अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ५३

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ५३


मागील भागाचा सारांश: आरतीला नोकरी लागल्याचे सेलिब्रेशन करण्यासाठी अभिराज, पंकज, आरती व ऋतुजा रणजीतच्या हॉटेलमध्ये जेवण करायला गेले होते. जेवण झाल्यावर ऋतुजा रणजीतच्या घरी गेली.


आता बघूया पुढे….


ऋतुजाने दरवाजावरील बेल वाजवली, अर्पिताने दरवाजा उघडला. अर्पिताने ऋतुजाला बघून स्माईल दिली. ऋतुजा सोप्यावर जाऊन बसली. अर्पिताने तिला पाणी आणून दिले. ऋतुजा काही बोलणार तेवढ्यात अर्पिताने नजरेने तिला आरव झोपलेला आहे, असे सांगितले. अर्पिता रुमचा दरवाजा बंद करुन आली.


"हं आता बोला. आरवची झोप कावळ्यासारखी झाली आहे. थोडा आवाज आला की लगेच उठतो. तो झोपलेला असल्यावर तेवढीच मला शांती लाभते." अर्पिताने सांगितले.


"वहिनी, तुम्ही झोपला होता का? उगीच मी तुमची झोप डिस्टर्ब केली. तुम्हाला झोपायचं असेल तर झोपा." ऋतुजा म्हणाली.


यावर अर्पिता म्हणाली,

"मी कसली झोपतेय. आरवला झोपवता झोपवता डोळा लागला होता. तुम्ही बोला,कसा झाला लंच? तुम्ही येणार असल्याचे रणजीतने कळवले होते."


"एकदम मस्त. आरती दीदींना तेवढंच बरं वाटलं." ऋतुजाने उत्तर दिले. 


"आई- बाबा उद्या येणार आहेत ना? मी काल फोन केला होता, पण आवाजचं येत नव्हता." अर्पिता म्हणाली.


"आई-बाबा उद्या रात्री दहा पर्यंत पोहोचतील. तिकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कधी आवाज येत नाही, तर कधी फोन लागत नाही. बाबा मॅसेज करुन अपडेट देत असतात." ऋतुजाने सांगितले.


"रणजीतला गिल्टी वाटत आहे. बाबांसोबत असं वागायला नको होतं, असं ते म्हणत होते. बाबा परत आल्यावर रणजीत त्यांची माफी मागणार आहे." अर्पिता म्हणाली.


"हो. दादाने मला फोन केला होता. दादा आणि बाबांचं नेहमीचंच आहे. दोघांमध्ये मतभेद होतात, त्यावरुन घर अशांत होतं आणि काही दिवसांनी पुन्हा सगळं सुरळीत होतं. फरक एवढाच आहे की, यावेळी त्याला मनापासून गिल्ट वाटत आहे." ऋतुजा म्हणाली.


अर्पिता पुढे काही बोलणार तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला.


"कॉलेजच्या एका मॅडमचा फोन आहे. मी आलेच." अर्पिता बोलून निघून गेली.


ऋतुजा फ्रेश झाली. मोबाईलमध्ये टाईमपास करत बसली होती. काही वेळाने ऋतुजाच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरुन फोन आला.


"हॅलो, कोण बोलतंय?" ऋतुजाने फोन उचलून विचारले.


"हॅलो, ऋतुजा मी सुरतहून अभिराजची आई बोलतेय." 


"सॉरी, माझ्याकडे तुमचा नंबर सेव्ह नव्हता." ऋतुजा म्हणाली.


"माझ्याकडेही तुझा नंबर नव्हता. आत्ता आरतीने तुझा नंबर दिला." अभिराजची आई म्हणाली.


"तुमची तब्येत कशी आहे?" ऋतुजाने विचारले.


"माझी तब्येत बरी आहे, पण ह्या घरची लक्ष्मी माहेरी जाऊन बसली आहे, त्यामुळे मन थाऱ्यावर राहिलं नाहीये. तू एकदा शीतल सोबत बोलशील का? ती तुझ्याशी नक्कीच बोलेल. परीची खूप आठवण येते ग." अभिराजच्या आईने सांगितले.


"आई, मी शीतल सोबत बोलेल, पण ते तुम्हाला आणि अजय दादांना पटलं पाहिजे. एकतर आमचं अजून लग्न झालं नाहीये. उगीच मी अधिकार नसताना लुडबुड केल्यासारखी वाटेल." ऋतुजा म्हणाली.


"नाही ग बेटा. असं अजिबात कोणालाच वाटणार नाही. अजयलाही शीतल व परी घरी यावी असं वाटतं, पण तो स्वतः झुकायला तयार होत नाहीये. तू बरोबर तिच्याशी संयमाने बोलशील." अभिराजची आई म्हणाली.


"ठीक आहे आई. मी शीतल सोबत बोलते आणि तुम्हाला लगेच कळवते." ऋतुजाने एवढं बोलून फोन कट केला.


ऋतुजाकडे अर्पिता प्रश्नार्थक नजरेने बघत होती. अर्पिताच्या नजरेतील प्रश्न ऋतुजाला कळला होता.


"वहिनी, अभिराजच्या आईचा फोन होता." ऋतुजाने सांगितले.


"हो, ते मला कळलं, पण शीतल सोबत काय बोलणार आहेस? म्हणजे कशाबद्दल?" अर्पिताने विचारले.


यावर ऋतुजा म्हणाली,

"लग्नाआधी शीतलने पार्लर व मेहंदीचा कोर्स केला होता, अर्थात तिला त्या सगळ्याची आवड होती. लग्नानंतर शीतलला पार्लर टाकण्याची इच्छा होती, पण अजय दादांना तसे केलेले आवडत नाही. अजय दादांचे म्हणणे आहे की, मी हिला कमावून आणून देतो आहे ना. बाईच्या जातीने मुलं आणि चुल याकडे लक्ष द्यावे. घरातून बाहेर पडून पैसे कमावणे का गरजेचे आहे? 


इतक्या दिवस शीतल सगळं शांतपणे सगळं ऐकून घ्यायची. तिला माझ्या नोकरीचा प्रॉब्लेम नाहीये, पण आरती दीदींनी नोकरी केलेली सगळ्यांना चालणार आहे, मग तिने काहीतरी केलं तर काय बिघडेल?


शीतल इथे कुठेच चुकत नाहीये, पण अजय दादांना ते आवडत नाहीये. शीतल परीला घेऊन माहेरी निघून गेली आहे. अजय दादा कोणाचंच ऐकत नाहीये."


"सगळंच अवघड आहे. आता तुम्ही शीतल सोबत काय बोलणार आहात?" अर्पिताने विचारले.


"असं काही ठरवून बोलणार नाहीये. या सगळ्यावर तिचं मत जाणून घेईल आणि वाटलं तर काही सल्ला देऊन बघेल. शीतल माहेरी असल्याने आई खूप टेन्शनमध्ये आहेत. परिणामी अभी, आरती व पंकज दादाही डिस्टर्ब आहेत." ऋतुजाने सांगितले.


"तुम्ही शीतल सोबत बोला, पण जरा जपून." अर्पिता म्हणाली.


"हो वहिनी, मला अभीने शीतल सोबत बोलशील का? म्हणून विचारलं होतं, तेव्हाच मी त्याला सांगितलं होतं की, आईंची परवानगी असेल तरच, मी तिच्यासोबत बोलेल." ऋतुजाने सांगितले.


"आरव उठेपर्यंत तुम्ही फोनवर बोलून घ्या, मीही तोपर्यंत माझं कॉलेजचं काम बाकी आहे, तेवढं उरकून घेते." अर्पिता बोलून निघून गेली.


शीतल व ऋतुजामध्ये काय बोलणं होईल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe






🎭 Series Post

View all