Login

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २२

सुरुवात एका सुंदर नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २२


मागील भागाचा सारांश: ऋतुजाच्या बाबांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. रणजीत हॉस्पिटलमध्ये आल्यावर अभिराज तेथून निघून गेला. ऋतुजाचे बाबा हॉस्पिटलमध्ये असताना अभिराज दोन वेळेस त्यांना भेटायला गेला होता. ऋतुजाच्या बाबांना व रणजीतला अभिराज ऋतुजासाठी एकदम परफेक्ट वाटला. ऋतुजाने अभिराजला स्वतःहून मॅसेज केला होता. 


आता बघूया पुढे…


दुसऱ्या दिवशी रणजीतने अभिराजला फोन करुन त्याच्या घरच्यांना आपल्या घरी घेऊन येण्यासाठी आमंत्रण दिले. येत्या रविवारी कार्यक्रम ठरवला होता. ऋतुजाच्या घरी धावपळ सुरु झाली होती. मुलाकडची मंडळी येणार म्हटल्यावर सगळं घर आवरावं लागणार होतं, तसेच त्यांचा प्रॉपर पाहुणचार करावा लागणार होता.


ऋतुजाच्या आईच्या मदतीसाठी आदल्या दिवशी सुलभा मावशी व पियू आल्या होत्या. मनोहर काकांचा पाय दुखत असल्याने ते काही आले नव्हते. सुलभा मावशी व पियूला बघताना त्यांच्यातील मतभेद मिटल्यासारखे वाटत होते.


पियू व ऋतुजा दोघी रुममध्ये असताना पियू म्हणाली,

"दीदी जिजूंचं नाव काय आहे ग?"


"अभिराज काळे." ऋतुजाने उत्तर दिले.


"दीदी नाव तर मस्त आहे. त्यांचा फोटो दाखव ना." पियू म्हणाली.


यावर ऋतुजा म्हणाली,

"उद्या ते घरी येणार आहेत, तेव्हा बघून घे. फोटो बघून मजा का घालवत आहेस?" 


"अग दीदी पण फोटो दाखवायला काय प्रॉब्लेम आहे?" पियूने विचारले.


ऋतुजा हसून म्हणाली,

"तुझी नजर लागली तर…"


"अरे वा दीदी. अजून लग्न झालंही नाही आणि तुला नजर लागण्याची काळजी वाटत आहे." पियू म्हणाली.


"बरं ते जाऊदेत. त्या ऋषिकेश प्रकरणाचं पुढे काय झालं?" ऋतुजाने विचारले.


"काय होणार? मी ब्रेकअप केलं." पियूने उत्तर दिले.


"म्हणजे आता तुमच्यात मैत्रीही नाहीये का?" ऋतुजाने विचारले.


पियू म्हणाली,

"नाही. मी ब्रेकअप करताना त्याला म्हणाले होते की, हवंतर आपण आपली मैत्री ठेवू शकतो, पण तो म्हणाला की, मला तुझ्यासोबत फक्त मैत्री ठेवण्यात कधीच रस नव्हता. मी तुझ्याकडे फक्त मैत्रीण म्हणून बघू शकणार नाही. माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप वेगळ्या भावना आहेत. तसंही तू कोणाच्या तरी सांगण्यावरुन ब्रेकअप करत आहेस, अश्या मुलीसोबत मला मैत्री ठेवायची नाहीये. मग मी पुढे काही बोललेच नाही.


सुरुवातीला मी ब्रेकअप करुन त्याला दुखावल्याचे मला वाईट वाटत होते, पण पुढील तीन ते चार दिवसांनी तो मला दुसऱ्याचं एका मुलीसोबत दिसला. याचं जर माझ्यावर खर प्रेम असतं, तर तो लगेच दुसऱ्या मुलीसोबत फिरलाच नसता. दीदी मुली म्हणजे या मुलांसाठी खेळण्या असतात, बाकी काही नाही.


बरं झालं वेळीच तू माझे डोळे उघडले. आता इथून पुढे मी या फंदात पडणार नाही. आपण भलं आणि आपला अभ्यास भला."


ऋतुजा पियूच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली,

"बरं झालं, तू वेळीच या सगळ्यातून बाहेर पडलीस. सध्यातरी अभ्यासावर लक्ष केंद्रीत कर. बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष कर. ऋषिकेश म्हणजे तुझ्या आयुष्यात झालेला एक अपघात होता, अस समज."


ऋतुजा व पियू बोलत असताना अर्पिता रुममध्ये येऊन म्हणाली,

"बहिणींमध्ये काय गप्पा सुरु आहेत?"


पियू म्हणाली,

"काही नाही वहिनी. मी दीदीकडे जिजूंचा फोटो मागत होते, तर ती म्हणे त्यांना नजर लागेल. उद्या प्रत्यक्ष आल्यावरचं बघ."


"तुझी दीदी अभिराजच्या प्रेमात पडली आहे, फक्त ती ते मान्य करत नाहीये. अग मीही अभिराजला भेटली नाहीये. घरातील सगळे त्याचं इतकं कौतुक करत आहेत की, कधी एकदा त्याला भेटतेय असं झालंय." अर्पिताने सांगितले.


ऋतुजा म्हणाली,

"तुम्ही दोघी माझी खेचत बसू नका. वहिनी आरव कुठे आहे?"


"आरव त्याच्या रणजीत सोबत खेळतो आहे. आई आणि मावशींनी किचनचा ताबा घेतला आहे. मावशी त्यांचे प्रसिद्ध रव्याचे लाडू बनवत आहेत. मी त्या दोघी बहिणींमध्ये काय करु? मग म्हटलं चला तुम्ही दोघी काय म्हणताय ते बघू." अर्पिताने सांगितले.


"वहिनी उद्या दिवसभर मला साडी घालून रहावे लागेल का?" ऋतुजाने विचारले.


अर्पिता म्हणाली,

"अर्थात आता अभिराजच्या घरातील वयस्क मंडळी येतील, तर मग त्यांच्या समोर साडीचं घालावी लागेल. आपली संस्कृती तरी तसंच सांगते. उद्या पहिलीचं वेळ आहे सो."


"साडीची सवय नसल्याने मला थोडं ऑकवर्ड वाटेल, म्हणून जरा टेन्शन आलं आहे." ऋतुजा म्हणाली.


यावर अर्पिता म्हणाली,

"डोन्ट वरी. सगळं व्यवस्थित होईल. जास्त टेन्शन घेतलं की, मग ऐनवेळी गोंधळ उडेल. आपल्या कडून काही चुकेल, हा विचारचं मनात आणायचा नाही."


थोड्यावेळ ऋतुजा, पियू व अर्पिता मध्ये अश्याचं गप्पा सुरु होत्या. काही वेळाने अर्पिताने ऋतुजाला बळजबरी झोपण्यास सांगितले. दुसऱ्या दिवसाच्या टेन्शनने ऋतुजाला काही झोप लागत नव्हती. पियू झोपली आहे, हे बघून ऋतुजाने मोबाईलचे नेट ऑन केले, तर अभिराजचा मॅसेज आलेला होता,

"हाय, उद्याची सर्व तयारी झाली का?"


"हो झाली आहे." ऋतुजाने रिप्लाय दिला.


अभिराज ऑनलाईन असल्याने त्याने लगेच मॅसेज केला,

"मी किती वेळेपासून तुमच्या मॅसेजची वाट बघत होतो."


ऋतुजा: अर्पिता वहिनी आणि पियू सोबत गप्पा मारत असल्याने फोनकडे लक्षचं नव्हतं.


अभिराज: पियू कोण?


ऋतुजा: माझ्या मावशीची मुलगी. सुलभा मावशी आणि पियू दोघी आज घरी आल्या आहेत.


अभिराज: अच्छा. मला वाटलं होतं की, आज तुमचा मॅसेज येणारचं नाही.


ऋतुजा: मला अर्पिता वहिनींनी झोपायला सांगितलं होतं, पण झोपचं येत नव्हती.


अभिराज: झोप का येत नव्हती?


ऋतुजा: उद्याच्या कार्यक्रमाची भीती वाटते आहे.


अभिराज: भीती आणि कसली?


ऋतुजा: तुमच्या घरचे लोकं मला पहिल्यांदा बघणार आहेत आणि मला साडी घालून इतक्यावेळ राहता येईल का? तुमच्या घरचे मला पसंत करतील का? त्यावेळी साडीमुळे काही गोंधळ तर होणार नाही ना? असे अनेक प्रश्न मनात येत आहेत. वहिनींच्या मते मी जास्त विचार करत आहे.


अभिराज: एकतर तुम्ही तुमच्या मनातील भीती काढून टाका. माझ्या घरचे सर्वजण एकदम साधे सरळ आहेत, ते तुम्हाला फार प्रश्न विचारणार नाहीत. दुसरी गोष्ट तुम्हाला सर्वजण पसंत करतील, याची मला खात्री आहे. आणि तुम्ही कोणतीही साडी नेसा, पण त्यात तुम्ही सुंदरचं दिसाल, हेही मला ठाऊक आहे. सो डोन्ट वरी सगळं काही नीट होणार आहे.


ऋतुजाच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली.

ऋतुजा: तुमच्या घरचे सर्व आलेत का?


अभिराज: नाही अजून. त्यांची ट्रेन दोन तास उशिरा येणार आहे. मी आता स्टेशनवरचं बसलेलो आहे.


ऋतुजा: अरे, ट्रेनला यायला उशीर होईल,हे तुम्हाला ठाऊक नव्हते का? इतक्या लवकर स्टेशनवर का जाऊन बसलात?


अभिराज: ट्रेन तेथून वेळेवर निघाली होती, पण वाटेत कुठेतरी प्रॉब्लेम झाला होता, म्हणून उशीर होत आहे. बाबांनी पंकजला कळवलं होतं, पण तो मला सांगायचं विसरुन गेला. आता स्टेशनवर आलोचं होतो, तर पुन्हा घरी जाऊन येण्याचा कंटाळा आला असता,म्हणून इथेच बसलो.


ऋतुजा: तुमची नीट झोपही होणार नाही.


अभिराज: तसंही झोपलो असतो तरी झोप लागली नसती.


ऋतुजा: का?


अभिराज: उद्याचा दिवस कधी उगतोय असं झालंय. तुमचं साडीतील रुप बघायला मन आतुर झालंय. मी असं डायरेक्ट बोललेलं तुम्हाला आवडणार नाही, पण मनात जे आलं ते बोललो.


ऋतुजा: असुदेत. तुमच्या अश्या बोलण्याची मला आता सवय करुन घ्यावी लागणार आहे. आता मी झोपण्याचा प्रयत्न करते. झोप झाली नाही, तर डार्क सर्कल्स अजून डार्क होतील. कोणीतरी मला बघण्यासाठी एवढं आतुरलं आहे, तर त्याच्यासाठी चांगलं दिसावं लागेल.


अभिराज: अरे वा. तुम्हीही माझ्यासारखं बोलायला शिकलात की. बरं खरंच तुम्ही आराम करा. जास्त टेन्शन घेऊ नका. काही गडबड झाली तरी मी सांभाळून घ्यायला असेल. गुड नाईट.


ऋतुजा: गुड नाईट.


अभिराजच्या बोलण्याचा आणि त्याचा विचार करत करत ऋतुजा झोपी गेली.


क्रमशः


©® Dr Supriya Dighe









0

🎭 Series Post

View all