अपराधी कोण? भाग ४

रहस्य एका मृत्युचे


अपराधी कोण? भाग ४


मागील भागात आपण पाहिले की अश्विनीचे आणि खाली पडलेल्या कागदावरचे हस्ताक्षर जुळत असते. आता बघू पुढे काय होते ते..


" का घुसायचा प्रयत्न करत होतास तू?" प्रशांतने समोर उभे असलेल्या तरूणाला विचारले.

" मला मेघना मॅडमना बघायचे होते.. माझे.." तो बोलता बोलता रडायला लागला. त्याचा आवाज ऐकून अनमोल बाहेर आला.

" पार्थ तू?" त्याने आश्चर्याने विचारले.

" कोण आहे हा?"

" हा, मेघनाचा मोठा चाहता आहे. अनेकदा तिला भेटायला यायचा." अनमोलने सांगितले.

" चाहता.. मी भक्त आहे त्यांचा.. त्यांची ओळनओळ वाचली आहे मी अनेकदा. त्या कसं जाऊ शकतात मला सोडून.."

त्याचे शेवटचे शब्द ऐकून प्रशांतची भुवई चढली. त्याने राघवला खुणावले. राघव पाणी घेऊन आला.

" बसा.. शांत व्हा. पाणी प्या.." राघव बोलला.

" मला एकदा फक्त एकदा बघायचे आहे त्यांना.. प्लिज बघू द्या ना.." तो विनवू लागला.

" हो.. आत जरा काम चालू आहे.. झाले की देऊ परवानगी. मला सांग तू नेहमी भेटायचास मॅडमना?"

" हो.. त्यांचे काही वाचले की मला आवडायचे त्यांना भेटून सांगायला. किंवा मी काही लिहिले तरी.." पार्थ बोलायचा थांबला.

" तू पण लिहितोस?" प्रशांतने विचारले.

" हो.. थोडेफार.." पार्थ अपराधीपणे बोलला.

" मग ते कुठे प्रकाशित करायचास?"

" मेघना मॅडमकडे द्यायचो.."

प्रशांत विचारात पडला.

" नाही समजलं.."

" त्यात काही नाही समजण्यासारखे. मला फक्त एकदा तिच्या खोलीत तरी जाऊ दे."

" आमचं आतलं काम झालं की सोडू. तोवर थांबावं लागेल." बोलता बोलता अचानक प्रशांतला मेघनाची बहिण आठवली. तिची चौकशी राहिलीच होती. तो राघवला काही सांगणार तोच समोर उभी असलेली सारिका त्याला दिसली.

" सर, एक छोटा इंटरव्ह्यू? प्लिज?"

" अजून आमची विचारपूस चालू आहे. सध्यातरी सांगण्यासारखे काही नाही." त्या दोघांचे बोलणे चालू असताना मनोजचा कॅमेरा चालू होताच. जेवढं करता येईल तेवढं शूट त्याने केले होते. प्रशांत नाही म्हटल्यावर ते दोघे जास्त ताणून न धरता बाहेर पडले.

" जेवढं मिळाले आहे त्यावरच भागवू.." असे म्हणत सारिका परत कॅमेऱ्यासमोर उभी राहिली आणि तिने बोलायला सुरुवात केली.

" तुम्ही बघत आहात मेघनाचे घर.."


अर्चना आत आली तेच भोकाड काढून..

" मी सांगते तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब.. त्यानेच मारले हो माझ्या बहिणीला."

" आम्ही करतच आहोत तपास.. अनमोलने मेघनाला मारले असेल असे का वाटते तुम्हाला?"

"कारण त्याची इच्छाच नव्हती मेघनाने आमची प्रॉपर्टी माझ्या नावाने करून द्यावी म्हणून."

" तुमची प्रॉपर्टी?"

" हो.. माझ्या आईवडिलांची जमीन आहे जी आम्हा दोघी बहिणींमध्ये वाटली गेली आहे. मेघनाची इच्छा होती की तिचा हिस्सा माझ्या नावावर करावा. पण हा अनमोल करून देत नव्हता. म्हणून त्यानेच मारले असावे.. म्हणजे तो मोकळा त्या बयेशी लग्न करायला.."

" कोणत्या बयेशी?" प्रशांतने विचारले.

" तीच.. बसली आहे ना घरात.. आधी माझ्या भाच्यांना मेघनापासून तोडले नंतर नवर्‍याला.. आता तर..." अर्चनाचे रडणे संपून कथाकथन सुरू झाले होते.

" म्हणजे अश्विनीचे आणि अनमोलचे??"

" मग तेच तर सांगते आहे कधीपासून.. मेघनाला दूर केले की तिचा पैसाही मिळेल आणि दुसरे लग्नही करता येईल.. पण मी आहे ना इथे.. मी कसं पचू देईल त्याला?"

" अच्छा.. असं आहे का? बघू काय केले असेल त्याने.." प्रशांत अर्चनाची समजूत घालत म्हणाला.

" सर, सगळे ठसे घेऊन झाले आहेत. फोटो पण घेतले आहेत.. आता?" राघवने विचारले.

" बॉडी पोस्टमार्टेमसाठी जाऊ दे. माझं इकडचं काम झालं की परत एकदा तिकडे नजर फिरवू.." त्यांचं बोलणं ऐकत असलेल्या अर्चनाने परत रडायला सुरुवात केली. ते बघून प्रशांतने राघवला तिला सुद्धा घेऊन जायची खूण केली.


" ना रक्ताचा डाग, ना झटापट झाल्याची काही खूण.. मग नक्की कसा झाला असेल मेघनाचा मृत्यु? नैसर्गिक की अजून काही?"


इन्स्पेक्टर प्रशांतला लागेल का पुढचा क्ल्यू? पार्थला का जायचे असेल मेघनाच्या खोलीत बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all