Sep 27, 2020
स्पर्धा

अर्धांगिनी  भाग ३

Read Later
अर्धांगिनी  भाग ३

 

अर्धांगिनी  भाग ३

 

क्रमश: भाग २

 

चंदू कडे मालतीच्या दोन मोठया बॅग होत्या आणि मालतीकडे तिची पर्स आणि एक छोटी बॅग होती . एस टी स्टॅन्ड जवळच चंदू ची खोली होती . अर्थातच खोली खूप लहान होती त्याने ती एकट्याच्या हिशोबाने घेतली होती .

चंदू ला मनातून सारखे कसे तरी वाटत होते ह्या असल्या छोट्या खोलीत मालती ला आवडेल कि नाही . खोली काय नंतर बदलता पण येईल . त्यात चंदू नुकताच आलेला त्यामुळे ती खोली लावलेली पण नव्हती . त्याचे सगळे सामान पसरले होते . ना चंदू तिच्याशी बोलत होता ना मालती त्याच्याशी . चंदू ची खोली जिन्यावर चालून वरती होती आणि खाली मालक राहत होता . खालीच नळ होते त्यामुळे प्यायचे पाणी खालून आणायचे होते . आणि एक दहा बाय  बारा ची खोली त्यातच छोटे किचन  छोटे बाथरूम पण होते .

 

चंदू ने खोलीची चावी घेतली आणि वरती आला . मालकाने आणि मालकीण बाईने बघितले कि ह्याच्या बरोबर कोणीतरी बाई आहे . मालकीण बाईने चेक केले कि गळ्यात मंगळसूत्र आहे आणि हातात हिरवा चुडा आहे म्हणजे नुकतेच लग्न झालेले दिसतंय .

 

फार काही न बोलता दोघेही वरती आले . खोली ना साफ होती ना आवरली होती . चंदू च्या बॅग पण त्याने

खोलल्या  नव्हत्या .

 

मालती ला खोलीत आल्यावर चंदू म्हणाला आधी तू घरात ये मग घर लावून झाले कि आपण तुझा गृह प्रवेश करू .

 

मालती .. हो नाही का ना नाही . काहीच  बोलत नव्हती.

 

चंदू ने मालतीला बसायला जागा करून दिली .

 

आणि चंदू रिकामी कळशी घेऊन खाली पाणी आणायला गेला .

 

मालती चंदू जसा खाली गेला तसे तिने स्वतः: हातात गृहलक्ष्मी घेतली . म्हणजे काय माहितेय ना .. म्हणजे झाडू घेतली . मालती ने पटापट घर झाडून काढले . खोलीत एक  जुन्या काळातला लोखंडाचा बेड होता . बॅग सगळ्या त्या बेड खाली ठेवल्या . तिने घरातून आणलेली बेडशीट टाकली . किचन मध्ये गेली बघितले तर नळाला पाणी होते . सगळी भांडी घासून काढली .

 

एका फडक्याने लादी पुसून काढली .

 

तोपर्यंत चंदू कळशीत प्यायचे पाणी घेऊन आला . घरात आल्यावर लगेच बदल त्याला कळलाच . चंदू ने स्टोव्ह पेटवला आणि दोघांसाठी चहा टाकला . जसा चंदू खोलीत आला तशी मालती पुन्हा बेड वर जाऊन बसली .

 

चंदू ने मस्त फक्कड चहा केला तिला दिला कपात आणि स्वतः ला घेतला पाणी प्यायच्या ग्लास मध्ये .

 

दोघांनी चहा प्यायला . मग चंदू अंघोळीला गेला . मालती पुन्हा किचन मध्ये बघू लागली . काय काय आहे .. काय काय नाहीये ते बघत होती . बघत बघता तिला डाळ -तांदुळ दिसले . तिने लगेच एका पातेल्यात खिचडी चढवली . म्हणजे अंघोळ झाल्या झाल्या जेवता येईल .

 

चंदू ची अंघोळ झाल्यावर मालती अंघोळीला निघाली . चंदू मालतीला म्हणाला " मी जरा बाहेर जाऊन येतो तू आतून कडी लावून घे. " आणि चंदू लगेचच बाहेर पडला . मालतीला आरामात अंघोळ करता यावी म्हणूनच चंदू  बाहेर गेला .मालतीने छान अंघोळ केली आणि मग एक छोट्या पत्र्याच्या डब्यावर एक चांगला टॉवेल टाकला आणि त्यावर तिने घरातून आणलेले देव मांडले . बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देवी स्थापना केली आणि साखरेचा नेवैद्य ठेवला .तोपर्यंत चंदू पण आला . जेव्हा पण बाहेरून घरात येई तेव्हा काहीतरी बदल दिसायचा .

 

ना मालती त्याच्यकडे बघायची ना तो तिच्याकडे बघायचा . दोघे मुकेपणाने सगळे करत होते .

 

मालतीने लगेच गरम गरम खिचडी भात वाढला . दोघे जेवले . अजून काही मालती ने तोंडातून शब्द काढला नव्हता . चंदू ला कळत नव्हते काय बोलावे ?

 

मालती ला पण काय बोलावे कळत नव्हते . माहित नसलेले गाव , माहित नसलेला नवरा . घरत कोणी बाई माणूस नाही . त्याच्या नावाशिवाय काहीच माहित नाही .

  गरमा गरम भात  खाल्यावर चंदू  ला झोप आली . त्याने काय केले एक चादर काढली खाली हांथरली आणि तिच्यावर झोपू लागला .

 

मालती " तुम्ही वरती झोपा .. मला वरती झोपायची सवय नाहीये . "

 

चंदू  वरती झोपला

 

मालती मात्र तिथेच बसून राहली . चंदू असा दमला होता आणि पोट  भरले होते हा पठ्ठ्या घोरायला लागला .

 

मालती ला जेव्हा खात्री पटली कि चंदू झोपलाय तेव्हा ती आडवी झाली . पण तिला झोप कसली येते . डोळे मिटले कि तिच्या डोळ्या समोर अण्णा यायचे . आणि अण्णा आले कि ती खाडकन डोळे उघडायची . गेल्या दोन दिवसात तिच्या बरोबर झालेले सगळे तिला पुन्हा आठवले . मनात एक अनामिक धड धड होती . जे झाले ते चांगले झाले का नाही हेच तिला कळत नव्हते . चांगले एवढेच झाले होते कि काल जर लग्न नसते झाले तर अण्णा मात्र पूर्ण खचले असते . आता मुलीचे लग्न झाल्यावर त्यांना त्यांची एक जवाबदारी पूर्ण झाल्या सारखे वाटत होते .

 

त्यावेळी चंदू ने मोठेपणा दाखवला नसता आज काय झाले असते . एक प्रकारे चंदू ने त्यांच्या घराची आब राखली होती . मालती ला दूषणा पासून वाचवलेले होते . सगळे आपल्या बरोबर घडलेले आठवले आणि मालतीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले . पूर्ण रात्र मालती या कुशीवरून त्या कुशीवर होत होती .पहाटे पहाटे तिला झोप लागली . आणि जाग आली बघते तर चांगलाच उजेड पडला होता . चंदू उठून अंघोळ करून कळशीने प्यायचे पाणी भरत होता .

 

मालतीला   खूप ओशाळ ल्या सारखे वाटले . आणि उठल्या उठल्या अण्णा चे दर्शन घडायचे ते आज दिसत नाही आता पण आपल्या  घरी नाही हे तिला कळले . आणि ती पटकन उठून आधी अंघोळीला गेली . छोट्या बाथरूम मधेच अंघोळ करून आत मधेच कशी बशी साडी नेसून बाहेर यायची .

 

तोपर्यंत चंदू ने पाणी भरले आणि स्टोव्ह पेटवून दोघांना चहा टाकला . मालतीने बाहेर येऊन देवा समोर दिवा लावला . आणि मग चहा बिस्कीट खायला बसले दोघे .

 

चंदू " रात्री झोप लागली का ?"

 

मालती मान हलवूनच हो म्हणाली

 

चंदू " मी समजू शकतो तुझ्या मनातला गोंधळ . जे काही घडले ते फार अचानक घडले . मी लग्नाला तयार झालो कारण मला त्यावेळी अण्णांनकडे बघवत नव्हते . तुझ्या काळजीने ते खचले होते . मी त्यांच्या डोळ्यातले अश्रू पहिले आणि मी लग्ना साठी पुढे आलो . तुझ्या सारख्या सुशील ,सुरेख मुलीला माझ्या पेक्षा नक्कीच चांगला नवरा  मिळाला असता. तूला सुखी ठेवायचा मी माझ्या परीने प्रयत्न करेन . हि खोली खूपच लहान आहे . थो ड्या दिवसां नंतर पाहिजे तर बदलू . तुला असे वाटत असेल कुठे आमचा वाडा आणि कुठे हि खोली . त्यात मी अनाथ . त्यामुळे घरामध्ये माझ्या शिवाय कोणी नाही . " बोल बोलता चंदू बेड वर जाऊन बसला . "

 

मालती सर्व ऐकून घेत होती आणि तिच्या डोळ्यातून घळा घळा पाणी येऊ लागले . अश्रूंचा पण एक क्षण असा येतो कि ते डोळ्यात थांबत नाहीत . आपोआप पडू लागतात .

 

चंदू " रडू नकोस ग. ज्या हिमतीने तू काल मंडपात विचारलेस त्याच हिमतीवर आता आपण संसार करू .मी जरी अनाथ असलो तरी माणूस म्हणून चांगला आहे . माझ्यामुळे तुला कधीच काही त्रास होणार नाही हे मी बघेन ."

 

चंदू ला काही कळायच्या आत मालती चंदू च्या पायावर डोकं ठेवून रडायला लागली .

 

चंदू " अग  हे काय करतेस . उठ .. पायावर डोके का ठेवलस ?"

 

मालती रडत रडत " अहो माझी हीच जागा आहे . माझ्या सारख्या अभागी ला तुम्ही स्वीकारले . तुम्ही नसतात तर मला जीव देण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता , गावात अण्णांचे जगणे मुश्किल झाले असते . आज तुम्ही होतात म्हणून माझ्या वडिलांची मान ताठ राहिली . मला एक स्त्री म्हणून सन्मान मिळाला तुमच्यामुळे . तुमचे हे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही . मी तुमची दासी बनून राहीन . मालती मोठं मोठ्याने रडू लागली "

 

चंदू " अग , हे काय वेड्या सारखे बोलतेस . उठ बघू आणि चंदू ने तिला दोन्ही खांद्याला  धरून वर उठवले . "

 

मालती ने तिचे डोळे पुसले .

 

चंदू म्हणाला मला लहानपणा पासून माझं असे कोणीच नाहीये . ना आई , ना बाबा , ना बहीण ना भाऊ , अनाथ आश्रमात माझ्या सारखी अनेक मुले होती . आम्हीच एकमेकांचे  होतो . कधी कधी माझ्या एकटे पणाचा मला खूप कंटाळा यायचा पण करू काय ? माझे हे एकेकी पण कधी भरूनच निघाले नाही ग .  अशीच कोणीतरी अनाथ मुलगी मला मिळाली  असती पण देवाच्या मनात काही वेगळेच होते आणि तू माझ्या आयुष्यात अचानक आलीस . मला कोणी दासी नकोय .. माझी सहचारिणी , माझी अर्धांगिनी हो . जी माझ्या सुखात , दुःखा ची वाटेकरी होईल  बोलता बोलता चंदू च्या  डोळ्यातून अश्रू वाहू लागले .

 

मालतीने चंदू ला तिचा रुमाल डोळे पुसायला दिला .

चंदू ने तो रुमाल घेतला आणि तिचे भरून आलेले डोळे पुसले .