अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २

ऋतुजाच्या वर्तनातील बदल बघून तिची आई आश्चर्यचकित होते.

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २


मागील भागाचा सारांश: आपल्या कथेची नायिका ऋतुजा व तिच्या कुटुंबाचा परिचय करुन घेतला. ऋतुजाच्या घरची मंडळी तिला लग्नासाठी तयार करतात.


आता बघूया पुढे….


रुममध्ये गेल्यावर ऋतुजाने आई बाबांच्या बोलण्याचा सखोल विचार केला. ऋतुजा आपल्या विचारात दंग असताना तिच्या मोबाईलची रिंग वाजली. मोबाईल चार्जिंगला लावला असल्याने ऋतुजाला आपल्या जागेवरुन उठून फोन घेण्याचा कंटाळा आला होता, पण कोणाचा महत्त्वाचा फोन आला असेल, म्हणून ती नाईलाजास्तव मोबाईल घ्यायला उठली. स्क्रीनवरील शरयू हे नाव बघून तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. 


शरयू: हॅलो, ऋतुजा कुठे कलमडली होतीस? फोन उचलायला एवढा उशीर का लावलास?


ऋतुजा: अग शरयू मोबाईल चार्जिंगला लावला होता. जागेवरुन उठण्याचा जाम कंटाळा आला होता.


शरयू: तुला बरं वाटत नाहीये का?


ऋतुजा: मी बरी आहे.


शरयू: मग तुझा आवाज एवढा लो का वाटतो आहे? काकूंशी लग्न या विषयावरुन काही झालं का?


ऋतुजा: शरयू तुला कसं कळलं?


शरयू: मला नाही तर कोणाला कळेल. आपण दोघी बेस्ट फ्रेंड्स काय फक्त पोस्टला टॅग करण्यासाठी आहोत का? ऋतुजा तुझ्या आवाजावरुन तुझ्या डोक्यात काय चालू असतं? याचा अंदाज मला येतो.


ऋतुजा: तुच माझी खरी मैत्रीण आहेस.


शरयू: म्हणूनच माझी दररोज फोन करुन आठवण काढत असतेस ना?


ऋतुजा: सॉरी यार. दररोज ऑफिसमध्ये इतकं थकायला होतं की, घरी येऊन कोणासोबत बोलण्याची इच्छाच होत नाही. जेवण करुन केव्हा एकदा झोपते असं होऊन जातं. 


शरयू: घरी सगळे व्यवस्थित आहेत का?


ऋतुजा: हो. पुढच्या महिन्यात नवीन फ्लॅटचं पजेशन मिळणार आहे. मग आम्ही सगळेच एका घरात राहू.


शरयू: अच्छा. बरं मूळ मुद्द्यावर बोलूयात. काकू काय बोलल्या?


ऋतुजा: आज फक्त आईचं नाहीतर बाबा पण बोलले. बाबांनी मला लग्नाचं मनावर घ्यायला लावलं आहे. मी पण होकार दिला आहे. शरयू माझं मन ह्या सगळ्यासाठी तयार होत नाहीये. एकता मॅडमसारखं माझ्यासोबत काही घडणार तर नाही ना, असं राहून राहून वाटत राहतं.


शरयू: हे बघ ऋतू तू आता लग्नासाठी स्थळं बघायला तयार झाली असशील, तर मनातील ही निगेटिव्हीटी काढून टाक. प्रत्येकाचे नशीब वेगवेगळे असते. एकता मॅडमच्या बाबतीत तुला एकच बाजू माहीत होती, बरोबर ना? जे काही झालं, त्यात एकता मॅडमचं सुद्धा काहीतरी चुकले असेल. ऋतू टाळी ही एका हाताने कधीच वाजत नाही.


ऋतुजा: तुझं बोलणं सगळं मला कळतंय, पण मनात एक भीती वाटत आहे. 


शरयू: ऋतू तू पंकजला भेटली आहेसचं. पंकज व माझी भेट होण्याआधी मलाही भीती वाटत होती. पंकज मला आत्त्याच्या घरी बघायला आले होते. आम्हाला बोलायला वेळ दिला होता, म्हणून आम्ही दोघे खाली पार्कमध्ये गेलो होतो. आमच्यात जेमतेम दहा मिनिटे बोलणं झालं. ऋतू तुला खरं वाटणार नाही, पण ती माझ्या आयुष्यातील बेस्ट दहा मिनिटे होती. आपल्याला समोरच्याच्या वाईबस वरुन सगळं समजतं. हा व्यक्ती आपल्यासाठी योग्य आहे, हे आपलं मन त्याचवेळी मान्य करतं. ऋतू तू याचा जास्त विचार करु नकोस. जी काही प्रोसेस होणार आहे, ती एन्जॉय कर.


ऋतुजा: तुझ्याशी बोलून जरा बरं वाटतंय. मी काही न विचारता तू माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.


शरयू: मैत्रीण याचसाठी असते. मी फोन का केला? हे सुद्धा तू विचारलं नाहीस. बरं जाऊदेत मीच सांगते. पुढच्या रविवारी माझं डोहाळे जेवण आहे आणि तू येणार आहेस. मला कोणतीही कारणे चालणार नाही. आई शनिवारी येणार आहे, तिच्यासोबत गाडीतून ये. रविवारी कार्यक्रम झाल्यावर आई लगेच परत जाणार आहे, सो तुला काहीच अडचण होणार नाही.


ऋतुजा: डोहाळे जेवण इकडेच ठेवायचे ना.


शरयू: अग माझ्या सासूबाई खूप हौशी आहेत. डोहाळे जेवणाची सगळी तयारी त्याच करत आहेत. उद्या पार्कमध्ये जाऊन फोटो काढायचे आहेत, ही इच्छा पण आईंचीच आहे.


ऋतुजा: बरं तुझी तब्येत कशी आहे? मी विचारायचं विसरुनचं गेले.


शरयू: एक दिवस मलाच विसरली नाहीस म्हणजे मिळवलं. मी बरी आहे. घरातील सर्वजण माझी खूप काळजी घेत असतात. मला एकाही कामाला हात लावू देत नाहीत. आईकडे जेवढी मजा झाली नसती, तेवढी मजा इकडे चालू आहे.


ऋतुजा: चांगलं आहे. बरं चल आई जेवणासाठी आवाज देत आहे. मी काकूंसोबत डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न करेल. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे.


एवढं बोलून ऋतुजाने फोन कट केला. ऋतुजा व शरयूच्या संभाषणावरुन तुम्हाला त्या एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी आहेत, हा अंदाज आला असेलच. ऋतुजा व शरयू ह्या शाळेपासून ते कॉलेजपर्यंतच्या मैत्रिणी, त्यांची मैत्री घट्ट होती. इंजिनिअरिंग झाल्यावर शरयूचे लगेच लग्न झाले. शरयू आता नाशिकला रहायला होती. शरयूच्या नवऱ्याची म्हणजेच पंकजची छोटीशी कंपनी होती. शरयू त्याला त्याच्या कामात मदत करायची. 


दुसऱ्या दिवशी सकाळी ऋतुजा झोपेतून उठली, फ्रेश होऊन हॉलमध्ये जाऊन बसली. बाबा देवपूजा करत होते, तर आई किचनमध्ये ब्रेकफास्टची तयारी करत होती. ऋतुजा आईजवळ जाऊन म्हणाली,


"आई मी तुला काही मदत करु का?"


आई ऋतुजाच्या डोक्याला हात लावत म्हणाली,

"तू बरी आहेस ना? किचनमधील कामांना हात लावायला तर तुला अजिबात आवडत नाही ना?"


"आई लग्न झाल्यावर ही काम करावी लागतील, म्हणून आत्तापासूनच सवय लावून घेण्याच्या विचारात आहे." ऋतुजाने उत्तर दिले.


यावर आई म्हणाली,

"पाण्यात पडलं की, पोहता येतं फक्त आपण हातपाय हलवायला पाहिजे. तुलाही स्वयंपाक जमेल. आता हॉलमध्ये जाऊन बस. मी चहा घेऊन येते."


ऋतुजा हॉलमध्ये येऊन बसली. बाबांची देवपूजा झाल्यावर ते हॉलमध्ये आले.


"गुडमॉर्निंग ऋतू." बाबा


"गुडमॉर्निंग बाबा. मला आईचं काहीच कळत नाही. एरवी किचनमध्ये मदतीला जात नाही, म्हणून ओरडत असते आणि आज मी गेले, तर हॉलमध्ये जाऊन बस असं सांगितलं." ऋतुजाने सांगितले.


"एवढ्या वर्षांत तुझ्या आईचा स्वभाव मला कळाला नाही, तर तुला कसं कळेल? तुझ्या आईचा स्वभाव म्हणजे भुलभुलैया आहे." आई हॉलमध्ये येत आहे हे बघून बाबा तिला चिडवण्यासाठी म्हणाले.


चहाचा ट्रे टीपॉय वर ठेवत आई म्हणाली,

"तुम्हाला जे काही बोलायचं ते बोला. माझा रणजित इथे नाही, म्हणून तुम्ही मला एकटं पाडलं आहे. नवीन घरात रहायला गेल्यावर तो माझ्याचं बाजूने असेल बघा. अग ऋतू माझा ब्रेकफास्ट बनवून झाला होता, म्हणून मी तुला काहीच काम सांगितलं नाही. तुला स्वयंपाक करण्याची इच्छा होत असेल, तर एक वेळेस पोळ्या करत जा. हळूहळू सवय झाली की, मग एकेक काम अजून करत जा. लगेच सगळंच करायला गेलीस, तर तुला कंटाळा येईल."


"हो आई." ऋतुजा स्माईल देत म्हणाली.


"आज दुपारी रणजितकडे जाऊयात का? मला आरवची खूप आठवण येत आहे." बाबांनी विचारले.


यावर ऋतुजा म्हणाली,

"अहो बाबा, पण आम्ही दोघी सुलभा मावशीकडे जाणार आहोत." 


आई ऋतुजाच्या चेहऱ्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली,

"आज तुला काय झालं आहे? एकतर मी स्वप्न तरी बघतेय किंवा आज सूर्य पश्चिम दिशेला उगवला असेल."


ऋतुजा हसून म्हणाली,

"आई यातील काहीच झालेलं नाहीये. तुला सुलभा मावशीकडे जायचं आहे. मलाही सुट्टी आहे, तर पियूची भेट होईल. माझा विकेंड काहीतरी मार्गी लागल्यासारखा वाटेल. दादाकडे गेलो असतो तरी चाललं असतं, पण काल तू मावशीला आपण येणार असल्याचे कळवले आहे आणि आपण जर गेलो नाही, तर मावशीला वाईट वाटेल. आपल्याला जर कोणी एवढं प्रेमाने बोलवत आहे, तर आपण त्याचा मान ठेवायला पाहिजे. बरं आई मी मॅट्रिमोनी साईटवरील अकाउंट अपडेट केलं आहे. माझे काही अलीकडील फोटो त्यात ऍड केले आहेत."


ऋतुजा आपल्या रुममध्ये निघून गेली. आई मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आश्चर्याने बघत होती.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe






🎭 Series Post

View all