अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २१

सुरुवात एका सुंदर नात्याची
अरेंज कम लव्ह मॅरेज भाग २१

मागील भागाचा सारांश: ऋतुजाच्या बाबांना अचानक चक्कर आल्याने व त्यांच्या छातीत दुखायला लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. अभिराज ऋतुजाची मदत करायला हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. अभिराज मदतीला असल्याने ऋतुजाला मदत झाली होती. अभिराजने ऋतुजाला व तिच्या आईला आधार देण्याचे चांगले काम केले होते.

आता बघूया पुढे….

दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांनी ऋतुजा व अभिराजला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले.

"डॉक्टर बाबांना नेमकं काय झालंय?" ऋतुजाने काळजीने विचारले.

डॉक्टर म्हणाले,
"काल तुझ्या बाबांच्या इ सी जी मध्ये गडबड आढळून आली. तुझ्या बाबांना मायनर हार्ट अटॅक आला होता, म्हणून आम्ही ताबडतोब अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. तसा मला अंदाज होताच अँजिओग्राफी मध्ये दोन ब्लॉकेज आढळून आले. एक ब्लॉकेज 40% आहे, तर दुसरा 50% आहे. ब्लॉकेज असल्याकारणाने त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असेल. आपल्याला अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. ब्लॉकेज काढल्या गेल्यावर त्यांना हार्ट अटॅकचा धोका राहणार नाही. एकदा वय झालं की, एकेक व्याधी सुरु होतात, त्यातील ही एक आहे. जास्त काळजी करण्याचं कारण नाही, फक्त अँजिओप्लास्टी लवकरात लवकर करण्याचा निर्णय तुम्ही घ्या."

"डॉक्टर अँजिओप्लास्टीच्या दरम्यान बाबांच्या जीवाला काही भीती तर नसेल ना?" ऋतुजाने विचारले.

"नाही, त्यांना काहीही होणार नाही." डॉक्टरांनी उत्तर दिले.

"ठीक आहे डॉक्टर. त्यांचा मुलगा काही वेळात इथे पोहोचेल, मग अँजिओप्लास्टी बद्दल तो ठरवेल." अभिराजने सांगितले.

डॉक्टरांनी मान हलवून होकार दर्शवला. डॉक्टरांच्या केबिनबाहेर आल्यावर ऋतुजा मोबाईलमध्ये अँजिओप्लास्टी बद्दल सर्च करत होती. अभिराज तिला थांबवत म्हणाला,
"गुगल वर नको त्या गोष्टी असतात. आपण सध्या एलर्जी बद्दल सर्च केलं तरी डायरेक्ट डेथ पर्यंत संबंध दाखवतात. गुगल वर उगाच सर्च करु नका, नाहीतर मनात नको त्या शंका येतील. तुमचे बाबा लवकर बरे होतील, काही काळजी करु नका."

हातातील मोबाईल बंद करत ऋतुजा म्हणाली,
"तुम्हाला ड्युटीवर जायचे नाहीये का?" 

"आज मी सुट्टी घेतली आहे. रणजीत दादा आल्यावर मी जाईल." अभिराजने उत्तर दिले.

पुढील काही वेळात रणजीत हॉस्पिटलमध्ये आला, त्याने बाबांची भेट घेऊन समक्ष डोळ्यांनी त्यांची परिस्थिती बघितली. अभिराज व ऋतुजाने डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल रणजीतला सांगितले. रणजीतने डॉक्टरांची भेट घेऊन अँजिओप्लास्टी बद्दल सर्व माहिती घेतली. बाबांची त्वरित अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय रणजीतने घेतला. 

"दादा मी निघतो आता. माझी काही मदत लागली तर सांग." अभिराज म्हणाला.

"अरे हो. मी नसताना माझ्या आई व बहिणीला आधार दिला याबद्दल मी तुझा मनापासून आभारी आहे. आपल्यात काही नातं नसताना सुद्धा तू इतकी मदत केलीस, खरंच हे खूप मोठं आहे. बाबांना जरा बरं वाटल्यावर आपण तुमच्या लग्नाची बोलणी करुयात." रणजीतने सांगितले.

यावर अभिराज म्हणाला,
"दादा आपल्यात अजून दुसरं काही नातं नसेल, पण माणुसकीचं नातं तर आहे ना. माणुसकीचे नाते हे कुठल्याही नात्यापेक्षा मोठे असते. बाबांना पूर्णपणे बरं होऊद्यात, मग निवांत लग्नाबद्दल बोलणी केली तरी चालेल."

अभिराज एवढं बोलून हॉस्पिटल मधून निघून गेला. रणजीतने ऋतुजाला आईला घेऊन घरी जायला लावलं. रात्रभर हॉस्पिटलमध्ये थांबल्यामुळे दोघींची झोप झाली नव्हती. दोघींना थोड्या वेळ आराम करण्याची आवश्यकता होती. ऋतुजा आईला घेऊन घरी गेली. 

दुपारी घरी जाऊन दोघींनी जरावेळ आराम केला. बाबांचं ऑपरेशन संध्याकाळी होतं, त्यावेळी आई व ऋतुजा पुन्हा हॉस्पिटलला गेल्या. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्यावर रणजीत व आई दोघे हॉस्पिटलला थांबले. ऋतुजा एकटीच घरी गेली. ऋतुजाच्या सोबतीसाठी अर्पिता घरी आलेली होती. 

पुढील तीन ते चार दिवस ऋतुजाच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट ठेवण्यात आले होते. या कालावधीत अभिराज दोनदा हॉस्पिटलमध्ये जाऊन बाबांची चौकशी करुन आला होता. बाबा घरी आल्यावर ऋतुजा ऑफिसमध्ये जायला लागली होती, तोपर्यंत ऋतुजाने सुट्टी घेतलेली होती. 

तीन चार दिवस सगळं नॉर्मल व्हायला गेले. रणजीत व अर्पिता काही दिवसांसाठी आई बाबांच्या घरी शिफ्ट झाले होते. बाबांच्या तब्येतीत सुधारणा होत होती. एके दिवशी रात्री जेवण झाल्यावर बाबांनी ऋतुजा व रणजीतला आपल्या रुममध्ये बोलावून घेतले.

"रणजीत माझ्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. तू अभिराज व त्याच्या फॅमिलीला आपल्याकडे बोलावून घे. अभिराज आपल्या ऋतूसाठी एकदम परफेक्ट मुलगा आहे. तू नसताना त्याने एक रात्र हॉस्पिटलमध्ये थांबून आईला व ऋतूला आधार देण्याचे काम केले. हॉस्पिटलमध्ये दोनदा मला भेटायला आला होता. गप्पा मारुन छान मन रमवतो. आज सकाळी त्याने फोन करुन माझी चौकशी केली होती. ऋतूसाठी याहून दुसरा चांगला मुलगा सापडणारचं नाही. त्याच्यावर त्याच्या आई वडिलांनी खूप छान संस्कार केले आहेत. ऋतू तुला अभिराज आवडतो ना?" बाबांनी विचारले.

"हो बाबा. अभिराज खूप चांगला आहे. सपोर्टिव्ह आहे. ही इज अ नाईस मॅन." ऋतुजाने सांगितले.

रणजीत पुढे म्हणाला,
"बाबा मी हॉस्पिटलमध्ये आल्यावर अभिराज तेथून निघून गेला, हवंतर तो थांबूही शकला असता, पण त्याला त्याचे लिमिटेशन्स माहिती आहे. आपल्याला त्याच्या उपस्थिती मुळे ऑकवर्ड होऊ नये, ही काळजी त्याने त्यावेळी घेतली नाही. तो आपल्या ऋतूसाठी एकदम परफेक्ट आहे. मी उद्या सकाळी त्याला फोन करुन पुढचा कार्यक्रम ठरवून घेतो. आधीच कार्यक्रम पुढे ढकलला गेला आहे, अजून उशीर व्हायला नको."

रुममध्ये गेल्यावर ऋतुजाला अभिराज सोबत बोलण्याची इच्छा झाली होती, म्हणून तिने त्याला 'हाय' मॅसेज केला.

अभिराज ऑनलाईन असल्याने त्याने लगेच मॅसेज केला,
"हाय, आज ह्या गरिबाची आठवण कशी काय आली?"

ऋतुजा: बोलण्याची इच्छा फक्त तुम्हालाच होऊ शकते का?

अभिराज: आज सूर्य पश्चिम दिशेला उगवला आहे वाटतं. 

ऋतुजा: असंच तुमच्या सोबत बोलण्याची इच्छा झाली होती, म्हणून मॅसेज केला. तुम्हाला माझी उडवायची असेल तर मी ऑफलाईन जाते.

अभिराज: अरे नको. मी गंमत करत होतो. बाबांची तब्येत कशी आहे?

ऋतुजा: बरी आहे. दादा उद्या तुम्हाला फोन करणार आहे.

अभिराज: घरी माझ्यावर चर्चा झाली वाटतं.

ऋतुजा: हो, तुम्ही माझ्या घरातील सगळ्यांना आवडला आहात.

अभिराज: आणि तुम्हाला?

ऋतुजा: ते मी आत्ता नाही सांगणार.

अभिराज: मग कधी? मुहूर्त काढू का?

ऋतुजा: मुहूर्त तर काढावाचं लागणार आहे.

अभिराज: त्या मुहूर्ताआधी तुमचं उत्तर मिळालं तर बरं होईल.

ऋतुजा: वेळ आल्यावर मिळेल.

अभिराज: मी त्या वेळेची वाट बघेल.

ऋतुजा: जेवण झालं का?

अभिराज: जागतिक प्रश्न.( हसण्याची स्माईली)

ऋतुजा: बॅड जोक.

अभिराज: हो झालंय. कालपासून पंकज आलाय, त्यामुळे जेवण सोबत होतं. मेसचा डबा येतो. लग्न होईपर्यंत मेसचं जेवण खावे लागणार आहे.

ऋतुजा: पंकजला जॉब मिळाला का?

अभिराज: नाही अजून. मी त्याला पहिले सॉफ्टवेअरचा कोर्स करायला सांगितला आहे, त्यांच्या इन्स्टिट्यूट तर्फे कॅम्पस असतात, त्यात त्याचं सिलेक्शन होऊन जाईल. एडिशनल कोर्स केल्याशिवाय चांगल्या कंपनीत नोकरी मिळत नाही.

ऋतुजा: गुड डिसीजन.

अभिराज: एकदा त्याचं करिअर सेट झालं की, डोक्याचं टेन्शन जाईल. 

ऋतुजा: हळूहळू सेट होईल.

अभिराज: हम्मम. तुमचं जेवण झालं का?

ऋतुजा: हो. मी आठ पर्यंत जेवून घेते. उशीर झालेला मला सहन होत नाही. 

अभिराज: ओके गुड. मला आईचा फोन येतो आहे. आपण नंतर बोलूयात का?

ऋतुजा: हो. उद्या दादाचा फोन आल्यावर आपल्यात बोलणं झाल्याबद्दल काही सांगू नका.

अभिराज: अर्थात. आपल्यातील बोलणं कुठेच लिक होणार नाही.

ऋतुजा: यस,बाय. गुड नाईट.

अभिराज: बाय, गुड नाईट.

ऋतुजाला अभिराज सोबत अजून बोलण्याची इच्छा होती, पण त्याला आईचा फोन आल्याने त्यांना अजून जास्तवेळ बोलता आले नाही. ऋतुजाला मनापासून अभिराज आवडला होता. अभिराजचा विचार करत करतचं तिला झोप लागली.

अभिराज व ऋतुजाच्या प्रेमकथेला सुरुवात झाली तर आहे, पण ती अजून कशी रंगतेय, बघूया पुढील भागात…

©® Dr Supriya Dighe











🎭 Series Post

View all