अरे संसार संसार... भाग 1

Katha tichya sansarachi

अरे संसार संसार...भाग 1


तारुण्याने मुसमुसलेली पुष्पा,

दिसायला देखणी, सुंदर, लांब सडक केस बघताक्षणी कुणालाही आवडेल अशी...

खेड्यात रहात असल्यामुळे जेमतेम शिक्षण झालेली.

शिक्षणात कमी असली तरी व्यवहार चातुर्य खूप होतं.

घरातला पैशाचा हिशेब तीच ठेवायची. घरात एक लहान बहिण, एक लहान भाऊ आणि आई वडील इतकं कुटुंब. आई वडील दोघेही शेतीच्या कामावर जायचे.

लहान बहीण आणि भाऊ शाळेत जायची आणि पुष्पा आईला मदत करायला शेतात जायची.


पुष्पा वयात आली असल्यामुळे सगळे मंगलला  म्हणायचे.


“पुष्पीची आई पुष्पीला आता असं शेतावर आणत जाऊ नका. अहो वयात आलेली पोर, कधी कुणाची वाईट नजर पडेल सांगता येत नाही.”

“काय बोलताय तुम्ही?”

“अग खरच बोलतेय ती.. आता चांगला मुलगा बघून लगीन करून टाक तिचं.”

“आजी तू बी अशी यांच्या सारखीच बोलायला लागलीस.”

“मग काय चुकीचं बोलतेय. चल अंधार व्हायच्या आत लेकीला घेऊन घरला जा.”


“व्हय आजी.”

दोघ्याही घरी गेल्या.
पुष्पीने स्वयंपाक बनवायला घेतला.
पुष्पाचे वडील हातपाय धुवून बसले होते.

“आव ऐकता का?”
“हम्म बोल,काय झालं?”

“शेतावर सगळे काय बोलत होते माहीत आहे का तुमासनी ?”

“मला कसं माहीत होणार, मी होतो का तिथे?”
मंगलने कपाळावर हात ठेवला. 

“सगळे बोलत होते पुष्पाचं लग्न लावून टाका म्हणून, पोरगी वयात आली तिला शेतावर आणत जाऊ नका, कोणाची वाईट नजर पडली तर होत्याचं  नव्हतं होईल. चांगलं स्थळ आलं की लगीन लावून टाक पोरीचं.


अहो आता तर आपण विचार करायला हवा ना, पोर मोठी होत चालली आहे तिचं झालं की लहाणीचा विचार करता येईल आपल्याला.

“हो बघू, चांगलं स्थळ आलं की विचार करू.”

“ठीक आहे.”


पुष्पाने स्वयंपाक बनवला सगळेजण जेवण केले आणि झोपले.

आठ-दहा दिवसानंतर बाजूच्या गावाच्या पाटलाच्या नात्यातलं स्थळ आलं. स्थळ चांगलं मोठं होतं, घरचेही मंडळी चांगली होती. इनामदाराचा मोठा वाडा होता.

दाखवण्याचा कार्यक्रम झाला. घरच्यांना मुलगी पसंत पडली, घरच्यांनी लग्न ठरवलं. सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला. पुष्पाने त्या मुलाला नीटसं बघितलेही नव्हतं.

महिन्याभराने साखरपुडा झाला. त्यानंतर फक्त एकदा पुष्पा गावच्या जत्रेमध्ये त्याला भेटली तो पुष्पाला जत्रेमध्ये फिरवायला घेऊन गेला होता, तेव्हाच ते काही वेळ बोलले तेवढेच त्यानंतर महिन्याभरातच पुष्पाचं लग्न झालं.

पुष्पा लग्न होऊन इनामदारांच्या घरी आली. इनामदार नावाने खूप मोठे व्यक्ती होते, पुष्पा त्या घरची मोठी सून असल्यामुळे पुष्पा वर भरपूर जबाबदाऱ्या आल्या.


पुष्पाच्या आई-वडिलाला खूप आनंद होता की माझी मुलगी मोठ्या घरात गेली पण त्यांना या गोष्टीची पुसटशीही कल्पनाही नव्हती की इनामदारांवर कर्जाचा मोठा बोजा होता.


सावकार रोज दारात येऊन राडा करायचे. त्यात सावकाराची नजर वाईट होती. सावकार तर पापी नीच. त्याची नजर आता पुष्पावर पडली.

त्याने तिच्यावर हात घालण्याचा प्रयत्न केला.

आधी पुष्पा घाबरली, रडली.

तिला वाटलं नवरा माझ्यासोबत आहे पण तसं नव्हतं.

नवऱ्याची कधीच तिला साथ मिळाली नव्हती.

पुष्पाने खूप हिम्मत धरून त्याचा हेतू उधळून लावला.

क्रमशः

🎭 Series Post

View all