अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २७

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २७


मागील भागाचा सारांश: अभिराजच्या घरी काहीतरी टेन्शन सुरु असल्याने त्याच्या घरच्यांनी लग्नाबद्दल पुढील बोलणी केली नव्हती. तसेच ऋतुजा व अभिराज मध्येही त्याबद्दल काहीच बोलणं होत नव्हतं. ऋतुजाला नेमकं काय चालू आहे? हे जाणून घ्यायचे असल्याने ती अभिराजला भेटायला गेली होती.


आता बघूया पुढे…


"मलाही प्रस्तावना द्यायची नाहीये, पण काय आहे ना, जे घडलं ते आमच्यासाठी खूप जास्त शॉकिंग होतं. तो विषय जरी काढला तरी डोळयात पाणी येतं. ऋतू आम्ही तीन भाऊ आणि आरती एकटी बहीण असल्याने ती सर्वांचीच लाडकी होती. लहानपणापासून मला अजय पेक्षा तीच आवडायची. आमचा सगळ्यांचा तिच्यात खूप जास्त जीव होता. 


आमची आरती तशी पहिल्यापासूनचं अति समजदार होती. आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना त्रास होऊ नये, ही तिची नेहमी इच्छा असायची. वैभव रावांचं स्थळ सांगून आलं, तेव्हा तर ती बिचारी लग्नासाठी तयार नव्हती, पण बाबा म्हणाले की, चांगलं स्थळ आहे, म्हणून आरतीने लग्नासाठी होकार दिला. वैभव राव नातेवाईकांमधील असल्याने त्यांच्या बद्दल सगळ्यांनी चांगलंच सांगितलं होतं.


चांगलं स्थळ हातातून जायला नको, म्हणून बाबांनी आरतीचं लग्न फिक्स केलं. आरतीला पुढे शिकण्याची, नोकरी करण्याची इच्छा होती. वैभव राव लग्नानंतर तिला शिकू देतील, असं त्यांनी सांगितलं होतं. मुलाला चांगली नोकरी आहे, शिवाय तो निर्व्यसनी आहे, हे बघून लग्न फिक्स झालं होतं.


आरतीच्या लग्नाला जवळपास तीन वर्ष झाले आहेत. आजवर कधीच तिने वैभव रावांबद्दल तक्रार केली नाही. वैभव राव आमच्या सगळ्यांशी व्यवस्थित बोलायचे. आरती नेहमी खुश दिसायची, त्यामुळे आम्हाला कधी काही शंका आली नाही. दोघा राजा राणीचा संसार अगदी मजेत सुरु होता.


लग्नानंतर आरतीने एम एस एस्सी करण्याऐवजी एम बी ए फायनान्स मध्ये केलं. वैभव रावांनीचं तिला तसं सुचवलं होतं. एम बी ए झाल्यावर ती नोकरी शोधणार होती, पण माझ्या आईचं व तिच्या सासूबाईंचं म्हणणं असं पडलं की, आता एखादं मूल होऊदेत मग नोकरी जॉईन कर. आता नोकरी जॉईन करशील मग परत मूल झाल्यावर नोकरीत गॅप पडेल. आरतीला त्या दोघींचं म्हणणं पटलं, म्हणून तिने लगेच नोकरी करण्याचा विचार बाजूला ठेवला. 


मी सहसा आरतीला कधी फोन करत नाही. आईकडून तिची ख्याली खुशाली कळून जाते. आरतीही मला काम असल्याशिवाय फोन करत नाही. तुझ्यासोबत चॅटिंग करत असताना तिचा फोन आला होता, मग मी उचलला, तर ती खूप रडत होती. रडताना एवढंच बोलत होती की, "दादा मला वाचव. मला इथून घेऊन जा. मी इकडे राहू शकणार नाही. मला या नरकातून घेऊन जा. मला या बंधनातून सोडव." 


असं काहीतरी बडबड करत होती. मी तिला बराच वेळ शांत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी थोडं ओरडून बोललो, तेव्हा ती शांत झाली व ती एवढंच म्हणाली की, "दादा मला घरी जायचे आहे. प्लिज मला घेऊन जा." 


मी तिच्याकडे वैभव रावांबद्दल चौकशी केली, तर ती त्यांच्या बद्दल काहीच बोलली नाही. आरतीचं रडणं ऐकून मला खूप टेन्शन आलं होतं. रात्रीची वेळ असल्याने तिच्याकडे कसं जावं? हाही प्रश्न पडला होता. माझा मावसभाऊ तिच्या घरापासून दहा किलोमीटरवर राहतो. मी त्याला फोन करुन तिला त्याच्या घरी घेऊन जायला सांगितलं. ते दोघे दादा वहिनी तिला त्यांच्या घरी घेऊन आले. हे दोघे तिच्या घरी गेले, तेव्हा वैभव राव घरी नव्हते. हॉलमध्ये दारुच्या बाटल्या दादाच्या निदर्शनास पडल्या, त्यावेळी आम्हाला वाटलं की, वैभव रावांनी ड्रिंक्स घेतले असेल,म्हणून दोघांमध्ये किरकोळ भांडण झालं असेल.


आरतीची अवस्था वाईट असल्याचे दादाकडून कळाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी वैभव रावांना फोन करुन आरती दादाच्या घरी असल्याचे सांगितले. वैभव राव फारसं माझ्यासोबत बोलले नाही, म्हणजे त्यांची बायको रात्री कुठेतरी निघून गेली, याबद्दल त्यांना काही वाटलं सुद्धा नाही. आरती बद्दल काळजी सुद्धा त्यांच्या बोलण्यात नव्हती.


मला तर सुट्टी नव्हती, मग पंकजला सुट्टी घेऊन मी मुंबईला पाठवलं, तो आरतीला घेऊन सुरतला गेला. पंकज दुसऱ्या दिवशी इकडे निघून आला. आरती आईजवळ खूप रडली, पण नेमकं त्या रात्री काय घडलं होतं? हेच तिने कोणालाच सांगितले नाही. आई व बाबांनी तिला बऱ्याचदा खोदून विचारले, पण ती काहीच बोलली नाही. 


शीतल म्हणजे अजयची बायकोही तिच्यासोबत बोलली, पण तिलाही तिने काहीच सांगितलं नाही. मग बाबांनी वैभव रावांच्या घरी फोन करुन घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. वैभव रावांना त्यांच्या घरच्यांनी त्या रात्री काय घडलं होतं? हे विचारलं तर त्यांनी असं उत्तर दिलं की, "त्या रात्री काही वावग घडलं नाही. घर ती सोडून गेली आहे, तिलाच विचारा. ती स्वतःहून गेली असल्याने मी तिला घ्यायला जाणार नाही. तिची इच्छा असेल, तर तिने स्वतःहून घरी यावं." 


आता असं बोलल्यावर आम्ही काय बोलणार? इकडे आरती काही बोलत नाहीये, तिकडे वैभव राव असं वेगळ्याचं तोऱ्यात बोलत आहेत. आरतीला जबरदस्त मानसिक धक्का बसलेला आहे. पुढे काय करावं? हेच कळत नाहीये. 


शेवटी न राहवून काल मी मुंबईला गेलो होतो. माझा मावसभाऊ व मी वैभव रावांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो, तरीही त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. जे विचारायचं असेल ते तुमच्या बहिणीला विचारा, असं त्यांनी सांगितलं.


ऋतू डोकं बंद पडलंय. आरती नीट जेवत सुद्धा नाहीये. तिच्या काळजीने आई बाबा जाम झाले आहेत. मला सुट्टी मिळत नाहीये. आपल्या लग्नाची बोलणी पुढे जात नाहीये. आता मला एक सांग हे सगळं तुझ्या आई बाबांना आम्ही कुठल्या तोंडाने सांगायचं." अभिराज म्हणाला.


यावर ऋतुजा म्हणाली,

"सॉरी अभी. हे सगळं इतकं विचित्र घडलं असेल, असं आमच्या डोक्यात सुद्धा आलं नाही. आता पुढे काय करायचं ठरवलं आहे?"


अभिराज म्हणाला,

"माहीत नाही. सुरतला आजूबाजूला नातेवाईक राहत असल्याने आरती माहेरी आल्यामुळे टोमणे मारत आहे. सारखं खोदून खोदून विचारत आहेत. आधीच कमी मानसिक त्रास आहे का? त्यात अजून हे लोकं वाढ करतात."


"मी एक सुचवू का?" ऋतुजाने विचारले.


"हो सुचव ना." अभिराज म्हणाला.


"आरती दीदींना इकडे पुण्यात घेऊन या. आपण एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे दाखवूयात. वैभव दाजी जर असे तुटक वागत असतील, तर नक्कीच काहीतरी गंभीर झालं असेल. आरती दीदी पुण्यात आल्यावर वातावरणा बदलामुळे त्यांना प्रसन्न वाटेल. त्या आपल्या सोबत बोलल्या नाही, तरी मानसोपचार तज्ञासोबत नक्कीच बोलतील. 


तू बिजी आहेस, याची मला कल्पना आहे. मला कंपनीतून सुट्ट्या मिळतील. मी स्वतः त्यांना मानसोपचार तज्ञाकडे घेऊन जाईल. कदाचित आरती दीदी माझ्यासोबत बोलतील. आरती दीदींना थोड्या वेगळ्या वातावरणात ठेऊन बघूयात. त्यांना आमच्या घरी ठेऊयात. हवंतर आम्ही दोघी कुठेतरी बाहेर जाऊन फिरुन येऊ." ऋतुजाने सांगितले.


यावर अभिराज म्हणाला,

"अग पण तू कशाला त्रास करुन घेतेस?"


ऋतुजा मिश्किल हसून म्हणाली,

"अभी आपल्या दोघांचं लग्न होणार आहे ना, मग आरती दीदी माझ्या कोणीच लागत नाहीत का? आपल्या माणसांसाठी काही केलं, तर त्यात त्रास होत नसतो. अभी मला एवढंच कळतं की, आरती दीदींना सध्या मानसिक आधाराची गरज आहे. कदाचित त्यांच्या मनात जे साचलं आहे, ते त्या माझ्याकडे मोकळं करतील."


"तुझ्या आई बाबांना विचारावं लागेल ना?" अभिराजने विचारले.


"त्याची आवश्यकता नाहीये. माझे आई बाबा कधीच नाही म्हणणार नाही. तू फक्त आरतीला इकडे लवकरात लवकर बोलावून घे. बाकी मी बघते." ऋतुजाने सांगितले.


"बरं. मी तुला थँक यू म्हणून परकं करणार नाही. मी आई बाबांसोबत बोलतो आणि तुला कळवतो." अभिराज म्हणाला.


क्रमश:


©®Dr Supriya Dighe





🎭 Series Post

View all