अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २९

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २९


मागील भागाचा सारांश: आरतीला ऋतुजा आपल्या घरी घेऊन येते. आरती सोबत बोलून ऋतुजा तिच्या मनातील काढून घेण्याचा प्रयत्न करते.


आता बघूया पुढे….


आरतीला जाग आली त्यावेळी ऋतुजा तिच्या बाजूला नव्हती. आरतीने घड्याळात बघितले, तर साडेआठ वाजले होते. आपण इतक्या उशिरापर्यंत कसे झोपून राहिलो? असा प्रश्न तिला पडला होता. असं दुसऱ्याच्या घरी राहत असताना इतक्या उशिरापर्यंत झोपलेलं कसं वाटत असेल? हा विचार ती करत होती, तोच ऋतुजा रुममध्ये येऊन म्हणाली,


"गुड मॉर्निंग दीदी. झोप झाली का?"


"गुड मॉर्निंग ऋतू. अग मला उठवायचं ना. मी कितीवेळ झोपून होते." आरती म्हणाली.


"इट्स ओके दीदी. तुम्हाला रात्रभर व्यवस्थित झोप लागली नव्हती. रात्रभर या कुशीवरुन त्या कुशीवर वळणे सुरु होतं, म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही. तसंही लवकर उठून जायचं कुठे आहे? बरं तुम्ही ब्रश करुन या. मी तुमच्या साठी चहा करते." एवढं बोलून ऋतुजा हॉलमध्ये आली.


ऋतुजाचा मोबाईल वाजला, तर अभिराजचा फोन होता. चहाचं गॅसवर पातेलं ठेवत ऋतुजाने कॉल उचलला,


"हॅलो ऋतू, गुड मॉर्निंग."


"गुड मॉर्निंग अभी. आज ऑफिसला जायचं नाहीये का?" ऋतुजाने विचारले.


"नाही गेलो तर तो मॅनेजर मला खाऊन टाकेल. मी निघतच होतो, तेवढ्यात आरती बद्दल विचारावं म्हणून फोन केला. काही बोलली का?" अभिराज म्हणाला.


"अजूनतरी नाही. पण बोलतील. अभी त्यांची मानसिक अवस्था नाजूक आहे. खूप भयानक काहीतरी घडलं आहे, असं वाटतंय. आई बाबा दोन दिवस घरी नसतील, सो आम्ही दोघीच घरात असू, तर त्या बोलतील. काल आमच्यात तसं थोडंफार बोलणं झालंय." ऋतुजाने सांगितले.


अभिराज म्हणाला,

"आरती कधी बोलेल? याचीच वाट मी बघतो आहे. बरं आई बाबा कुठे गेलेत?"


"माझे एक चुलत आजोबा पहाटे वारले, तर आई बाबा त्यांच्या अंत्यविधी साठी गावी गेले आहेत. दोन दिवस तरी येणार नाहीत." ऋतुजाने उत्तर दिले.


"बरं आरती काही बोलली, तरी मला लगेच कळव." अभिराज म्हणाला.


"हो रे बाबा. मी लगेच तुला फोन करेल. आता तू ऑफिसला जा." बोलून ऋतुजाने फोन कट केला.


"अभीचा फोन होता का?" आरतीने किचनमध्ये येऊन विचारले.


"हो. भावाला बहिणीची काळजी लागली आहे." ऋतुजा म्हणाली.


"काका- काकू दिसत नाहीयेत. ते कुठे बाहेर गेले आहेत का?" आरतीने विचारले.


ऋतुजा म्हणाली,

"हो. आई बाबा गावी गेले आहेत. माझे एक चुलत आजोबा वारले, त्यांच्या अंत्यविधी करता गेले. दोन दिवस आता आपण दोघीच घरी राहू. तुम्ही हॉलमध्ये बसा. मी चहा घेऊन येते."


आरती हॉलमध्ये जाऊन बसली. ऋतुजा चहाचे दोन कप घेऊन गेली. 


"चहा कसा झाला?" ऋतुजाने विचारले.


"मस्त." आरतीने उत्तर दिले.


ऋतुजा म्हणाली,

"तुम्हाला काय खायला आवडेल? ते सांगा. आई घरात नसल्याने किचन डिपार्टमेंट माझ्याकडे आहे. तुम्ही अंघोळ करुन घ्या, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. तुम्हाला बाहेर फिरायला जायचं असेल तर तसं सांगा. आपण पुणे दर्शन करुयात. आपण मूव्ही बघायलाही जाऊ शकतो आणि तुमची इच्छा असेल तर मानसोपचार तज्ञाकडे जाऊ शकतो." 


यावर आरती म्हणाली,

"ऋतू अंघोळ, स्वयंपाक बाकीच्या गोष्टी करण्याआधी मला बोलायचं आहे. आता आपण दोघी घरात आहोत, तर मला बोलणं सोपं जाईल. ऋतू मनात सगळं साठवून मी थकले आहे. रात्री जाग आली, तर त्या विचाराने मला झोप लागत नाही."


"मग बोला ना दीदी. सगळ्या कामांपेक्षा हे जास्त महत्त्वाचे आहे. आपण जेवण बाहेरुन ऑर्डर करु, पण प्लिज बोला." ऋतुजा म्हणाली.


डोळयात आलेलं पाणी आरतीने पुसलं व तिने बोलायला सुरुवात केली,


"मी थोडं सुरुवातीपासून सांगते. वैभव आमच्या जवळच्या नातेवाईकांमधील होते. एका लग्नात वैभवने मला बघितलं होतं आणि मग त्यांच्या घरच्यांनी मला मागणी घातली होती. वैभव दिसायला, स्वभावाने, नोकरी, फॅमिली सगळं काही चांगलं असल्याने बाबांनी लगेच होकार दिला. बाबांना वैभव आवडल्याने मी नाही म्हणण्याचा काही प्रश्नचं नव्हता. त्यावेळी माझं ग्रॅज्युएशन झालं होतं. 


मला पुढे शिकण्याची इच्छा होती. नोकरी करुन आपल्या पायावर उभे राहावे असं वाटत होतं. वैभव व माझ्यात जेव्हा पहिल्यांदा बोलणं झालं, तेव्हा मी माझी इच्छा त्यांच्याकडे बोलून दाखवली. माझी शिकण्याच्या इच्छेला त्यांचा पाठिंबा असेल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं. वैभवचे एकंदरीत विचार ऐकून मी खूप आनंदी झाले होते. 


वैभव सारखा जोडीदार आपल्याला मिळणार ह्या कल्पनेने मला आभाळ दोन बोटं राहिल होतं. साखरपुड्यात वैभवने मला स्मार्टफोन गिफ्ट केला होता. मग काय आमच्यात चॅटिंग, कॉल्स सुरु झालं होतं. रात्री एक, दोन वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारायचो. मी वैभवच्या प्रेमात पडले होते. मला ते मनापासून आवडू लागले होते. आता आपल्या आयुष्यात कधी काहीच प्रॉब्लेम येणार नाही, असं वाटायला लागलं होतं. 


लग्न होण्याच्या पंधरा दिवस आधी वैभव माझ्यासोबत फिजिकल रिलेशन या विषयावर बोलू लागले होते. आपला होणारा नवरा या विषयावर बोलतो आहे, म्हणून मला त्यात काहीच गैर वाटले नाही. आमच्यात त्या विषयावर बऱ्यापैकी मोकळं बोलणं होऊ लागलं होतं. लग्नाच्या आधी सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यातर नंतर सगळं सोपं जातं, असं वैभवचं म्हणणं होतं.


लग्न झाल्यावर आम्ही हनिमूनला महाबळेश्वरला गेलो होतो. साहजिकच तिकडे गेल्यावर ज्या क्षणांची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो, ते झालं. वैभव मला स्पेशल फिल करुन देत होते. छान वाटत होतं. 


मुंबईला परत आल्यावर माझं एम बी एचं ऍडमिशन झालं. मी दिवसभर कॉलेजला असायचे, तर ते कंपनीत. आमचा राजा राणीचा संसार सुरु होता. वैभवला ओकेजनली ड्रिंक करण्याची सवय होती, ते मला लग्नानंतर समजलं. महिन्यातून एकतरी पार्टी ते करायचे. 


वैभवच्या सगळ्या गोष्टी चांगल्या असल्याने मी तेवढी एक गोष्ट नजरेआड केली. माझं एम बी एचं पहिलं वर्ष संपलं. दुसऱ्या वर्षी मला अभ्यासाचा जास्त लोड असल्याने आमच्या दोघांमध्ये शारीरिक दुरावा येत होता. वैभव मला त्याबाबतीत समजून घ्यायचे. कधी त्यांनी त्याबद्दल तक्रार केली नाही. 


कॉलेजचे शेवटचे सहा महिने असताना अभ्यास वाढला होता, त्यात प्रोजेक्टचे काम ऍड झाले होते. कॉलेजला ये-जा करण्यात बराच वेळ निघून जात असल्याने वैभवने मला होस्टेलला रहा, असे सुचवले. सहा महिन्यांचा प्रश्न असल्याने मलाही त्यांचं म्हणणं पटलं. मी विकेंडला घरी यायचे.  


दररोज वैभव सोबत फोनवर बोलणं व्हायचं, त्यामुळे त्यांच्या बद्दल मनात कधी शंका उत्पन्न झालीच नाही. मित्रांसोबत पार्टी केली, तरी ते मला फोनवर सांगायचे. वैभव सारखा सपोर्ट करणारा जोडीदार भेटला, याचा मला अभिमान वाटायचा. 


वैभव मला होस्टेलवर भेटायला यायचे, त्यामुळे माझ्या सर्व मैत्रिणी त्यांना ओळखायच्या. एक दिवस माझ्या एका मैत्रिणीने मला येऊन सांगितले की, वैभवला तिने एका मुलीसोबत हॉटेलमध्ये बघितले. तेव्हा तिच्या बोलण्यावर मी विश्वास ठेवला नाही. तरी मी तिच्यासमोर वैभवला फोन केला, तर वैभवने सांगितले की, तिने दुसऱ्या कोणाला तरी बघितले असेल. माझा वैभववर पूर्ण विश्वास असल्याने मी शंका घेतलीच नाही. 


शेवटचा एक महिना मला घरी जाता आले नाही. वैभवला त्यावेळी कंपनीत खूप काम असल्याने त्यांना मला भेटायला यायला जमले नाही.


शेवटची एक्साम संपल्यावर आम्ही दोघे खूप आनंदी झालो होतो. आईने व सासूबाईंनी सुचवले की, आता नोकरी करण्यापेक्षा बाळाचं मनावर घ्या. जेणेकरुन नोकरीत गॅप पडणार नाही. आम्हाला दोघांना त्यांचं म्हणणं पटलं.


आमचं सगळं काही सुरळीत सुरु होतं. वैभवचे बऱ्यापैकी सगळेच मित्र मला माहित होते. आमच्या घरी ते यायचे, त्यांच्या बायकाही यायच्या. ते सगळेच मला सभ्य वाटायचे. 


माझा एकच प्रॉब्लेम झाला की, मी सगळ्यांना माझ्याप्रमाणेचं तोललं. मी कधी डोळे उघडून बघितलं नाही. वैभव व त्याचा मित्र त्या दिवशी घरी दारुच्या बाटल्या घेऊन आले नसते, तर मला वैभव बाहेर काय करतात? हे कधीच कळलं नसतं."


आरतीला वैभवचं काय सत्य समजलं होतं?ज्यामुळे तिला इतका मोठा धक्का बसला होता, बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe


🎭 Series Post

View all