अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३४

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३४


मागील भागाचा सारांश: ऋतुजा व तिचे कुटुंबीय अभिराजच्या घरी सुरतला गेले. सर्वानुमते ऋतुजा व अभिराजचा साखरपुडा दुसऱ्या दिवशी सुरतला करण्याचे ठरले. अंगठी खरेदी करण्यासाठी अभिराज व ऋतुजा दोघेच मार्केटमध्ये गेले.


आता बघूया पुढे….


अभिराज व ऋतुजा अंगठी व बाकी गोष्टींची खरेदी करुन घरी परतले. ऋतुजाच्या हातावर मेहंदी काढायची असल्याने तिला लवकर जेवण करुन घ्यायला सांगितले. ऐनवेळी मेहंदी काढायला कोणाला बोलवायचे, म्हणून शीतल तिच्या हातावर मेहंदी काढणार होती.


कोणी डिस्टर्ब करु नये, म्हणून शीतल व ऋतुजा ह्या दोघीजणी एका सेपरेट रुममध्ये जाऊन बसल्या. 


"तुम्ही कामात बिजी असल्याने आपल्या दोघींना काहीच बोलता आले नाही. आपली नीट ओळखही झाली नाही." ऋतुजा म्हणाली.


"हो ना. घरातील बाकीचे सर्वजण खूप गप्पा मारतात. मला कमी बोलण्याची सवय आहे. ऋतुजा मला अहो काहो करु नकोस. फक्त शीतल म्हणत जा." शीतलने सांगितले.


यावर ऋतुजा म्हणाली,

"मला सगळेजण ऋतू म्हणतात. आरती दीदीही मला ऋतूचं म्हणतात. तुही ऋतूचं म्हण. आपल्या घरी नेहमी साडी नेसावी लागते का?"


शीतल हसून म्हणाली,

"नाही ग. मी एरवी ड्रेस घालते. आज घरी पाहुणे असल्यामुळे साडी नेसली आहे. आपल्या भागात घरातील सुनेला ड्रेस घालायला सहजासहजी परवानगी मिळत नाही, पण आई बाबांनी परवानगी देऊन टाकली. त्यांच्या मते घरातील सगळेजण खुश राहिले पाहिजे, मग थोड्या फार रूढी परंपरा मोडल्या तरी चालतात. आई बाबा जास्त शिकलेले नसले, तरी त्यांचे विचार बऱ्यापैकी पुढारलेले आहेत. तुला साडी नेसायला आवडत नाही का?"


"साडी नेसून घरातील काम करायची सवय नाहीये ना, म्हणून मी विचारलं." ऋतुजाने उत्तर दिले.


शीतल म्हणाली,

"लग्नाआधी कोणालाच सवय नसते, नंतर आपोआप सवय होऊन जाते. तुला मेहंदी आवडते आहे ना?"


"हो. तू छान मेहंदी काढते आहेस. मेहंदीचा क्लास केला होता का?" ऋतुजाने विचारले.


"हो. मला मेहंदी काढायला आवडत होतीच, मग मी क्लास केला होता. मी पार्लरचा क्लासही केला होता. लग्न झाल्यावर कोणत्याच क्लासचा उपयोग झाला नाही. सणासुदीला आई व माझ्या हातावर मेहंदी काढते आणि स्वतःचा थोडाफार मेकअप करते." शीतलने सांगितले.


"तुला ब्युटी पार्लर चालू करायचे होते का?" ऋतुजाने विचारले.


"इच्छा तर होती, पण लग्न झाल्यावर तीन महिन्यातचं प्रेग्नंट राहिले. आईची तब्येत बरी राहत नव्हती, म्हणून त्यांना घरातील कामं जमत नव्हती. घरातील काम करता करता दिवस कुठे निघून जायचा? हेही कळत नव्हते. शिवाय ह्यांना मी घराबाहेर पडून काम करणे आवडणार नव्हते आणि त्यातल्या त्यात पार्लर तर सरळसरळ त्यांनी नकार दिला होता. मला जास्त बोलण्याची सवय नसल्याने मीही कधी माझी बाजू मांडू शकले नाही." शीतलने सांगितले.


"परी थोडी मोठी झाल्यावर तू पार्लर सुरु करु शकतेस. घरातील कामांना बाई लावू शकतेस आणि परीला सांभाळायला आई आहेतचं. अजय दादांना समजावून सांगितलं तर ते ऐकतील. आपल्या इच्छा दाबून ठेवू नये. निदान स्वतःसाठी तरी लढायला शिक." ऋतुजा म्हणाली.


शीतल मिश्किल हसून म्हणाली,

"ऋतू तू अगदी बरोबर बोलते आहेस, पण अजय व अभिराज दादा सख्खे भाऊ असले तरी त्यांचे विचार खूप वेगळे आहेत. तू शहरात वाढली असल्याने तुझे विचार असे झाले आहेत. माझी जडणघडण एका खेडेगावात झाली आहे. मला घरात सगळं काही मिळतंय हेच माझ्यासाठी खूप आहे. अजय सगळ्याच बाबतीत चांगले आहेत. मला कधीच सासुरवास झाला नाही. आई बाबा मला अगदी त्यांच्या मुलीसारखं मानतात.


आई घरात असल्याने मला परीला सांभाळण्यात काहीच अडचण आली नाही. ऋतू तसंही आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतात, असं नाही ना. मी तुझ्यासोबत या विषयावर बोलली आहे, ते कोणाला सांगू नकोस. सहज विषय निघाला म्हणून बोलून गेले."


"नाही सांगणार." ऋतुजाने सांगितले.


मेहंदी काढता काढता ऋतुजा व शीतलमध्ये बऱ्याच गप्पा झाल्या. 


"अजून मेहंदी काढून झाली की नाही?" अभिराजने येऊन विचारले.


"अजून फक्त पंधरा मिनिटे. दादा परी त्रास देत आहे का?" शीतल म्हणाली.


"परी जेवण करुन झोपली. आई असल्यावर परीची काळजी करण्याची गरज नाही." अभिराजने सांगितले.


"अभी दादा तुला माणसांमध्ये करमत नाही का? सगळेजण तिकडे बसलेत आणि हा ऋतूला भेटण्यासाठी इकडे आला." आरती अभिराजच्या पाठोपाठ येऊन म्हणाली.


आरतीच्या बोलण्यावर ऋतुजा व शीतल दोघी हसल्या. 


"अरे मी सहज मेहंदी झाली की नाही? हे बघायला आलो होतो. ऋतू आपल्या घरची पाहुणी आहे ना, मग तिची काळजी घ्यायला हवी की नाही. मी विचार केला की, मॅडमला काही हवं असेल तर विचारुन येऊयात." अभिराज सारवासारव करत म्हणाला.


"तुम्ही तर काहीच विचारलं नाही." शीतल म्हणाली.


यावर अभिराज म्हणाला,

"अग शीतल मी इथं का आलो आहे? हे न बोलता तिला कळलं. आम्ही एकमेकांशी नजरेतून बोलतो. आम्हाला शब्दांची गरज नाहीये."


"ही नजरेची भाषा जरा तुमच्या भावालाही शिकवा." शीतल म्हणाली.


"अभी दादाला बोलण्यात कोणी हरवू शकत नाही आणि अजयला कोणी काही शिकवू शकत नाही. माझे तीनही भाऊ वरुन साधे सरळ दिसत असले, तरी ते खरे कसे आहेत? हे मलाच माहीत." आरती म्हणाली.


"आरती आमचं अजून लग्न व्हायचं आहे. हे सगळं त्यानंतर बोल. नाहीतर ऋतू उद्या अंगठी घालू देणार नाही." अभिराज म्हणाला.


ऋतुजाच्या हातावर मेहंदी काढून झाली होती. ऋतुजा अभिराज कडे बघून म्हणाली,

"मेहंदीचा फोटो काढता का? शीतलने किती सुंदर मेहंदी काढली आहे." 


"बघ म्हणून मी आलो होतो. मला कल्पना होती की, ऋतूला माझ्या मदतीची गरज पडणार आहे." अभिराज म्हणाला.


अभिराजने ऋतुजाच्या हाताचे फोटो काढले. 

"नवरदेव तुम्हालाही हातावर मेहंदी काढावी लागेल. आईचा आदेश आहे. शीतल ह्याचा हातावर थोडी मेहंदी काढ." आरतीने सांगितले.


शीतल समोर हात देत अभिराज म्हणाला,

"आईचा आदेश आहे म्हटल्यावर मोडता येणार नाही. शीतल जास्त काही काढत बसू नकोस. फक्त दोन तीन फुलं काढ."


"तुमच्या दोघांपैकी कोणाचं जास्त प्रेम आहे, हे उद्या सकाळी कळेल." आरती म्हणाली.


"म्हणजे?" अभिराजने विचारले.


"समजा ऋतुजाच्या हातावरील मेहंदी रंगली तर तुझे तिच्यावर जास्त प्रेम आहे आणि तुझ्या हातावरील मेहंदी रंगली तर तिचे तुझ्यावर जास्त प्रेम आहे." आरतीने सांगितले.


"अरे मग ऋतुजाच्या हातावरील मेहंदी जास्त रंगणार." अभिराज विश्वासाने म्हणाला.


"ऋतुजा ह्याचा कॉन्फिडन्स बघ." आरती म्हणाली.


यावर ऋतुजा म्हणाली,

"उद्या सकाळी कळेलचं. दीदी हे लहानपणापासूनचं एवढे बडबड करतात का?"


"आता बरोबर प्रश्न विचारलास. तरी म्हटलं अजून तुला ह्याची अति बडबड लक्षात कशी आली नाही. दहावी पर्यंत अभी खूप शांत होता. अकरावीला जेव्हा तो होस्टेलला रहायला गेला, तेव्हा याचं कसं होईल? हा प्रश्न आई बाबांना पडला होता, पण तिकडून सुट्टीत आल्यावर याची बडबड ऐकायला मिळाली. तेव्हापासून याची बडबड सुरु झाली. आपण जर समजा एखादी महत्त्वाची गोष्ट विचारायला फोन केला, तर निरर्थक बडबड ऐकून आपल्याला कंटाळा येईल, पण हा बोलून थकत नाही. 


एखाद्या वेळेस हा जर काही बोलला नाही, तर त्याची तब्येत बरी असेल का? हा प्रश्न पडतो." आरतीने सांगितले.


"तुम्ही माझी उडवण्याची संधी शोधत असतात. मी आता काही बोलत नाही. तुमचं चालूद्यात." अभिराज म्हणाला.


"दीदी एका जागेवर बसून माझ्या कंबरेला कळ लागली आहे. मी जाते. तुम्ही तुमच्या भावाला कंपनी दयायला बसा." एवढं बोलून ऋतुजा बाहेर निघून गेली.


ऋतुजा गेल्यावर शीतल म्हणाली,

"दादा तुम्हाला ऋतुजा एकदम परफेक्ट मिळाली आहे."


क्रमशः


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all