अरेंज कम लव्ह मॅरेज भाग १२

Twist Comes Between Prachi And Pratik's Life

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग १२


मागील भागाचा सारांश: अभिराज व ऋतुजामध्ये सविस्तर बोलणं झालं. अभिराजने त्याची संपूर्ण माहिती ऋतुजाला दिली. ऋतुजाने तिच्याबद्दल थोडक्यात अभिराजला सांगितले.


आता बघूया पुढे…..


"कसा वाटला मुलगा?" ऋतुजाने घरात पाय ठेवल्या बरोबर आईने विचारले.


यावर ऋतुजाचे बाबा म्हणाले,

"अग तिला घरात तर येऊदेत. मग तुझे प्रश्न विचार."


ऋतुजा घरात येऊन बसल्यावर रणजीत, अर्पिता, आई व बाबा सगळेजण तिच्या आजूबाजूला येऊन बसले. 


ऋतुजा हसून म्हणाली,

"तुम्ही माझ्याकडे असं बघू नका. मी तुम्हाला सगळं काही सांगते. आई काल आपण मावशी कडून येत असताना एका मुलाने आजी आजोबांना रस्ता ओलांडण्यात मदत केली होती, तो हाच अभिराज काळे होता. अभिराजला लोकांची मदत करायला आवडते, असं यावरुन निर्देशित होते. ओव्हरऑल अभिराज मलातरी चांगला वाटला. मिडल क्लास फॅमिली मधून असल्याने स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचला आहे. अभिराज इज अ फॅमिली मॅन. अभिराजला दोन भाऊ व एक बहीण आहे. अभिराज घरात सर्वांत मोठा आहे, त्याच्या एका भावाचं व बहिणीचं लग्न झालेलं आहे. एकच आहे की, तो खूप जास्त बोलतो.

बाकी दादा व बाबांनी त्याला एकदा भेटावे आणि मग पुढील गोष्टी ठरवाव्यात."


आई काही बोलणार इतक्यात रणजीत म्हणाला,

"आई अजून काही प्रश्न विचारुन तिला गोंधळात पाडू नकोस. माझे दोन तीन मित्र सॉफ्टवेअर कंपनीत मोठ्या पोस्टवर जॉबला आहेत, तर मी त्यांच्याकडून ह्या अभिराज काळेची काही चौकशी होते का ते बघतो. हवंतर नेक्स्ट विकेंडला त्याला मी भेटून घेतो, मग पुढे जायचं की नाही, ते ठरवूयात."


यावर ऋतुजाचे बाबा म्हणाले,

"रणजीत अगदी बरोबर बोलतोय. सर्वप्रथम मुलाची चौकशी करुन घेऊयात. रणजीत व त्याला एकदा बाहेर भेटूदेत, मग त्याला व त्याच्या आई वडिलांना घरी बोलवूयात. मुलगी देताना जास्त विचार करावा लागतो."


"दादा त्याला काय सांगायचं? आपला काहीतरी निर्णय त्याला कळवावा लागेल ना." ऋतुजाने विचारले.


"हो. तू त्याला सांग की, नेक्स्ट विकेंडला मी त्याला भेटेल म्हणून." रणजीतने उत्तर दिले.


रात्री झोपण्यापूर्वी ऋतुजाने रणजीतने सांगितल्याप्रमाणे अभिराजला मॅसेज केला,

"नेक्स्ट विकेंडला माझा दादा तुम्हाला भेटणार आहे आणि मग पुढे काय करायचं? हे तोच सांगेल."


------------------------------------------------------


अभिराज रुमवर पोहोचण्याआधी गाडीवर असतानाच आईचे चार ते पाच वेळा फोन येऊन गेले होते. गाडीवरुन उतरल्यावर लगेच अभिराजने आईला फोन केला,


"हॅलो आई, अग कोणी एवढे लागोपाठ फोन करतं का?"


"अरे गुड्डू तू फोनचं उचलत नव्हतास ना, मग मला काळजी वाटत होती." आईने उत्तर दिले.


अभिराज चिडून म्हणाला,

"आई मी गाडीवर होतो. संध्याकाळच्या वेळी ट्रॅफिक जास्त असते आणि रुमवर आल्याबरोबर मी तुला फोन केलाच असता ना."


"बरं ते जाऊदेत. मुलगी कशी वाटली? तुमच्यात काय बोलणं झालं?" आईने विचारले.


अभिराज म्हणाला,

"मुलगी दिसायला एकदम भारी आहे. ती खूप शांत आहे म्हणजे माझ्या एवढी बडबडी नाहीये. ती सधन घरातील मुलगी आहे. तिचा रिप्लाय येईपर्यंत आपण वाट पाहुयात. तिला मी आवडेल की नाही, जरा शंकाचं वाटत आहे."


"अरे ती तुला नाही कशी म्हणेल. माझा गुड्डू लाखात एक आहे. आपण सकारात्मक रहायचं." आईने सांगितले.


यावर अभिराज म्हणाला,

"कोणत्याही आईला त्याचा मुलगा लाखात एकच वाटतो. बरं मी आता वर जाऊन फ्रेश होतो. आपण नंतर बोलूयात."


प्रतिकची बाईक बघून अभिराज मनातल्या मनात म्हणाला,

"प्रतिक घरुन जाऊन एवढ्यात आला सुद्धा!"


अभिराज कडे रुमची चावी असल्याने तो लॉक उघडून आत गेला. प्रतिक गॅलरीत चेहरा पाडून बसलेला होता. अभिराज आता जाऊन फ्रेश झाला, मग तो प्रतिक जवळ जाऊन म्हणाला,

"काय झालं रे? इतक्यात घरी जाऊन आला सुद्धा. तू गेलास केव्हा, घरी कितीवेळ थांबलास आणि कधी आलास?"


"सगळं संपलय रे." प्रतिक शून्यात बघत म्हणाला.


"म्हणजे?" अभिराजने विचारले.


प्रतिक म्हणाला,

"मी घरी गेलोच नव्हतो."


"मग सकाळपासून कुठे होतास? मी सकाळी उठण्याआधीचं तू निघून गेला होतास." अभिराजने विचारले.


"स्वतःला शोधायला गेलो होतो." प्रतिकने उत्तर दिले.


अभिराज म्हणाला,

"प्रतिक गुरुजी मला कळेल अशा भाषेत बोलशील का? नॉर्मल बोल ना."


प्रतिक म्हणाला,

"रात्री आपल्या दोघांचं बोलणं झाल्यावर मी प्राची सोबत या विषयावर बोललो. घरी जाऊन आई बाबांना लग्नाची कल्पना दयायला तिने दुजोरा दिला. साधारणपणे रात्री साडेबाराला माझं आणि तिचं बोलणं संपलं. मी सकाळी निघाण्यासाठी काही तयारी करुन ठेवली आणि झोपलो. 


सकाळी पाच वाजेचा अलार्म लावून ठेवला होता. रात्री परत यायचे असल्याने सकाळी लवकर निघण्याचा प्लॅन मी केला होता. उठण्याची इच्छा नसताना सुद्धा मी सव्वापाचला उठलो. अंघोळ करुन तयार झालो. साडेसहाला बस होती. मी रात्रीचं बुकिंग करुन ठेवले होते. मी सव्वासहा पर्यंत मी बस स्टॉप वर पोहोचलो होतो. घाईघाईने आवरण्याच्या तयारीत असताना मी मोबाईलचे नेट ऑन करुन मॅसेज चेक केले नव्हते. बस यायला पंधरा मिनिटे बाकी असल्याने मी मोबाईलचे नेट ऑन केले, तर प्राचीचा मॅसेज आला होता,


"हाय प्रतिक, मी तुझ्या सोबत लग्न करु शकणार नाही. घरी गेल्यावर आई बाबांना लग्नाबद्दल काहीच सांगू नकोस. तुला जे काही प्रश्न पडले असतील त्यावर भेटल्यावर बोलू."


प्राचीचा मॅसेज वाचल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी प्राचीला फोन लावला, तर तिचा फोन बंद होता. काल रात्रीपर्यंत लग्नासाठी मागे लागलेली मुलगी दोन दिवसांवर लग्न येऊन ठेपलं असताना नाही कशी म्हणतेय? मला हेच कळत नव्हतं. बस येऊन निघून गेली, पण मी बसमध्ये बसलोच नाही. पुढील अर्धा तास तिथेच बसून होतो. प्राचीला खूप वेळेस फोन केले, पण तिचा फोन लागतचं नव्हता. 


गाडी घरी असल्याने प्राचीकडे जायला रिक्षा किंवा कॅबने कमीत कमी एक तास तरी लागला असता. साडेसहा- पावणे सातच्या दरम्यान मी बस स्टॉप वरुन घरी परत आलो. वरती न येता खाली पार्किंग मध्ये येऊन गाडी घेऊन प्राचीच्या घराकडे गेलो. प्राचीच्या घराच्या इथे मी आठ वाजेपर्यंत पोहोचलो होतो. बिल्डिंगच्या खाली उभा राहून मी तिला पुन्हा फोन लावला, पण तिचा फोन लागतचं नव्हता. मी गाडी पार्किंग मध्ये पार्क केली आणि पायऱ्यांच्या दिशेने निघालो असताना मला प्राचीचा हसण्याचा आवाज आला, म्हणून मी आवाजाच्या दिशेने गेलो, ते प्राची एका मुलीसोबत हसून गप्पा मारत होती. मला त्यावेळी प्राचीचा प्रचंड राग आला होता. माझी झोप उडवून ही हसत खिदळत आहे. मी तिथेच प्राचीची येण्याची वाट पाहत उभा राहिलो.


जवळपास पंधरा मिनिटाने प्राची माझ्या दिशेने येताना दिसली. प्राचीचा मोबाईल वाजल्याने तिचा फोन तर चालू होता, हे माझ्या लक्षात आले होते. प्राची मोबाईल वर बोलत येत असल्याने तिचे माझ्याकडे लक्षचं नव्हते, मग मी डायरेक्ट तिच्या समोर जाऊन उभा राहिलो. मला अचानक समोर बघून प्राची दचकली. प्राची फोन बंद करुन म्हणाली,


"तू तर गावी जाणार होतास ना, मग इथे काय करतो आहेस?"


"तुझा मोबाईल चालू असताना माझा फोन का लागत नाहीये? तू मला ब्लॉक केलंस का?" मी जरा रागातच विचारले.


"तुझ्या नेटवर्कला काहीतरी प्रॉब्लेम असेल. मी तुला ब्लॉक का करु?" प्राचीने अगदी शांतपणे उत्तर दिले.


"प्राची मला जो मॅसेज केला आहेस, त्याचा अर्थ काय? मला त्याबद्दल तुझ्या सोबत बोलायचे आहे." मी विचारले.


प्राची म्हणाली,

"त्या मॅसेजचा अर्थ विचारण्यासाठी तू इथवर आला आहेस होय. मी मॅसेज मराठीतचं केला होता, तरी तुला त्याचा अर्थ कळाला नाही."


माझा राग त्यावेळी खूप जास्त अनावर झाला होता. प्राचीच्या कानाखाली एखादी मारावी की काय? असं वाटत होतं. पण मी स्वतःला कसेबसे शांत करत होतो. प्राचीचा मोबाईल पुन्हा वाजल्यावर तिने मला वरती घरात येण्याचा इशारा करुन ती निघून गेली."


प्राचीने प्रतिकला लग्नासाठी नकार का दिला असेल? तसेच ऋतुजाचा मॅसेज बघून अभिराजची प्रतिक्रिया काय असेल? बघूया पुढील भागात….


©®Dr Supriya Dighe




🎭 Series Post

View all