अपराधी कोण? भाग ८

रहस्य एका मृत्युचे


अपराधी कोण? भाग ८


मागील भागात आपण पाहिले की प्रशांतने सगळ्यांना बोलावले आहे.. आता बघू पुढे काय होते ते.


" नाही.. मी असं काही नाही केलं.." अर्चना तोंडावर हात ठेवत म्हणाली. "मी बोलले असेन, पण तिला त्रास व्हावा असं का वागेन मी?"

" हो? मग का येताजाता मेघनाला फोन करून त्रास द्यायचीस ते?" अनमोल बोलला.

" काय त्रास दिला मी? तिला फक्त मी एवढंच सांगत होते की देवदयेने तुझ्याकडे सगळंच आहे. पैसाअडका, प्रतिष्ठा.. मग आईबाबांची जमीन मला द्यायला काय हरकत आहे?"

" पण मग तुम्हालासुद्धा अर्धा वाटा मिळाला असेलच ना?" प्रशांतने विचारले. त्यावर अर्चना फक्त मुसमुसत राहिली.

" बोला पटकन.."

" हो मिळाला होता हिस्सा.. पण तो.."

" तो तुमच्या नवर्‍याने जुगारात घालवला. तुम्हाला मग तुमच्या मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन येऊ लागले. तेव्हाच मेघनाला एक पुरस्कार जाहीर झाला होता. त्यावर लिहिलेली रक्कम बघून तुमचे डोळे फिरले आणि तुम्ही सुरुवात केली मेघनाला सांगायला की तुझा हिस्सा मला दे म्हणून."

" हो.. सांगितलं मी तिला. काय चुकलं मग त्यात माझे? लहानपणापासून मी आमच्या घरातली अयशस्वी व्यक्ती राहिले आहे. दिसायला सुंदर कोण मेघना, लिखाणात चमकते कोण मेघना? नवरा कोणाला चांगला मिळाला? तर तो मेघनाला. भरपूर पैसा आणि प्रसिद्धी मिळते कोणाला तर मेघनाला.. आणि मला काय मिळाले? तर माझ्या हुशारीची कधीच कदर केली गेली नाही. नवरा मिळाला तोही व्यसनी. नोकरी चांगली आहे पण सगळा पगार तो जुगारात घालवणार. मग माझ्या मुलांसाठी मी तिच्याकडे काही मागितलं तर काय बिघडले?" अर्चना बोलता बोलता रडू लागली.

"बिघडले हे की तुम्ही फक्त तिच्याकडून अपेक्षाच केलीत. कधी बहिण म्हणून तिची चौकशी केलीत? तिच्या बाळंतपणात ती जेव्हा नवर्‍याशी तिच्या आजाराशी लढत होती तेव्हा साधं तुम्हाला यावंसंही वाटलं नाही." अर्चनाकडे या प्रश्नाचे काहीच उत्तर नव्हते.

" एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर.. या फॅमिली ड्रामामध्ये माझे काय काम आहे? मला का इथे बसवून ठेवले आहे, समजेल का?" संजनाने डोळ्यावरचा गॉगल काढत विचारले.

"फॅमिली काय आणि बिझनेस काय? जिथेतिथे फक्त ड्रामाच.. मला ना खरंच आश्चर्य वाटते या मेघनामॅडमचे. एवढ्या अडचणीतून जात होत्या त्या. तरिही कसं बरं त्यांना एवढं सुचायचे? कश्या त्या एवढं लिहायच्या? म्हणजे जर मी चुकत असेन तर मला दुरूस्त कर बरं का पार्थ.. मॅडमचे आईवडील वारले, अशावेळेस त्यांनी एक अतिशय रोमँटिक कादंबरी लिहिली. जिच्यावर एक हिट सिनेमा देखील आला. त्यानंतर अनमोलसरांच्या म्हणण्यानुसार त्यांना जेव्हा मानसिक आजार झाला होता तेव्हा त्यांनी एक सामाजिक कादंबरी लिहिली ज्याला राज्यशासनाचा पुरस्कार मिळाला.. मग अशी लेखिका दुसर्‍याचे लिखाण स्वतःच्या नावाने लिहिते असा आरोप तुम्ही कसा केलात संजनामॅडम?"

" मी काहिही खोटं बोलले नाही.. तिला सवयच होती.. खोटं वाटत असेल तर या पार्थला विचारा. पार्थ सांग ना तू.. कशा तुझ्या कथा मेघनाने घेतल्या. कशी ती प्रकाशकांशी बोलत होती.. बोल पार्थ." संजना पार्थला आग्रह करत होती.

" पार्थच्या कथेबाबत मी नंतर बोलेन.. मला सांगा त्याआधी तुम्ही हे मत कसे बनवले?"

" तिने आधीसुद्धा हे केले होते.." संजना धुसफुसत म्हणाली..

" कधी? जेव्हा एका स्पर्धेत तुम्ही दोघींनी भाग घेतला होता आणि त्यांना पहिला व तुम्हाला दुसरा क्रमांक मिळाला होता. तेव्हा एका असंतुष्ट व्यक्तीने उच्चारलेल्या वाक्यावर तुम्ही हे सारे इमले बांधले? आपण लिहितो ते उत्कृष्ट असून सुद्धा मेघनाला क्रमांक मिळतो हे तुम्हाला खटकत होते. त्यानंतर मेघनाला मिळालेल्या पुरस्काराने तर तुमची जास्तच चिडचिड झाली. हिचा काटा काढलाच पाहिजे.. हे तुमचेच वाक्य ना?" प्रशांत संजनाला विचार करायला वेळच देत नव्हता.

" हो.. पण मी ते फक्त बोलले होते.. मी का करेन असं काही?"

" तुम्हाला जर काही करायचेच नव्हते, मग दोन दिवसांपूर्वी मेघनामॅडमना पुस्तके पाठवण्याचा हेतू काय होता?" प्रशांतने आवाज चढवून विचारले.

" दर्जेदार लिखाण काय असते ते दाखवायचे होते, मला तिला."

" दाखवायचे होते की मारायचे होते? तुमच्या घरी असलेल्या विषांच्या कलेक्शनबद्दल फार ऐकून आहे."

" तो माझ्या नवर्‍याच्या कामाचा भाग आहे."

" तशाच विषाने मेघनाचा मृत्यू झाला ही वस्तुस्थिती आहे." संजनाला काय बोलावे ते सुचले नाही.

" आणि काय म्हणत होता तुम्ही? पार्थची पुस्तके प्रकाशकाला दिली आहेत.. कशासाठी दिली आहेत हे माहित होते तुम्हाला?"

" हो.. मला त्या ऑफिसमधल्या माझ्या माणसाने सांगितले होते." संजना धीर एकवटून बोलली.

" त्याने चुकीचे सांगितले होते.. मेघनाने पुस्तक त्याच्याकडे वाचायला दिले होतेच, त्यावरचे नावही खोडले होते.. कारण.."



काय आहे ते कारण? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all