अपराजित

संघर्ष नारीचा
साट्कन् एक कानाखाली मारली गेली,
" काय म्हणालीस? आय. पी. एस. अधिकारी व्हायचं आहे? उद्यापासून मालिका पाहणं बंद. साधं शिकायचं ,लग्न करायचं, निगुतीने संसार करायचा आणि नवऱ्याचं म्हटलेले ऐकायचं. बस. ह्या पुढे काही नाही. समजलं का? नसेल समजलं तर नीट परत सांगतो." म्हणत दोन चार लाथा बुक्के मिळाले आणि बाबा निघून गेले घरा बाहेर. 

आणि ऊर्वीच्या आयुष्यात बंडाचे बी रुजले. 
'मी कुणाचे वाईट केले का? मी कुणाचा अपमान केला का? मी कोणावर अन्याय केला का? मग का मला नेहमी माझ्या मनातलं मनातच दडपून ठेवायला सांगितलं जातं? आता नाही. मला जे योग्य वाटेल ते मी बोलणार आणि करणार.'

हे उर्वीने त्यादिवशी ठरवून टाकलं. एक टिपूस ही डोळ्यातून न गाळता ती कामाला लागली. बिना आईची पोर. लहानपणा पासून एकटीच घरात. पण सतत हसतमुख, सगळ्यात मिसळणारी. मात्र चूकला चूक म्हणणारी. नेमका हाच स्वभाव तिच्या वडिलांना आवडायचा नाही. तसेही ते रागिष्टच होते. एवढ्या तेवढ्या कारणांवरून उर्वीला बडवित असायचेच. हळूहळू उर्वी मोठी होत होती. तिला कळत नव्हतं की आपलं मत मांडलं की बाबा हात का उचलतात?

आज मात्र तिने ठरवून टाकलं ह्या पुढे बाबांशी काही बोलायचं नाही. मला जे योग्य वाटेल ते मी करणार.आजूबाजूला, शाळेत जाता येता,बाजारात ,कुठे ही काही चूक किंवा विपरीत घडत असलेलं दिसलं की उर्वी लगेच खऱ्याची बाजू खणखणीतपणे घ्यायची.

आणि तेच तिला भोवलं. एकदा शाळेतून येत असताना, एकांत गाठून दोन गुंडांनी बदला म्हणून तिच्या शरीराचा उपभोग घेतला. ती कशी बशी घरी आली. ही बातमी कशी कोणास ठाऊक पण सगळीकडे पसरली आणि बाबांनी तिला बेदम तुडवलं
"हे काळं तोंड मला परत दाखवू नकोस. "
म्हणत घरातून हाकलून लावलं. उर्वी सारखं म्हणत होती
" बाबा! माझं काय चुकलं? मी काहीच केलं नव्हतं. एकदा मला समजून घ्या न?"
पण छे. ते तर मुळीच, काहीच ऐकायला तयार नव्हते. त्यांनी फरफटत तिला घराबाहेर काढलं आणि दार लावून घेतलं. उर्वीने थोड्यावेळ वाट पाहिली आणि आपले अश्रू पुसून ती वाट सापडेल त्यावर चालू लागली.

अचानक टाळ्यांचा गडगडाटाने उर्वी भूतकाळातून परतली. ती मंचावर होती आणि एक ईमानदार, जवाबदार आणि धाडसी पोलिस अधिकारी म्हणून तिचा सत्कार समारंभ चालू होता.गर्दीत उर्वीला तिचे म्हातारे वडील दिसले होते आणि ह्या आठवणी दाटून आल्या होत्या.वडिलांना बघताच एक चीड तिच्या मस्ताक उफाळली. तिने त्यांच्याकडे बघणं टाळलं. कोणीतरी तिला दोन शब्द बोलण्याचा आग्रह केला आणि ती उठली. ती काय बोलली हे तिचं तिलाच कळलं नाही. अचानक तिचं लक्ष परत वडिलांकडे गेलं . ते हात जोडून डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर पश्चात्ताप घेऊन उभे होते. तिने तिथे लक्ष दिले नाही आणि घोळक्याबरोबर बाहेर निघून गेली. 

रात्री झोपताना उर्वीला स्वतः चाच राग आला.
'हे काय केलं मी? माझा एकच बाणा असतो. अन्यायाची चीड बाळगा माणसाची नाही. मी आज अन्यायाशी झगडून यश मिळवलं आहे मग माणसावर ती चीड का म्हणून काढली? ते काही नाही मी उद्या बाबांना शोधून बोलवून आणणार.'

दुसऱ्या दिवशी तिने आपल्या बाबांचा शोध लावला आणि घरी घेऊन आली. तिला बाबांना बघून रडायलाच आलं. हाडांची काडं झालेली, दाढी वाढलेली, कळकट कपडे घातलेले, उदास भकास डोळे असलेले बाबा बघताच ती त्यांच्या गळ्यात पडली. तिच्या हाताखालची लोकं डोळे भरून हे दृश्य बघत होती.

दोन दिवसात बाबा थोडे बरे झाले, आणि त्यांनी उर्वीला आपल्या जवळ बसवलं आणि म्हणाले,
"बाळ! मी तुझ्याशी किती निर्दयपणे वागलो. गुरा सारखं तुला तुडवलं. तुझं काही एक ऐकून घेतलं नाही. मला सांग बाळ हा निर्धार, हा सच्चेपणा घेऊन तू ह्या यशा पर्यंत कशी पोहोचली? मला ऐकायला आवडेल तुझ्या संघर्षाची कथा."
उर्वीने एक दीर्घ श्वास घेतला, काही क्षण मौन राहून तिने बोलायला सुरुवात केली.
" बाबा! मी सगळं सांगेन पण माझं एकच म्हणणं आहे, जर माझा भूतकाळ जाणून घेतल्यानंतर तुम्हाला माझा राग आला किंवा मी अस्पृश्य आहे असं वाटलं तर तुम्ही तसं सांगून इथून जाऊ शकता. "
आणि उर्वी आपला भूतकाळाचा पट आपल्या बाबांसमोर उलगडू लागली.

बाबांनी घरातून हाकलून लावल्यावर उर्वी वाट सापडेल तिथे चालू लागली. तिला दिवस आहे की रात्र?वाट मोकळी आहे की रहदारीने गजबजली आहे? हे काहीच कळत नव्हतं. शेवटी थकून ती एके ठिकाणी बसली. समोर एक टपरी होती. बरीच लोकं येता जाता चहा आणि भजी खात उभे होते. कितीतरी वेळ ती नुसती बघत होती आणि तिला खांद्यावर हाताचा स्पर्श जाणवला. मान उचलून बघताच एक प्रौढ वयाची बाई तिच्या कडे बघून काही बोलण्यासाठी तिला उठवत होती असं जाणवताच ती पटकन उठून उभी राहिली.
" बाळ! कोण गं तू? इथे एकट्याने कधी पासून बसून आहेस. आता रात्र झाली आहे. घरी का जात नाहीस? हे जग फार वाईट आहे. कोणाची नजर अश्या एकट्या तरुण मुलीवर पडली तर काय होईल हा विचार कर?"

त्या बाईचे हे शब्द ऐकताच उर्वी हसतच म्हणाली,
"मला माहित आहे .आणि तो अनुभव गाठीशी आहे माझ्या. पण ह्या जगात मी एकटीच आहे."
उर्वी आतून खूप दुखावली गेली आहे हे ती बाई समजली होती. ती उर्वीला आपल्या घरी घेऊन आली. दोन दिवसाने ती जेव्हा टपरी वरून रात्री परत आली तेव्हा उर्वी बेशुद्ध आणि अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली दिसली. ती समजली नको ते घडलं होतं.
'देवा! काय रे ह्या पोरीपुढे वाढून ठेवलं आहे तेच कळत नाही.'
हा विचार करत तिने उर्वीला व्यवस्थित झोपवलं , पांघरुण घातलं. पण ती उर्वीला खूप दिवस आपल्याकडे ठेवू शकली नाही. कारण एक दिवस उर्वी तिच्या घरातून गायब झाली होती ती कुठे गेली कोणा बरोबर गेली हे काहीच कळलं नाही.
ही उर्वी एका रेडलाईट एरियात पोहोचली होती. आता रोज रात्री देहव्यापार हेच सुरु झालं.उर्वीला आय.पी.एस. ऑफिसर बनायचं होतं हे विचार परत परत उसळून यायचे पण कसं? हे तिला कळत नव्हतं. 
अचानक एक दिवस त्या भागात पोलिसांची धाड पडली. सगळे इथे तिथे लपण्याचा प्रयत्न करत होते. दलाल पोलिसांना लाच देऊन पटवण्याच्या प्रयत्नात होते. आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन उर्वी एका महिला पोलिस अधिकारी जवळ पोहोचली आणि आपली व्यथा सांगून मोकळी झाली. 
इथे मात्र भाग्याने तिची साथ दिली होती. ती अधिकारी तिला घेऊन घरी आली.एका समाजसुधारक स्वाती ताईकडे तिला सोपवलं. स्वाती ताईंनी तिला एका आश्रमात ठेवलं जिथे अनेक बायका विपरीत परिस्थितींशी झगडत रहायला आल्या होत्या.अनेक कामं करत त्या इथे स्थिर जीवन जगण्याचा प्रयत्न करत होत्या. उर्वही अनेक कामं करून इथे राहू लागली आणि आपलं स्वप्न पूर्ण होण्याच्या मागे लागली.छोट्या छोट्या परीक्षा देत स्कॉलरशिप घेत ती पुढची वाटचाल करत होती.आश्रम संचालिकांनी तिला मदत केली तिने आय. पी. एस. ची तयारी केली आणि आपलं स्वप्न पूर्ण केलं. आज तिचं पोलिस खात्यात कौतुक होत होतं, सगळीकडे तिच्या धाडसाचं कौतुक होत होतं. विपरीत परिस्थितीत झगडत तिने जय मिळविला होता ती अपराजिता होती.
बाबा उर्वीकडे अनिमिष डोळ्याने बघत होते.
' ही माझी मुलगी? ही तर हिरा होती आणि मी तिला ओळखलं ही नाही.देव मला क्षमा करेल की नाही माहित नाही पण मी स्वतः ला कसं माफ करू? माझ्या नजरेत मीच आज खूप खाली गेलो आहे.' 
बाबा विचार करत होते आणि उर्वीचा मोबाईल वाजला तिला एका घटनेसाठी अचानक बोलवून घेतलं होतं आणि रात्र असून ही ती आपल्या पोशाखात आत्मविश्वासाने बाहेर पडत होती आणि बाबा निश्चिंत होऊन तिला जाताना बघत होते.

राधा गर्दे
कोल्हापूर