अर्धी भाकर (भाग दुसरा)

आयुष्याच्या वाटेवर चालताना मिळालेला एक धडा

भाग दुसरा 


संजुला खुप मार बसला होता. दवाखान्यात उपचार घेण्याचे देखील तिच्या जवळ पैसे नव्हते. तिने त्याला बसवून पाणी दिलं आणि जखमेवर हळद लावली. आणि जिथे सुजल होत तिथे कपड्याने हळू हळू शेक देत बसली. संजू झोपी गेला होता. तितक्यात गण्या तिथे संजूला पाहायला आला. मिताला संजूची काळजी घेत असताना पाहून त्याला एकटेपणाची जाणीव झाली. पण त्याहून जास्त तिचे रडून सुजलेले डोळे पाहून त्याला त्याच्या चुकीची जाणीव होत होती. त्याने हळूच जाऊन मिताशेजारी मगाशी फटाके चोरताना तिथल्याच एकाच पाकीट चोरल होत त्यातले त्याने पैसे काढून मिताला दिले आणि माफी मागून परत जायला निघणार तितक्यात मिताने त्याला थांबविले.


"ह्या पैशांमुळे तो बरा तर होईल पण त्याच्या कोवळ्या मनावरून आज चा दिवस पूर्णपणे काढता येईल का? चोरी काय असते, ती कशी करतात ह्या धड्याच पान फाडता येईल का?  

आज माझ्या भावाची अवस्था तुझ्यामुळे अशी झालीय. मी हाथ जोडते लांब राह त्याच्यापासून आणि हे घे तुझे पैसे.. भाकर अर्धी का होईना, कष्टाची खाऊ घालत आलेय त्याला. ह्या पैशांतून आणलेल्या माझ्या भाकरीला चव नाही येणार.." गण्या काहीच न बोलता तिथून निघून आला. मिताचे बोलणे त्याच्या मनात रुंजी घालत होते. त्यालाही त्याच्या आई वडीलांची आठवण येऊ लागली. ते देखील रोज अंगावर पडेल ते काम करून मेहनत करायचे. गण्या शिकून मोठा माणूस व्हावा असे त्या दोघांना वाटे. म्हणूनच ते त्याला जवळच्या सरकारी शाळेत टाकणार होते. पण चोरीच्या पैशांची चटक लागलेल्या गण्याला, आयुष्याचे धडे देणाऱ्या आई वडीलांचा त्याला राग येऊ लागला. आणि असाच एके दिवशी तो एका व्यक्तीची पर्स पळवून घरी आला. त्याने त्यातले पैसे घेऊन दुसऱ्या शहरात पळून गेला तो आजही तिथेच होता. कसलीही तमा फिकीर नसणाऱ्या गण्याला आज त्याच्या आई वडीलांची प्रकर्षाने आठवण येत होती. उद्या काहीही करून आपल्या आई वडीलांना एकदा तरी दुरून पाहून यायचं म्हणून त्याने निश्चय केला. त्याला रात्रभर ह्याच सगळ्या विचारांनी झोप लागली नाही. ती रात्र त्याने तशीच तळमळत काढली आणि सकाळी तो संजू ला भेटण्यासाठी गेला. त्याने सोबत बाकी सगळ्या मुलांना देखील आणले. संजू ची आणि बाकी सगळ्यांची त्याने माफी मागितली. 


"आपण काल जे काही केलं ते खुप चुकीचं केलं. आपल्याला इतका त्रास झाला तर म विचार कर आपण चोरी करत असलेल्या व्यक्तीला किती त्रास झाला असेल. त्याची मेहनत आपण लुबाडून पळून जात होतो. त्या सगळ्याचा मनस्ताप सगळ्यांच्या घरात खुप झाला."


"दादा पण तूच तर म्हणायचा नं की, ह्या सगळ्या गोष्टीचा जास्त विचार नाही करायचा." त्यातला एक जण म्हणाला.


"बोललो होतो पण एक गोष्ट मात्र सांगायला विसरलो. वाईट वाटेवर चालताना काही वाटत नाही आधी. मग आपण सगळ्यांशी धावत पळत इतके पुढे येतो की पुढचा प्रवास काय आहे, कसा असणार आहे, काही कळत नाही. आयुष्य दिशाहीन होते आणि आपल्या सोबत असणारे कधीच दूर गेलेले असतात. ज्या वेळी आपलं आयुष्य दिशाहीन झालंय ह्याची जाणीव होईल त्यावेळी आपल्या माणसांची प्रकर्षाने आठवण येईल पण त्याचा काही उपयोग नसेल. त्यामुळे आजपासून काहीही काम करूया पण वाईट वाटेवर नाही जायचं कधीच.. कळलं..?" दाराबाहेर असलेली मिता त्याच सगळं बोलणं ऐकत होती. तिला फार नवल वाटलं. गण्या सारखा मुलगा इतकं छान समजावू शकतो.


"पण काय काम करायचं..?" हा मात्र प्रश्न आता सगळ्यांना पडला होता.


ह्याचा विचार आपण नंतर करू म्हणून तो तिथून निघाला. वाटेत जाताना त्याला देऊळ दिसले त्याने मनोमन देवासमोर हाथ जोडून नमस्कार केला आणि "आज पासून वाईट वाटेवर पाऊल ही ठेवणार नाही. तसेच माझे आई वडील जिथे कुठे असतील त्यांना सुखरूप ठेव आणि त्यांची आज भेट होऊ दे, त्यांच्यासाठी मी हवं ते करायला तयार आहे." अशी देवाजवळ त्याने प्रार्थना केली. 


"हवं ते करायला पैसे कुठून आणणार, चोरी करून का?" मागून मिताचा आवाज त्याला कानी पडताच, तो घाबरून गेला. 


क्रमशः 

🎭 Series Post

View all