अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३५

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३५


मागील भागाचा सारांश: शीतलने ऋतुजाच्या हातावर मेहंदी काढली. मेहंदी काढताना ऋतुजा व शीतलच्या बऱ्याच गप्पा झाल्या. 


आता बघूया पुढे….


ऋतुजा व अभिराजच्या साखरपुड्यासाठी पियू, सुलभा मावशी व मनोहर काका पहाटे सुरतला पोहोचले. जवळच्या पाहुण्यांना अभिराजच्या कुटुंबियांनी साखरपुड्याला आमंत्रित केले होते. स्वामीनारायण मंदिराच्या जवळील हॉलमध्ये सगळेजण सकाळी गेले.


साखरपुड्या करिता शीतल ऋतुजाला तयार करणार होती. शीतलची प्रॅक्टिस नव्हती, तरी तिने ऋतुजाचा खूप छान मेकअप केला होता. 


"दीदी आज तुला बघून जिजू घायाळ होतील. तू लई भारी दिसत आहेस." पियू म्हणाली.


"शीतलने एवढा भारी मेकअप केला आहे म्हणून. शीतलने बघ एकदम साधा सोबर मेकअप केला आहे. ही तिच्या हाताची जादू आहे." ऋतुजाने सांगितले.


शीतल म्हणाली,

"असं काही नाहीये. ऋतू उगाच माझं कौतुक करत आहे. ती नॅचरली एवढी भारी दिसत आहे की, मला फार कष्ट घ्यावे लागले नाही." 


शीतलला कोणीतरी बोलवायला आलं म्हणून ती निघून गेली.


"दीदी तुझी जाऊबाई तर खूपच साधी सरळ आहे. ही पार्लर चालवते का?" पियूने विचारले.


"तिला भरपूर इच्छा होती, पण हवा तसा सपोर्ट मिळाला नाही. पियू आपण चांगलं असलं की सगळं जग आपल्याशी चांगलं वागतं. बरं ऐक इथल्या कोणत्याच माणसाच्या बाबत बोलू नकोस. कोणी ऐकलं तर गैरसमज होईल. तुला जे काही बोलायचं असेल, ते आपण पुण्याला जाऊन बोलूयात." ऋतुजाने सांगितले.


यावर पियू म्हणाली,

"हो ग बाई. नाही बोलणार. चला जिजूंमुळे सुरत बघायला मिळालं."


ऋतुजा व पियू मध्ये बोलणं सुरु असताना अर्पिता ऋतुजाला बोलवायला आली. सगळ्यांच्या उपस्थितीत विधिवत रित्या ऋतुजा व अभिराजचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे विधी उरकल्यावर अभिराज व ऋतुजाचे फोटो काढण्यासाठी फोटोग्राफर त्यांना बाहेरील गार्डनमध्ये घेऊन गेला.


फोटो काढता काढता ऋतुजा व अभिराजच्या गप्पा सुरु होत्या.


"ऋतू माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे." अभिराज म्हणाला.


ऋतुजा त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली,

"कसं काय?" 


अभिराज हातावरील मेहंदी दाखवत म्हणाला,

"हे बघ माझ्या हातावरील मेहंदी तुझ्या हातावरील मेहंदी पेक्षा कमी रंगली आहे." 


ऋतुजा हसून म्हणाली,

"असं काही नसतं. मी रात्री झोपताना मेहंदीवर निलगिरीचे तेल लावले होते, त्याने मेहंदीला जास्त रंग चढतो. मी मेहंदीला किती जपलं. सकाळी उठल्यावर कितीवेळ हात पाण्यात घातले नाही. तू नक्कीच एवढं काही फॉलो केलं नसेल." 


"अरे मला हे सगळं माहीतच नव्हतं. आता लग्नाच्या वेळी मीही मेहंदीची तुझ्या इतकी काळजी घेईल." अभिराज माघार घेत म्हणाला.


"हो बघू." ऋतुजा म्हणाली.


"बरं ऐक ना. तुला कसं वाटतंय?" अभिराजने विचारले.


"मंदिराचा परिसर खूप मस्त आहे. इथे येऊन प्रसन्न वाटत आहे. मला तर हे मंदिर खूप आवडलं." ऋतुजाने उत्तर दिले.


"ऋतू मी तुला काय विचारलं? आणि तू सांगते काय आहेस?" अभिराज म्हणाला.


ऋतुजा म्हणाली,

"अभी साखरपुडा झाल्यावर कुठल्याही मुलीला आनंदचं होईल ना. तू काही प्रश्न विचारत असतोस."


"हो तेही आहेच. ऋतू ह्या मंदिरात येऊन खरंच खूप प्रसन्न वाटतं. मी जेव्हा कधी उदास व्हायचो, तेव्हा इथे येऊन बसायचो." अभिराजने सांगितले.


इतक्या वेळ लांबून दोघांचं संभाषण ऐकत असलेली पियू म्हणाली,

"जिजू, दीदी तुमचं झालं असेल तर आपण आत जाऊयात का? तुमच्या दोघांचं फोटोशूट झालं आहे. दीदी आपल्याला पुण्याला परत जायचं आहे. मला तर भूक लागली आहे चल. मी कुठून तुझी करवली झाले काय माहीत? तुम्ही दोघे नंतर गप्पा मारत बसा." 


ऋतुजा, अभिराज व पियू हॉलमध्ये परत गेले. सगळ्यांची जेवणं झाल्यावर पाहुणे आपापल्या घरी निघून गेले. ऋतुजा व अभिराजच्या घरची मंडळी अभिराजच्या घरी गेले. पुढील काही वेळातच ऋतुजाच्या घरचेही पुण्याला रवाना झाले. घरचे सगळे उपस्थित असल्याने ऋतुजा व अभिराज मध्ये काहीच बोलणं होऊ शकलं नाही.


ऋतुजाच्या घरची मंडळी निघून गेल्यावर अभिराजच्या घरी सर्व घरातीलचं होते. आरतीच्या विषयावर आई बाबांसोबत बोलण्याची हीच वेळ योग्य आहे, असा विचार करुन अभिराज म्हणाला,

"आई-बाबा, अजय मला तुमच्या सोबत अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. मी बोलत असताना तुम्हाला कितीही बोलावंस वाटलं तरी मध्ये बोलू नका. माझं सगळं बोलणं ऐकून घ्या, मग तुम्ही प्रतिक्रिया द्या." 


अभिराजने वैभव व आरती मध्ये घडलेल्या सर्व गोष्टी सविस्तरपणे सगळ्यांसमोर मांडल्या. आई, बाबा, अजय व शीतल सगळेजण शॉक झाले होते. सर्वांच्याच डोळयात पाणी आले होते. 


अजय चिडून म्हणाला,

"दादा ह्या लोकांनी तर आपल्याला फसवलं आहे. त्यांचा मुलगा निर्व्यसनी, संस्कारी होता ना. मला तर असं वाटतंय की, त्या वैभवचा जाऊन जीव घ्यावा. तो आरती सोबत असं कसं वागू शकतो? एवढं सगळं होऊन सुद्धा तो तोऱ्यात मिरवतो आहे."


अभिराज अजयला शांत करत म्हणाला,

"अजय ही वेळ चिडून प्रतिक्रिया देण्याची नाहीये. मी व पंकजने जेव्हा हे सगळं ऐकलं, तेव्हा आम्हाला दोघांनाही राग अनावर झाला होता, पण ही वेळ चिडून मारामारी करण्याची नाहीये. आपण त्या वैभवला त्याची जागा बरोबर दाखवणार आहोत. मी त्याच साठी चार पाच दिवस सुट्टी घेतली आहे. आपण त्याचा हिशोब बरोबर करु."


आई आरती जवळ गेली व ती तिच्या डोक्यावरुन हात फिरवून म्हणाली,

"माझ्या लेकराने किती सहन केलं. आरती बाळा अग एकदा या आईकडे मन मोकळं करण्याचा प्रयत्न तरी करायचा ना. असं म्हणतात की, आईला आपल्या लेकराच्या मनात काय चालू आहे? हे कळतं, पण मला तर काहीच कळालं नाही." 


आरती आईच्या कुशीत शिरुन खूप रडली. बाबा मात्र शांत बसलेले होते.


"बाबा तुम्ही यावर काहीच बोलणार नाहीये का?" अभिराजने विचारले.


"अभी काय बोलू? नातेवाईकांमधील मुलगा असल्याने मी जास्त चौकशी केली नाही. आरतीला पुढे शिकायचं होतं, नोकरी करायची होती, तरी मी तिला लग्न कर म्हणून सांगितलं. तिनेही ते ऐकलं. अभी माझा निर्णय चुकला रे. माझ्या मुलीचं मीच वाटोळं केलं. आपल्याच लोकांनी आपल्याला फसवलं." बाबा म्हणाले.


यावर अभिराज म्हणाला,

"बाबा तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही आरतीच्या भल्यासाठीचं निर्णय घेतला होता ना. बाबा आपल्यापुढे हे मोठं संकट उभं राहिलं आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून ह्या संकटाला सामोरे जायचे आहे. धीराने घ्यावं लागेल. तुम्ही येत्या दोन दिवसांत वैभव व त्याच्या घरच्यांना बोलावून घ्या. लग्न ज्या मध्यस्थीने जमवलं होतं त्यालाही बोलवा. आपले कॉमन पाहुणेही बोलवा. नाही त्या वैभवची इज्जत वेशीवर टांगली ना, नाव अभिराज काळे सांगणार नाही."


"ऋतुजाच्या घरच्यांना हे सगळं माहीत आहे का?" बाबांनी विचारले.


"हो त्यांना सगळं माहीत आहे. आरतीच्या मनातील सगळं काढून घेणे ऋतुजालाचं जमलं. बाबा ते लोकं खूप वेगळ्या विचारांचे आहेत, त्यांना या गोष्टीने काहीही फरक पडला नाही." अभिराजने सांगितले.


यावर बाबा म्हणाले,

"हो ना. आपल्याला खूप चांगली माणसं मिळून गेली. आरतीच्या बाबतीत पुढं काय करायचं?"


"वैभव कडून तिला घटस्फोट मिळवून द्यायचा. इकडे सुरतला राहण्यापेक्षा आरतीला मी पुण्यात घेऊन जातो. तिकडे एखादी नोकरी तिला मिळूनचं जाईल. आरती तिच्या आयुष्यात बिजी असेल तर ती विचार करत बसणार नाही. ही सगळी कल्पना ऋतुजाची आहे. आरतीला उभारी देण्यात ऋतुजाचा खूप मोठा हातभार आहे." अभिराजने सांगितले. 


"घटस्फोटा व्यतिरिक्त दुसरा पर्याय आपल्याकडे नाहीये का?" आईने विचारले.


अभिराज म्हणाला,

"आई तो वैभव जो वागला आहे, त्याला त्याबाबतीत जरासाही पश्चाताप नाहीये. आरतीला एक फोन करुन सुद्धा त्याने तिची चौकशी केली नाही. अशा माणसासोबत आरती कशी राहू शकेल? चुका सगळ्यांच्या हातून होतात, पण आपण काही चूक केली आहे, ह्याची जाणीव त्याला व्हायला पाहिजे. आई तुझी काळजी मला समजते आहे, पण ही वेळ इमोशनल राहून विचार करण्याची नाही, तर प्रॅक्टिकल विचार करुन निर्णय घेण्याची आहे."


क्रमशः


©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all