अपराध माझा असा काय झाला? भाग ६

कथा एका निष्पाप जीवाची
अपराध माझा असा काय झाला? भाग ६

मागील भागात आपण पाहिले की ट्रेनमध्ये श्रियावर अतिप्रसंगाचा प्रयत्न होतो. पण तिला अनिरुद्ध वाचवतो. आता बघू पुढे काय होते ते.

" अरे माधवराव.. आज सकाळीच फोन?" प्रवीणराव समोरून फोन आला म्हणून खुश होते. "नाही. टिव्ही बघितलाच नाही सकाळपासून. काही झाले आहे का? हॅलो.. हॅलो.."

" विचित्रच आहेत. स्वाती टिव्ही लाव जरा." प्रवीणराव म्हणाले. "ही येईपर्यंत बातम्या संपायच्या." त्यांनी उठून स्वतःच टिव्ही लावला.

" मुंबईच्या ट्रेन स्त्रियांसाठी सुरक्षित आहेत? नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी परत एकदा सांगते. ही आहे काल रात्रीची घटना. मुंबईसारख्या शहरात एक व्यक्ती स्त्रियांच्या डब्यात शिरून अतिप्रसंग करायचा प्रयत्न करते. सरकार काय करते आहे?" समोरची निवेदिका जोरजोरात ओरडत होती.

" यात काय आहे बघण्यासारखे?" प्रवीणराव पुटपुटले. तोच समोर व्हिडिओ सुरू झाला. एक माणूस एका मुलीच्या अंगावर झुकला होता. ती जोरजोरात ओरडत होती. मध्येच ट्रेन थांबली. एक तरूण त्या व्यक्तीला मारू लागला. तो बाजूला होताच त्या मुलीचा ओझरता चेहरा दिसला.

" श्रिया???" प्रवीणराव ओरडले. लगेचच मुलीच्या चेहर्‍यावर पट्टी आली. पण त्यांनी तिला ओळखले होते. गार्ड त्या माणसाला घेऊन गेला. त्या तरूणाने त्या मुलीची ओढणी सारखी केली.

" हा श्रियाचाच ड्रेस.." प्रवीणराव मटकन खाली बसले. ते एवढ्या जोरात का ओरडले हे बघायला स्वातीताई बाहेर आल्या.

" काय झाले?" त्यांनी घाबरून विचारले. काहीच न बोलता प्रवीणरावांनी टिव्ही कडे बोट दाखवले. तिथे जाहिरात लागली होती म्हणून त्यांनी चॅनेल बदलले. तिथे बातमी सुरू होती. स्वातीताईंनीही श्रियाला ओळखले. त्यांच्याही तोंडचे पाणी पळाले.

" कुठे आहे ती?" प्रवीणरावांनी विचारले.

" झोपली आहे. खूप घाबरली होती रात्री." स्वातीताई म्हणाल्या.

" मला का नाही उठवले तेव्हाच?"

"मला तरी काय माहित हे असे होईल ते. तसंही ती त्या विराजसोबत होती. तो सोडणार होता तिला घरी. म्हणून.. आणि घरी आल्यावर.."

" विराज होता का तिच्यासोबत? मग ही ट्रेनने?" प्रवीणराव बुचकळ्यात पडले.

" त्याच्या घरून फोन आला म्हणून तिला एकटीला सोडून गेला." स्वातीताई रागाने बोलल्या.

" तिच्यासोबत काही वेडंवाकडं?" प्रवीणरावांनी विचारले.

" नाही. तो एकजण देवासारखा धावून आला म्हणून वाचली पोर." प्रवीणरावांना हायसे वाटले.

" मी बोलतो मग माधवरावांशी.." प्रवीणराव म्हणाले.

" म्हणजे?"

" त्यांचा फोन आला होता. थोडे रागात होते. त्यांनीच मला बातम्या बघायला सांगितल्या. सांगतो त्यांना काही झालं नाही म्हणून." स्वातीताईंनी बोलायला तोंड उघडले पण काहीच उपयोग नाही हे समजून परत बंद केले. तोपर्यंत प्रवीणरावांनी फोन लावला होता.

" हो.. बघितली बातमी. श्रिया बालंबाल बचावली.
एकटी? नाही ओ.. विराजरावांनी सोडले तिला. विचाराना त्यांनाच.

ते नाही म्हणतात. अहो पण..

काय? लग्न मोडलं? अहो पण साखरपुडा झाला आहे. पत्रिका सुद्धा छापायला गेल्या आहेत. असं नका करू." प्रवीणराव गयावया करत होते.

" हॅलो.. हॅलो.."

" फोन कट केला असेल त्यांनी." स्वातीताई म्हणाल्या.

" लग्न मोडलं त्यांनी." प्रवीणराव म्हणाले.
" काय गरज होती या कार्टीला रात्री अपरात्री यायची? चांगलं स्थळ घालवलं. आणि आता दोन दोन ठपके बसले. लग्नही होईल का नाही इथपासून मारामारी? माझंच नशीब फुटकं." चिडून प्रवीणराव घराबाहेर पडले. त्यांचं बोलणं श्रिया आणि सुजयने ऐकलं होतं.

" आई, यात माझी काय चूक आहे ग?" रडत रडत श्रियाने विचारले.

" चूक माझी आहे. तुझा मोठा भाऊ असूनही मला घराची जबाबदारी घेता आली नाही. त्यामुळे बाबा तुला हे लग्न करायला सांगत होते. किती नालायक आहे बघ मी.. काल तू अडचणीत असताना सुद्धा तुला वाचवायला येऊ शकलो नाही." सुजयला खूपच वाईट वाटत होते. स्वातीताई आपल्या दोन मुलांना मिठीत घेऊन रडत होत्या.

" वहिनी, ती टिव्हीवर दिसते आहे ती श्रियाच आहे ना?" शेजारच्या काकू विचारायला आल्या होत्या.

" हो.. मीच आहे ती.. आणि इथेच उभी आहे. विचारा काय विचारायचे आहे ते." श्रियाच्या रागाचा स्फोट झाला होता.

" ते तुझी काळजी वाटली म्हणून आले." पुटपुटत त्या निघून गेल्या. श्रियाने दरवाजा बंद केला आणि ती आतल्या खोलीत निघून गेली. आत तिचा फोन कधीचा वाजत होता. तिने फोन बघितला. तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीचा फोन होता. डोळे पुसून तिने फोन उचलला.

"बोल ईशा.."

" श्रिया, येते आहेस ना ऑफिसला?"

" आज नाही जमणार. मी सरांना मेल करते. थोडी अडचण आहे म्हणून."

" श्रिया, तो व्हिडिओ तुझाच आहे का ग?" विचारू की नको हा विचार करत ईशाने विचारलेच.

" हो.. काल माझ्यावरच त्याने बळजबरी केली, त्यामुळे माझे लग्न तुटले.. अजून काही विचारायचे आहे?" श्रिया चिडून बोलत होती. बोलता बोलता आलेल्या ताणाने ती बेशुद्ध पडली.


कशी सामोरी जाईल श्रिया या सगळ्याला? सावरू शकेल का ती स्वतःला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all