Login

अपराधी कोण? भाग ५

रहस्य एका मृत्युचे
अपराधी कोण? भाग ५


मागील भागात आपण पाहिले की अर्चनाचा मेघनाच्या इस्टेटीवर डोळा असतो.. तिने केला असेल का बहिणीचा खून? बघू काय होते ते पुढे.



" सर, सगळी तयारी झाली आहे.." राघवने प्रशांतजवळ येऊन सांगितले. दोघेही आज साध्या कपड्यात होते.

" अनमोल आणि मुले कुठे?"

" ते सगळेच हॉलमध्ये आहेत.."

" चल मी पण येतो." दोघे हॉलमध्ये आले. मेघनाचा मृतदेह मधोमध ठेवला होता. सगळे आजूबाजूला बसले होते. सगळ्या शांततेत फक्त अर्चनाचा रडण्याचा आवाज येत होता. मेघनाच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. प्रकाशक, लेखक यांचा ग्रुप एका बाजूला कुजबुजत होता.. अचानक चिडीचूप शांतता झाली. पांढरे कपडे घातलेली एक स्त्री आत आली होती. डोळ्याला गॉगल, मोकळे सोडलेले केस, थोडी लिपस्टिक.. या वातावरणात ती वेगळीच दिसत होती. तिने आणलेले पुष्पचक्र मेघनाच्या पायाजवळ ठेवले. आणि ती बाजुच्या लेखकांच्या ग्रुपजवळ गेली. तिने लावलेला परफ्यूम प्रशांत आणि राघव दोघांनाही जाणवला.

" ही कोण?" प्रशांतने आश्चर्याने विचारले.

" ही मेघनाची तगडी प्रतिस्पर्धी संजना.." बाजूला उभ्या असलेल्या सारिकाने माहिती पुरवली. ती लेखकांच्या बाईट्स घेत होती.

" तगडी प्रतिस्पर्धी?"

" हो.. दोघींचे मोठे भांडण पण झाले होते."

" कशावरून?"

" हिचा आरोप होता की मेघना दुसर्‍यांच्या कथा आपल्या नावाने छापते. तो आरोप तिला कधीच सिद्ध करता आला नाही. त्याचवर्षी मेघनाच्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तेव्हा तर हिने धमकीही दिली होती, मेघनाला जीवे मारण्याची.. अशी आतल्या गोटातली माहिती आहे.." सारिका बोलत होती. तेवढ्यात अंत्ययात्रेला सुरुवात झाली म्हणून सारिका बाहेर गेली. राघवही बाहेर पडला. प्रशांत संजनाकडे बघत होता. बरीचशी लोक बाहेर गेली तरी तिची नजर कोणालातरी शोधत होती. शेवटी तिला हवी ती व्यक्ती दिसली. ती पार्थजवळ गेली. तो एका कोपर्‍यात सुन्नपणे बसून होता. ती त्याच्याशी काहीतरी बोलली. पार्थने आधी नकारार्थी मान हलवली. त्यावर ती हसली आणि बाहेर पडली.. घर जवळपास रिकामे झाले होते. प्रशांतने मोबाईलवर आलेला मेसेज बघितला. डॉक्टरांनी पोस्टमार्टेमचा रिपोर्ट मेल केला होता. तो बघून घ्यायला सांगितला होता. प्रशांतने मेल उघडला.

" आर्सेनिकच्या सेवनाने मृत्यु.."


आता हे आर्सेनिक मेघनाला कोणी व कसे दिले असेल? आणि का? प्रशांतच्या विचारांची गाडी धावायला लागली. त्याने परत मेघनाच्या स्टडीरूममध्ये चक्कर मारली.. आदल्या दिवशी जशी होती तशीच ती खोली होती. प्रशांतने त्या खोलीत लावलेले सीसी टिव्ही फुटेज परत बघितले. मेघना बहुतेक चिडलेली होती. ती रागारागात त्या खोलीत आली. ती काहीतरी बडबडत होती. बोलता बोलता ती अचानक रडायला लागली. कोणीच आले नव्हते तिची समजूत काढायला. रडून दमल्यानंतर तिने स्वतःच स्वतःचे डोळे पुसले. तिकडचे पाणी घेतले. पाणी पिऊन झाल्यावर तिने समोर ठेवलेले पुस्तक उचलले. ते पुस्तक वाचता वाचताच ती बेशुद्ध झाली. कितीतरी वेळ ती तशीच पडली होती. रात्री कधीतरी उशीरा अनमोल तिथे आला.. त्याने ती झोपली आहे हे बघितले. तो हळूच बाहेर गेला. त्यानंतर मग दोनेक तासांनी अश्विनी येताना दिसली. मेघना तशीच झोपली आहे हे बघून ती ही परत गेली.

प्रशांत विचार करू लागला. एक व्यक्ती कितीतरी वेळ पडली आहे.. आणि घरातल्या कोणालाच त्याचे काही वाटत नाही? मेघनाच्या मुलांनासुद्धा जास्त दुःख झाल्याचे जाणवत नव्हते. तसं बघायला गेलं तर तिचा मुलगा बारा वर्षांचा होता. म्हणजे अगदीच लहान नाही.. तरिही. ती संजना.. तिने तर तिला धमकी दिली होती ठार मारायची तरिही ती इथे आली? तिचे आणि पार्थचे काय बोलणे झाले असावे? प्रशांतने टेस्टिंग साठी पाठवलेल्या वस्तूंची लिस्ट बघितली. त्यात तो पाण्याचा जग होता.. ज्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मग अजून नक्की काय असेल, ज्यातून मेघनाला विष दिले गेले असावे.


तुमच्याकडे आहे का प्रशांतच्या प्रश्नाचे उत्तर? असेल तर वाट बघते उत्तराची.

हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all