अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३७

सुरुवात एका नवीन नात्याची
अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३७

मागील भागाचा सारांश: रश्मीचा मोबाईल बंद येत असल्याने ऋतुजाचे तिच्या सोबत बोलणं होतं नव्हतं. रश्मी ऑफिसलाही आली नसल्याने ऋतुजाला तिची काळजी वाटू लागली होती. ऋतुजाने रश्मीच्या आईला फोन केल्यावर रश्मीच्या आईने ऋतुजाला घरी बोलावून घेतले होते. रश्मीच्या घरी गेल्यावर ऋतुजाला कळले की, रश्मीने शिवम सोबत लग्न करायला नकार दिला होता.

आता बघूया पुढे…..

रश्मीला शांत करत ऋतुजा म्हणाली,
"रश्मी शांत हो. आपण तुझ्या रुममध्ये जाऊन बोलूयात का?"

रश्मीने मान हलवून होकार दर्शवला. रश्मी आपल्या रुममध्ये निघून गेली.

"काकू मी तिच्या सोबत बोलते. आम्हाला डिस्टर्ब करायला येऊ नका. तिला कदाचित ते आवडणार नाही." हे बोलून ऋतुजा रश्मीच्या रुममध्ये गेली. 

"रश्मी पहिले मला एक सांग की, तू तुझा मोबाईल बंद का केला आहे?" रुममध्ये जाताचं ऋतुजाने विचारले.

"शिवम सोबत लग्न कर किंवा तो किती चांगला आहे. माझ्यासाठी कसा योग्य आहे, हे सांगायला भरपूर फोन येत होते. विशेष करुन मावशीचा, मावस बहिणीचा, भावाचा. मला कोणासोबतचं बोलण्याची इच्छा होत नव्हती, म्हणून मी मोबाईल बंद करुन ठेवला होता." रश्मीने उत्तर दिले.

"ऑफिस मधून सुट्टी का घेतली?" ऋतुजाने पुढील प्रश्न विचारला.

"शिवम सोबत लग्न न करण्याचे कारण सांगायचे आणि मगच घराबाहेर पाऊल टाकायचे, असं बाबांनी सांगितलं होतं." रश्मीने सांगितले.

"मग तू त्यांना कारण सांगत का नाहीये?" ऋतुजाचा पुढील प्रश्न आला.

रश्मी म्हणाली,
"शिवमच्या चांगुलपणावर त्यांचा इतका विश्वास आहे की,त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता. मी सगळ्या गोष्टी चुकीच्या समजून घेत आहे, असं त्यांनी मला सांगितलं असतं. आजवर सगळ्याच बाबतीत असंच होत आलं आहे. माझ्या बोलण्यावर कधीच आई बाबा विश्वास ठेवत नाहीत.

नेहमी मी कशी चूक आणि बाकीचे कसे बरोबर हेच मला ते पटवून देत आले आहेत."

"रश्मी एकतर तू आई बाबांबद्दल चुकीचा ग्रह मनात करुन ठेवला आहेस. असं मला वाटतंय. कुठल्याही आई वडिलांना आपल्या मुलीचं चांगलं व्हावं असं वाटत असतं. तू नेमकी कोणत्या गोष्टींच्या बाबत बोलत आहेस, याची मला कल्पना नाही. बाकी राहूदेत, आता मला एक सांग की, तू शिवमला लग्नाला नकार का दिलास?" ऋतुजाने विचारले.

रश्मीने सविस्तर बोलायला सुरुवात केली,
"आपलं मागच्या वेळी शिवम बद्दल बोलणं झालं होतं बघ, त्यानंतर मी शिवमला मॅसेज करुन सांगितलं की, मला नॉनव्हेज मॅसेज पाठवत जाऊ नकोस म्हणून. त्यावर त्याचा रिप्लाय आला की, 'मग फोटो आणि व्हिडिओ पाठवू का?'

मी त्याला काही रिप्लाय देण्याच्या आतचं त्याने मला काही फोटो आणि व्हिडिओ पाठवलेत. मी ते ओपन करुनही बघितले नाहीत. मी काहीच रिप्लाय न दिल्याने थोड्या वेळात त्याचा फोन आला. फोनवरही तोच बोलत होता. मी फार काही बोललेच नव्हते.

"रश्मी डार्लिंग यार, आपण ह्या जनरेशन मधील आहोत. नॉनव्हेज मॅसेज, न्यूड फोटोज, व्हिडिओज ही कॉमन गोष्ट आहे. त्यात न आवडण्यासारखं काय आहे? आपलं लग्न झाल्यावर तर आपल्यात फिजिकल रिलेशन बद्दल चर्चा होणारचं ना, मग त्याची सुरुवात आत्तापासूनचं झाली तर काय हरकत आहे?

मी तुला खूप जवळचं मानतो, म्हणून मी तुझ्या सोबत या विषयावर बोलत आहे. तू मला जवळचं मानत नाही का? ठीक आहे तुला या विषयावर बोलायचं नसेल तर नको बोलूस. 

मीही यापुढे या विषयावर बोलणार नाही. मग तर झालं. माझ्या बद्दल मनात काही चुकीचे विचार असतील तर काढून टाक."

मी काहीच न बोलल्याने त्याने तो विषय बंद केला. पुढील बराच वेळ आम्ही वेगळ्या विषयावर गप्पा मारत होतो. त्या दिवसानंतर शिवम मला नॉर्मल मॅसेज करायचा. माझ्यासाठी बदलणारा शिवम मला आवडू लागला होता, त्याला प्रत्यक्षात कधी भेटेल? असं वाटू लागलं होतं.

एके दिवशी अचानक डायरेक्ट घरी येऊन शिवमने मला सरप्राईज दिलं. शिवमने माझ्यासाठी लाल गुलाबाचा बुके आणला होता. माझ्या रुममध्ये आल्यावर त्याने मला मिठी मारली होती.

ऋतुजा शिवमच्या त्या मिठीत खूप भारी वाटत होतं. हा मुलगा आपल्यासाठी एकदम परफेक्ट आहे असं त्याक्षणी वाटत होतं. घरुन जेवण करुन सगळ्यांसोबत गप्पा मारुन शिवम निघून गेला. जाताना दुसऱ्या दिवशी मला बाहेर घेऊन जाण्याची परमिशन बाबांकडून घेऊन गेला.

मी ऑफिसमध्ये पुढील दोन ते तीन दिवसांची सुट्टी घेतली होती. दुसऱ्या दिवशी शिवम त्याच्या बाबांची कार घेऊन मला घरी न्यायला आला होता. शिवम त्याच्या प्रत्येक कृतीतून मी त्याच्या साठी किती स्पेशल आहे, हे मला जाणवून देत होता. शिवमने मला एक घड्याळ गिफ्ट केलं होतं.

शिवम मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. माझ्या आवडीचं जेवण ऑर्डर केलं. जेवण करता करता पुढील आयुष्याचं प्लॅनिंग त्याने मला सांगितलं. मी मंत्रमुग्ध होऊन त्याचं बोलणं ऐकत होते. जेवण झाल्यावर मात्र त्याने बॉम्ब टाकला.

शिवम म्हणाला,
"रश्मी आपलं लग्न होणार आहे, सो मला तुझ्यापासून काहीही लपवायचे नाहीये. माझ्या आयुष्यातील एक सत्य आहे, जे तुला कळायला हवं, त्याबद्दल आई बाबांना काहीच माहिती नाहीये. ते कधी समजूनही घेणार नाहीत. 

(शिवमने त्याच्या मोबाईल मधील एक फोटो दाखवला. शिवम व त्याच्या सोबत एक मुलगी होती.) ही माझी गर्लफ्रेंड आहे, हिचं नाव सुझान आहे. आम्ही गेल्या दोन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही दोघे एकमेकांशिवाय राहू शकत नाही.

सुझान माझ्यापेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. माझ्या घरी आमच्या लग्नाला कधीही मान्यता मिळणार नाही. मी सुझानला सोडण्याचा विचारही केला होता, त्यासाठी सुझान व मी काही दिवस वेगळे राहून बघितले, पण आम्हाला फार काळ एकमेकांपासून दूर राहता आले नाही. रश्मी मी तिच्यात खूप गुंतलेलो आहे.

मी तुला नॉनव्हेज मॅसेज, फोटो व व्हिडीओ मुद्दाम पाठवत होतो. मला वाटलं होतं की, तू तेव्हाच मला नकार देशील. पण तू मला समजून घेतलं होतं. रश्मी मला तुला फसवायचं नाहीये.

मी या लग्नाला केवळ आई बाबांसाठी होकार देत आहे. आपलं लग्न झाल्यावर मी नक्कीच तुला एक बायको असल्याचा मान देईल. तुझ्या सगळ्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, पण सुझान माझ्या आयुष्यात कायम असेल. मी तिला कधीच अंतर देऊ शकणार नाही. कधी कधी सुझान आपल्या घरीही येऊन राहील. तुला हे सगळं सहन होणार असेल, तरचं लग्नाला होकार दे."

"मग तुच लग्नाला नकार देना. तुला लग्न करायचे नाहीये, हे तुच सगळ्यांना सांग." मी रागात म्हणाले.

यावर शिवम म्हणाला,
"मी तसं करु शकणार नाही. माझ्या नातेवाईकांमध्ये माझी एक इमेज तयार झाली आहे, त्या इमेजला मी तडा जाऊ देऊ शकणार नाही. मी नकार देणार नाही. तुला द्यायचा असेल तर तू दे."

मी रागात म्हणाले,
"शिवम तू एका मुलीला फसवणार आहेस. तुला कळत कसं नाही? तुझी इमेज जपण्यासाठी तू एका मुलीच्या आयुष्यासोबत खेळणार आहेस."

"मी फसवत नाहीये. मला फसवायचं असतं तर मी तुला सुझान बद्दल काहीच सांगितलं नसतं. मी कोणत्याही मुलीला फसवणार नाही. ज्या मुलीशी लग्न करेल त्या मुलीला माझं सगळं सत्य आधीचं सांगेल." शिवम एकदम तोऱ्यात म्हणाला.

मी त्यावर काहीच बोलले नाही आणि शिवमच्या गाडीत बसलेही नाही. टॅक्सीने घरी निघून आले. मी घरी येण्याच्या आतच शिवमचा लग्नासाठीचा होकार घरी पोहोचला होता. 

मी घरी आल्यावर लग्नासाठी स्पष्ट नकार कळवायला बाबांना सांगितला, पण त्यांनी कळवलं नाही. आता मी जर बाबांना त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे हे सांगितलं, तर त्यांना अजिबात पटणार नाही."

क्रमशः

©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all