अर्धांगिनी भाग ८
क्रमश: भाग ७
त्या रात्री तिघे खूप गप्पा मारत बसले . अण्णांनी चंदू आणि मालतीला दिवाळी साठी घरी बोलावले . सरपंच नेहमी चंदू ची आठवण काढत असतात वगैरे अश्या विषयावर बोलणे चालू होते .
थोड्याच वेळात अण्णांनी एक विषय चंदू जवळ काढला .
अण्णा " मी मालतिचे सर्व डी एड चे कागद आणि मार्कशीट वगैरे आणलेत. शिवाय माझ्या शाळेत ती कामाला होतीच ना तर त्याचे एक्सपेरिअन्स सर्टिफिकेट पण आणलेय . मालतीला लहान मुलांना शिकवताना मी बघितलंय . ती खूप चांगली शिक्षिका आहे तर जर तुम्हाला काही गैर वाटत नसेल तर तिला पण शिक्षिकेची नोकरी करता आली तर बघा . शेवटी हा तुमच्या दोघांचा निर्णय आहे माझी काही जबरदस्ती नाही .
चंदू " तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे . मी मालतीला म्हणालो थोड्या दिवसांनी आपण तुझ्या नोकरी साठी प्रयत्न करू . तिची पण तीच ईच्छा आहे . "
अण्णा " म्हणजे तुमचं याविषयी बोलणे झालय म्हणायचे .
चंदू " याच विषयां नंतर मालती माझ्याशी बोलायला लागली .. तो पर्यंत नुसते मान हलवून उत्तर द्यायची . आणि जोर जोरात हसायला लागतो . "
त्याच्या या जोक वर त्याला वाटले हे दोघे पण हसतील पण कोणीच हसले नाही . मालती तर अण्णांचे लक्ष नसताना त्याच्याकडे बघून नाक मुरडून आत गेली . तिची हि नाक मुरडण्याची अदा पण चंदू ने पाहल्यांदाच बघितली होती .. चंदू आपला गप्पच बसला नंतर .
मग सगळे आहे त्या जागेत अड्जस्ट करत झोपले. सकाळी चंदू उठून त्याची ऑफिस ची तयारी करू लागला . अण्णांची पण गावाला जायची तयारी सुरु होती. मालतीची मात्र धांदल चालू होती , चहा , नाश्ता , डबा करत होती .
मग चंदू डबा घेऊन अण्णांचा निरोप घेऊन ऑफिस ला गेला . एस टी स्टॅन्ड जवळच होते त्यामुळे चंदू ने मालतीला अण्णांना स्टॅन्ड वर सोडायला सांगितले .
अण्णानां नाश्ता करून त्यांना पोळी भाजी चा डबा मालतीने बांधून दिला . जाई जाई पर्यंत अण्णा मालतीला काही ना काही तर सांगतच होते . चंदू चे गुणगान गाता गाता थकत नव्हते .
अण्णा " मालती चंदू सारखा मुलगा शोधून सापडला नसता . कोणत्या जन्माची पुण्याई म्हणून मला असा जावई मिळाला काय माहित . तुझ्या जन्माचे पण कल्याण झाले . आता लवकरात लवकरात एखादे मुल होऊ द्या ."
मालती " काय अण्णा .. काल पासून तेच तेच सांगत आहात .त्यांच्या समोर तुम्ही बोलत होतात मला किती लाज वाटत होती "
अण्णा " मला काही कळले नाही असे वाटते का तुला ? "
मालती " काय "
अण्णा " आता हे तुझ्याशी मी बोलणे कितपत योग्य आहे मला माहित नाही पण पोरी मी तुझा बाप आहे "
मालती " काय कश्या बद्दल बोलताय "
अण्णा " तू खाली झोपतेस आणि जावई वर झोपतात ना . तुझी आवडीची बेडशीट मला खालच्या वळकटीत दिसली "
मालती काहीच बोलली नाही ..
अण्णा " मी समजू शकतो. पण घरात पाळणा हलला ना कि नाते अजून घट्ट होते . बाळा च्या येण्याने नवरा बायको कायमसाठी एकमेकांशी जोडले जातात .एकदा तुम्ही असे जोडले गेलात कि मी सुखाने मरायला मोकळा "
मालती " अण्णा , तुम्ही काही काळजी करू नका .. माझे आता सुद्धा खूप छान चालू आहे . "
अण्णा ' हो ग बाई .. ते तर कळलेच मला मी काय म्हणतोय तुला कसे समजावू ?. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या चांगल्या असतात . त्या दामोदर च्या मुलीचे लग्न तुझ्या आधी ४ महिने झाले आता बघ बाळंतपणाला घरी आलीय . आम्हाला पण आमच्या जवाबदाऱ्या पूर्ण करायच्या असतात ."
मालती " काय ? सवि ला दिवस गेलेत .. अण्णा माझ्या कडून अभिनंदन सांगा "
अण्णा " हूमम .."
तेवढ्यात अण्णांची गाडी आली . मालती अण्णांची बॅग घेऊन वर चढली आणि त्यांच्या साठी एक जागा पकडली आणि मग मागून अण्णा आले . अण्णांना गाडीत जागेवर बसवून दिल्यावर मालती च्या डोळ्यात पाणी येऊ लागलं .
मालती " अण्णा परत या .. पुढल्या वेळेस आई ला घेऊन या .."
अण्णां पण भरल्या डोळ्यांनी आशीर्वाद देत निघून गेले .
अण्णांना सोडून आल्यावर मालती चा थोडा मूड गेला होता . आता अण्णा परत कधी भेटतील माहित नाही . पण अण्णा आले ते बरे झाले . चंदू ने त्यांना पत्र लिहुन बोलावले होते . मालतीला पण कळत होते कि चंदू मालती चा किती विचार करतो . नुसता दोन तीनदा ती बोल बोलता म्हणाली होती कि आमचे अण्णा असे बोलतात तर लगेच अण्णांना पत्र लिहुन बोलावले होते .
आज मालती विचारात रमून गेली होती . तिला गावची आठवण येत होती .उघड्या डोळ्यांनी तिने मनातून अख्खा गाव बघितला होता . एक एक मैत्रीण आठवली. मैत्रिणीनं बरोबर केलेली मज्जा आठवली . शेवटी ज्या गावात माणूस लहानाचा मोठा झालेला असतो त्या गावाशी आपली नाळ जोडलेलीच असते .
आज तिच्याचाने काही काम होई ना . संध्याकाळ झाली तरी आज ती तयार नव्हती . ना तिने रात्रीचे जेवण करून ठेवले . चंदू संध्याकाळी घरी आला ते व्हा तिच्या लक्षात आले कि आज आपली सगळी कामे राहिलीत .
चंदू " काय म्हणत होते अण्णा जाता जाता ? गाडी मिळाली का ?"
मालती " हो . मी गाडीत बसवूनच आले "
चंदू " मग आपण आता तुझ्या नोकरी साठी प्रयन्त करू . तुला आता शहरातील रहाणीमानाचा अंदाज पण आलाय ."
मालती चे काम चालू होते . तिचे आज सगळे काम राहिले होते . साईड बाय साईड ती चंदू ला चहा देत होती . जेवणाचे बघत होती . आता जेवण बनवताना तिचा स्पीड चांगलाच वाढला होता . आता पहिल्या पेक्षा जेवण बनवण्या वर हात बसला होता . तिला भीती वाटत होते कि आज जेवण तयार नाही म्हटल्यावर चंदू चिडेल कि काय ?
पूर्वीच्या बायकांना अशी नवऱ्याची भीती वाटायची . नवऱ्याचे सगळे वेळच्या वेळी झालेच पाहिजे हाच एक नियम असायचा .
चंदू त्याचे आवरत होता आणि बोलता होता
चंदू " आज आवरले नाहीस का ? आज बाहेर नाही जायचंय का ?"
मालती " ते आज जरा उशीर झाला .."
चंदू " ठीक आहे ... मग आज नको जाऊया बाहेर .. चालेल ना "
मालती " नाही मी आवरते लगेच . "
चंदू बेड वर जरा आडवा पडला .
मालती तिचे जेवणाचे पटपट आवरायचं बघत होती पण स्टोव्ह पण एकच जेवढा वेळ लागायचा तेवढा लागणारच होता .
मालती भाकरी करत होती तर गरम तव्याचा चटका लागला .
मालती " आई ग ... अशी एकदाच बोलली आणि तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले .
खर तर कामांत लक्ष नसले किंवा गडबड केली कि अश्या गोष्टी घडतात . पूर्वी अर्धे ऍक्सीडेन्ट हे नवरा ओरडेल या भीतीने होयचे .
चंदू " काय ग ? काय झाले ?
मालती " काही नाही .. जरासा चटका बसला "
तशातच चंदू ला तिने जेवण वाढले ..
मालती " ते आज जरा अण्णा गेले ना तर कामात लक्षच लागत नव्हते . तुम्ही बोलावल्यामुळे अण्णा आले म्हणून भेट झाली . "
चंदू " तूला पण घे कि जेवायला घे .
मालती"हो घेते तुमचे झाले कि जेवेन ."
चंदू " का ? आज नेहमी सारखी बरोबर का नाही बसत आहेस ?"
मालती " असेच ."
चंदू " बघू कुठे भाजलय ?"
मालती " बरं आहे .. जास्त नाही .. "
चंदू " दाखव तर ."
चंदू चे जेवण झाल्यावर शेवटी त्याने तिचे हात बघितलेच . बऱ्या पैकी भाजले होते .
चंदू " काय ग हे .. किती भाजलय .. चंदू ने एक बटाटा कापला आणि त्यावर कापलेल्या बटाट्याची चकती ठेवली . मालतीचा थोडा दाह कमी झाला .
चंदू " अग , नाही एक दिवस जेवण झालं तर त्यात काय एवढं ? कधीतरी नुसता चहापोहे खाऊन झोपणारा माणूस आहे मी . तू त्याच एवढं टेन्शन घेतलस . "
आणि बोल बोलता त्याने जखमेवर फुंकर घालून क्रीम लावले .
मालती काही बोलत नव्हती
चंदू " तू अजून मला ओळखले नाहीस .. याचे मला दुःख आहे . तूला वाटले कि जेवण वेळेत नाही बनले तर बाकीच्या नवऱ्यानं सारखा मी चिडेल ."
मालती " नाही .. तसे नाही "
चंदू " नाही कसे नाही .. मगाशी मला तुझ्या चेहऱ्याकडे बघून लगेच कळले जरा घाबरली आहेस "
मालती ला रडायला यायला लागले . एक तर हात भाजलाय ते दुखतंय ते वेगळे आणि आता चंदू पण नाराज झालाय ..
मालतीच्या उजव्या हाताची बोटे भाजली होती . त्या दिवशी चंदू ने तिला भरवले . आपला नवरा आपली आई वडीलां सारखी काळजी घेतोय हे पाहून मालतीच्या डोळे भरून येत होते.
एक एक घास खाताना मालतीच्या डोळ्यातून अश्रू पडायचा . चंदू तिचे अश्रू पण पुसत होता आणि तिला भरवत होता . पुढे तीन दिवस चंदू ने तिला पाण्यात हात घालून दिला नाही . तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला .
जुन्या काळातील अशी किती तरी जोडपी असतील कि त्यांनी त्यांच्या बायकोला कधी माझे तुझ्यावर प्रेम आहे असे बोलले नसेल पण त्यांच्या कृतीतून ते त्यांचे प्रेम व्यक्त करायचे . न बोलता समोरच्या च्या मनातले ओळखणे हे आणि त्याच्या मना सारखे वागणे , काळजी घेणे यातून ते त्यांचे प्रेम व्यक्त करायचे . असेच चंदू चे मालतीचे अव्यक्त प्रेम सुरु झाले होते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा