अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३३

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३३


मागील भागाचा सारांश: अभिराजने ऋतुजाचे आभार मानले. ऋतुजाने अभिराजला लग्नाची बोलणी पुढे नेण्यास सांगितले. अभिराजने घरी फोन करुन बाबांसोबत त्या विषयावर चर्चा केली. ऋतुजा व तिच्या घरच्यांना अभिराजच्या बाबांनी सुरतला बोलावले.


आता बघूया पुढे….


अभिराज, पंकज व आरती ऋतुजाच्या कुटुंबियांसोबत सुरतला गेले. अभिराजच्या आई बाबांनी ऋतुजा व तिच्या घरच्यांचे स्वागत केले. आरतीचा खुललेला चेहरा बघून तिच्या आई बाबांचे डोळे पाणावले. 


घरात गेल्यावर एका रुममध्ये आरतीला तिची आई घेऊन गेली. तिच्या चेहऱ्यावरुन हात फिरवत आई म्हणाली,

"बाळा नेहमी अशीच आनंदी रहा. तुझ्या चेहऱ्यावरील दुःख बघवत नव्हते."


"आई या सगळ्याचे श्रेय ऋतूला जाते. आई अभी दादा खूप नशीबवान आहे की, त्याला ऋतुजा सारखी बायको मिळत आहे. ऋतुजा खूप समजदार आहे. तिने मला व्यवस्थित रित्या समजून घेतले. मला परकेपणाची जाणीव अजिबात होऊ दिली नाही." आरतीने सांगितले.


घरात पाहुणे असल्याने मायलेकींना फारसे बोलता आले नाही. जेवणं झाल्यावर अभिराजचे बाबा ऋतुजाच्या बाबांना म्हणाले,

"प्रमोद राव मी सगळं काही शून्यातून निर्माण केलं आहे. मोठं घर बांधण्यापेक्षा मुलांना शिकवण्याला जास्त महत्त्व दिले. तसंही अभिराज व पंकज नोकरीमुळे पुण्यातचं राहतील. इकडे आम्ही दोघे आणि अजयची फॅमिली, म्हणून मनात मोठं घर घेण्याचा विचार होता, तोही काढून टाकला. 


तुमच्या मुलीला मात्र कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तुमची मुलगी कायम सुखात राहिल. माझा अभिराज लाखात एक मुलगा आहे. आमच्या घराकडे बघून आमची पारख करु नका."


यावर ऋतुजाचे बाबा म्हणाले,

"अहो दिलीपराव तुम्ही स्वतःला कमी का समजता आहात? माणसाचं घर नाहीतर मन मोठं असावं लागतं. अभिराज लाखात एक मुलगा आहे, हेही मी मान्य करतो, त्याच्याकडे बघूनच मी माझी मुलगी देतो आहे. माणूस पैसा कधीही कमवू शकतो, त्यात मोठी गोष्ट नाहीये. तुम्ही कमी शिकलेले असताना सुद्धा मुलांना शिकवलं ही मोठी गोष्ट तुम्ही केली आहे.


विशेष म्हणजे तुम्ही मुलांवर अतिशय छान संस्कार केले आहेत. अभिराजच्या वागण्यातून प्रत्येक वेळी मला ते जाणवत आहे. मी तुमचं घर बघून नाही, तर मन बघून माझी मुलगी देत आहे. आता पुढे कसं आणि काय करायचं? हे ठरवून घेऊयात."


अभिराजचे बाबा अभिराज कडे बघून म्हणाले,

"अभी तुला मुलगी पसंत आहे ना? काही विचार बदलला असेल, तर तसं सांग."


"नाही बाबा, माझा काही विचार बदलला नाहीये. मला ऋतुजा पसंत आहे." अभिराजने त्वरित उत्तर दिल्यावर सगळेजण हसायला लागले.


"ऋतू तुला अभिराज पसंत आहे ना?" रणजीतने विचारले.


"हो दादा. आता स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ का? मुद्दाम तुम्ही लोकं आम्हाला छळत आहात." ऋतुजा म्हणाली.


"मला काय वाटतं प्रमोदराव तसंही लग्न आपण पुण्यातचं करणार आहोत, तर साखरपुडा उद्या इथेच सुरतला केला तर चालेल का? अगदी मोजक्या लोकांमध्ये साखरपुडा करुन घेऊयात. इकडे स्वामीनारायण मंदिर आहे, तिथे एक मस्त हॉल आहे, तिथे आपल्याला साखरपुडा करता येईल. आमच्या जवळच्या पाहुण्यांना बोलावता येईल." अभिराजचे बाबा म्हणाले.


ऋतुजाचे बाबा म्हणाले,

"अगदी माझ्या मनातील बोललात. उगाच लांबवण्यापेक्षा उद्या सकाळी साखरपुडा उरकून घेऊयात म्हणजे आम्हाला रात्री पुण्याला जाता येईल. अंगठयांची खरेदी तेवढी करावी लागेल."


"हे मुलं मार्केटमध्ये जाऊन अंगठ्या घेऊन येतील. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करुयात." अभिराजच्या बाबांनी सांगितले.


घरातील सगळ्यांनाच काहीना काही कामं असल्याने अभिराज व ऋतुजा दोघेच अंगठी खरेदी करायला घराबाहेर पडले. 


"ऋतू सुरत आवडलं का?" अभिराजने विचारले.


"तू अजून सुरत दाखवलं कुठेय? पूर्ण सुरत बघितल्या शिवाय ते कसं आहे, हे मी सांगू शकणार नाही." ऋतुजा म्हणाली.


अभिराज म्हणाला,

"आपल्याकडे वेळ कमी आहे, नाहीतर आजचं सुरत दर्शन तुला घडवलं असतं."


"हो ना. मीही असंच बोलले." ऋतुजा म्हणाली.


"ऋतू उद्या आपला साखरपुडा आहे आणि आपण खरेदीसाठी दोघेच चाललो आहोत. गंमतच आहे. आमच्याकडे लग्नाआधी मुलगा आणि मुलगी एकटे कुठेचं जाऊ शकत नाही, तशी परवानगी नसते. पण बाबांनी मला लगेच परवानगी दिली. आपल्या मुलाच्या आनंदासाठी आई बाबा काहीही करायला तयार होतात." अभिराज म्हणाला.


"हो. आरती दीदींबद्दल घरी कधी सांगणार आहेस? सगळ्यांसमोर बोलता येणार नाही, म्हणून आता विचारत आहे." ऋतुजा म्हणाली.


"उद्याचा साखरपुडा होऊन जाऊदेत. साखरपुड्याला वैभवची गैरहजेरी दिसल्यावर नातेवाईक चर्चा करतीलच. परवा वैभवच्या घरच्यांना बोलावून सगळा सोक्षमोक्ष लावतो. प्रोजेक्टचं काम संपल्याने मॅनेजरने पाच दिवसांची रजा मंजूर केली आहे, ती मार्गी लावतो." अभिराजने सांगितले.


ऋतुजा म्हणाली,

"हो ना. मला तर वाटलं होतं की, तुझा तो खडूस मॅनेजर आपल्या लग्नाच्या वेळेसही सुट्टी देईल की नाही."


"ऋतू त्या विषयावर आपण नंतर बोलूयात. आता आपण दोघेच आहोत ना, तर प्लिज बाकी कोणाचा विषय नको. ही वेळ आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाही, म्हणून मला प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा आहे. आपली नोकरी, कुटुंब यांचे प्रश्न आपल्या सोबत असणारच आहे, पण आपण फक्त दोघे आणि आपल्या दोघांचं आयुष्यही असणार आहे." अभिराज म्हणाला.


 ऋतुजा अभिराज कडे कौतुकाने बघत म्हणाली,

"अभी तू ना परफेक्ट आहेस. मला काही बोलायची गरजच नाहीये. तू सगळ्या गोष्टी परफेक्ट करतोस. घरच्यांना मॅनेज करुन आपण दोघेच खरेदीला बाहेर कसे पडू? याकडे तू लक्ष दिलंस. तू एकाचवेळी सगळे रोल्स निभावतो."


"ऋतू माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, याकडे मी जास्त लक्ष देतो. माझ्या आजूबाजूचे लोकं आनंदी कसे राहतील? ह्याला मी महत्त्व देतो." अभिराजने सांगितले.


"आणि तुझ्या आनंदाचं काय?" ऋतुजाने विचारले.


"माझा आनंद जपायला तू आहे ना. माझ्या चेहऱ्यावरील आनंद तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे माझ्या लक्षात आले आहे. ऋतू तुझे डोळे खरं बोलतात आणि मी तुझे डोळे वाचायला शिकलो आहे. तू म्हणते ते खरं आहे. सगळंच काही बोलण्याची आवश्यकता नसते. तुझं माझ्यावर किती प्रेम आहे, हे तुझ्या डोळयात दिसतं." अभिराज बोलता बोलता इमोशनल झाला होता.


ऋतुजा अभिराजचा हात हातात घेऊन म्हणाली,

"अभी इतकं इमोशनल व्हायला काय झालंय?"


"आपल्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार मिळायला भाग्य लागतं. तू माझ्या आयुष्यात आल्याने मला खूप मोठा रिलीफ मिळाला आहे. मी तुला काहीच सांगितलं नाही, तरी तुला बरोबर कळतं. आता हेच बघ ना, मी इमोशनल झालो आहे, हे कळल्यावर मला आधाराची गरज आहे, हे तुला जाणवलं, म्हणून तू माझा हात काही विचार न करता हातात घेतलास. ऋतू तू पहिल्यांदा माझा हात हातात घेतला आहेस." अभिराजने सांगितले.


अभिराजचा हात सोडत ऋतुजा म्हणाली,

"अभी आपण बोलत बसलो, तर इथेच रात्र होऊन जाईल. पटकन लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करु आणि घरी जाऊयात. घरचे सगळे वाट बघत असतील."


"ऋतू फक्त शेवटचा प्रश्न. आपला साखरपुडा छोटेखानी होत आहे, तर तू खुश आहेस ना?" अभिराजने विचारले.


ऋतुजा हसून म्हणाली,

"अभी माझ्यासाठी आपला साखरपुडा होणे महत्त्वाचे आहे. तो छोटेखानी होतोय किंवा मोठा होतोय हे नाही. आता आई बाबा, रणजीत दादा, अर्पिता वहिनी व आरव तर आहेच. सुशील मावशी, पियू व मनोहर काका आज रात्री बसणार आहेत, म्हणजे उद्या सकाळी ते पोहचतील. माझ्या जवळची सगळी माणसे हजर असणार आहेत. आता राहिला प्रश्न मैत्रिणींचा तर त्या लग्नाला येतीलचं. 


मला माझ्या मनासारखा जोडीदार मिळतो आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. बाकी या सगळ्या गोष्टी किरकोळ असतात. अभी तुझे प्रश्न संपले असतील, तर काम करुयात का?"


अभिराजने हसून मान हलवून होकार दर्शवला.


क्रमशः

©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all