अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ४

ऋतुजाची भेट पियूच्या मैत्रिणीसोबत होते

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ४

मागील भागाचा सारांश: ऋतुजा व तिची आई सुलभा मावशीकडे जातात. मनोहर काका व सुलभा मावशीच्या रव्याच्या लाडूंबद्दल मस्त जुगलबंदी चालू होती. ऋतुजाला घरी आलेलं बघून पियूला खूप आनंद होतो. पियूला ऋतुजासोबत खूप गप्पा मारायच्या असतात. पियूची चिडचिड चालू असते. ऋतुजाला मॅट्रिमोनी साईटवर अभिराज काळे या मुलाचा इंटरेस्ट आलेला असतो.

आता बघूया पुढे….

ऋतुजा व पियू जेवण करण्यासाठी बाहेर येतात. ऋतुजा, वैशाली,सुलभा मावशी, पियू व मनोहर काका सर्वजण जेवण करण्यासाठी सोबत बसतात. सगळेजण एकमेकांसोबत गप्पा मारत जेवण करत असतात, पण पियू मात्र शांत असते. पियूला असं शांत बघून वैशाली म्हणाली,

"पियू आज एवढी शांत का ग? एरवी तर सतत तोंड चालूचं असतं. तुझं आणि सुलभाचं भांडण झालं की काय?" 

"नाही ग मावशी. तुम्ही सगळे बोलत आहात, तर मी फक्त ऐकण्याचे काम करत आहे." पियूने उत्तर दिले.

"हल्ली मॅडमला कॅन्टीन मधील फास्ट फूड आवडतं. आईच्या हातच्या जेवणाला चव नाही अशी कम्प्लेन्ट असते. रव्याचा लाडू आठवड्यापासून खाल्ला नसेल." सुलभाने सांगितले.

पियूच्या चेहऱ्याकडे बघून ऋतुजा म्हणाली,

"मावशी अग रव्याचा लाडू नेहमी खायची गोष्ट आहे का? तुला आणि काकांना आवडतात, म्हणून पियूने पण दररोज एकतरी लाडू खाल्लाचं पाहिजे, असं काही आहे का? आणि मावशी कॅन्टीन मधील पदार्थ खायची सवय झाली की, घरच्या पदार्थांची चव लागत नाही. हे काही दिवसांपुरतं असतं. मलाही असंच व्हायचं. बरं ऐका इकडे जवळचं माझी एक ऑफिसमधील मैत्रीण राहते. मी तिच्याकडे जाणार आहे. मी माझ्यासोबत पियूला पण घेऊन जाते."

"अग पण पियूला तिचा अभ्यास असेल ना. तुम्ही दोघी सोबत गेल्या की लवकर परत येणारचं नाहीत. मग कामाच्या वेळेस पियूला तिचा अभ्यास आठवेल." सुलभा मावशी टोमणा मारत म्हणाली.

"मावशी एक दोन तासाने काही मोठा फरक पडत नाही. पियू तिचा अभ्यास रात्री करेल." ऋतुजाने मावशीला समजावून सांगितले.

पियू व सुलभा मध्ये काहीतरी खटकलं असल्याचा अंदाज वैशालीला आला, म्हणून ती म्हणाली,

"अग सुलभा मुलींना एवढं धारेवर धरायचं नसतं. ऋतुजा ऑफिसमधून आली की, आयत्या ताटावर बसते आणि तशीच उठून जाते. लग्न झाल्यावर तिला हे सगळं करावंच लागणार आहे. आपल्याकडे आहे, तोपर्यंत तरी त्यांना शांतता लाभू द्यावी, असं माझं म्हणणं आहे. पियू तर अजून लहान आहे. फोनवर बोलणं म्हणा की कॅन्टीन मध्ये खाणं म्हणा, हे सगळं या वयात नाही करणार तर आपल्या वयात करणार का? तू एकच गोष्ट लावून धरतेस, हा तुझा लहानपणापासूनचा प्रॉब्लेम आहे. पियूला थोडा वेळ मोकळं सोडत जा."

वैशाली व ऋतुजाचं बोलणं ऐकून पियूच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती. सगळ्यांची जेवणं झाल्यावर ऋतुजा पियूला घेऊन घराबाहेर पडली. घराबाहेर आल्याबरोबर पियूने ऋतुजाला घट्ट मिठी मारली.

"दीदी तू ग्रेट आहेस. आईला बरोबर पटवलंस."

ऋतुजा मिठी सोडवत म्हणाली,

"बरं इथे कुठे बेस्ट कोल्ड कॉफी मिळते का? आणि ते ठिकाण असं असलं पाहिजे की, तिथे आपण जास्त वेळ बसून गप्पा मारु शकू."

पियू बुद्धीला जोर देत म्हणाली,

"हो इकडे एक कॉफी शॉप आहे, तिथे कोल्ड कॉफी खूप छान मिळते, पण जरा महागडं कॉफी शॉप आहे. म्हणून मला तिकडे जाता आलं नाहीये."

ऋतुजा तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाली,

"आपण भरपूर श्रीमंत आहोत,चल."

पियू व ऋतुजा कॉफी शॉपच्या दिशेने निघाल्या. पियूचा चेहरा चांगलाच फुलला होता. पियूच्या चेहऱ्यावरील स्माईल बघून ऋतुजाला बरे वाटत होते. कॉफी शॉप जवळच असल्याने त्या दोघी पायीच तिकडे गेल्या. कॉफी शॉपचं इंटेरिअर एकदम भारी होतं. कॉफी शॉपमध्ये गेल्यागेल्या फ्रेश वाटत होतं. गर्दीच्या ठिकाणी प्रशस्त व शांतता वाटणारे ते कॉफी शॉप होते. ऋतुजा व पियू एका कोपऱ्यातील टेबलच्या इथे जाऊन बसल्या.

"मस्त कॉफी शॉप आहे ग. एकच नंबर इंटेरिअर आहे." ऋतुजा म्हणाली.

"नयना व हरीष इकडेच येत असतात, त्यांनीच मला सांगितले होतं." पियूने सांगितले.

ऋतुजाने कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. 

"पियू तुला अजून काही घ्यायचं असेल तर ऑर्डर कर. पैश्यांचा विचार करु नकोस." ऋतुजाने सांगितले.

पियूने मान हलवून होकार दिला. तेवढ्यात पियूचा मोबाईल वाजला. मोबाईल वरील नाव बघून तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली होती. तिने फोन उचलून 'नंतर फोन करते.' म्हणून सांगितले.

ऋतुजा पियूच्या चेहऱ्यावरील एकेक भाव टिपत होती. 

"कोणाचा फोन होता?" ऋतुजाने विचारले.

"ऋषिकेशचा होता." पियूने उत्तर दिले.

"कोण ऋषिकेश?" ऋतुजाने प्रश्न विचारला.

पियू म्हणाली,

"कॉलेज मधील मित्र आहे. नोट्स पाहिजे असतील म्हणून फोन केला असेल."

पियू बोलताना नजर मिळवत नव्हती, तेव्हाच ऋतुजाच्या लक्षात आले होते की, काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय. 

"त्याने फोन का केला? हे मी विचारलंच नव्हतं. मित्र आहे म्हटल्यावर सहज फोन करुच शकतो की." ऋतुजा म्हणाली.

तेवढ्यात एक मुलगी पियूच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली,

"पियू तू आज इकडे कशी काय आलीस? आम्ही म्हटलो तर कधीच येत नाहीस. काहीना काही कारण देऊन टाळत असतेस."

यावर पियू म्हणाली,

"नयना तू इकडे कधी आलीस? ही माझी ऋतुजा दीदी आहे. ती मला इकडे घेऊन आली."

ऋतुजा व नयनाने एकमेकींकडे बघून स्माईल दिली.

"अग क्लासवरुन मी आणि हरीष इकडेच आलो होतो. त्या तिकडचा कोपऱ्यातील टेबल आहे ना, तो आमचा फेव्हरेट टेबल आहे. महत्त्वाचं म्हणजे तिकडे कोण बसलं आहे? हे कोणालाच कळत नाही. एकदा तर आई आणि तिची एक फ्रेंड इथे आल्या होत्या. आम्ही तिकडेच बसलेलो होतो. आईला समजलं सुद्धा नाही. आई जाईपर्यंत आम्हाला तिकडेच बसून रहावं लागलं होतं. माझी तर जाम फाटली होती."

नयना बोलत असतानाच एक मुलगा तिच्या मागून येऊन म्हणाला,

"नयू डार्लिंग चल मी येतो. मॉमचे बरेच कॉल येऊन गेलेत. उद्या मी जेव्हा म्हणेल तेव्हा गुपचूप मला भेटायला यायचं. काही कारण देऊ नकोस. तुला माहितीये ना की, मी तुला बघितल्याशिवाय राहू शकत नाही." 

यावर नयना लाजून म्हणाली,

"अरे हरीष मम्मा सुट्टीच्या दिवशी घरीच असते, मग घराबाहेर पडता येत नाही. तरीही मी ट्राय करेल."

हरीष व नयनाने एकमेकांना मिठी मारली, त्यानंतर हरीष तेथून निघून गेला. ऋतूजा त्या दोघांकडे आश्चर्याने बघत आहे, हे पियूच्या लक्षात आले होते.

"दीदी तो हरीष होता. नयनाचा बॉयफ्रेंड." पियूने सांगितले.

"हरीष तुमच्या कॉलेजमध्ये आहे का?" ऋतुजाने विचारले.

नयना पियू शेजारील खुर्चीत बसत म्हणाली,

"दीदी हरीष एम बी ए करतो आहे. त्याच्या डॅडचा बिजनेस सेट असल्याने त्याला फक्त नावाला डिग्री घ्यायची आहे."

"मग तुमची भेट कुठे झाली?" ऋतुजाने विचारले.

नयना म्हणाली,

"माझे पप्पा व त्याचे डॅड कॉलेज फ्रेंड्स आहेत. त्यांच्या गेटटूगेदरच्या वेळी आमच्या दोघांची भेट झाली होती. तिथून पुढे मैत्री आणि आता लव्ह."

"तुम्ही दोघे लग्न करणार आहात का?" ऋतुजाने विचारले.

"माहीत नाही. त्याबद्दल अजून काही ठरवलं नाही. हरीष सोबत फिरणं, गप्पा मारणं, त्याला हग करणं छान वाटतं. तो सोबत असला की मला कोणाचीच आठवण येत नाही. कितीही मोठा प्रॉब्लेम असला तरी तो चुटकीसरशी सॉल्व्ह करतो. हरीष खूप भारी आहे." नयनाने उत्तर दिले.

ऋतुजा मिश्किल हसून म्हणाली,

"नयना तुला भेटून खरंच खूप छान वाटलं. तुझ्यासारखी मैत्रीण पियूला असल्याने हल्ली तिला माझी आठवण येत नाही. नयना तुला राग येणार नसेल तर सांगते, मी आणि पियू गप्पा मारण्यासाठी बाहेर आलो होतो. तू जर इथेच बसून राहिलीस तर आम्हाला बोलता येणार नाही. प्लिज तू जाशील का?"

नयना म्हणाली,

"अरे हो चालेल की आणि दीदी मला रिक्वेस्ट का करत आहेस? मी हा विचारचं केला नाही. तू हरीषबद्दल विचारलं आणि मी इथेच बोलत बसले. तुम्ही दोघी गप्पा मारा. मी पियूकडून तुझ्याबद्दल खूप काही ऐकलं होतं. आज भेटून खूप छान वाटलं."

नयना ऋतुजा व पियूला 'बाय' म्हणून निघून गेली. पियूला नेमकं काय झालंय? हे ऋतुजाच्या लक्षात आले होते.

ऋतुजा व पियूमध्ये काय बोलणं होतं? बघूया पुढील भागात….

©®Dr Supriya Dighe

🎭 Series Post

View all