अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ४५

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ४५


मागील भागाचा सारांश: ऋतुजाने रणजीत दादा व तिच्या बाबांमध्ये मतभेद झाल्याचे अभिराजला सांगितले. तसेच अभिराजला पंकज व अजयच्या बाबतीत तिने शांतता घ्यायला सांगितली.


आता बघूया पुढे…..


ऋतुजाचे आई-बाबा वैष्णोदेवीला दुसऱ्या दिवशी जाणार असल्याने ऋतुजा त्यांची पॅकिंग करत होती, तेवढ्यात दरवाजा वरील बेल वाजली. ऋतुजाने दरवाजा उघडला तर दारात अर्पिता व आरव हे दोघे होते. अर्पिताच्या हातात एक पिशवी होती. आरव ऋतुजाला बिलगला. ऋतुजाने त्याला उचलून घेतले व त्याची पप्पी घेतली. 


अर्पिताला ऐकू जाईल अशा आवजात ऋतुजा म्हणाली,

"आरव तुला आत्तूची आठवण आली नाही का? मी तुला किती मिस केलं. तू व्हिडिओ कॉलवरही बोलला नाही."


आरव त्याच्या बोबड्या भाषेत काहीतरी बडबड करत होता, ते ऐकून अर्पिता म्हणाली,

"आरव आत्तूला सांग की, आरवला बरं नव्हतं. आरवला व्हिडिओ कॉल लावून दिला की, आरव मोबाईलवर कार्टून बघत बसतो. आरवची मोबाईलची सवय मोडायची आहे, म्हणून मम्मा व्हिडिओ कॉल लावून देत नाही."


"आरव मोबाईलवर कार्टून बघणं चुकीचं आहे. असं अजिबात करायचं नाही." ऋतुजाने आरवला सांगितले.


अर्पिता घरात जात म्हणाली,

"आई पॅकिंग झाली का? मी तुम्हाला आवडतात म्हणून बेसनाचे लाडू करुन आणले आहेत. रणजीतला हॉटेलवर काम होतं, म्हणून ते आले नाहीत. रणजीतची वाट बघत बसले असते तर आम्ही दोघेही घरीच राहिलो असतो." 


घरात येताच अर्पिताची बडबड सुरु झाली होती. आरव आजी आजोबांना जाऊन बिलगला. खूप दिवसांनी आरव व आजी आजोबा एकमेकांना भेटत असल्याने तिघेही खुश होते. आजीने आरवची पप्पी घेतली. आरवला बघून आजीच्या डोळयात पाणी आले. 


"मला वाटलं नव्हतं की, तू येशील म्हणून. तुला ह्यांच्या बोलण्याचा राग आला होता ना. हे बोलले रणजीतला पण तुलाच आमच्या सगळ्यांचा राग आला." ऋतुजाची आई अर्पिताकडे बघून म्हणाली.


"आई मी जरा वेगळ्याच गोंधळात होते. मला बाबांच्या बोलण्याचा राग आला नव्हता आणि तुमच्या कोणाचाच नाही. रणजीत सोबत या विषयावर बोलायलाही माझ्याकडे वेळ नव्हता. रणजीत व बाबांमध्ये पडायचं म्हटल्यावर आपलंच मरण होतं. मी फक्त रणजीतच्या हो ला हो करत होते.


ऋतूचा फोन आला होता, त्यावेळी मी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते, म्हणून मी फार बोलले नाही. रणजीत कधी कधी अति करतात. वडील थोडं बोलले तर ऐकून घ्यायचं ना. उगाच छोट्या गोष्टीचा बाऊ करत बसतात." अर्पिताने सांगितले.


"तुला काय झालं होतं? काही प्रॉब्लेम झाला होता का?" ऋतुजाच्या आईने विचारले.


"अहो आई आमच्या कॉलेजमध्ये माझ्यावर नको ते आरोप होत होते. मी लेक्चर वेळेवर घेत नाही. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेळेत संपवत नाही. कलीग पॉलिटिक्स खेळत असतात बाकी काय? कोणाचं कौतुक केलेलं त्यांना बघवत नाही.


मी माझं काम प्रामाणिकपणे करत होते. कॉलेज वाल्यांची इच्छा असते की, जास्त वेळ थांबून इतर कामे करावीत म्हणून. राजकारण ह्यांनी करायचं आणि ह्यांची कामे आपण करायची. शिवाय ते त्याचा पगारही देत नाहीत. मी यावेळी काम करायला नकार दिला, तर नोकरीवरुन काढायची धमकी देत होते." अर्पिता म्हणाली.


"अर्पिता अश्या कॉलेजवर नोकरी कशाला करायची? ती नोकरी सोडून दे." ऋतुजाचे बाबा चिडून म्हणाले.


"हो बाबा मी तेच ठरवले होते. राजीनामा घेऊन दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये गेले होते. अनुभवी व प्रामाणिकपणे काम करणारा स्टाफ त्यांच्याकडे कमी आहे, म्हणून त्यांनी मला टर्म पूर्ण होईपर्यंत नोकरी सोडू नको असं सांगितले तसेच कॉलेज बाहेरील कामे करायला लागणार नाही हेही सांगितले.


मग मीच विचार केला की, आपल्याला आपल्या मनाप्रमाणे काम करायला मिळणार असेल तर मग नोकरी सोडण्याची काही गरज नाही. हे सहा महिने बघते, नाहीच पटलं तर नोकरी सोडून देईल.


बाबा आपण घाईत आणि रागात एखादा निर्णय घेऊन टाकतो, पण नंतर त्याचा पश्चाताप होऊ शकतो, म्हणून मी थोडी शांतता घेण्याचे ठरवले." अर्पिताने सांगितले.


यावर ऋतुजा म्हणाली,

"वहिनी मला मान्य आहे की, तुम्ही त्यावेळी टेन्शनमध्ये असाल म्हणून पण समोरच्याला आपण काहीच सांगितलं नाही, तर त्यांना ते कळणारही नाही. तुम्ही जर त्यावेळी ह्या सगळ्याची थोडी कल्पना दिली असती, तर तुमच्या बद्दल मनात गैरसमज निर्माण झाला नसता.


आज समजा तुम्हाला यायला जमले नसते आणि तुम्ही आल्या नसत्या तर आपल्या मध्ये दुरावा वाढला असता. वहिनी बोलायला हवं. संवाद नसला की नात्यात दुरावा येतो आणि गैरसमज वाढतो, मग ते नातं कोणतेही असो."


"हो ऋतू मला समजतंय. इथून पुढे आपल्यात असे गैरसमज निर्माण होणार नाहीत याची पुरेपूर काळजी मी घेईल. तुम्ही आता माझ्या बरोबर तिकडे चला. इकडे एकट्या राहू नका. मी इकडे आले असते, पण आरवची सेटिंग पुन्हा बिघडेल आणि मला कॉलेज दूर पडेल." अर्पिता म्हणाली.


"नको वहिनी. मी रश्मीला सांगून ठेवलं आहे. रश्मी माझ्यासोबत रहायला येणार आहे. मलाही तिकडून दूर पडेल. मला तसं वाटलंच तर मी तिकडे येईल." ऋतुजाने सांगितले.


काही वेळाने अभिराज ऋतुजाच्या आई बाबांना भेटायला आला. अर्पिता वहिनीला तिथे बघून त्याला शॉक बसला, कारण ऋतुजा कडून घडलेला प्रकार त्याला कळला होता.


"रणजीत दादा आले नाही का?" अभिराजने विचारले.


"नाही, त्यांना हॉटेलमध्ये काम होतं. जमलं तर थोड्या वेळात येणार आहेत." अर्पिताने उत्तर दिले.


"अभिराज आम्ही वैष्णोदेवीला जाऊन आल्यावर तुमच्या लग्नाचा मुहूर्त काढू." रणजीतचा विषय टाळण्यासाठी ऋतुजाचे बाबा म्हणाले.


"बाबा तुम्ही फिरुन या. स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, मग आमच्या लग्नाचं बघू. लग्न होणारचं आहे. थोडं निवांत करुयात." अभिराज म्हणाला.


अभिराज व ऋतुजाच्या बाबांमध्ये बऱ्यापैकी गप्पा रंगल्या होत्या. अर्पिता व आरवला घ्यायला म्हणून रणजीत आला होता. अभिराज घरी असल्याने रणजीत थोडा वेळ थांबला होता. रणजीत आई व ऋतुजाशी बोलला, पण त्याने बाबांकडे बघितले नाही.


रणजीत व अर्पिताने जोडीने आई-बाबांना नमस्कार केला. रणजीतने आईच्या हातात पैश्यांचं पाकीट टेकवलं. पाकिटातील पैसे बघून आई म्हणाली,

"अरे रणजीत एवढे पैसे कशाला?" 


"आई असूदेत. खरंतर आई वडिलांना देवदेवाला नेण्याची जबाबदारी मुलाची असते. हॉटेलचं थोडं रिनोव्हेशन व फ्लॅटच्या इंटेरिअर मुळे सध्या मी आर्थिक तंगीत आहे. मी जास्त काही देऊ शकणार नाही. जे काही ऍडजस्ट झालं ते दिलं, प्लिज नाही म्हणू नकोस." रणजीतने सांगितले.


अभिराजला येऊन बराच वेळ झाला होता, म्हणून त्याने सर्वांचा निरोप घेतला. अभिराज गेल्यावर रणजीत म्हणाला,

"चल आई, ऋतू आम्हीही निघतो. आई काही लागलं तर फोन कर." 


असं बोलून रणजीत जायला निघाला तेव्हा आई म्हणाली,

"रणजीत तू बाबांशी बोलणारच नाहीये का? नात्यात अहंकार येऊ देऊ नये. तुझे बाबा असं तुला पहिल्यांदा बोलले आहेत का? तू असा त्यांच्या सोबत अबोला किती दिवस धरशील? ते बोलले तू बोलला विसरुन जा ना. मघाशी अभिराज घरात होते, म्हणून मला काही बोलता आलं नाही."


"आई दरवेळी बाबा बोलतात, पण यावेळी त्यांचं बोलणं माझ्या मनाला जास्त लागलं. अर्पिताने मला खूप आग्रह केला म्हणून आज आलो, नाहीतर मला येण्याची इच्छाच नव्हती." एवढं बोलून रणजीत घराबाहेर पडला.


अर्पिता आईच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली,

"आई तुम्ही त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. मी त्यांच्या सोबत नंतर बोलते. यावेळी त्यांना जरा जास्त वेळ लागणार आहे असं वाटतंय. तुम्ही दोघे व्यवस्थित जा. तब्येती सांभाळा. मी येते."


अर्पिता आरवला घेऊन निघून गेली. दुसऱ्या दिवशी ऋतुजाचे आई बाबा वैष्णोदेवीला निघून गेले. 


क्रमशः


©®Dr Supriya Dighe






🎭 Series Post

View all