अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २६

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २६


मागील भागाचा सारांश: अभिराज आरतीचा फोन येऊन गेल्याने डिस्टर्ब होता. ऋतुजाला या विषयावर त्याची भेट घेऊन बोलण्याची इच्छा होती. अभिराजचा मॅनेजर बदलल्याने त्याला कंपनीतून लवकर निघता येणार नव्हते, म्हणून अभिराज व ऋतुजाची भेट होऊ शकली नाही.


आता बघूया पुढे…..


घरी गेल्यावर ऋतुजाने पुन्हा मोबाईल चेक केला, अजूनही अभिराजचा मॅसेज आलेला नव्हता. 


"ऋतू तुझे अभिराज सोबत काही बोलणे झाले का?" तिच्या आईने विचारले.


"नाही. आज तो कंपनीतील कामात बिजी आहे. आमच्यात काहीच बोलणे झाले नाही. तू का विचारत आहेस?" ऋतुजा म्हणाली.


"अग तुझ्या बाबांनी दुपारी आपण सुरतला कधी जायचं? हे विचारण्यासाठी फोन केला होता, तर त्याचे बाबा म्हणाले की, ते सध्या कुठल्या तरी गोंधळात आहेत. मला वाटलं की, तुला अभिराजने काही सांगितलं असेल म्हणून." आईने सांगितले.


यावर ऋतुजा म्हणाली,

"असेल काहीतरी. माझं आणि अभिराजचं बोलणं झालं की, त्याला विचारुन सांगते."


रात्री झोपताना ऋतुजाने नेट ऑन केलं तर अभिराजचा मॅसेज आला होता,


"सॉरी यार. साडेनऊ वाजता ऑफिस मधून सुटका झाली. मॅनेजर जाम त्रास देतोय. प्रोजेक्टचं काम पिकवर आलं आहे. थोडे दिवस प्लिज मला समजून घे. घरीही थोडा प्रॉब्लेम सुरु आहे. मला तर कुठेच वेळ देता येत नाहीये. आपण येत्या विकेंडला नक्की भेटुयात." 


"इट्स ओके. तुझी स्थिती मी समजू शकते. घरी काही सिरीयस प्रॉब्लेम सुरु आहे का? माझ्या बाबांनी तुझ्या बाबांना फोन केला होता, तर त्यांनी ते सध्या गोंधळात आहे असं सांगितलं." ऋतुजाने रिप्लाय केला.


अभिराज ऑनलाईन नसल्याने त्याचा काही मॅसेज आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋतुजाला अभिराजचा मॅसेज आलेला होता,


"प्लिज तुझ्या बाबांना सांगशील की, गैरसमज करुन घेऊ. घरी सध्या जरा सिरीयस मॅटर सुरु आहे. फोनवर किंवा मॅसेजवर याबद्दल बोलता येणार नाही. मला सुट्टी मिळत नसल्याने मला घरीही जाता येत नाहीये. माझं मन कुठेच लागत नाहीये. आई बाबांना माझी गरज आहे, पण मी जाऊ शकत नाहीये. तुलाही वेळ देता येत नाहीये. विकेंडची मी आतुरतेने वाट बघत आहे." 


"अभी तुझ्यासाठी कामही तेवढंच महत्त्वाचं आहे. आयुष्यात एकाच वेळी अनेक गोष्टी घडतात, अशावेळी आपण सगळ्याच ठिकाणी जाऊ शकत नाही. आम्ही कोणीच तुझ्याबद्दल गैरसमज करुन घेणार नाही. मला वेळ दिला नाहीस तरी चालेल. मला काही तुझा राग आला नाहीये. मला तुझी काळजी वाटत होती, म्हणून मी तुला मॅसेज केला होता. आपण जेव्हा भेटू तेव्हा बाकीच्या गोष्टींवर बोलू. मला नाही माहीत की, घरी काय सुरु आहे? पण सगळं सेटल व्हायला थोडा वेळ लागतो. काही प्रश्नांवर वेळ हेच उत्तर असतं. तू कितीही टेन्शन घेतलं तरी आता जे सुरु आहे, ते बदलणार नाही. सो रिलॅक्स अँड टेक केअर." ऋतुजाने रिप्लाय केला.


पुढील चार ते पाच दिवस अभिराज व ऋतुजा मध्ये फक्त गुड मॉर्निंग, गुड नाईट एवढेच मॅसेज होते होते. शुक्रवारी रात्री अभिराजने ऋतुजाला मॅसेज केला की, "मी उद्या मुंबईला चाललो आहे. रविवारी लंचला आपण बाहेर कुठेतरी भेटुयात. जरा जास्त वेळ काढून ये. मला तुझ्या सोबत खूप बोलायचे आहे. मनात खूप काही साचलं आहे." 


"ओके. जागा आणि वेळ सांगशील. मी नक्कीच वेळ काढून भेटायला येईल." ऋतुजाने रिप्लाय केला.


रविवारी सकाळी अभिराजने ऋतुजाला भेटण्याची वेळ व जागा मॅसेज करुन सांगितले.


"आई मी आज दुपारी अभिराजला भेटायला जाणार आहे. आमचा लंचचा प्लॅन ठरला आहे." ऋतुजाने आईला सांगितले.


यावर ऋतुजाची आई म्हणाली,

"ऋतू मी तुला अभिराजला भेटण्यापासून थांबवणार नाही, पण अजून तुमचं लग्न फिक्स झालं नाहीये, म्हणजे आपण तोंडी बोललो आहे. पण त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अजून एखादा विधी झाला नाहीये. त्यांच्या घरी असा काय गोंधळ सुरु आहे की, त्यांनी एक फोन करुन पुढे काय करायचं? याबद्दल विचारलं सुद्धा नाही. मला त्यांच्या हेतूवर शंका घ्यायची नाहीये, पण मला तुझी काळजी वाटते."


आईच्या बोलण्याला दुजोरा देत ऋतुजाचे बाबा म्हणाले,

"ऋतू आई एकदम बरोबर बोलते आहे. अभिराज चांगला मुलगा आहे, पण अजून तुमचं लग्न फायनल झालं नाहीये. तू त्याला भेटल्यावर पुढे काय करायचं? ते विचार. आपल्या कडूनही लग्नाची बोलणी पुढे सरकायला बरेच दिवस लागले होते, पण आपण त्याचं कारण स्पष्ट केलं होतं. इथं ते स्पष्टपणे काहीच बोलत नाहीये. मी अभिराज सोबत बोलू का?"


"बाबा मला तुमच्या दोघांचीही काळजी समजते आहे. तुम्ही अभिराज सोबत या विषयावर बोलू नका, त्याचा उगाच गैरसमज होईल. मी आज भेटल्यावर त्याच्या सोबत या विषयावर बोलेल. त्याच्या घरी नक्कीच काहीतरी मेजर घडलं आहे, कारण तो एकदा बोलताना तसं बोलून गेला होता. आज तो स्वतःहून मला सगळं सांगणार आहे, म्हणूनच त्याने मला भेटायला बोलावले आहे." ऋतुजाने सांगितले.


ठरल्याप्रमाणे ऋतुजा हॉटेलमध्ये पोहोचली. अभिराज तिथे आधीच तिची वाट बघत होता. अभिराजने ऋतुजाला बघून स्माईल दिली, पण त्या स्माईल मागे त्याच्या डोळ्यातील दुःख ऋतुजाला जाणवत होते. ऋतुजा व अभिराज दोघे एका टेबलच्या इथे जाऊन बसले. ऋतुजा व अभिराजने जेवणाची ऑर्डर दिली. तेवढ्यात अभिराजला त्याच्या आईचा फोन आला,


"हॅलो आई, तू रडू नकोस. आपण काहीतरी मार्ग काढूयात. तू नेहमी म्हणतेस ना की, आपण कुणाचं वाईट केलं नाही, तर आपलंही देव वाईट करत नाही. आई आता जे आपल्या आयुष्यात घडत आहे, ते संकट आपल्या संयमाची परीक्षा बघण्यासाठी आले आहे. मी काहीतरी करतो. आई मी आत्ता बाहेर आहे. मी तुला रात्री निवांत फोन करतो." 


एवढं बोलून अभिराजने फोन कट केला.


"तू मला भेटायला आला आहेस, हे आईंना सांगितलं नाहीस का?" ऋतुजाने विचारले.


"नाही. आई सध्या आपलं भेटणं समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. ती वेगळ्याच टेन्शन मध्ये आहे." अभिराजने सांगितले.


ऋतुजा म्हणाली,

"अभी नेमकं तुमच्या घरी कसलं टेन्शन सुरु आहे, हे मला कळेल का? एकतर इतके दिवस झाले तू स्पष्टपणे काही सांगत नाहीये. तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसून येत आहे. इतकं मोठं काय घडलं आहे? आपण लग्न करणार आहोत, तर मला हे सगळं कळायला हवं की नाही? मला शंका घ्यायची नसेल तरी तू असं काही बोलत, वागत आहेस की, आपसूकच मनात शंका येते. माझे आई व बाबाही आज तेच विचारत होते. तुमच्या घरुन लग्नाची पुढील बोलणी करण्यासाठी एखादा फोन सुद्धा आला नाही. अरे प्रॉब्लेम्स सगळ्यांच्या घरी असतात, पण तुम्ही काही सांगितलं नाही, तर आम्हाला कसं कळेल. माणसाने कोड्यात बोलण्यापेक्षा स्पष्टपणे बोलावं."


ऋतुजा चिडलेली वाटत होती. इतक्या दिवस शांत असणारी ऋतुजा अशी एकदम चिडलेली बघून अभिराज शांतपणे म्हणाला,

"ऋतू मी तुला ते सगळं सांगण्यासाठीचं आज इथे बोलावलं आहे. माझे बाबा काल तुझ्या बाबांना फोन करणार होते, पण तुझ्या बाबांनी बोलणी पुढे ढकलण्याचं कारण विचारलं असतं, तर माझे बाबा खरं सांगू शकले नसते. ऋतू हवंतर मी घरी येऊन आई बाबांशी बोलेल. तुझा राग मी समजू शकतो. तुझ्या आई बाबांना वाटणारी काळजीही मला समजते आहे. सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात आपण आपल्या जागेवर बरोबर आहोत. आपलं लग्न झालेलं असतं, तर तुला व तुझ्या घरच्यांना आम्ही सहजपणे सांगू शकलो असतो, पण आईला असं वाटतंय की, हे सगळं तुमच्या घरच्यांना कळलं, तर तुम्ही आमच्या बद्दल काय विचार कराल म्हणून."


"अभी आता प्रस्तावना देण्यापेक्षा सरळ सरळ सांगशील का?" ऋतुजाने विचारले.


अभिराजच्या घरी काय घडलं होतं? हे बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all