अर्धांगिनी भाग १६
क्रमश : भाग १५
सुख म्हणजे नक्की काय असते . आपल्या माणसांची सोबत असणे या सारखे सुख नाही . मग दिवस कसेही असोत सीता माता प्रभू रामचंद्रानं बरोबर वनवासात गेली ते उगाच का ? सीता माता पण एक अर्धांगिनी च होती ना . पतीच्या सुख दुःखात जी वाटेकरी असते ती अर्धांगिनी . नुसते सुखात मजा करायची आणि दुःखात त्याला सोडून देणाऱ्या पण बऱ्याच आहेत या कलयुगात .
मुळात जर प्रेम असेल तर हे प्रेम परिस्थिती नुसार बदलत नाही . कारण प्रेम हे व्यक्तीवर असते त्याच्या सौदर्य , संपत्ती वर नसते कारण या दोन्ही गोष्टी कालांतराने नष्ट होणाऱ्या आहेत .
चंदू चा कंपनी मध्ये चांगलाच जम बसलं होता . त्याला आता बाहेर फिरताना कोणी दिसले तर " सर म्हणून हाक मारायचे . मालतीला त्याच खूप अभिमान वाटायचा .
मालती तर शिक्षिका होती . आता मालतीला येता जाता शाळेतली मुले " नमस्ते बाई " अशी आदराने हाक मारायची . आता त्या शहरात दोघे नावा रूपास आले होते . आपले काम मन लावून केले ना कि त्याचे फळ हे मिळतेच .
दोघांना एकमेकांचा आदर आणि अभिमान होता. घरात कधी चिडचिड नाही . भांडणे नाही कारण दोघात कधी दुमत झालेच नाही .
चंदू ला कंपनीत कधी कधी साईट वर जावे लागत असे .कामगार लोक कसे काम करतायत हे पाहायला . त्यांच्या काही अडचणी आहेत का ते बघायचे . आणि हे काम पण तो चोख पार पाडत असे .
एक दिवस चंदू नेहमी प्रमाणे साईट वर गेला . आणि त्याच्या रुटीननुसार सेफ्टी साठी हेल्मेट , ग्लोव्ज , सेफ्टी शूज सर्व घालून वावरत होता .
साईट चेक करण्यासाठी तो शिडी ने चढून वरती गेला होता . त्याच्या बरोबर आणखीन दोन कामगार पण होते. सर्व पाहून चेक करून नोट करून ठेवत होता काय बदल करायचेत ते बदल सांगत होता . आणि कसा काय माहित त्याचा तोल गेला आणि चंदू वरून खाली पडला . पडला पण त्याने लागू नये म्हणून दोन्ही हात पुढे घेतले . त्यामळे आधी त्याचे हात जमिनीवर टेकले गेले आणि मग शरीर . हेल्मेट वगैरे असल्यामुळे डोक्याला वगैरे फार काही लागले नाही पण त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर झाले . कंपनी चांगली होती लगेच त्याला दवाखान्यात नेले . ऍडमिट केले आणि त्याच्यावर उपचार सुरु केले .
लगेचच कंपनी मधला एक माणूस निरोप घेऊन चंदू च्या घरी आला सांगायला असे असे झालंय . मालती नुकतीच शाळेतून आली होती . आणि धनश्री ला घेऊन बसली होती . हि बातमी ऐकल्यावर मालती च्या पायाखालची जमीनच सरकली .
मालतीने धनश्री ला आत्या कडे ठेवले आणि लगेच दवाखान्यात गेली . चंदू वर प्राथमिक उपचार केले पण डॉक्टर म्हणाले पुण्या /मुंबई सारख्या मोठया शहरात जर घेऊन गेलात तर तिकडे चांगले उपचार होतील . तिकडे हाडांचे चांगले दवाखाने आहेत . सध्या चंदू चे दोन्ही हातातील हांडांचा चुराडा झाला होता . चंदू च्या वेदना त्याला शांत बसून देत नव्हत्या . मालती खूप घाबरून गेली होती चंदू ला बघून रडायलाच लागली . कंपनी मधले इतर स्टाफ आणि कामगार पण सगळे बघत बसले . शेवटी एक जण बोलायला पुढे आला आणि मालती ला त्याने सांगितले " घाबरू नका वाहिनी फक्त हाताला लागलेय . बाकी तसे घाबरण्या सारखे नाहीये . त्यांचा सर्व खर्च कंपनी कडूनच होईल . आता आपल्याला त्यांना पूना किंवा मुंबई ला जावे लागेल . तुमच्या बरोबर जायला कोणी आहे का ?असेल तर त्यांना बोलावून घ्या .
मालती ला काहीच सुचे ना .. तिने तिच्या भावाच्या हॉस्टेल च्या नंबर वर फोन लावला
मालती रडत रडतच भावा जवळ फोन वर बोलली आणि मनीष पण लगेचच निघाला यायला . मालती ने चंदू ला लांबूनच काचेतून बघितले .मालतीच्या लक्षात आले कि आता रडत बसून उपयोग नाही आता कणखर बनून आलेल्या परिस्थितीला सामोरे जायला पाहिजे .
मालती घरी आली रुक्मिणी अत्त्यांना तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला . लवकरच आता मोठ्या शहरात ह्यांना घेऊन जायला लागणार आहे . आत्या सामान बांधायला घ्या .मी मनीष ला फोन केलाय तो पण लगेच निघतोय तिकडून रात्री येईल तो .
आपल्याला डबा घेऊन जायचंय दवाखान्यात .
इतका कठीण प्रसंग आला होता आणि मालती एकटी होती . तिला काय करावे, कसे करावे हे सुचतच नव्हते . मनातून खूप घाबरलेली पण दाखवत नव्हती . आलेल्या अश्रूंना ती परत पाठवत होती .
आत्याबाई पण तिला धीर देत होत्या " घाबरू नकोस बाळा , होईल सगळे ठीक , परमेश्वरावर विश्वास ठेव "
अशा वेळेला देवावर विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त काहीच पर्याय नसतो .
खालून मालक आणि मालकीण बाई पण मदतीला धावून आले .मालती चंदू ला डबा घेऊन गेली . चंदू आणि मालती दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. मालतीच्या चेहऱ्याकडे बघून चंदू ला कळत होते कि ती कोणत्या दुःखात आहे आणि चंदू च्या चेहऱ्याकडे बघून मालतीला कळत होते कि चंदू ला किती वेदना होत आहेत . तरी पण एक मेकांना धीर देत होते . मालतीने चंदू ला जेवण भरवले आणि घरी आली . तोपर्यंत रात्री मनीष आला . मनीष जेवला आणि दवाखान्यात झोपायला गेला . धनश्री पण सारखी विचारत होती " आई .. बाबा पाहिजे आणि रडत होती . तिला पण रात्री चंदू च्या हातून जेवायची सवय झाली होती .
मालती घरातील आवरून लगेच ती पण दवाखान्यात गेली . तरी इकडचा दवाखाना जवळ होता म्हणून बरे झाले
दुसऱ्याचं दिवशी पहाटे चंदू ला घेऊन कंपनीची गाडी पुण्याला मोठ्या हॉस्पिटल कडे गेली . तिकडे लगेचच चंदू वर चांगल्या डॉक्टरांनि चेक करून क्स-रे काढून त्याच्या हाताचा नीट अभ्यास करून त्याच्या वर चांगली ट्रीटमेंट केली . त्याच्या हाताच्या एक दोन छोट्या छोट्या सर्जरी करण्यात आल्या आणि मग हात प्लास्टर मध्ये ठेवण्यात आला .
मनीष च्या एका मित्राचा मोठा वाडा होता . त्यातली एक खोली त्यांनी घेतली . तिकडेच त्यांना संसार थाटावा लागला . लागेल ते सामान बाजारातून विकत आणावे लागत होते . तरी पण स्टोव्ह वगैरे असे सामान मनिष च्या मित्राच्या घरातल्यांनी दिले म्हणून बरे झाले . रुक्मिणी आत्या घरात सगळे बघत होत्या . शिवाय धनश्री ला पण सांभाळत होत्या मालती आणि मनीष दोघे दवाखान्यातले आणि बाहेरचे बघायचे हॉस्पिटल चा खर्च जरी कंपनी बघणार होती तरी इकडे सगळे एवढे दिवस राहायचे म्हणजे खर्च तरी कमी आहे का ? मालती रोज त्याला प्रॉपर जेवण भरवत होती , फळ कापून भरवत होती , नारळ पाणी देत होती . शिवाय गोळ्या औषधे चालूच होती .
अण्णांना हि बातमी कळली तसे अण्णा पण सरपंचांना घेऊन इकडे आले . अण्णांना बघितल्यावर मात्र मालती चा धीर सुटला . त्या दिवशी मालती मोठं मोठयाने रडली .
चंदू ला हात दुखणे आणि दोन्ही हात प्लास्टर मध्ये असल्याने काहीच स्वतःचे स्वतः करता येत नव्हते . तसा बोलायला , उठून चालायला लागला होता . पण काही वेळाने हात खूप दुखायला लागायचा . खूप हाय पॉवर च्या गोळ्या आणि इंजेकशन चालू होती . पण १० /१५ दिवसात फरक चांगलाच पडला होता .
अण्णांनी चौकशी केली आणि एक रात्रीत परत गेले . कारण इथे किती जणांनी थांबायचे . तसा मनीष होताच मालतीच्या मदतीला . नाही नाही म्हणता जाताना मालतीच्या हातात ५००० रुपये देऊन गेले . मालती घेतच नव्हती पण अण्णा म्हणाले " पोरी अशा वेळी पैसे जवळ असलेले बरे घेऊन ठेव "
हल्ली धनश्री घरी खूप चीड चीड करत होती . तिला तिचा बाबा बरेच दिवसात दिसला नव्हता . सारखी बाबा. बाबा.. करत बसायची . एक दिवस ती खाणे खाईना तिला आज तिचा बाबा पाहिजे च होता . शेवटी आत्या मालती ला म्हणाल्या हिला एकदा तिच्या बापाला भेटवून आणा त्या शिवाय ती शांत नाही होयची .म्हणून मग मालती धनश्री ला घेऊन दवाखान्यात आली . धनश्री आधी जरा घाबरली कि आपण कुठे आलोय म्हणून जी मालतीला चिकटून बसली होती जसे चंदू च्या रूम मध्ये आली तशी तिने अशी चंदू कडे झेप टाकली . चंदू ने त्याच दोन्ही हात बाजूला केले पण धनश्री ने जे त्याला घट्ट' पकडून ठेवले ते सोडायलाच तयार नाही .
चंदू पण " धनु .. कशी आहे .. किती दिवसांनी बाबाना दिसली .."
मालती तिला मागून सांगत होती " हळू .. बाबांना बु.. झालाय .. बाबांना दुखेल .. "
एवढीशी धनश्री तुरु तुरु चालायची पण अजून नीट बोलता येत नव्हते तिला ." बाबाला .. बु झाला .. बु झाला असे म्हणायची आणि त्याला मिठी मारायची .
धनश्रीला च्या लीला बघून दवाखान्यात चैतन्य तर आलेच पण सर्वांच्या डोळ्यात पाणी पण आले .
बोल बोलता हॉस्पिटल मध्ये १ महिना झाला . डॉक्टरांनी चंदू ला सांगितले कि आता लवकरच तुमचे प्लास्टर काढणार आहोत . मग दोन दिवसात तुम्ही घरी जाऊ शकता .
चंदू ला असे झाले होते कधी एकदा इथून बाहेर पडतोय . आजारी माणसाला कधी एकदा दवाखाना सुटतोय असेच वाटत असते .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा