अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३९

सुरुवात एका नवीन नात्याची
अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३९

मागील भागाचा सारांश: शिवमचे खरे रुप रश्मीने ऋतुजाच्या मदतीने आई बाबांसमोर आणले. वैभव व त्याचे आई वडील अभिराजच्या घरी आलेले असताना वैभवने आरती कशी चारित्र्यहीन मुलगी आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. अभिराजने वैभव विरोधातील पुरावे सर्वांसमोर सादर केले.

आता बघूया पुढे….

रश्मीच्या घरुन निघून ऋतुजा आपल्या घरी गेली. जेवण करता करता तिने आईला रश्मी व शिवम बद्दल सांगितले. हे ऐकल्यावर ऋतुजाची आई म्हणाली,
"हल्ली कोणावर विश्वास ठेवावा की नाही? हाच मोठा प्रश्न आहे. जवळचे नातेवाईकही असे फसवायला लागल्यावर काय करायचे? बरं त्या शिवमने सगळं आधीच सांगितलं, नाहीतर लग्नानंतर खरं कळलं असतं, तर त्या बिचाऱ्या रश्मीने काय केले असते?"

"हो ना आई. सगळं ऐकून मलाच धक्का बसला होता. रश्मीचं हे असं आणि तिकडे आरती दीदींचं तसं. आज त्यांच्याकडे बैठक होती. काय झालं असेल? काय माहीत. आता जेवण झालं की अभिराजला फोन करुन विचारते." ऋतुजाने सांगितले.

"हो. आरतीचं प्रकरण मार्गी लागलं म्हणजे तुमच्या लग्नाबद्दल विचार करता येईल." ऋतुजाची आई म्हणाली.

यावर ऋतुजा म्हणाली,
"आई तुला मला ह्या घरातून काढून द्यायची खूपचं घाई झालेली दिसतेय."

"तसं नाही ग बाळा. आमच्यावर तुझ्या लग्नाची मोठी जबाबदारी आहे ग." ऋतुजाची आई म्हणाली.

"आई बाबा केव्हापासून कोणासोबत फोनवर बोलत आहेत?" ऋतुजाने विचारले.

ऋतुजाची आई म्हणाली,
"आपल्या नवीन फ्लॅटचं इंटेरिअरचं काम करायचं आहे ना, त्याबद्दल रणजीत व ते बोलत आहेत. दुपारी तुझ्या बाबांचं आणि त्या बिल्डरचं कशावरुन तरी भांडण झालं होतं, ते मिटवायला रणजीतला जावं लागलं होतं. रिकामा वेळ भेटला की, तुझे बाबा काहीतरी उद्योग करत बसतात. मी त्यांना काहीच विचारलं नाही, मला माझी बरीच कामं असतात.

मी त्यांना सांगत असते की, संध्याकाळी मंदिरात जात जा, तिथे बाहेर लॉनमध्ये बरेच ज्येष्ठ नागरीक असतात, त्यांच्या सोबत गप्पा मारल्या तर वेळ निघून जाईल, पण काही केल्या ऐकत नाहीत. मग असे काहीतरी उद्योग सुचतात. नवीन फ्लॅटचं इंटेरिअर रणजीतला त्याच्या डोक्याने करायचं आहे, पण हे त्याच्या मागे सतत भुणभुण लावत असतात. एकत्र राहिल्यावर तर दोघा बापलेकांचं कसं होईल? काय माहीत. 

आत्तापासून विचार करुनचं माझ्या अंगावर काटा येतो. मला तर वाटतंय की, आता जसं आहे तसंच रहावं. उगाच एकत्र राहून मनाने दूर जायला नको."

"आई तू नक्कीच एखाद्या तुझ्या मैत्रिणी कडून सुनेचे गाऱ्हाणे ऐकून आली असशील. आई एकत्र राहिल्यावर काहीही होणार नाही. तुझा आणि बाबांचा आरव मध्ये वेळ निघून जात जाईल. अर्पिता वहिनी तुमचा रागराग करणार नाही. आई मागच्या वेळी बाबांना अचानक त्रास झाला होता, तसा देव न करो पण एखाद्या वेळेस झाला तर दादा व वहिनी जवळ असलेले बरे की नाही. उगाच काहीपण विचार करत बसू नको." ऋतुजा एवढं बोलून जेवणाचे ताट किचनमध्ये ठेवायला निघून गेली.

रुममध्ये जाऊन ऋतुजाने अभिराजला फोन केला,

"बोला मॅडम, फायनली आपल्याला माझी आठवण झाली म्हणायची." अभिराज म्हणाला.

"आठवण तर प्रत्येक क्षणाला येते, पण वेळ मिळत नाही. जेवण झालं का?" ऋतुजाने विचारले.

अभिराज म्हणाला,
"हो आत्ताच. अच्छा तर तुला माझी आठवण प्रत्येक क्षणाला येते तर…. मला स्वतःला नशीबवान म्हणावं लागेल." 

"अभी आज घरी काय झालं ते पहिले सांग. बाकी आपण नंतर बोलू." ऋतुजा म्हणाली.

मग अभिराजने सविस्तरपणे घडलेली सगळी हकीकत ऋतुजाला सांगितली.

"बापरे, चोरावर मोर अशीच परिस्थिती उभी झाली होती तर." ऋतुजा म्हणाली.

"हो ना. तू वैभव विरोधात पुरावे गोळा करण्याची आयडिया दिली नसती तर अवघड होऊन बसलं असतं. सगळे पुरावे दाखवल्यावर वैभवचा चेहरा बघण्यासारखा झाला होता." अभिराजने सांगितले.

"आता पुण्यात कधी येणार आहेस?" ऋतुजाने विचारले.

"उद्या रात्री बसेल म्हणजे परवा सकाळपर्यंत पोहोचेल. आरती व पंकजला सोबत घेऊन येतो. आरती इकडे राहिली तर शेजारी पाजारी तिचं सांत्वन करण्यासाठी येऊन बसतील." अभिराजने उत्तर दिले.

"हो तेच बेस्ट राहील. बरं मला तुला रश्मी बद्दल काहीतरी सांगायचं आहे." 

ऋतुजाने रश्मी व शिवम बद्दल अभिराजला सांगितले.

"चला आमच्या हर्षल भाऊंचा मार्ग मोकळा झाला." अभिराज म्हणाला.

यावर ऋतुजा म्हणाली,
"अभी बिचारी इतकी त्रासलेली होती आणि तुला गंमत सुचत आहे. हर्षल व रश्मीचं जुळायचं असेल तर जुळेल. आपण त्यांना साखरपुड्याची पार्टी देऊयात तेव्हा दोघांची भेट होईलचं."

"हो ग. आपण कोण जुळवणारे? त्यांचं आपोआप जुळलं तर चांगलंच आहे." अभिराज म्हणाला.

"चल मी आता झोपते. उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे. उशीरा झोपलं की झोप पूर्ण होत नाही, मग दिवस आळसात जातो." ऋतुजा म्हणाली.

"माझी झोप उडवून स्वतः मस्त झोप काढतेस." अभिराज म्हणाला.

"मी तुझी झोप का उडवेल?" ऋतुजाने विचारले.

"साखरपुड्याच्या फोटोत इतकी सुंदर दिसत आहेस की फोटोवरुन लक्षच हटत नाहीये. आता तू समोर नाहीये म्हटल्यावर फोटो बघावे लागत आहेत. फोटो बघून आई म्हणत होती की, राम-सीतेचा जोडा दिसत आहे म्हणून." अभिराजने सांगितले.

ऋतुजा म्हणाली,
"अभी फोटो आले पण…. मला पाठवले का नाहीत? पटकन सगळे फोटो पाठव ना."

"अग हो पाठवतो. आत्ता काही वेळापूर्वी पंकज जाऊन पेनड्राइव्ह मध्ये घेऊन आला. फोटो व्हाट्सएप द्वारे पाठवले तर इमेजची क्वालिटी व्यवस्थित येत नाही, म्हणून मी विचार केला होता की, दोन दिवसांनी परस्पर भेटून पेनड्राइव्ह देईल." अभिराजने सांगितले.

यावर ऋतुजा म्हणाली,
"बरं ठीक आहे, पण सॅम्पल सारखे एक दोन फोटो तर पाठव. निदान मी कशी दिसत होते? हे तर मला कळेल."

"हो पाठवतो, पण एका अटीवर." अभिराज म्हणाला.

"कोणती अट?" ऋतुजाने विचारले.

"तुझं माझ्यावर प्रेम आहे, हे तू अजून मला सांगितलेच नाहीये. आता लगेच आय लव्ह यू बोल, मग फोटो पाठवतो." अभिराज म्हणाला.

"तुझे फोटो तुलाचं राहूदेत. मी फोन ठेवते. बाय." हे बोलून ऋतुजाने फोन कट केला. 

अभिराजच्या बोलण्याची वाटही तिने बघितली नाही. ऋतुजाला आपल्या बोलण्याचा राग तर आला नसेल ना? हा प्रश्न अभिराजला पडला. अभिराज मनातल्या मनात म्हणाला,' मी तर फक्त गंमत करत होतो. यात राग येऊ देण्याचा काय संबंध आहे? मी उगाच तिला आय लव्ह यू म्हणायला फोर्स करत आहे. पुढच्या वेळी असं बोलायचं नाही, हे लक्षात ठेवावं लागेल.'

अभिराजने ऋतुजाला चार ते पाच साखरपुड्याचे फोटो पाठवले. ऋतुजाने फोटो बघितले, पण काहीच रिप्लाय केला नाही.

दुसऱ्या दिवशी अभिराज पंकज व आरतीला आपल्या सोबत घेऊन पुण्याला आला. सुट्ट्या संपल्या असल्याने अभिराजला ऋतुजाची भेट घेता आली नव्हती. अभिराज व ऋतुजा फोनवरचं बोलत होते. 

आरतीची नोकरी शोधण्याची मोहीम चालू झाली होती. आरती सोबत राहत असल्याने पंकज व अभिराजचा जेवणाचा प्रश्न मिटला होता. स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या बेसिक वस्तू अभिराजने विकत घेतल्या होत्या. पंकजचे क्लासेस सुरु होते. 

शनिवार रविवार आल्याशिवाय अभिराज व ऋतुजाची भेट होणार नव्हती. रश्मी ऑफिसमध्ये यायला लागली होती. रश्मीच्या चेहऱ्यावरील हास्य नाहीसे झाले होते. ऋतुजा रश्मीला हसवण्याचा प्रयत्न करायची, पण व्यर्थचं होतं. 

शिवम जे काही वागला, बोलला होता, त्याचा कुठेतरी रश्मीच्या मनावर खोल परिणाम झाला होता. ऑफिसमध्ये कामाचा लोड असल्याने ऋतुजाला रश्मी सोबत निवांत बसून बोलता येत नव्हते. रश्मी व आरतीची एकदा भेट घालून द्यायची असे ऋतुजाने ठरवले होते.

रश्मीच्या चेहऱ्यावरील हसू परत आणण्यासाठी ऋतुजा अजून काय करेल? बघूया पुढील भागात…

©®Dr Supriya Dighe









🎭 Series Post

View all