरयू किंवा रश्मी घ्या, त्या दोघींना जर मी काही सांगायला गेले, तर त्या पहिले मी कुठे चुकते? हे दाखवून देतात, मग समोरच्याची चूक दाखवून माझ्या बोलण्याला दुजोरा देतात.

आपल्या हो ला हो मिळवणाऱ्या मैत्रिणी काही कामाच्या नसतात. अर्थात हे माझं मत आहे. चला तुम्हालाही झोपायचं असेल. माझं तत्वज्ञान सुरुचं राहिलं." ऋतुजा म्हणाली.

यावर आरती हसून म्हणाली,
"मला तुझं तत्वज्ञान ऐकायला आवडतंय. झोपायला तर हवंच. सकाळी आपल्याला ड्युटी आहे."

अभिराजला मॅसेज करुन ऋतुजा व आरती या दोघी झोपेच्या अधीन झाल्या.