अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ४७

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ४७


मागील भागाचा सारांश: ऋतुजाचे आई बाबा वैष्णोदेवीला गेल्याने रश्मी तिच्यासोबत घरी जाणार होती. हर्षलला रश्मीला भेटायचे होते. अभिराज व हर्षलला ऋतुजाच्या घरी येण्याचा प्लॅन केला. अभिराज जेवायला येणार म्हणून ऋतुजाने स्वयंपाक बनवला.


आता बघूया पुढे…..


हर्षल व अभिराज दोघेही फ्रेश झाले. 


"तुम्ही दोघे जेवायला बसून घ्या. मग मी आणि रश्मी बसतो." ऋतुजाने सांगितले.


यावर अभिराज म्हणाला,

"नाही. आपण चौघेही एकत्रच जेवायला बसूयात. पुरुष आधी मग स्त्रिया असं नको. आपण आपापलं जेवायला वाढून घेऊयात."


अभिराजने आग्रह केल्याने चौघेजण एकत्र जेवायला बसले. अभिराजने पहिला घास खाल्ला. ऋतुजा त्याची प्रतिक्रिया बघण्यासाठी त्याच्याकडे टक लावून बघत होती.


"ऋतू तुझ्या हाताला तर भारीच चव आहे ग. सगळाच स्वयंपाक मस्त झालाय. मला आयुष्यभर असं चविष्ट जेवण जेवायला मिळणार." अभिराजने आपली प्रतिक्रिया दिली.


"असं स्वादिष्ट जेवण करण्यासाठी मी तुमच्या घरी वरचेवर येत जाईल." हर्षलने सांगितले.


"हो चालेल, पण अशी स्वादिष्ट जेवण बनवणारी एखादी शोधत का नाही?" ऋतुजाने विचारले.


"मी तर लगेच बोहल्यावर चढायला तयार आहे, पण मला माझ्या टाईपची सापडत नाहीये. ज्यांना मी आवडतो त्या मला आवडत नाहीत आणि जी मला आवडते तिला मी आवडत नाही." हर्षलने सांगितले.


"डोन्ट वरी बालका, तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे." अभिराज म्हणाला.


हर्षल म्हणाला,

"असं जर घडलं, तर तुला कसला चढावा द्यायचा तेही सांग."


"चढावा म्हणजे काय?" रश्मीने मध्येच विचारले.


हर्षल डोक्याला हात मारत म्हणाला,

"यार रश्मी तुला एवढंही माहीत नाही का? चढावा म्हणजे आपली जर एखादी इच्छा पूर्ण झाली तर आपण देवाला पेढे घेऊन जातो ना."


"माझ्यासाठी हा शब्द नवीन होता, म्हणून विचारलं." रश्मी म्हणाली.


"माझा चढावा मी तुला नंतर सांगेल. जेव्हा तुझी मनोकामना पूर्ण होईल तेव्हा मला फोन कर." अभिराजने सांगितले.


"अभी गप्पा मारता मारता जेवण केलं तर दोन तास जेवण होणार नाही. आता जरा जेवणाकडे लक्ष केंद्रित करुयात ना." ऋतुजा म्हणाली.


"ओके मॅडम जशी आपली आज्ञा." अभिराज म्हणाला.


जेवण झाल्यावर रश्मी व ऋतुजाने सगळा पसारा आवरुन ठेवला.


"आई बाबा व्यवस्थित पोहोचले का?"अभिराजने ऋतुजाला विचारले.


"हो. संध्याकाळी बाबांचा फोन आला होता." ऋतुजाने उत्तर दिले.


"ऋतू आईस्क्रीम खाणार का? मी आणि हर्षल जाऊन घेऊन येतो." अभिराज म्हणाला.


"तू इथेच थांब. मला जरा बोलायचं आहे. रश्मी व हर्षल आईस्क्रीम घेऊन येतील." ऋतुजाने सांगितले.


"ऋतू किचन मधील पसारा आवरायचा आहे ना?" रश्मी म्हणाली.


यावर ऋतुजा म्हणाली,

"भांडे घासायला सकाळी मावशी येतीलच. किचन ओट्यावरचा पसारा मी आवरुन घेईल. तू जा." 


ऋतुजाने फोर्स केल्याने रश्मी हर्षल सोबत आईस्क्रीम घ्यायला गेली. ऋतुजा किचन ओटा पुसत होती, अभिराज किचनमध्ये जाऊन म्हणाला,

"तुला माझ्यासोबत काय बोलायचं होतं?"


"अभी तू किती मंद आहेस रे. हर्षलला रश्मी सोबत काहीतरी बोलायचे होते, म्हणून त्याने तिला भेटायला बोलावले होते. हर्षल रश्मी सोबत आपल्या समोर काही बोलू शकणार नव्हता, म्हणून मी त्या दोघांना आईस्क्रीम आणण्याच्या निमित्ताने बाहेर जायला सांगितलं." ऋतुजाने सांगितले.


"अरे हो की. माझ्यातर हे लक्षातच आले नाही." अभिराज म्हणाला.


"तू सध्या कोणत्या जगात जगतो आहेस? हे तुलाच माहीत." ऋतुजा म्हणाली.


"मी सध्या तुझ्याच विचारात असतो. तुच माझं जग झाली आहेस. मला तुझ्याच जगात रमायला आवडतं आहे. तू मला वेड केलं आहेस. ऑफिसमध्ये काम करत असताना सुद्धा तू यावेळी काय करत असशील? हा एकच विचार डोक्यात येतो. 


मोकळा वेळ मिळाल्यावर तुला कोणती साडी चांगली दिसेल? लग्नात आपण काय घालायचं? लग्नात तू किती सुंदर दिसशील? हाच विचार करत असतो." अभिराज म्हणाला.


"अभी तू वेडा आहेस." ऋतुजा हॉलमध्ये जाताना म्हणाली.


अभिराज तिच्या पाठोपाठ जात म्हणाला,

"मी तुझ्या प्रेमात वेडा झालो आहे ग." 


ऋतुजा सोप्यावर जाऊन बसली. अभिराज तिच्यासमोरील खुर्चीत जाऊन बसला आणि ऋतुजाकडे एकटक लावून बघत होता.


"अभी ही नौटंकी बंद कर रे. प्लिज माझ्याकडे असं बघू नकोस." ऋतुजा म्हणाली.


"तुला आवडत नाहीये का?" अभिराजने विचारले.


"बरं ते जाऊदेत. पंकज दादा तुझ्याशी बोलत आहेत का?" ऋतुजाने विचारले.


"ऋतू यार मी मस्त रोमँटिक मूडमध्ये होतो आणि तुला पंकजचं पडलं आहे." अभिराज म्हणाला.


ऋतुजा हसून म्हणाली,

"माझ्या प्रश्नाचं उत्तर दे." 


"नाही. पंकज माझ्याकडे बघतही नाहीये. त्याला जरा जास्तच राग आला आहे वाटतं. आता बाकी अजून काही विचारुन माझा मूड खराब करु नकोस." अभिराज आपल्या जागेवरुन उठत म्हणाला.


अभिराज खिडकीच्या कडेला जाऊन उभा राहिला आणि बाहेर बघत होता. ऋतुजा त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली, त्याच्या खांद्यावर हात ठेवून ऋतुजाने विचारले,


"अभी काय झालंय? तुझ्या चेहऱ्यावर हसू आहे, पण डोळयात दुःख का दिसत आहे?" 


अभीने ऋतुजाकडे आश्चर्याने बघून तो म्हणाला,

"तुला कसं कळलं?" 


ऋतुजा अभिराजचा हात हातात घेऊन म्हणाली,

"तुला जसं माझ्या मनातील कळतं, तसं मीही तुझ्या मनात काय चालू आहे? हे ओळखूच शकते ना."


अभिराजच्या डोळयात पाणी आले होते. 

"ऋतू अर्पिता वहिनी आणि तुमच्यातील गैरसमज दूर झालेत, पण आमच्याकडे अजून वाढले आहेत. आईने आरतीला फोन करुन सांगितले की, अभीला तुझं होत असेल तर सुरतला निघून ये म्हणून. 


ऋतू मी असं काहीच बोललो नव्हतो. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला आहे. मी याबद्दल बोलण्यासाठी आईला फोन केला होता पण या विषयावर मला काहीच बोलायचे नाही, असं आईने स्पष्टपणे सांगितले.


ऋतू आजपर्यंत माझी आई माझ्याशी असं कधीच बोलली नव्हती. मी ही परिस्थिती कशी हाताळू तेच कळत नाहीये." 


"जेव्हा आई अश्या बोलल्या तेव्हा आरती दीदींनी रिप्लाय काय दिला?" ऋतुजाने विचारले.


"आरतीने आईला स्पष्टपणे सांगितलं की, तू पंकजच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस, त्याचा गैरसमज झाला नाहीये. दादावर आमचं ओझं झालंय असं तो वागत नाहीये. दादाने स्वतःहून मला पुण्याला येण्याबद्दल बोलला होता. त्याचा हेतू चांगला आहे, पण शेवटी घेणारे कसे असतील, हे त्यावर अवलंबून असेल." अभिराजने सांगितले.


यावर ऋतुजा म्हणाली,

"मग तर अभी तुला काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाहीये. आईंना थोडा वेळ दे. आरती दीदींना जसा तुझा हेतू कळाला आहे ना, तसाच तुझा हेतू बाकीच्यांना कळेल. नाहीतर तू एकदा बाबांसोबत या विषयावर बोलतोस का?"


"बाबांबरोबर मी नाही बोलू शकणार. माझं आणि बाबांचं नातं फ्रेंडली नाहीये. आम्ही फक्त कामाच्या विषयावर बोलू शकतो. बाबांपर्यंत हे सगळं गेल्यावर ते चिडतील, मग आईलाही ऐकून घ्यावं लागेल." अभिराजने सांगितले.


"अभी तू खूपच इमोशनल आहेस, म्हणून तुला या सगळ्याचा इतका त्रास होतो आहे. काल रणजीत दादा घरी आला होता, पण तो बाबांशी बोललाच नाही. आम्ही याकडे जास्त लक्ष दिलं नाही." ऋतुजा म्हणाली.


"मी तुला मिठी मारु शकतो का? म्हणजे मला जरा बरं वाटेल." अभिराजने मिश्किल हसून विचारले.


ऋतुजाने अभिराजच्या हातावर फटका मारला आणि त्याला मिठी मारली. तेवढ्यात दारावरील बेल वाजली.


"यांना आत्ताच यायचं होतं वाटतं. थोड्या वेळाने आले असते तर काय झालं असतं?" अभिराज म्हणाला.


ऋतुजा त्याच्या मिठीतून सुटत दरवाजा उघडायला गेली. रश्मी व हर्षल आईस्क्रीम घेऊन आले होते. चौघांनी आईस्क्रीम खाता खाता गप्पा मारल्या. ऋतुजा घड्याळाकडे बघून म्हणाली,

"चला तुम्ही निघा आता. उद्या सकाळी चौघांनाही ऑफिसला जायचं आहे. आमचा दूधवाला सकाळी साडेसहालाच येतो. आई बाबा नाही तोपर्यंत मला उठावे लागेल."


"ऋतू असं पाहुण्यांना कोणी काढून देतं का?" अभिराज म्हणाला.


"मी तुम्हाला पाहुणे मानतचं नाही. खरंच अभी रात्री झोप नाही झाली, तर दिवसभर डोकं दुखत राहील." ऋतुजा म्हणाली.


यावर हर्षल म्हणाला,

"अभी ऋतुजा वहिनी बरोबर बोलत आहेत. आपण निघुयात. घरी पोहोचेपर्यंत खूप उशीर होऊन जाईल."


मग अभिराज व हर्षल दोघेजण निघून गेले. 


क्रमशः


©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all