अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ४३

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ४३


मागील भागाचा सारांश: ऋतुजाचे बाबा वैष्णोदेवीला जाण्याचा प्लॅन करत होते, पण तिच्या आईला जाण्याची इच्छा नव्हती. ऋतुजाने समजावून सांगितल्यावर तिची आई जाण्यास तयार झाली होती. अभिराज व ऋतुजा मूव्ही बघायला गेले होते. अभिराज नेहमीपेक्षा खूप शांत होता.


आता बघूया पुढे….


जेवण झाल्यावर अभिराजने बिल दिले व दोघेही हॉटेल मधून बाहेर पडले.


"आता कुठे जायचं?" अभिराजने ऋतुजाकडे बघून विचारले.


"मी तुला आज माझ्या आवडत्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. मी तुला मॅप लावून देते, त्या ठिकाणावर आपण जाणार आहोत." ऋतुजाने मॅप लावलेला मोबाईल अभिराजच्या हातात देत म्हणाली.


"ऋतू अग किती लांब आहे हे ठिकाण. शहराच्या एकदम बाहेर आहे." अभिराज म्हणाला.


"मला तिथे जायचं आहे आणि तू तिथे येणार आहेस. तुला कितीही कंटाळा आला असेल, तरी तुला तिथे यावंच लागणार आहे." ऋतुजाने ठामपणे सांगितले.


अभिराज नाईलाजाने ऋतुजा बरोबर जायला तयार झाला. काही वेळानंतर ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले होते. अभिराजने आजूबाजूला बघितले, तर त्याच्या चहूबाजूला डोंगर होते. थोडे पुढे चालत गेलं तर एक खोल दरी नजरेस पडत होती. सगळीकडे हिरवळ होती आणि शांतता होती. अभिराज व ऋतुजा सोडून तिथे कोणीच नव्हते.


"ऋतू आपण इकडे का आलो आहोत? इथे कोणीच नाहीये." अभिराजने विचारले.


ऋतुजा म्हणाली,

"मला इथे एकदा दादा घेऊन आला होता. मला हे ठिकाण खूप आवडले होते. गर्दीपासून एकदम दूर. शांतपणे विचार करायला वेळ मिळतो. मन प्रसन्न होऊन जातं. तुला चांगलं नाही वाटत आहे का?" 


"मला चांगलं वाटत आहे, पण मला गर्दीतील ठिकाणं आवडतात. बरं आपण इथे काय करणार आहोत?" अभिराजने पुन्हा प्रश्न विचारला.


"तिथे समोर दोन दगड दिसत आहेत ना? तिथे आपण दोघे जण जरावेळ बसणार आहोत. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे." ऋतुजाने सांगितले.


"या ठिकाणी आता मला काय सरप्राईज मिळणार आहे, काय माहीत. बरं चल तिकडे जाऊन बसू." अभिराज वैतागून म्हणाला.


अभिराजला काहीतरी झालंय हे ऋतुजाला जाणवले होते. एरवी अभिराज असं कधीच बोलत नव्हता. तो आतून दुखावलं गेल्यासारखा वाटत होतं. दोघेजण दगडावर जाऊन बसले. ऋतुजाने आपल्या पर्समधून एक चिठ्ठी काढून त्याच्या हातात दिली आणि वाचायला सांगितली.


"प्रिय अभिराज,

आजवर मैत्रिणींना, आईला, आरवला किंवा काही जवळच्या व्यक्तींना प्रिय किंवा डिअर म्हणून संबोधले असेल, पण आज तुझ्या नावापुढे प्रिय लिहिताना मनात गुदगुल्या होत आहेत. 


मला पटकन बोलून माझ्या मनातील भावना सांगता येत नाहीत, म्हणून मी या चिठ्ठीचा आधार घेतला आहे. अभी तुझं नाव स्क्रीनवर दिसल्यावर माझ्याही नकळत चेहऱ्यावर स्माईल येते. 


प्रत्येक क्षणाला तू काय करत असशील? हा प्रश्न मनात येतो. मी खूप आनंदी किंवा दुःखी त्या क्षणाला तू माझ्याजवळ असावास असं मला वाटतं. तू आयुष्यात आल्यापासून हे आयुष्य सुंदर वाटायला लागलं आहे. देवा मला आता काही नकोच, हे हात जोडून सांगावं वाटतं.


मला माझा राजकुमार भेटला आहे. पुढे आयुष्यात जाऊन कितीही दुःख येऊदेत पण तुझा हात हाती असल्यावर मी कधीच संकटांना घाबरणार नाही. तू जेव्हा ऋतू म्हणतो, तेव्हा खूप भारी वाटतं. काल सहज कागदावर ऋतुजा अभिराज काळे नाव लिहून बघितलं, तेव्हा माझं नाव पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. पुढील कितीतरी वेळ मी त्या नावाकडे एकटक बघत बसले होते.


अभी प्रेम कशाला म्हणतात हे मला ठाऊक नाही, पण हल्ली जो वेडेपणा मला वाटत आहे, त्याला जर प्रेम म्हणत असतील, तर माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. आय लव्ह यू अभी. 


तुला बघितलं

आणि

प्रेम म्हणजे काय असतं 

ते मला कळलं


राहिलेलं आयुष्य

मला तुझ्या सोबत घालवायचं आहे

तुझा हात हातात घेऊन

या प्रेमाच्या वाटेवर चालायचं आहे.


तुझीच ऋतू."


अभिराजच्या चेहऱ्यावर हसू आणि डोळयात पाणी आले होते. ऋतुजा गुडग्यावर बसली आणि आपल्या हातातील गुलाबाचे फुल अभिराजला देत म्हणाली,

"आय लव्ह यू अभी." 


अभिराजने तिच्या हातातील गुलाबाचे फुल घेतले आणि तिचा हात हातात धरुन तिला उठवले आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली. अभिराजच्या डोळ्यातील पाणी बघून ऋतुजालाही भरुन आले होते. 


"ऋतू हा क्षण, ही जागा मी कधीच विसरु शकणार नाही. आय लव्ह यू टु ऋतू." अभिराजने हळूच आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले.


ऋतुजा अभिराजच्या मिठीतून बाजूला झाली, त्याचा हात हातात घेऊन त्याला खाली दगडावर बसवले आणि ती म्हणाली,


"अभी तुझ्या मनात नेमकं काय सुरु आहे? हे मला ऐकायचं आहे. तुला कोणी काही बोललंय का? तू कशामुळे दुखावला गेला आहेस? जरा मला सांगशील का? अभी आपल्या दोघांनाही ही गोष्ट माहिती आहे की, आपण दोघे एकमेकांपासून काहीच लपवू शकणार नाही. प्लिज बोल ना." 


ऋतुजा असं बोलल्यावर अभिराजचे डोळे पुन्हा भरुन आले, तो भरलेल्या आवाजात म्हणाला,

"ऋतू मला तुला सांगायचं नाही असं नाहीये, पण तुझा गैरसमज नको व्हायला."


"अभी यार तुझ्या डोळ्यातील पाणी बघून मला कसंतरी होत आहे. मला ते सहन होत नाहीये. मी काहीच गैरसमज करुन घेणार नाही, पण प्लिज काहीतरी बोल." ऋतुजा म्हणाली.


यावर अभिराज म्हणाला,

"ऋतू काल तू आणि रश्मी आमच्या घरुन आल्यावर मी आरती व पंकज सोबत इन जनरल गप्पा मारत बसलो होतो. पंकज व आरती इकडे रहायला आल्यापासून खर्च बराच वाढला आहे, त्यात फ्लॅटचा, गाडीचा हप्ता बरंच आहे. सेव्हिंग फारशी राहत नाहीये. आता काही दिवसांनी आपलं लग्न होणार म्हटल्यावर सेव्हिंग तर हवीच ना, म्हणून मी पंकजला कोर्स करता करता एखादा पार्ट टाईम जॉब कर असे सुचवले, तर तो डायरेक्ट म्हणाला की, 


"अजून लग्न झालंही नाहीये की, मी तुला जड व्हायला लागलो आहे. एवढंच होतं तर मला आग्रह करुन पुण्यात बोलावून कशाला घ्यायचं? तुला माझा खर्च करण्याची काही गरज नाहीये. मी महिन्याला माझ्या वाट्याचे भाडे आणि जेवणाचा खर्च देत जाईल. लग्न झाल्यावर तुला जर माझी अडचण व्हायला लागली, तर मी माझी रहाण्याची व्यवस्था दुसरीकडे करुन घेईल." 


एवढं बोलून पंकज घराबाहेर निघून गेला. माझा बोलण्याचा हेतू त्याला समजलाच नाही. कालपासून आमच्यात काहीच बोलणं झालं नाहीये. हे झालं पंकजचं.


काही वेळाने आईचा फोन आला, तिच्याकडून अजय व शीतलचं भांडण झाल्याचं कळलं. आईने मला अजय सोबत बोल म्हणून सांगितलं. मग मी त्याला फोन केला तर तोही माझ्यावरचं उलटला. शीतलला पार्लर सुरु करायचं आहे. लग्न झाल्यापासून तिची तीच इच्छा आहे, पण हे अजयला आवडत नाही. शीतलही इतक्या दिवस काहीच बोलत नव्हती, पण आता आपलं लग्न जमलंय, तेव्हा तू नोकरी करशील हे तिला कळलं. आता त्यातल्या त्यात आरती नोकरी करेल हेही तिला कळलं. मग आता तिचं म्हणणं आहे की, या घरातील मुलगी आणि एक सून नोकरी करेल, ते सर्वांना चालेल पण तिला कोणी काहीच करु देत नाही. 


मी यावर अजयला समजावून सांगायला गेलो की, शीतलला पार्लर सुरु करायचं असेल तर करुदेत, त्यासाठी जे काही भांडवल लागेल ते मी देतो. तर तो म्हणाला की, "तुला माझ्यावर उपकार करण्याची गरज नाहीये. तुला इंजिनिअर बायको करण्याची गरज काय होती? तसेच आरतीला नोकरी करण्यासाठी पुण्याला घेऊन जायची गरज काय होती? तुमच्यामुळेच माझी बायको बिथरली आहे. माझ्या बायकोने काय करावे? काय करु नये? हे माझं मी बघून घेईल. तू पैशावाला असल्यासारखा वागू नकोस. मी माझ्या बायकोला पार्लर टाकून देण्याची ऐपत माझ्यात आहे." 


आता मला सांग ऋतू या सगळ्यात माझं काय चुकलं? हे इथेच थांबलं नाही, तर पंकजने आईला फोन करुन माझी तक्रार केली. आईने फोन करुन मलाच बडबड केली. तू घरात सगळ्यात मोठा आहेस. तुच जर असा वागलास तर आपलं घर कसं टिकेल म्हणून."


आता यावर ऋतुजाची प्रतिक्रिया काय असेल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all