अपूर्वाई

A Book About Journey Of Author


शीर्षक-वाचाल तर वाचाल

कथेचं नाव-अपूर्वाई

जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या. आणि एक रुपया चं पुस्तक घ्या. कारण भाकरी तुम्हाला जगण्याला मदत करेल. तर पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल.
असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.

वाचनाचे मूल्य हे बहुमूल्य रत्नापेक्षाही अधिक आहे. वाचनाचा अपमान करणे म्हणजे आपल्याच मेंदूचा अपमान करणे होय.
अधिक वाचन केल्याने मनुष्याचे ज्ञान वाढते असे नाही, पण वाचलेले जेव्हा अत्यंत सुंदरपणे आचरण आणले जाते तेच खरे वाचन होय.

वाचनाचा वेड प्रत्येकाला असावं.
मला पण वाचनाचं वेड बालपणातच लागलं. चांदोबा, चाचा चौधरी वाचता वाचता नकळत कादंबऱ्या, आत्मचरित्र, व्यक्तिचित्रण, प्रवासवर्णने वाचायचं वय झालं. अनेक दिग्गज लेखकांच्या कादंबऱ्या वाचनात आल्या.
त्यातीलच एक दिग्गज लेखक पु ल देशपांडे... उभा महाराष्ट्र त्यांना पू.ल.म्हणूनच ओळखतो. त्यांची पुस्तकं वाचून मनाला आलेली मरगळ दूर तर होतेच आणि नकळत ओठावर हास्य फुलते.
त्यांची अनेक पुस्तके मी वाचलेली आहेत. बटाट्याची चाळ, नसती उठा ठेव, कान्होजी आंग्रे, आणि अपूर्वाई....
त्यांचं लेखन म्हणजे दुधारी शस्त्र होय. पुस्तकातून सांगताना ते असं काही सांगतात की वाचणारा हसून लोटपोट तर होतोच पण स्वतःशीच अंतर्मुख होऊन तो विचार करायला भाग पडतो. व्यक्तीच्या स्वभावाचे कंगोरे तर ते त्यांच्या विशिष्ट शैलीतून व्यक्त करतात.

असंच त्यांचं अपूर्वाई हे प्रवास वर्णन माझ्या मनाला खूप भावलं.....
अपूर्वाई हे पुस्तक वाचताना भान हरपते. हे पुस्तक त्यांनी केलेल्या इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स, जर्मनी या देशातल्या भ्रमंतीवर आधारित प्रवास वर्णन आहे.
त्या देशात भ्रमंतीला जाण्यासाठी विमानात बसतानाच वर्णन फारच हसायला लावणार आहे.
विमानतळावर आलेल्या मंडळींनी दिलेले हार तुरे...... ते म्हणतात, "इंग्लंड रिटर्न नावाच्या विशेष मनुष्याला सोनं चिटकवतात असं ऐकलं होतं. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या वारकऱ्याला पंढरपूरला जायच्या पहिल्यांदाच टिळा लावतात असं प्रथमच पाहिलं."
एडिंबरो ला एडिंबरा सुद्धा म्हणतात. ते स्कॉटलंड चं पुणे... त्यांना ते खूप म्हाताऱ्यांच शहर वाटलं. कारण तिथे 30-40 म्हाताऱ्या बायांमध्ये फक्त एक तरुणी त्यांना दिसली. त्यांनी त्यांच्या खुमासदार शैलीने त्यांचं वर्णन केलेला आहे.
एडींबरो येथील त्यांचं वास्तव्य वाचताना खूप मजा वाटते. देशपांडे या आडनावाचा तेथील लोकांनी केलेला अपभ्रंश! आपल्या येथील लोकांची तेथील लोकांशी केलेली तुलना, हे वाचून खूप मनमोकळ हसायला येतं. आणि आपणच एडिंब रो येथे आहोत की काय असं वाटायला लागतं. तेथील लोकांची शिस्त, काटेकोर नियोजन, कमी बोलण्याची सवय, प्रत्येक गोष्ट कशी शिस्तीने केलेली...
हे सर्व वाचून हसू तर येतच, पण नकळत मनाला एक रुखरुख लागते. की आपल्या देशात का अशी स्वयंशिस्त नाही कारण आपल्या देशाची खूप मोठी लोकसंख्या, लोकांच्या विचारांची, राहणीमानाची विविधता
असही असलं तरी सकारात्मक दृष्टीने विचार करणं आपल्याला आवश्यक असते.
पु ल देशपांडे यांची पुस्तके वाचल्याने मन हलकं व प्रफुल्लित होतं. दिवसातले थोडे तास का होईना आपण त्यात गढून जातो. आपला मेंदू फ्रेश होतो. आपली चिडचिड होत नाही. आपल्या मुलांना सुद्धा पु ल देशपांडे यांची पुस्तके वाचायला देऊन त्यांचं मन प्रफुल्लित करा......

वाचन आहे प्रवास सुंदर!
नव्या नव्या ज्ञानाचा!!
इतिहासाचा साहित्याचा!
आणि विज्ञानाचा!!!!!

छाया राऊत बर्वे