अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३१

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ३१


मागील भागाचा सारांश: आरतीच्या डोळ्याआड वैभव काय करत होता? हे त्याच्या मित्राकडून आरतीला कळलं. तिच्यासाठी तो खूप मोठा धक्का होता. वैभवला केलेल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप नव्हता. आरतीला त्याचं वर्तन सहन न झाल्याने ती घरातून बाहेर पडली.


आता बघूया पुढे…


ऋतुजाने दोघींसाठी स्वयंपाक बनवला. आरती फ्रेश झाल्यावर दोघींनी जेवण केले. जेवण झाल्यावर ऋतुजा म्हणाली,

"दीदी मनातलं बोलून कसं वाटतंय?" 


"खूप बरं वाटत आहे. तुझ्यामुळे मी बोलू शकले, नाहीतर मला ते बोलवलं जात नव्हतं. अभी व पंकजला तुच सांग. पुन्हा पुन्हा तेच बोलण्याची माझ्यात हिंमत नाहीये." आरती म्हणाली.


"हो दीदी. आज रात्री दोघांना घरी बोलावून घेते आणि मग त्यांच्या सोबत बोलते. बरं मला एक सांगा, पुढे काय करायचं ठरवलं आहे?" ऋतुजाने विचारले.


"मी त्यावर विचारचं केला नाही. सुरतला राहिलं, तर शेजारी पाजारी, नातेवाईक आई बाबांना टोमणे मारुन हैराण करतील. मी घरी असले की, आई बाबांना माझ्याकडे बघून वाईट वाटेल. काय करावं? हेच सुचत नाहीये." आरती म्हणाली.


यावर ऋतुजा म्हणाली,

"दीदी तुम्ही इकडे पुण्यात शिफ्ट व्हा. मी माझ्या घरी रहा असं म्हणणार नाही, कारण तुमच्या साठी ते कम्फर्टेबल नसेल. अभी व पंकज फ्लॅटवर दोघेच राहत आहेत, तर तुम्ही त्यांच्या सोबत रहा. दोघांच्या जेवणाची सोयही होईल. समजा तुम्हाला होस्टेलला रहायचे असेल, तर तसंही ऍडजस्ट होऊ शकेल. तुम्ही इकडे नोकरी शोधा. काही दिवसांत तुम्हाला नोकरी नक्की मिळेल. तुम्ही कामात बिजी असल्या की, तुमच्या डोक्यात वेगळे विचार येणार नाही. 


तुम्ही तुमचे पैसे कमवत असल्या की तुम्हाला कोणावर ओझं झाल्यासारखं वाटणार नाही. प्रत्येक मुलीने आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडंट असलं पाहिजे. निदान स्वतःला लागणारा किरकोळ खर्च तरी आपला आपल्याला करता आला पाहिजे. कशी वाटली माझी आयडिया?"


"तुझी आयडिया छानचं आहे, पण एक प्रश्न मनात आला आहे, म्हणून विचारते. तुमच्या दोघांचं लग्न झाल्यावर मी व पंकज दोघेही तुमच्या सोबत एकाच फ्लॅटवर राहिलेलं तुला आवडेल का?" आरतीने विचारलं.


"तुम्ही दोघांनी आपापलं काम केलं, तर मला का आवडणार नाही? जोक्स अ पार्ट, दीदी आपण एका फॅमिलीतील असणार आहोत, मग एका घरात रहायला मला काहीच अडचण नाहीये. हं आता तुम्हाला आमच्या प्रायव्हसी बद्दल बोलायचं असेल, तर हो प्रायव्हसी ही हवीच. तुम्ही दोघेही तेवढे समजदार नक्कीच असाल की, आम्हाला आमची प्रायव्हसी द्याल.


दीदी मी ह्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल वाद घालणारी मुलगी नाहीये. पंकज व माझ्यात कधी बोलणं झालं नाहीये, पण तोही अभी सारखाच असेल असं वाटतं. दीदी कसं असतं ना, कोणत्याही मुलीला जॉईंट फॅमिलीत रहायला प्रॉब्लेम नसतो, पण तिला तिचं आयुष्य तिच्या पद्धतीने जगू दिलं पाहिजे. काही जॉईंट फॅमिलीत सगळं मोठ्यांचं ऐकावं लागतं. घरातील सुनेला काहीच किंमत नसते, मग तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो." ऋतुजाने सांगितले.


आरती म्हणाली,

"ऋतू तुझे विचार खरंच खूप वेगळे आहेत. डोन्ट वरी मी व पंकज जरी तुमच्या सोबत राहिलो, तरी तुम्हाला आमची अडचण होणार नाही, असंच वागू. तुम्हाला दोघांना तुमची प्रायव्हसी मिळेल. आता माझा हा निर्णय आई बाबांना पटला पाहिजे."


"नाही पटला, तरी आपण पटवून देऊ." ऋतुजाने सांगितले.


ऋतुजाने अभिराजला फोन करुन संध्याकाळी घरी येण्यास सांगितले, सोबत पंकजला घेऊन यायला सांगितले.


अभिराज व पंकज घरी आल्यावर ऋतुजाने दोघांना जेवण करायला सांगितले. चौघांचे जेवण झाल्यावर ऋतुजाने वैभवचे कृत्य अभिराज व पंकजला सांगितले. सगळं ऐकल्यावर अभिराज व पंकजचे डोळे रागाने लाल झाले होते, ते बघून ऋतुजा म्हणाली,


"तुम्हाला दोघांनाही राग येणं स्वाभाविक आहे, पण ही वेळ रागात येऊन काही करण्याची नाही, तर शांततेत डोकं चालवून काहीतरी करण्याची वेळ आहे." 


"ऋतू आता ह्या क्षणी जाऊन त्या वैभवचा जीव घेण्याची इच्छा होत आहे. तो इतका खालच्या पातळीला जाऊच कसा शकतो? ह्याला जर हे धंदे करायचे होते, तर त्याने आरती सोबत लग्न करण्याची गरजच नव्हती." अभिराज चिडून बोलत होता.


"दीदी जिजू ड्रिंक्स करतात, हे तू आम्हाला सांगायला हवे होते. तेव्हाच घरातील कोणी काही बोललं असतं, तर गोष्टी या थराला गेल्या नसत्या." पंकज म्हणाला.


यावर ऋतुजा म्हणाली,

"पंकज दीदींनी तेही सांगितलं असतं, तरी आज जी परिस्थिती आहे, त्यात थोडाही बदल झाला नसता. जे झालं त्याबद्दल चर्चा करण्यात फायदा नाहीये. अभी त्यांचा जीव घेणे प्रॅक्टिकली शक्य नाही आणि समजा असं काही केलं, तर त्याने अजून प्रॉब्लेम वाढतील.


माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. माझी ही कल्पना आपल्या आई बाबांच्या जनरेशनला पटणार नाही, सो त्यांना ह्यापैकी काहीच कळू द्यायचं नाही. आता सध्या वैभव जिजू गाफील आहेत. त्यांना ही गॅरंटी आहे की, आरती दीदी सगळं खरं घरच्यांना सांगू शकत नाही, त्यामुळे तुम्ही त्यांचं काहीच वाकडं करु शकणार नाही.


वैभव जिजूंविरोधात आपल्याला पुरावे लागणार आहेत, ते गोळा करण्याची ही योग्य वेळ आहे. वैभव जिजूंचा पाठलाग करुन ते कुठे जातात? कोणासोबत फिरतात? या सगळ्यांचे फोटो, व्हिडीओ काढायचे. 


हे काम तुमच्या एखाद्या मित्राकडून करुन घेऊ शकतो. वैभव जिजूंच्या घरच्यांना जेव्हा तुम्ही त्यांचं कृत्य सांगायला जाल, तेव्हा आरती दिदींवर कोणी विश्वास ठेवणार नाही. आपल्याकडे पुरावे असतील, तर ते आपण पटवून देऊ शकतो. 


आता वैभव जिजू सावध नाहीयेत. आपण असं काही करु याची कल्पना त्यांना नसेल. सावजाला शिकाऱ्याच्या ताब्यात अडकवण्याची ही परफेक्ट वेळ आहे. आता लगेच आई बाबांना काहीच सांगू नका.


पुढे जाऊन घटस्फोट घेण्याच्या वेळी हेच पुरावे आपल्याला मदत करतील. आपल्याकडे ठोस पुरावे आहेत, हे कळल्यावर ते घटस्फोट द्यायला सहजासहजी तयार होतील."


"ऋतू तू एकदम करेक्ट बोलत आहेस. पंकजचे असे दोन मित्र आहेत, जे हे काम करु शकतील. आपण सर्व पुरावे गोळा करु, मग त्या माणसाला सगळ्या नातेवाईकांमध्ये उघडं करुयात. आई बाबांना ही गोष्ट पटणार नाही, पण अश्या लोकांना ह्याच पद्धतीने एक्स्पोज करावे लागेल." अभिराज म्हणाला.


अभिराजच्या बोलण्याला दुजोरा देत पंकज म्हणाला,

"हो दादा. वहिनी जसं म्हणत आहेत, तसंच करुयात. मी माझ्या मित्रांना वैभव जिजूंचा पाठलाग करुन पुरावे गोळा करायला लावतो." 


इतक्या वेळ शांत बसलेली आरती म्हणाली,

"तुम्ही दोघे जपून हे काम करा. अभी दादा ऋतू म्हणत होती की, पुण्यात जॉब शोध म्हणून."


"ऋतू बरोबर बोलली. तिकडे सुरतला राहिलीस, तर आजूबाजूचे लोकं हैराण करतील. तुला सुखाने जगू देणार नाही. तू कामात बिजी असलेलं बरं. तुझा बायोडाटा तयार कर. ऑनलाईन ऍप्लिकेशन करुन ठेवायचे. कुठेतरी नोकरी मिळेलचं. प्रयत्न करुन बघायला काहीच हरकत नाही. ऋतूचे आई बाबा नाहीये तोपर्यंत इथे थांब, मग आपल्या फ्लॅटवर शिफ्ट हो. आमच्या दोघांच्या जेवणाची सोय होईल." अभिराजने सांगितले.


आरती म्हणाली,

"हो ऋतू मला तसंच म्हणत होती."


अभिराज म्हणाला,

" मला ऋतू सोबत थोडं बोलायचं आहे. तुम्ही दोघेजण खाली जाऊन आईस्क्रीम खाऊन येतात का? आणि आमच्यासाठी पण घेऊन या. थोड्या उशिरा या."


"दादा आम्ही आत्तापासूनचं तुला कबाब मध्ये हड्डी वाटायला लागलो की काय?" पंकज अभीला चिडवण्यासाठी म्हणाला.


यावर आरती म्हणाली,

"पंकज त्यांना बोलूदेत. आपण आईस्क्रीम खाऊन येऊ. डोन्ट वरी दादा, तू फोन केल्याशिवाय आम्ही काही घरी येणार नाही."


अभिराजला ऋतुजा सोबत काय बोलायचे असेल? बघूया पुढील भागात…


©®Dr Supriya Dighe



🎭 Series Post

View all