अपराध माझा असा काय झाला?
" स्वाती, झाली का श्रियाची तयारी?" प्रवीणरावांनी विचारले.
" करते आहे ती? पण तुम्ही का एवढे टेन्शन घेत आहात? पहिलंच स्थळ आहे. पडलं तर पडलं पसंत. नाहीतर जाऊ दे." स्वातीताई समजुतीने म्हणाल्या.
"आई आहेस की कोण? मी तडफडतो आहे की इथे लग्न जुळावे म्हणून. आणि तू म्हण जमलं तर जमलं."
" एवढं काय सोनं लागून गेलंय या स्थळाला?" स्वातीताई नाक मुरडत म्हणाल्या.
" अग चांगलं श्रीमंत स्थळ आहे. खूप ओळखी आहेत त्यांच्या. त्यांनी एक शब्द टाकला ना तर आपल्या सुजयच्या नोकरीचं काम होऊन जाईल. आपल्या घराचं पण काहीतरी होईल." प्रवीणराव इमले बांधत होते.
" म्हणजे आपल्या स्वार्थासाठी तुम्ही श्रियाचा बळी देताय?" स्वातीताईंचा आवाज चढला होता.
" हळू बोल. मी काही पाठी लागलो नव्हतो त्यांच्या. त्यांनीच श्रियाला बघितलं, पत्रिका बघितली, आता फक्त त्यांना तिची वधूपरिक्षा करायची आहे. ती झाली की मग लगेच बार उडवून देऊ."
" अहो पण, श्रियाचं काय?"
" तिला काय विचारायचे? आईबाप आहोत आपण. आपल्याला तिचे भलेबुरे समजतेच ना? आणि आता फाटे फोडत बसू नकोस. ती माणसे वेळेची पक्की आहेत. कधीही येतील. आवर." काहीच न बोलता स्वातीताई आत गेल्या. आत श्रिया साडी नेसून तयार होती. तिच्या डोळ्यात पाणी होते. बहुतेक तिने बाहेरचे संभाषण ऐकले होते.
" आई, मी कमावते तेवढे पुरेसे नाही का ग?" तिने टिकली लावत विचारले.
" पुरेसे? तुझाच तर हातभार आहे या घराला. सुजयला काय या महिन्यात नोकरी आहे पुढच्या महिन्यात नाही. आणि तुझ्या बाबांना खूप टेन्शन आहे त्याचे. त्यांचा तर अर्धा पगार गावच्या कोर्टकेसेसवर खर्च होतो आहे." स्वातीताई नवर्याची बाजू घेत म्हणाल्या.
" आई, मी काही करू शकेन यावर तुमचा कोणाचाच विश्वास नाही का?"
" आपण त्यावर नंतर बोलू. आता ते पाहुणे येतील. तुला पटलं तरच पुढे जाऊ. नाहीतर विषय सोडून दे."
"स्वाती, आली ग त्यांची गाडी. ये बाहेर." प्रवीणराव उत्साहाने बोलले.
" या, या.. घर सापडायला त्रास नाही ना झाला?" प्रवीणराव हसत म्हणाले.
" तुम्ही पत्ता पाठवला होता. आम्हाला रस्ते माहित आहेत. " समोरून एक शिष्ट आवाज आला.
" हो.. ते पण आहेच." कसनुसं हसत प्रवीणराव म्हणाले.
" आपण हा बघण्याचा कार्यक्रम पटकन आटपून घेऊयात का? म्हणजे आपण पुढे जायला मोकळे." त्यातल्या बाई म्हणाल्या.
" हो.. हो.. स्वाती." प्रवीणरावांनी आवाज दिला. स्वातीताई पाणी घेऊन बाहेर आल्या.
" पाणी नको.. आम्ही फक्त प्युरिफायरचे पाणी पितो." कामिनीताई म्हणाल्या.
" त्याचेच पाणी आहे." स्वातीताई कानकोंडं होत म्हणाल्या.
" तरिही नकोच.. तुम्ही बोलवा मुलीला." कामिनीताईंनी आग्रह केला. स्वातीताईंना टेन्शन आलं. जी माणसं साधं आपल्या घरातलं पाणी प्यायला तयार होत नाहीत, ती आपल्या मुलीला पसंत करतील?
" अग, बोलावते आहेस ना श्रियाला?" प्रवीणरावांनी आवाज दिला.
" हो.. बोलावते." स्वातीताई आत गेल्या. श्रिया कसलातरी विचार करत होती.
" जायचे ना बाहेर?"
" हो.." डोळ्यातलं पाणी पुसत श्रिया म्हणाली. स्वातीताई आणि श्रिया बाहेर आल्या.
" विराज, नीट बघून घे रे.. परत म्हणशील रंग थोडा सावळाच आहे, नाक उपरं आहे." माधवराव म्हणाले. ते ऐकूनच श्रियाला कसंतरी वाटलं.
" श्रिया नाव ना तुझं?" कामिनीताई म्हणाल्या.
" हो.. " मान खाली घालून म्हणाली.
" तुमच्याकडे सुईदोरा आहे का?" कामिनीताईंनी विचारले. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.
" हो.."
" हिला जरा सुईत दोरा ओवून द्यायला सांगा." कामिनीताई म्हणाल्या. ते ऐकून स्वातीताईंच्या कपाळावर आठ्या पडल्या.
" बर्याचजणी चष्मा असल्याचे लपवतात. ही आपली जुनी पद्धतच बरी." कामिनीताई स्वतःच्या बोलण्याचे समर्थन करत म्हणाल्या. काहीच न बोलता श्रियाने सुईत दोरा ओवला. स्वातीताईंना वाटले होते तसेच मुलाकडच्यांनी काहीच खाल्ले नाही. निघताना माधवराव म्हणाले,
" पत्रिका जुळलेलीच आहे. तरिही दोनेक दिवसात तुम्हाला कळवतो." हे ऐकून प्रवीणरावांचे तोंड उतरले. वरकरणी हसून त्यांनी मान डोलावली. पाहुणे जाताच स्वातीताई म्हणाल्या,
" कठीणच आहे सगळं. या काळात सुईदोरा ओवायला सांगतात?"
" ते जरा आहेत जुन्या वळणांचे. पण मुलगी सुखी राहील तिथे." प्रवीणराव म्हणाले.
" ते येणारा काळच सांगेल." सुस्कारा सोडत स्वातीताई म्हणाल्या. श्रिया मात्र आतल्या खोलीत बसून स्वतःवरच वैतागली होती. हे दाखवून घेणं, होकाराची वाट बघणं तिला खूप विचित्र वाटत होतं. मुलगी बघायला आलेल्या विराजने शब्दही न बोलणं तिला कुठेतरी खटकत होतं. पण तिच्या बाबांचे शब्द तिच्या मनात गुंजत होते.. आपल्या लग्नाने आपल्या घरची परिस्थिती बदलेल. मग आपल्याला नकाराचे स्वातंत्र्य आहे?
येईल का श्रियाला होकार? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई