अपराध माझा असा काय झाला? भाग ७

कथा एका निष्पाप जीवाची
अपराध माझा असा काय झाला? भाग ७


मागील भागात आपण पाहिले की श्रियाचा व्हिडिओ कोणीतरी प्रसिद्ध केल्यामुळे तिचे लग्न तुटते. आता बघू पुढे काय होते ते.


" श्रिया, आजतरी जाणार ना ऑफिसला?" झोपलेल्या श्रियाच्या डोक्यावरून हात फिरवत स्वातीताईंनी विचारले.

" बघते.." डोळे न उघडता श्रिया म्हणाली.

" अजून किती दिवस असं तोंड लपवून घरात राहणार आहेस? आहे त्या परिस्थितीला तोंड दे. आठ दिवस झाले ऑफिसलाही गेली नाहीस तू." स्वातीताई बोलत होत्या.

" आई, कुठेच जावंस वाटत नाही ग. तू म्हणालीस म्हणून त्या दिवशी ऑफिसला गेले तर सगळ्यांच्या नजरेत मीच काही गुन्हा केला असे वाटत होते. सहा वाजता ऑफिस सुटते मग रात्री अकरापर्यंत मी कुठे होते, काय करत होते? एकटीने प्रवास करायची गरजच काय? प्रत्येकजण हेच कुजबुजत होता. आणि तो विराज ज्याच्यामुळे मी थांबले होते तो तर माझा फोनही उचलत नाहीये." श्रिया रडत होती.

" रडून प्रश्न सुटणार आहेत?" स्वातीताईंनी विचारले.

"प्रश्न कशानेच सुटणार नाहीत. घरी बाबा बोलत नाहीत, दादा अपराधी वाटून घेत बाहेरच राहतो आहे. असं वाटतं मरून जावं म्हणजे सगळेच प्रश्न सुटतील." श्रिया रडत होती.

" कशी मरणार आहेस? फास घेऊन की विष घेऊन? की उडी मारतेस?"

" आई... तुलाही मी नकोशी झाले आहे?" श्रियाने दुःखाने विचारले.

" तुला असं वाटतं?"

" तू आता मला कसं मरावं ते सांगत होतीस?"

" मग काय करू? जिला जन्म दिला, प्रेमाने एवढं वाढवलं ती लेक जर जीव द्यायचं म्हणत असेल तर तिला उपाय सुचवायला नको?"

" आई... " रडत श्रिया स्वातीताईंच्या कुशीत शिरली.

"तुला त्रास देणाऱ्या लोकांसाठी तुझ्यावर प्रेम करणाऱ्या आईला दुखावायला आवडेल का तुला? तसंही हे लग्न तुझ्या इच्छेने होत नव्हतंच ना? मग का वाईट वाटून घेतेस? देवाने जगण्याची एक संधी दिली आहे.. त्याचा वापर कर." स्वातीताई श्रियाला समजावत होत्या.

" हो.. जगा.. छान जगा. आमच्या जीवाला घोर लावा आणि तुम्ही मजेत रहा." यांचे बोलणं ऐकत असलेले प्रवीणराव म्हणाले.

" काय घोर लावला मुलीने? का येताजाता तिला ऐकवत असता?"

" काय गरज काय होती तिथे जायची? तोंड काळं करून यायची?"

" तिने काहिही केलं नाही. त्या विराजनेच हिला भेटायला बोलावलं होतं." स्वातीताई श्रियाची बाजू घेऊन बोलत होत्या.

" हे तुम्ही सांगता.. तिथे तो तर वेगळंच काही बोलतो आहे."

" काय म्हणतो आहे तो?"

" त्याचं म्हणणं आहे तो श्रियाला भेटलाच नाही. तो कुठेतरी हॉस्पिटलमध्ये होता. त्याचे आईबाबा पण तेच सांगत आहेत."

"तुमचा विश्वास बसला?" श्रियाने विचारले.

" तो का खोटं बोलेल?"

" व्वा बाबा.. आपल्या मुलीवर तुमचा विश्वास नाही आणि या आत्ता भेटलेल्या माणसांवर तुमचा विश्वास आहे?" खिन्नपणे हसत श्रिया म्हणाली.

" विश्वास असो वा नसो. तू तिथे त्या माणसाच्या तावडीत सापडलीस हे सत्य तर बदलत नाही ना? ती मोठी खानदानी, जुन्या परंपरांची माणसे आहेत. त्यांना हे प्रकार आवडत नाहीत." प्रवीणराव बोलत होते. श्रिया वडिलांचे बोलणे सुन्नपणे ऐकत होती. तेवढ्यात बेल वाजली. स्वातीताई दरवाजा उघडायला उठल्या.

" श्रिया आहेत का?"

" आपण कोण?" आश्चर्याने स्वातीताईंनी विचारले.

" मी अनिरुद्ध.. त्या दिवशी त्यांना घरी सोडलं होतं." बोलता बोलता अनिरुद्ध थांबला. स्वातीताईंना काही सुचेना.

" या ना.. आत या." त्यांनी त्याला आत बोलावले. " श्रिया, तुला भेटायला बघ कोण आले आहे." त्यांनी तिला आवाज दिला. डोळे पुसून श्रिया बाहेर आली. अनिरुद्धला बघून तिला आश्चर्य वाटले.

" तुम्ही इथे?"

" तुम्हाला भेटायला आलो. त्या दिवशी तुम्ही खूपच घाबरला होता म्हणून थोडी काळजी वाटली."

" तुम्हाला खरंच माझी काळजी वाटली?" श्रियाने रोखून बघत विचारले.

" काही चुकले का माझे?" अनिरुद्धने प्रतिप्रश्न केला.

" त्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले. आज अजून एक गोष्ट कराल?" ते ऐकून अनिरुद्ध सावरून बसला.

" घाबरू नका. कोणतीही अशक्य गोष्ट करायला सांगणार नाही." श्रिया ठामपणे बोलत होती. ती मगाची रडकी श्रिया जणू कोणी दुसरीच होती.

" सांगा.. काय करायचे आहे?"

" माझ्यासोबत चला. आईबाबा तुम्ही ही तयार व्हा."

" अग पण कुठे जायचे आहे?" स्वातीताईंनी सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारला.

" विराजच्या घरी.."


श्रिया भाग पाडेल विराजला आपल्याशी लग्न करण्यासाठी? काय असेल नक्की तिच्या मनात? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all