अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ५६

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ५६


मागील भागाचा सारांश: अजय शीतलला घ्यायला गेला होता. ऋतुजाच्या बाबांनी लग्नासाठी मुहूर्ताच्या तारखा काढून आणल्या होत्या. ऋतुजा ऑफिस मधून थकून आल्याने तिच्या आईला लग्नानंतर तिचं कसं होईल? याची काळजी वाटत होती. सुलभा ऋतुजाच्या आई-बाबांना भेटायला त्यांच्या घरी आली होती.


आता बघूया पुढे….


स्वयंपाक झाल्यावर ऋतुजाची आई तिला बोलावण्यासाठी रुममध्ये गेली. ऋतुजा ब्लॅंकेट घेऊन झोपलेली होती. ऋतुजाची आई तिच्याजवळ गेली, तिने तिच्या डोक्यावरुन हात फिरवला, तर ऋतुजाला ताप आल्याचे तिला जाणवले. 


"आई, मला बरं वाटत नाहीये ग. झोपू दे." आईची चाहूल लागल्यावर ऋतुजा हळूच डोळे न उघडता म्हणाली.


"ऋतू, तुला ताप आला आहे, चल आपण डॉक्टरकडे जाऊयात. अशीच झोपून राहिलीस, तर तुझा ताप अजून वाढेल." ऋतुजाच्या आईने सांगितले.


ऋतुजाच्या आईने तिच्या बाबांना आवाज दिला, त्यांनी ऋतुजाला बळजबरी झोपेतून उठवले. ऋतुजाला थंडी वाजत असल्याने तिच्या आईने तिला स्वेटर घालायला दिले. 


ऋतुजाचे बाबा तिला घेऊन फॅमिली डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी ऋतुजाला इंजेक्शन दिले. गोळ्या-औषधे घेऊन ऋतुजा घरी आली.


ऋतुजाला काहीच खाण्याची इच्छा होत नसल्याने तिच्या आईने बळजबरी मुगाच्या डाळीची खिचडी खायला घातली. गोळ्या घेऊन ऋतुजा झोपून गेली.


ऋतुजा आजारी असल्याचे अभिराजला माहीत नव्हते. अभिराज ऋतुजाला फोन करत होता, पण तिचा फोन सायलेंटवर असल्याने तिला कळलंच नाही. ऋतुजा फोन उचलत नसल्याने अभिराजला तिची काळजी वाटत होती.


रात्र झाल्याने अभिराज तिच्या बाबांच्या फोनवर फोन करुन चौकशीही करु शकत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋतुजाला जाग आली, तेव्हा तिने मोबाईल बघितला, तर अभिराजचे जवळपास वीस मिस्डकॉल होते.


ऋतुजाने घड्याळात बघितले, तर सात वाजले होते. ऋतुजाने अभिराजला फोन केला. चार ते पाच रिंगनंतर फोन उचलला गेला.


"सॉरी अभी, मी लवकर झोपून गेले होते. मोबाईल सायलेंटवर असल्याने माझ्या लक्षातच आले नाही." फोन उचलल्या बरोबर ऋतुजाने आपली बडबड सुरु केली.


"हॅलो ऋतू, अभी दादा अंघोळ करतोय. तो बाहेर आला की, मी त्याला तुला फोन करायला सांगते." आरतीचा आवाज ऐकून ऋतुजा शांत झाली. 


पाच मिनिटांनी अभिराजने ऋतुजाला फोन केला.


"हं बोल, काय म्हणतेस?" अभिराजच्या आवाजावरुन तो चिडलेला असल्याचे ऋतुजाला जाणवले होते.


"अभी, काल ऑफिस मधून आल्यावर मला ताप आला होता. बाबा मला बळजबरी डॉक्टरकडे घेऊन गेले होते. माझ्या अंगात त्राण राहिला नव्हता. जेवण सुद्धा आईने भरवले होते. या सगळ्यात तुला फोन किंवा मॅसेज करायचा राहूनच गेला. गोळ्या घेतल्याने गुंगी आली होती." ऋतुजाने सांगितले.


"बरं ठीक आहे. मला ऑफिसला लवकर जायचे आहे. संध्याकाळी ऑफिसवरुन येताना तुला भेटायला येतो. आज ऑफिसला जाऊ नकोस, घरीच आराम कर. मी आल्यावर बोलू." अभिराजने एवढं बोलून फोन कट केला.


अभिराजला ऋतुजाचा राग आला होता, हे त्याच्या कृतीतून स्पष्ट दिसून येत होते. ऋतुजाने ती येणार नसल्याचे फोन करुन ऑफिसमध्ये सांगितले. ऋतुजाला रात्रीपेक्षा जरा बरं वाटत होतं. अंगात अजूनही थोडा ताप असल्याने आईने तिला अंघोळ करु दिली नव्हती.


सुलभा आपल्या घरी जाण्याआधी ऋतुजासोबत गप्पा मारुन गेली. जेवण करुन गोळ्या घेतल्यावर ऋतुजा तिच्या रुममध्ये जाऊन पडली होती.


तेवढ्यात तिला शीतलचा फोन आला.


"हॅलो ऋतू, तू बिजी आहेस का?" शीतलने विचारले.


"नाही. बोल ना." ऋतुजाने उत्तर दिले.


"तुला बरं वाटत नाहीये का? आवाज खूपच लो येत आहे." शीतलने काळजीने विचारले.


"हो. कालपासून जरा तब्येत बिघडली आहे. आज घरीच आहे." ऋतुजाने सांगितले.


"तुला आराम करायचा असेल तर कर. मी नंतर फोन करते." शीतल म्हणाली.


"मी आरामचं करते आहे. तू बोल. अजय दादा तुला घ्यायला आले होते, हे मला अभीकडून कळालं होतं." ऋतुजा म्हणाली.


यावर शीतल म्हणाली,

"हो. तू सांगितल्याप्रमाणे मी आईंना फोन केला, तर लगेच दुसऱ्या दिवशी अजय मला घ्यायला आले होते. आमच्यात काहीच घडलं नाही, याप्रमाणे अजय वागत, बोलत होते. 


अजयच्या वागण्यात बराच फरक पडलेला मला आढळून आला. पहिले अजय घरी आल्यावर घरात जास्त रहायचे नाही. मित्रांसोबत बाहेरच भटकत बसायचे. आता परीसोबत वेळ घालवतात. तिला खेळवतात. 


काल स्वतःहून मला बाहेर जेवायला घेऊन गेले होते, त्यांना माझ्यासोबत बोलायचे होते, म्हणून परीला घरीच ठेवून गेलो होतो.


जेवण करताना अजयने स्वतःहून पार्लरचा विषय काढला. अजयचा पार्लरला का विरोध आहे? यामागील खरं कारण काल मला कळलं.


अजयचा एक मित्र मुंबईला राहत होता, त्याच्या बायकोने पार्लर टाकलं होतं. पार्लरमुळे तिचा संपर्क काही चुकीच्या बायकांसोबत आला. पैश्यांच्या हव्यासापोटी ती नको ते काम करायला लागली होती. पार्लरच्या नावाखाली ती सेक्स रॅकेट चालवत होती.


अजयच्या मित्राला त्याची काहीच कल्पना नव्हती. पोलिसांची रेड पडल्यावर त्याला सगळं प्रकरण कळालं. 


अजयला ते प्रकरण कळाल्यामुळे त्यांचा पार्लर टाकायला विरोध आहे. अजयचं म्हणणं आहे की, तुला घरात बसून जे काम करायचं असेल, ते कर. फक्त पार्लरचं नाव काढू नकोस. 


मलाही अजयचं म्हणणं पटलंय, पण घरात बसून काय करु हेच सुचत नाहीये?" 


"अजय दादांनी हे सुरुवातीलाचं सांगितलं असतं, तर एवढा गोंधळ झाला नसता. तू मेहंदीचे डिझाइन काढून इन्स्टाग्राम व युट्युबवर टाकू शकतेस. त्यातून तुला लगेच इन्कम सुरु होणार नाही, पण काही दिवसांनी फॉलोवर वाढल्यावर इन्कम सुरु होईल." ऋतुजाने सांगितले.


"पंकज दादा याबद्दल मला चांगली माहिती देतील. मी एकदा त्यांच्यासोबत बोलून घेते. तू आराम कर." एवढं बोलून शीतलने फोन कट केला.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all