अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३२

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३२


मागील भागाचा सारांश: ऋतुजा अभिराज व पंकजला घरी बोलावून वैभवच्या कृत्याबद्दल सांगितले, तसेच वैभव विरोधात ठोस पुरावे गोळा करण्याची आवश्यकता असल्याचेही तिने त्यांना सांगितले. अभिराजला ऋतुजा सोबत एकांतात बोलायचे असल्याने त्याने आरती व पंकजला आईस्क्रीम खाण्यासाठी बाहेर जायला सांगितले.


आता बघूया पुढे….


"बोला साहेब आपल्याला काय बोलायचं आहे?" आरती व पंकज निघून गेल्यावर ऋतुजाने विचारले.


अभिराज म्हणाला,

"ऋतू तुझे आभार मानून मला तुला परकं करायचं नाहीये, पण तू आरतीच्या मनातील सगळं काढून खूप मोठं काम केलं आहे. आरती जर काही बोलली नसती, तर ती काही दिवसांनी डिप्रेशन मध्ये गेली असती आणि त्याची मला सर्वांत जास्त भीती वाटत होती. आरती व तुझी ही पहिली भेट होती, तरी तिने तुझ्याकडे मन मोकळं केलं म्हणजे तुच तिला तसा विश्वास दिला असशील.


मी नेहमी विचार करायचो की, आपल्याला एका शिकलेल्या मुली सोबत लग्न करायचे आहे, पण ती आपल्या फॅमिलीला सांभाळून घेईल का? माझ्या भावंडांना समजून घेईल का?


तुझ्या बाबतीत तर मला वाटलं होतं की, ही थोड्या सुखवस्तू घरातील आहे, हिला स्वतंत्र आयुष्य जगायला आवडत असेल. तू मनाने किती चांगली आहेस हे मला कळलं होतं. पण आज तू आरतीला पुण्यात शिफ्ट व्हायला सांगून माझ्या मनातील सगळे गैरसमज दूर केलेत.


काही दिवसांपूर्वी पंकज व माझ्यात बोलणंही झालं होतं की, लग्न झाल्यावर पंकजला वेगळं रहावं लागेल म्हणून. ऋतू ते दोघे आपल्यात राहिल्याने तुला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना?"


"अभी मला काहीच प्रॉब्लेम होणार नाही, कारण तू मला समजून घेशील, तुला माझ्या सर्व भावना कळतील. आरती दीदी आणि पंकज पण फ्रँक वाटले. ते आपल्याला आपली प्रायव्हसी नक्की देतील. आता हेच बघ ना, तुला माझ्या सोबत बोलायचे होते, तर तू त्यांना बाहेर जायला सांगितलं आणि त्यांनी ते समजून घेतलं. मला काही बोलण्याची गरज पडली नाही आणि लग्नानंतरही असंच होईल, याची खात्री मला आहे.


कुठल्याही शिकलेल्या मुलीला फॅमिली हवीच असते, पण तिच्या काही इच्छा असतात, तिची काही स्वप्नं असतात, तेही समजून घेतले पाहिजे. लग्न झाल्यावर ती मुलगी एका वेगळ्या कुटुंबात जाते, तिला तिथं सगळंच नवीन असतं आणि अशात जर तुम्ही तिच्यावर बंधनं लादायला सुरुवात केली, तर मग तिला ते आवडणार नाही. 


तू मला हवं तसं जगू देशील, ह्याची कल्पना मला आहे, म्हणून मी त्याबाबत निश्चिन्त आहे. राहिली गोष्ट आरती दीदींसोबत बोलण्याचा आणि त्यांचा विचार करण्याचा, तर अभी ते सगळे खुश असतील, तर खुश असशील आणि मला तू खुश असणं जास्त महत्त्वाचं आहे. तुझ्या चेहऱ्यावर स्माईल दिसावी म्हणून मी हे सगळं करत आहे." ऋतुजाने सांगितले.


अभिराज म्हणाला,

"माझ्या चेहऱ्यावर स्माईल दिसावी म्हणून सगळं करतेस, पण माझ्यावर प्रेम आहे, हे स्पष्टपणे सांगत नाहीस. मला तुला आता मिठीत घेण्याची इच्छा झाली होती, पण तेही करता येत नाही."


यावर ऋतुजा म्हणाली,

"घुमून फिरुन तू तिथेच ये. तुझ्याबद्दल माझ्या मनात ज्या भावना आहेत, त्या तुला कळल्या ना, मग बोलण्याची काय गरज आहे? मला जेव्हा मूड असेल, तेव्हा मी तुला स्पष्टपणे सांगेल. सब्र का फल मिठा होता है.


आता राहिला प्रश्न मिठीचा तर तुझं ते स्वप्न लगेच पूर्ण होणार नाही. ऐक ना अभी मला कल्पना आहे की, आता सध्या तुमच्या सगळ्यांची मनस्थिती वेगळी आहे, पण आपल्या लग्नाची बोलणी पुढे जायला हवी. मला माहिती आहे की, आपल्या सगळ्यांचा लग्नासाठी होकार आहे, पण ऑफिशिअली फायनल व्हायला हवं. 


किती दिवस हा विषय लांबत ठेवणार आहोत. आरती दीदींना घटस्फोट लगेच मिळणार नाही, त्याची काहीतरी प्रोसेस असते, त्याला वेळ लागेल. तोपर्यंत आपलं लग्न थांबवू शकणार नाही. आपल्याला मोकळेपणाने भेटता येत नाही. आई बाबांना टेन्शन येतं. तू प्लिज तुझ्या आई बाबांसोबत बोल ना.


अभी मला माझं लग्न एन्जॉय करायचं आहे. आपल्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम्स येणार आहेत, पण त्यासाठी आपण आपल्या आयुष्यातील चांगले क्षण खराब करु शकणार नाही. तुला माझ्या बोलण्याचा राग आला असेल, तर सॉरी. पण मी काही बाबतीत जरा स्पष्टचं बोलते."


"मला राग येण्याचा काही संबंध नाहीये. तू अगदी योग्य बोललीस. मी उद्या बाबांशी बोलतो. मलाही लग्नाची घाई झाली आहे. जोपर्यंत लग्न होणार नाही, तोपर्यंत मला तुला हक्काने मिठीत घेता येणार नाही." अभिराज म्हणाला.


"तुला तेवढंच सुचूदेत. पंकजला फोन कर आणि त्यांना घरी यायला सांग. उदय ऑफिसला जायचं नाहीये का? इथंच बसलास तर झोप पूर्ण होणार नाही. ऑफिसला जायला उशीर झाला, तर तुझा तो खडूस मॅनेजर तुला रडायला लावेल." ऋतुजाने सांगितले. 


"थोडं आनंदी व्हावं म्हटलं तर तू लगेच मॅनेजरची आठवण करुन देतेस. तू खूप खडूस आहेस, पण ह्याच खडूसच्या प्रेमात पडलो आहे." अभिराज म्हणाला.


अभिराजने पंकजला फोन करुन बोलावून घेतले. पंकज व आरती अभिराज व ऋतुजा साठी आईस्क्रीम घेऊन आले. 


"दादा आम्हाला वाटलं होतं की, तुझं बोलणं काही आता रात्रभर संपत नाही." पंकज अभिराजला चिडवण्यासाठी म्हणाला.


अभिराज म्हणाला,

"गप रे. उगाच जखमेवर मीठ चोळू नकोस. रात्रभर गप्पा मारण्याची माझी इच्छा होती, पण आमच्या मॅडम तयार नाहीयेत ना."


अभिराज व ऋतुजाने आईस्क्रीम खाल्लं. अभिराज व पंकज अजून थोड्या गप्पा मारुन दोघेजण निघून गेले.


दुसऱ्या दिवशी अभिराजने घरी फोन करुन बाबांना लग्नाची बोलणी पुढे करण्या बद्दल सुचवले. अभिराजने समजावून सांगितल्यावर त्याच्या बाबांना त्याचे म्हणणे पटले. 


पंकजने त्याच्या मुंबईतील मित्रांना वैभवचा पाठलाग करण्याचे काम सांगितले. आरतीने ऋतुजाच्या मदतीने बायोडाटा तयार केला. ऑनलाईन फ्लॅटफॉर्मवर नोकरी मिळण्यासाठी ऋतुजाने आरतीची प्रोफाईल बनवून दिली. आरतीचा अवतार खराब झाल्याने ऋतुजाने तिला पार्लरची अपॉइंटमेंट घेऊन दिली.


आरती पार्लर मध्ये गेलेली असताना ऋतुजाने तिच्या आई बाबांना आरती सोबत काय घडलं? याची सविस्तर कल्पना दिली. पंकजचे मित्र त्यांच्यावर सोपवलेलं काम व्यवस्थित रित्या पार पाडत होते. 


अभिराजच्या बाबांनी ऋतुजाच्या बाबांना फोन करुन सुरतला येण्याचे आमंत्रण दिले होते. येत्या विकेंडला सर्वांनी सुरतला जायचा प्लॅन ठरला होता. ऋतुजाने आरतीला पुणे फिरवलं. आरती साठी तिने कपड्यांची शॉपिंग केली. आरती व ऋतुजाचे सूत चांगल्या रीतीने जुळलं होतं. आरती ऋतुजा सोबत मनमोकळेपणाने बोलत होती.


"ऋतू तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे." आरती म्हणाली.


"आता मी काय केलं?" ऋतुजाने विचारले.


आरती म्हणाली,

"ऋतू काही दिवसांपूर्वी आयुष्य उध्वस्त झाल्यासारखं मला वाटत होतं. आता आपल्याला या आयुष्यात करण्यासारखं काहीच उरलं नाही असं वाटत होतं. पण मी पुण्यात आल्यापासून तू ज्या पद्धतीने आयुष्याची नवीन ओळख करुन देत आहेस ना. ते बघून नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करावी असे वाटत आहे.


आयुष्यात अनेक गोष्टी आहेत, त्या मी करु शकते. आयुष्य जगण्यासाठी एक जोडीदारचं असणे आवश्यक नाही, हे मला समजले आहे. मी एकटी असले तरी हे आयुष्य मस्त एन्जॉय करु शकते, हे मला कळलंय. तुझ्यासारखी वहिनी सोबत असेल, तर मला कोणाचीच गरज पडणार नाही. दादा तर माझा होताच, पण आता तुही माझा आधार बनली आहेस."


"आरती दीदी तुम्ही स्वतःचं तुमचा आधार बनू शकता. आम्ही सगळे तुमच्या सोबत असू, पण आयुष्य जगण्याची हिंमत तुम्हाला दाखवायला हवी. मी जो तुमच्यावर विश्वास दाखवला आहे, तो सार्थ करुन दाखवा आणि मग माझं कौतुक करा. दीदी आयुष्य हे असंच असतं. कधी काय घडेल? हे सांगू शकत नाही. त्या विरोधात लढण्याची तयारी आपण कायम ठेवायची." ऋतुजाने सांगितले.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all