अपराध माझा असा काय झाला? भाग ३

कथा एका निष्पाप जिवाची
अपराध माझा असा काय झाला? भाग ३


मागील भागात आपण पाहिले की विराज श्रियाला भेटायला जातो. पण त्याचे वागणे आणि बोलणे तिला खटकते. आता बघू पुढे काय होते ते.


" तुला हवे ते दागिने घे.. पैशांची काळजी करू नकोस." साखरपुड्याच्या खरेदीला जाताना कामिनीताई बोलल्या.

" हो.. उगाचच हे किती महाग, हे किती स्वस्त हा विचार करायचा नाही. जे आवडेल ते घ्यायचे." माधवरावांनी पुस्ती जोडली. प्रवीणराव हसले. श्रियाने विराजकडे बघितले. तो मोबाईलमध्ये व्यस्त होता. सगळे दुकानात गेले. ते दुकान बघूनच श्रिया आणि तिच्या घरचे गप्प झाले. इतके दिवस हे दुकान ते फक्त बाहेरूनच बघत होते.

" अजिबात लाजू नका. हे आमचे ठरलेले दुकान आहे. आमची सगळी खरेदी आम्ही इथूनच करतो." कामिनीताई म्हणाल्या. तिकडच्या सेल्सगर्लने लगेच दागिने दाखवायला सुरूवात केली. ते सगळे जडजड, मोठे दागिने बघून श्रियाचे डोके दुखायला लागले. तिची अवस्था स्वातीताईंनी ओळखली. धीर करून त्या म्हणाल्या,

" आत्तापुरती साखरपुड्याची फक्त अंगठी घेतली तर चालेल का? लग्नाची खरेदी नंतर करू." त्यांचे बोलणे विराजच्या आईबाबांना पटले नाही.

" आम्ही काही रिकामटेकडे नाही. उठलं की जा खरेदीला. एकदाच काय ते करून टाकू. श्रिया तुला निवड करणं जमत नसेल तर तसं सांग. मी निवडते पटकन." कामिनीताई म्हणाल्या. तिला डिझाईन आवडत नाहीत हे बघून तिकडची सेल्सगर्ल म्हणाली,

" हे जर आवडत नसेल तर आमच्याकडे वजनाने थोडे हलके, नाजूक दागिने आहेत. हे बघा." तिने पटापट थोड्या नाजूक डिझाईन दाखवायला सुरुवात केली. ते बघून श्रियाला हायसे वाटले. तिने एकदोन दागिने निवडले. ते बघून कामिनीताईंनी नाक मुरडले.

" सुधारणार नाहीत.."

श्रियाला वाटत होते की विराज पुढे येऊन तिला दागिने निवडायला मदत करेल. तिला काय शोभेल हे हळूच तिच्या कानात सांगेल. पण तो जे हातात मोबाईल घेऊन बसला होता त्याच्या बाहेर बघायला तयार नव्हता. कशीबशी त्यांनी खरेदी संपवली. आणि ते घरी जायला निघाले. निघताना कोणीच एकमेकांशी बोलले नाही.

" हे लग्न करायलाच हवे का?" स्वातीताईंनी रिक्षात बसल्यावर प्रवीणरावांना विचारले. "ती माणसं मला बरोबर वाटत नाही."

" काय बरोबर नाही? एवढे दागिने घेतले. उद्या साड्या खरेदी करायच्या आहेत. तुमचे समाधानच होत नाही."

" अहो पण स्वभाव म्हणून काही असतो की नाही. लेकीच्या जन्माचा प्रश्न आहे."

" लेक फक्त तुझी? माझी नाही का? आणि तिला जर वाटत असेल तर तिने नाही म्हणावं. तू का म्हणते आहेस?" प्रवीणराव चिडले होते.

" बाबा, मला चालणार आहे." डोळ्यातलं पाणी लपवत श्रिया म्हणाली. स्वातीताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत राहिल्या.

" सुजय, अरे आज साखरपुडा आहे श्रियाचा. निदान आजतरी पाऊल घरात राहू दे. अजून तर तू त्यांना भेटलाही नाहीस." स्वातीताई बोलत होत्या.

" तुम्ही भेटून काय झाले? नुसता अपमानच ना? मला वाईट वाटतं आहे, त्यापेक्षाही जास्त राग येतो आहे स्वतःचा. मला जर धड नोकरी असती ना, तर ही वेळच आली नसती श्रिया वर. काहीच करू शकत नाही मी मोठा भाऊ असूनही." सुजय निराशेने बोलत होता.

" दादा, तुला माझ्याबद्दल एवढे वाटते तेच खूप आहे रे.. हे प्रेम असेच ठेव." श्रिया सुजयची समजूत घालत म्हणाली.

साखरपुडा श्रियाला जसा वाटला तसाच झाला. पण आता ती मानसिक रित्या तयार होती. त्यामुळे तिला एवढं वाईट वाटले नाही. तिच्या मैत्रिणी मात्र विराजच्या घरची परिस्थिती बघून आश्चर्यचकित झाल्या होत्या.

" नशीब काढलेस ग श्रिया. असा श्रीमंत नवरा मिळायला पुण्य लागते हो." त्या तिला चिडवत होत्या. विराजही सगळ्यांशी हसून बोलत होता. इतके दिवस आपल्यासोबत असणारा विराज खरा की हा? श्रियाला प्रश्न पडला होता.

" खूप छान दिसते आहेस." विराज श्रियाला म्हणाला. लग्न ठरल्यापासून पहिल्यांदाच विराज तिच्याशी अश्या प्रकारे बोलला होता. नाही म्हटले तरी ती त्याने मोहरून गेली. "हा असे जरी बोलला तरी मी त्याच्याशी हसत हसत संसार करेन." श्रिया स्वतःशीच बोलली.


होईल का श्रियाच्या मनासारखे? वागेल का विराज तिच्याशी नेहमीच चांगला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all