अपराधी कोण? भाग ६

रहस्य एका मृत्युचे


अपराधी कोण? भाग ६


मागील भागात आपण पाहिले की संजना ही मेघनाची प्रतिस्पर्धी असते, जिने मेघनाला जीवे मारण्याची धमकी दिलेली असते. आता बघू पुढे काय होते ते.


" सतत काय फोन करून विचारताय, कधी येणार, कधी येणार ते? आणि तुम्ही का नाही आलात इथे?" अर्चना फोनवर बोलत होती.

" हो.. तुमचं ऑफिस महत्त्वाचे आहेच, पण इथे नको थांबायला? त्या जमिनीचा काय तो सोक्षमोक्ष लावूनच येते. या अनमोलचा काही भरोसा नाही. त्याने त्या सटवीशी लग्न करायच्या आधी मला सगळं बघू दे.. नंतर परत यायला मिळेल न मिळेल."

" मुलं? नाही ना.. ती पण सतत तिलाच चिकटलेली असतात. जरा जवळ येतील तर शपथ.. ती ही त्या मेघनाचीच मुले ना. जाऊ दे.. तुम्ही आपल्या मुलांची काळजी घ्या. हे झाले की निघतेच मी.. आणि हो.. ती कुरियरची पावती फाडलीत ना?"

आपल्याला कोणी बघत नाही हे बघून अर्चनाने फोन ठेवला..


" का नाही भेटत तू मला पहिल्यासारखे?" चिडलेल्या अनमोलने अश्विनीला विचारले.

" कसं भेटणार? ते पोलीस सतत लक्ष ठेवून असतात. मुलेही भेदरलेली आहेत. त्यांनाही मी जवळ हवी असते. मी तरी कुठे कुठे बघू? त्यात ती अर्चना.. नुसती आल्यागेल्याजवळ रडायचे काम करते.. बाकीच्या कामांची नुसती बोंब.."

" हे म्हणजे विचित्रच त्रांगडं झाले आहे. जी गोष्ट मिळावी म्हणून एवढं सगळं केलं त्याचा फायदाच नसेल तर??" अनमोल थोडा घाबरला होता.

" अनमोल, मला पण भिती वाटायला लागली आहे रे.. त्या इन्स्पेक्टरने त्यादिवशी माझ्याकडून एक चिठ्ठी लिहून घेतली. कशासाठी असेल रे?"

" मला तरी काय माहित? माझा थोडीच या पोलिसांशी नेहमी संबंध येतो."

" मला खूप भिती वाटते रे.."

" मी आहे ना?" अनमोलने अश्विनीला मिठीत घेतले.


" तुम्ही मला इथे कशासाठी बोलावले आहे?" पार्थने गाडीबाहेर उभ्या असलेल्या संजनाला विचारले.

" निदान आतातरी तू खरं बोलावं यासाठी. आतातरी सांग, मेघनाच्या नवीन गाजलेल्या कथा तुझ्या होत्या." संजना गॉगल काढत म्हणाली.

" तुम्ही कितीही बोललात तरी मी या विषयावर काहीच बोलणार नाही."

" म्हणजे माझा अंदाज खरा होता तर. मग मला एवढे तरी समाधान मिळू दे की पुरस्कार तिला नाही तुला मिळाला होता."

" का पाठी लागलाय त्यांच्या आणि माझ्या? त्या तर गेल्याच, मी.. माझे.." पार्थ डोक्याला हात लावून बसला होता.

" ती तर जाणारच होती.. अशी नाही तर तशी.."

" म्हणजे तुम्ही मॅमना?" पार्थला धक्का बसला होता.

" तुला मी मूर्ख वाटते का, खून करायला आणि त्याचा गाजावाजा करायला? तसं बघायला गेले तर खून करायला मोटिव्ह तुझ्याकडे पण होता. तू तुझी नवी कोरी कादंबरी तिला वाचायला दिली होतीस, आणि तीच कथा तिने एका प्रकाशकाला वाचायला दिली आहे, ते ही तुझे नाव खोडून.. बरोबर ना?" हे ऐकून पार्थ चमकला.

" तुम्हाला कसे समजले?"

" तिचे त्या प्रकाशकाशी काय बोलणे सुरू होते, ते ही मी तुला सांगू शकते. आता प्रश्न हा आहे की तुला काय करायचे आहे?" संजना आता मुख्य विषयावर आली.

" काय करायचे म्हणजे?"

" तुझ्या कल्पना मला दे.. मी त्या फुलवून त्यावर मोठी कथा लिहीन. त्याचा तुला मोबदला मिळेल याची काळजी नक्की घेईन."

" मी विचार करतो." पार्थ बोलला.

" तो करच.. पण ती जी नवीन कादंबरी आहे ती मिळवायचा प्रयत्न कर. कारण मेघनाने आधीच ती त्या प्रकाशकाकडून परत घेतली आहे." एवढं बोलून संजना गाडीत बसून निघून गेली. आणि पार्थ तिथे उभा राहून विचार करत बसला.


" दादा, आता आपण काय करायचं रे? छोटी पियू नीलला विचारत होती.

" आपण काय करणार? आई जे सांगायची तसंच वागायचं." परिस्थितीमुळे अकाली प्रौढ झालेला नील बोलत होता.

" म्हणजे त्या आंटीला आई म्हणायचे?"

" पियु.. हो.. तू आणि मी अजून खूप लहान आहोत. आपण आधी कसं आईचं ऐकायचो तसंच आत्ताही ऐकायचं."

" पण आई आपल्याला लांब का ठेवायची? नेहमी सांगायची कोणासमोर रडू नका..

" ती आजारी होती ना पियु.. म्हणून." नील पियुला समजावत होता.

" मला आईची खूप आठवण येते आहे. " पियु रडत होती.

" पियु रडू नकोस. तू रडलीस की मलाही रडू येईल. त्यादिवशी कशी शांत बसलीस तशीच आताही बस.." दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते.


" राघव, काय आला रिपोर्ट त्या पुस्तकाचा?"

" सर, तुमचा अंदाज खरा होता.. पुस्तकाच्या मधल्या पानावर आर्सेनिकचे ट्रेसेस सापडले.. आता पुढे काय करायचे?"

" आता हे शोधायचे की ते पुस्तक आले कुठून? कारण मेघनाची बाकीची पुस्तके मी बघितली.. तिने प्रत्येक पुस्तकावर जर विकत घेतले असेल तर त्याची तारीख नोंदवली आहे.. आणि जर कोणी दिले असेल तर देणार्याचे नाव वगैरे माहिती आहे. या पुस्तकावर तसे काहीच दिसत नाही. म्हणजे ते नुकतेच तिच्याकडे आले असावे. राघव आता माहिती काढ नुकतेच यांच्याकडे काही कुरिअर आले होते का?"


कोण असेल मेघनाला पुस्तक कुरिअर करणारी व्यक्ती? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all