अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ५५

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ५५


मागील भागाचा सारांश: ऋतुजाने शीतलला फोन करुन समजावून सांगितले. शीतलच्या मनात नेमकं काय सुरु आहे? याचा अंदाज तिने घेतला. शीतलला सासरी परत जाण्याचा सल्ला ऋतुजाने दिला.


आता बघूया पुढे….


शीतल सोबत फोनवर बोलून झाल्यावर ऋतुजाने अभिराजच्या आईला फोन करुन त्यांच्यातील बोलणं सविस्तरपणे सांगितलं.


आरव झोपेतून उठल्यावर ऋतुजा त्याच्या सोबत खेळत बसली होती. रणजीत घरी आल्यावर सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केले.


जेवण झाल्यावर रणजीत म्हणाला,

"ऋतू, उद्या आपण एका ऍग्रोटुरिझमला जाऊयात. आरव तिथे खेळेलही आणि आपल्यालाही मस्त वाटेल. अभिराज आपल्या सोबत येणार आहे का?"


"नाही, त्याला बाकीची काम आहेत. तो यायला नाही म्हणाला." ऋतुजाने सांगितले.


"आई-बाबा आल्यावर तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढुयात. साखरपुडा व लग्नात जास्त गॅप पडणे योग्य नाही." रणजीत म्हणाला.


"बाबाही जाताना हेच म्हणून गेले होते. आता आल्यावर ते त्याच कामाला लागतील." ऋतुजाने सांगितले.


दुसऱ्या दिवशी ऋतुजा, रणजीत, अर्पिता व आरव चौघेजण ऍग्रोटुरिझमला गेले. चौघांनी भरपूर फोटोज काढले. ऋतुजाने फोटोज काढून अभिराजला पाठवले. 


ऋतुजाला अभिराजने मॅसेज करुन अजय शीतलला घ्यायला गेला असल्याचे सांगितले.


ऋतुजाचे आई-बाबा वैष्णोदेवीहून परतले होते. रणजीत त्या दोघांना आपल्या घरी घेऊन आला. रणजीतने बाबांची माफी मागितली, तसेच पुन्हा असं न वागण्याचे वचन त्याने आई व बाबांना दिले.


दुसऱ्या दिवशी ऋतुजा व तिचे आई-बाबा त्यांच्या घरी परत गेले. ऋतुजाला रणजीतच्या घरुन ऑफिस दूर पडत होते.


दोन ते तीन दिवसांनी ऋतुजाच्या बाबांनी ब्राम्हणाकडे जाऊन लग्नासाठी मुहूर्ताच्या तारखा काढून आणल्या.


"ऋतू, मी तुला व्हाट्सअप्पवर लग्नाच्या तारखा पाठवल्या आहेत, त्यातून तुला कोणती योग्य वाटते? ती सांग." ऋतुजा ऑफिसमधून येऊन सोप्यावर बसत असताना तिचे बाबा म्हणाले.


"बाबा, अभीच्या बाबांना विचारलंय का?" ऋतुजाने विचारले.


"मी त्यांना फोन करुन सांगितलं आहे. ते मला उद्या कळवणार आहेत. लग्न तुझं आहे म्हटल्यावर तुझंही मत विचारात घ्यावं लागेल ना." ऋतुजाचे बाबा म्हणाले.


"बाबा, तारीख कोणतीही फायनल करा. फक्त त्या दिवशी रविवार असला पाहिजे. सुट्टीचा दिवस असला की, सगळ्यांना लग्नाला येता येईल. लग्नाला न येण्याचं कोणी कारण देऊ शकणार नाही." ऋतुजाने सांगितले.


"बरं, तसंच करु. तू थकलेली दिसत आहेस. आज ऑफिसमध्ये जास्त काम होतं का?" बाबा म्हणाले.


यावर ऋतुजा म्हणाली,

"बाबा, सध्या जाम हेक्टिक प्रोजेक्ट सुरु झाला आहे. पुढील आठ ते दहा दिवस असेच जाणार आहेत. मी फ्रेश होऊन जरावेळ पडते."


ऋतुजा रुममध्ये गेल्यावर तिची आई किचन मधून हॉलमध्ये येऊन तिच्या बाबांना म्हणाली,

"लग्नानंतर ही थकून घरी आल्यावर हिला आयतं खायला कोण देईल? आपली ऋतू कसं मॅनेज करणार आहे, काय माहीत?"


"तू तिची काळजी करु नकोस. अभिराज खूप चांगला मुलगा आहे, तो तिला सांभाळून घेईल. जबाबदारी माणसाला सगळं काही शिकवते. ऋतूही हळूहळू शिकेल. पाण्यात पडल्याशिवाय माशाला पोहता येत नाही." ऋतुजाचे बाबा म्हणाले.


"आपली ऋतू सगळं ऍडजस्ट करुन घेईल, याची मला खात्री आहे, पण घर आणि ऑफिस सांभाळताना तिची बरीच तारांबळ उडणार आहे." ऋतुजाची आई म्हणाली.


ऋतुजाचे बाबा काही बोलणार एवढ्यात दरवाजावरील बेल वाजली. ऋतुजाच्या बाबांनी दरवाजा उघडला, तर दारात सुलभा उभी होती.


"आज तुम्ही इकडे यावेळी कशा काय?" ऋतुजाच्या बाबांनी विचारले.


सुलभा घरात येत म्हणाली,

"माझ्या बहिणीचं घर आहे. मी कधीही येऊ शकते."


"सुलभा ताई, तुम्ही संध्याकाळच्या वेळी येत नाहीत ना, म्हणून विचारलं." ऋतुजाच्या बाबांनी स्पष्टीकरण दिले.


"सुलभा, तू एकटीच आलीस का?" ऋतुजाच्या आईने विचारले.


"हो. तुम्ही दोघे वैष्णोदेवीवरुन आल्यापासून तुम्हाला भेटायला यायचं होतं. पियूची परीक्षा चालू असल्याने तिला जमणार नव्हतं, मग तिच्या सोबत तिचे बाबा थांबले. रात्रीचा स्वयंपाक करुन आले. मुक्कामी आलं म्हटल्यावर तुझ्याशी निवांत गप्पा मारता येतील." सुलभाने सांगितले.


"तू किचनमध्ये ये. मी स्वयंपाक करते. स्वयंपाक करता करता आपल्या गप्पाही होतील." ऋतुजाची आई म्हणाली.


सुलभा किचनमध्ये गेली.


"ऋतू ऑफिस मधून आली का?" सुलभाने विचारले.


"हो आलीय ना. ती थकून आली आहे, म्हणून जरावेळ पडली आहे. मला तर तिची काळजी वाटते आहे." ऋतुजाची आई म्हणाली.


"काळजी ती कसली?" सुलभाला प्रश्न पडला.


ऋतुजाची आई म्हणाली,

"लग्नानंतर तिचं कसं होईल? ऑफिस, घर दोन्ही तिच्याकडून मॅनेज होईल का?"


"होईल ग. समजा नाही झालं, तर कामाला बाई लावून घेईल. आपली ऋतू समजदार आहे, ती सगळं मॅनेज करुन घेईल. एक आई म्हणून तुला वाटणारी काळजी रास्त आहे, पण त्याचा अतिविचार करु नकोस. वेळेवर जे होईल ते बघून घेता येईल." सुलभाने समजावून सांगितले.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe








🎭 Series Post

View all