अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ५१

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ५१


मागील भागाचा सारांश: ऋतुजा आरतीला सरप्राईज देण्यासाठी केक घेऊन त्यांच्या घरी गेली होती. केक कट करुन फोटो काढून झाल्यावर अभिराज काही कामासाठी घराबाहेर गेला होता. आरती व ऋतुजा गप्पा मारत बसल्या होत्या. गप्पा मारत असताना अजय व शीतलचा विषय निघाल्यावर पंकज तिथे येऊन म्हणाला की, "तुम्ही त्याच्या बद्दल बोलून वातावरण दूषित का करत आहात?" पंकज चिडून घराबाहेर निघून गेला.


आता बघूया पुढे….


पंकज बाहेर पडल्यानंतर अभिराज घरी आला. 


"चला तुमचं आवरलं का? आपण निघूयात. एकतर त्या रोडला विकेंडला ट्रॅफिक असते. आपण ट्रॅफिक मध्ये अडकलो, तर आपल्याला पोहोचायला उशीर होईल." अभिराज म्हणाला.


"आमच्या दोघींचं आवरलेलं आहे, पण पंकज बाहेर गेला आहे. निघण्याच्या आधी त्याला फोन करायचा आहे, मग तो डायरेक्ट खाली येऊन आपल्याला भेटणार आहे." आरतीने सांगितले.


"हो, मी त्याला जाताना बघितलं. पंकज तर घरीच थांबणार होता, त्याला अचानक काही महत्त्वाचं काम आलं होतं का?" अभिराजने विचारले.


मग आरतीने अभिराजला घडलेली सविस्तर हकिकत सांगितली. 


"पंकज अजय सोबत शीतल व त्याच्या विषयावर बोलला असेल आणि अजयने हवा तसा रिप्लाय त्याला दिला नसेल, म्हणून पंकज चिडलेला असेल." अभिराजने सांगितले.


"दादा, तसं असूही शकेल, पण एरवी तर अजय व पंकजचं खूप जमतं ना?" आरती म्हणाली.


"हो, त्यामुळेच पंकज दुखावला गेला असेल. अजयने पंकजचं काहीच ऐकून घेतलं नसेल." अभिराज म्हणाला.


"तुम्ही जर-तर करत बसण्यापेक्षा सरळ सरळ पंकजलाच याबद्दल का विचारत नाहीत?" ऋतुजाने विचारले.


अभिराजने लगेच पंकजला फोन लावून घरी यायला सांगितले. पुढील पाच मिनिटात पंकज घरी आला.


"दादा, आपल्याला जेवायला जायचं नाहीये का? मी खालूनच येणार होतो ना." पंकज म्हणाला.


"खाली जाताना या दोघींच्या डोक्यात जे पिल्लू सोडून गेलास, त्याचं स्पष्टीकरण कोण देणार? महिला वर्गाच्या मनात उभ्या राहणाऱ्या शंकेचे जोपर्यंत पूर्णपणे निरसन होत नाही, तोपर्यंत त्या तोच विचार करत बसतात." अभिराज म्हणाला.


यावर पंकज म्हणाला,

"दादा, विशेष काही नाहीये. आपल्यात बोलणं झाल्यावर अजय दादाला मी फोन केला होता. त्याचा मूड बरा आहे, हे चेक करुन शीतल वहिनीचा विषय काढला होता. अजय दादाने माझं पूर्ण बोलणं ऐकून घेतलंच नाही, उलट मलाच नको ते ऐकवलं.


अजय दादाला नेमका काय प्रॉब्लेम आहे? हेच कळत नाहीये. त्याचं म्हणणं आहे की, घरातील बाईने चूल आणि मूल सांभाळावे. ती घरातून बाहेर पडली, तर परीची जबाबदारी आईवर पडेल. आईकडे दिवसभर कोण बघेल?


शीतल वहिनी घरातून बाहेर जाऊन काम करु लागली, तर घराकडे तिचे दुर्लक्ष होईल. आईवर घरातील कामांचा भार पडेल. यावर मी त्याला ऋतुजा वहिनींचं उदाहरण द्यायला गेलो, तर तो वेगळंच बोलत बसला. जे मला अजिबात पटलं नाही. अजय दादाला जर आपलं ऐकायचंच नाहीये, तर आपण त्याच्या बद्दल चर्चा करुन आपला मूड का खराब करुन घ्यायचा?"


"पंकज, तुझं म्हणणं मलाही पटतंय, पण शीतल वहिनी व परी अशी किती दिवस माहेरी राहतील? काहीतरी मध्यस्थ काढायला पाहिजे की नाही? आईला या सगळ्याचा किती त्रास होतो आहे? याची कल्पना अजयला आहे का?" आरती चिडून म्हणाली.


"आरती, तुझ्यात व शीतल मध्ये एवढ्यात काही बोलणं झालं होतं का?" अभिराजने आरतीला विचारले.


"मी मागे एकदा तिला फोन केला होता, पण ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलली नव्हती, म्हणून मी पुन्हा फोनच केला नाही." आरतीने उत्तर दिले.


अभिराज पुढे म्हणाला,

"अजय तर आपलं काहीच ऐकत नाहीये, तर मला असं वाटतंय की, एकदा शीतल सोबत या विषयावर बोलायला हवे. पण शीतल सोबत शांततेत बोलणार कोण?"


"हे काम ऋतुजा वहिनी चांगलं करु शकतील." पंकजने सुचवले.


"अभी दादा, पंकज अगदी बरोबर बोलतोय. हे काम ऋतू शिवाय कोणीच चांगलं करु शकत नाही." आरतीने पंकजच्या बोलण्याला दुजोरा दिला.


"ऋतू, तू शीतल सोबत बोलशील का? तिच्या मनात नेमकं काय सुरु आहे? हे तरी आपल्याला कळेल." अभिराजने विचारले.


"मला शीतल सोबत बोलायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण त्याआधी तू आईंना मी तिच्या सोबत बोलले तर चालेल का? हे विचारुन घे. आई हो म्हणाल्यावरच मी शीतल सोबत बोलेल.


अभी, अजून आपलं लग्न झालेलं नाहीये. आईंना न कळवता मी जर परस्पर शीतल सोबत बोलले, तर त्यांच्या मनात माझ्या बद्दल गैरसमज निर्माण होईल. लग्नाआधीच आमचं नातं बिघडायला नकोय." ऋतुजाने सांगितले.


यावर अभिराज म्हणाला,

"बरं ठीक आहे. आपण आत्ता बाहेर जाऊन जेवण करुन येऊयात, मग मी आईला विचारतो. तिने होकार दिला, तर मी तुला कळवतो, मग तू एकदा शीतल सोबत बोलून घे."


"हो चालेल. आपल्या गप्पांच्या नादात दादाला फोन करुन आपण त्याच्या रेस्टॉरंट मध्ये जाणार असल्याचे कळवायचे राहिले. मी त्याला फोन करते. आपण लगेच निघूयात. पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले आहेत." ऋतुजा म्हणाली.


ऋतुजाने रणजीतला फोन करुन ते सगळेजण त्याच्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जाणार असल्याचे कळवले. पुढील काही वेळातच अभिराज, पंकज, आरती व ऋतुजा घराबाहेर पडले.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all