अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २५

सुरुवात एका सुंदर नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २५


मागील भागाचा सारांश: रश्मीने ऋतुजाला बाहेर भेटण्यासाठी बोलावून घेतले होते. शिवम पुढील आठवड्यात येणार असल्याचे रश्मीने ऋतुजाला सांगितले, तसेच रश्मीला शिवमच्या बोलण्यातील काही गोष्टी खटकत असल्याचे तिने सांगितले. ऋतुजाने अभिराज बद्दल रश्मीला सांगितले.


आता बघूया पुढे….


रश्मीला भेटून ऋतुजा घरी गेली. माणसांनी भरलेलं घर अचानक रिकामं झाल्याने ऋतुजाला बोअर झाले होते. ऋतुजाचे बाबा व आई आपापल्या कामात व्यस्त होते, म्हणून ऋतुजा आपल्या रुममध्ये जाऊन बसली व तिने मोबाईलचे नेट ऑन केले. तिच्या अपेक्षेप्रमाणे अभिराजचा मॅसेज तिच्या इनबॉक्स मध्ये आलेला होता,


"हाय ऋतू, आज खरंच तू खूप सुंदर दिसत होतीस. माझी नजर तुझ्यावरुन हटतचं नव्हती. आजच तुझं ते रुप माझ्या डोळ्यासमोरुन जातच नाहीये. आपण सोबत फोटो काढायला पाहिजे होता. मी ठरवलं होतं, पण माझ्या लक्षातचं राहिलं नाही. तुमच्या घरुन निघाल्यावर गाडी आठवलं. एनिवेज आजचा एकंदरीत सगळाचं कार्यक्रम एकदम मस्त झाला. माझ्या घरच्या सर्वांनाचं तू व सोनवणे फॅमिली मनापासून आवडली."


ऋतुजाने थोडा विचार करुन रिप्लाय केला,

"हाय अभी, फोटो काढायला मलाही आवडलं असतं, पण फोटो काढण्यापेक्षा तो क्षण आपण भरभरुन जगलो, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आजचा दिवस आपण दोघे कधीच विसरु शकणार नाही. आपल्या आयुष्यातील आजचा दिवस अविस्मरणीय असेल."


अभिराज ऑनलाईन होताच सो त्याने रिप्लाय केला,

"हो, आजचा दिवस आपण कधीच विसरु शकणार नाही. तू इतक्या वेळ नेट ऑन केले नव्हते का? मी तुझ्या रिप्लायची किती वेळेपासून वाट बघत होतो."


ऋतुजा: मी रश्मीला भेटायला गेले होते. तिला माझ्या सोबत बोलायचे होते.


अभिराज: अच्छा, तिला आपल्या बद्दल सांगितलंस का?


ऋतुजा: हो. आजचं सांगितलं. तिला पार्टी पाहिजे आहे आणि तिला तुम्हालाही भेटायचे आहे.


अभिराज: देऊयात की. हर्षलचं तिने हार्ट ब्रेक केल्याने त्याला सोबत घेऊन येऊ शकणार नाही.


ऋतुजा: हर्षलने तिला कुठं त्याच्या मनातील भावना सांगितल्या. दोघांची मैत्री अजूनही आहेच. तिचं मला सांगत होती की, हर्षलला जिजूंना घेऊन यायला सांगते म्हणून.


अभिराज: असेल मग. माझं हर्षल सोबत त्या टॉपिकवर फारसं बोलणं झालंच नाही.


ऋतुजा: आई बाबा गेलेत का?


अभिराज: हो, पंकज त्यांना सोडवायला स्टेशनवर गेला आहे. बाबा जास्त सुट्ट्या घेत नाहीत, त्यांना त्यांचं काम व घर खूप प्रिय आहे. बाबा कामाव्यतिरिक्त सुट्ट्या घेत नाहीत. बाबांना आमचं सुरत मधील घर सोडून कुठेच शांत झोप येत नाही. आई मात्र सगळीकडे रमते. जिथे जाईल तिथली होऊन जाते.


ऋतुजा: स्त्रीला सुरुवातीपासून ऍडजस्टमेंट करण्याची सवयचं असते ना?


अभिराज: हो हे मात्र अगदी खरं आहे. मला जगातील सर्व स्त्रियांबद्दल याचसाठी खूप आदर वाटतो. आयुष्याचे निम्मे दिवस त्या आपल्या आई वडिलांच्या घरी राहतात आणि अचानक एके दिवशी दुसऱ्याच्या घरी रहायला जातात, शिवाय त्या घराला आपलंस करुन घेतात. हॅट्स ऑफ टू ऑल द लेडीज.


 ऋतुजा: तुझ्या मनातील स्त्रियांबद्दल आदर ऐकून मला खूप भारी वाटलं. बऱ्याच पुरुषांना एक वेगळाच अहंकार असतो. घरातील स्त्रीला नेहमी खाली दाखवण्यात त्यांना मोठेपणा वाटतो.


अभिराज: बरं ऋतू ऐक ना, मला आरतीचा फोन येतो आहे, तिच्या सोबत बोलतो. बाय.


ऋतुजा: हो बाय.


दिवसभर झालेल्या धावपळीमुळे ऋतुजा थकलेली होती, म्हणून लवकर जेवण करुन झोपून गेली. झोपण्यापूर्वी अभिराजला मॅसेज केला की,

"अभी मी ऑनलाईन येण्याची वाट बघू नकोस. मी थकल्यामुळे लवकर झोपत आहे, गुड नाईट."


दुसऱ्या दिवशी सकाळी जाग येताचं अभिराजचा मॅसेज वाचण्यासाठी ऋतुजाने घाईघाईने नेट ऑन केले. 


"हाय ऋतू. सॉरी यार मघाशी आरतीचा फोन झाल्यावर मी जरा डिस्टर्ब झालो होतो. म्हणून मी ऑनलाईन आलोच नाही. आत्ता तुझ्याशी बोलावं म्हटलं तर तुझा मॅसेज बघितला. उद्या दिवसभर बोलायला जमणार नाही. ऑफिसमध्ये खूप काम असणार आहे. संध्याकाळी ऑफिस मधून निघताना फोन करतो, मग बोलू."


ऋतुजाने रिप्लाय केला,

"इट्स ओके. नो प्रॉब्लेम. आरतीच्या फोनमुळे तू डिस्टर्ब का झाला होतास? सगळ काही ठीक आहे ना? तुला माझ्या सोबत काही शेअर करायचं असेल तर करु शकतोस. हवंतर संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर आपण भेटून बोलूयात. गुड मॉर्निंग."


अभिराजने ज्यावेळी मॅसेज बघितला तेव्हा रिप्लाय केला,

"आरती सोबत विचारही केला नव्हता, असा एक किस्सा घडला आहे, त्यावर आपण फोनवर बोलू शकणार नाही. मी जर ऑफिस मधून लवकर फ्री झालो, तर भेटूयात. आमचा मॅनेजर बदलला आहे. पहिला मॅनेजर चांगला होता, आत्ताचा खूप खडूस आहे. मुद्दाम राबवून घेतो. तुला तर आपल्या फिल्ड बद्दल सगळंच माहीत आहे, सो वेगळं सांगण्याची गरज नाही. गुड मॉर्निंग अँड हॅव अ नाईस डे."


ऑफिसला जाण्यापूर्वी ऋतुजाने अभिराजचा मॅसेज आला आहे की नाही, हे चेक करण्यासाठी नेट ऑन केले. अभिराजचा मॅसेज वाचल्यावर तिने रिप्लाय केला,

"यस. आपल्या फिल्डमध्ये काय चालतं? हे मला ठाऊक आहे. देव तुला नवीन मॅनेजरला सहन करण्याची शक्ती देवो. वेळ भेटला तर भेटू, बाय."


जेवणाच्या सुट्टीत ऋतुजाने अभिराजला मॅसेज केला,

"हाय अभी जेवण केलं का? आज संध्याकाळी भेटू शकू की नाही हे सांगशील, म्हणजे मला तसं तयारीत रहायला."


ऋतुजा अभिराजच्या मॅसेजची वाट बघत होती, पण त्याचा मॅसेज काही आला नव्हता. संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळीही ऋतुजाने मोबाईल चेक केला, पण अभिराजचा मॅसेज आलेला नव्हता. रश्मी ऋतुजाचा मूड ठीक करण्यासाठी म्हणाली,

"ऋतू गाडी घेऊन कॉफी शॉपकडे ये. मस्त गप्पा मारत कॉफी पिऊयात."


ऋतुजाने मान हलवून होकार दिला. कॉफी शॉपमध्ये गेल्यावर सुद्धा ऋतुजाचे पूर्ण लक्ष मोबाईलकडे होते.


"ऋतू अभिराज बिजी असेल. मोबाईलकडे बघायला त्याच्याकडे वेळ नसेल. जेव्हा तो तुझा मॅसेज बघेल, तेव्हा तो नक्कीच तुला मॅसेज किंवा कॉल करेल." रश्मी म्हणाली.


यावर ऋतुजा म्हणाली,

"हो, पण काहीच मॅसेज आला नसल्याने मला त्याची काळजी वाटत आहे."


"ऋतू एक खोल श्वास घे. तुला अभिराज आवडायला लागल्याने तुला त्याची काळजी वाटते आहे आणि ते स्वाभाविकच आहे, पण त्याची परिस्थिती समजून घे. मॅनेजर खडूस असल्यावर काय दिवस येतात? हे आपण दोघींनी अनुभवले आहे. शिवाय आज सोमवार असल्याने जास्तीचे काम असेल. मॅनेजर टीम मधील मुलांना तसंही जास्त राबवून घेतात." रश्मीने सांगितले.


ऋतुजा नाराज होऊन म्हणाली,

"मला त्याला भेटण्याची इच्छा होती. सकाळी घरातून निघाले तेव्हा तो भेटेल म्हणून मी खूप खुश झाले होते. आता त्याच्यामुळे मूड खराब होईल."


"अरे ठीक आहे ना. होतं असं कधीकधी. तू त्याच्या प्रेमात पडली आहेस, बाकी काही नाही, म्हणून तुला सतत तुझ्या डोळ्यासमोर तो हवा आहे. शनिवार किंवा रविवारी भेटण्याचं ठरवत जा, म्हणजे तुमच्या दोघांची धावपळ होणार नाही. काही महिन्यांचा तर प्रश्न असेल, मग तुम्ही दोघे एकत्रचं राहणार आहात. काल मी हर्षलला फोन केला होता, तेव्हा तो म्हणाला की, अभिराज काळे राजा माणूस आहे. तुझी मैत्रीण खूप नशीबवान आहे की तिला असा लाईफ पार्टनर मिळाला आहे. अभिराज काळे म्हणजे खरं सोनं आहे." रश्मीने सांगितले.


यावर ऋतुजा म्हणाली,

"हो, हर्षल काय सांगेल, मीच स्वतःला नशीबवान समजत आहे. अभिराज खूप भारी. तुझी व त्याची भेट झाली की, मगचं तुला तो काय आहे? हे कळेल. बरं चल कॉफी पिऊन झालीच आहे, तर घरी जाऊयात. मी घरी उशिरा गेले की, मी अभिराजला भेटून आले की काय? असे आईला वाटू शकेल."


ऋतुजा व रश्मी कॉफी शॉपच्या बाहेर पडून आपापल्या घराच्या दिशेने निघून गेल्या.


क्रमशः


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all