अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 54

This part is in continuation with earlier series..

'तु मला बिल्कुल मम्मी बोलायचं नाहीस शर्वरी.. बिल्कुल नाही.. म्हणे मी भडकवलं.. एका तोंडाने देवमाणूस म्हणायचं आणि त्याच्याच मुलीला त्रास द्यायचा??हा कसला दुट्टपीपणा भावोजी??'- हंसबाई रागीट झाल्या..

माधवराव निशब्द झाले होते.. रडता रडता त्यांनी पुन्हा एकदा हंसबाईनसमोर हात जोडले होते..

                                       ------------

'काकू मला वाटतं आपण इथे बोलण्यापेक्षा; खाली कॅन्टीनमध्ये बसून बोलूयात का?? आता तिकडे कोणी नसेल. माझी तिथल्या कॅन्टीनवाल्याशी चांगली ओळख आहे.. कॅन्टीन आता बंद झाली तरी तो आपल्याला हवं तितका वेळ बसू देईल..'- आशिषने सुचवलं तसा सर्वांनी होकार दिला..

सर्व जण कॅन्टीनमध्ये गोलाकार बसले .. माधवराव आणि शर्वरीची नजर अजूनही खालीच होती.. शरयूचं रडणं अधूनमधून चालूच होत.. आशिष, संध्या आणि हंसबाई तेवढे शांत होते.. साटम काका-काकूंच्या मनात असंख्य प्रश्न होते.. कदाचित पुढच्या काही क्षणात त्यांना त्याची उत्तरं मिळण्याची शक्यता वाटत होती..  आशा शरयुला सावरून उभी होती तर छोटा आशिष रवीच्या मांडीवर बसून सगळ्यांकडे टकामका बघत बसला होता.. 

'मी.. मी आशिष आणि संध्याच्या आयुष्यातून कायमच निघून जाण्याचं ठरवलं आहे..मला.. मला; मी जिथेही असेन, तिथून आशिषला सुखात बघायचं आहे.. खूप दुखावलं मी त्याला... पण आता नाही.. पुन्हा कधीच नाही..'- शरयूने जडवलेल्या स्वरात सुरुवात केली...

पुढे कोणी काही बोलण्याच्या आत; राहुल (आशाचा नवरा) अश्विनीला घेऊन तिथे पोहचला होता..

'मम्मी..'- तिने अत्यानंदाने शरयुकडे झेप घेतली..

'कशी आहे माझी पिल्लू??.. मम्माला खूप आठवण आली माझ्या सोनाची.. माझा बच्चा..'- शरयू मायेने तिचे मुके घेत होती..

'तु का लडते?? बाबा, ही का लडते?'- तिने बोबड्या स्वरात आशिषला विचारलं तसा तो काही काळ निरुत्तर झाला..

'ते तुझ्या मम्माला बू झाला होता ना.. मग तिला तुला भेटायला जमलं नव्हतं म्हणून ती रडत होती बेटा..'- संध्याने तिला समजवण्याचा प्रयत्न केला..

'या कोण?'- तिने शरयुकडे पाहत निरागसपणे विचारलं..

'तुझी मम्मा.. आता तिच तुझ्यासोबत असणार..'- उत्तर देताच शरयुला हुंदका आवरला नाही.. पण लेक कडेवर असल्याने तिने तो कसाबसा दाबला..

सर्वजण एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले.. शरयूच्या पुढच्या शब्दांकडे साऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या..

'आणि तु?? तु कुटे चालली?'- अश्विनीचा पुढचा प्रश्न आला..

'मी.. मी खूप लांब जाते बेटा.. खूप लांब.. खूप लांब.. बाबाला त्रास नाही द्यायचा हा बच्चा.. आणि मम्माला पण नाही..'- शरयूने संध्याकडे बोट दाखवत तिला समजवलं.. 

अश्विनीचा चेहरा रडवलेला झाला तसा तिने आशिषकडे पाहिलं..

'नाही बेटा.. मम्मा मस्करी करतेय तुझी.. ती कुठेच जात नाहीये.. कुठेच नाही..'- आशिषने तिला सांगितलं तशी ती हसून टाळ्या वाजवू लागली.. पटकन तिने शरयूचा गालावर किस घेतला.. शरयूला मात्र आशिषच्या उत्तराने धक्का बसला होता.. ती डोळे विस्फारून त्याच्याकडे पाहत होती.. 

एक संध्या सोडली तर इतर सगळे आश्चर्यचकित झाले होते..

'शरयू, मी आणि संध्या; एकमेकांपासून दूर राहण्याचं ठरवलं आहे.. कदाचित आमच्या नशिबाला आमच्याकडून तेच हवं आहे आणि आमच्या स्वतःच्या माणसांनासुद्धा आमचं एकत्र असणं नकोच आहे.. त्यामुळे फक्त आमच्या दोन जीवांच्या सुखासाठी; आम्ही किती जणांची मन दुखवायची.. संध्या पुढच्या महिन्यातच फ्रान्सला निघतेय.. कायमस्वरूपी.. आणि मी इथेच असेन..तुझ्यासोबत.. तुझ्या इच्छेनुसार..'- आशिषने कातर आवाजात सांगितलं तसे सगळे अवाक झाले.. 

'पण..पण.. तुम्ही का स्वतःच मन मारून जगायचं? ते पण आमच्या चुकांसाठी?? तुम्ही एक होणं हिच आमची इच्छा आहे आशिष... संध्या..'- रवीने मध्येच मुद्दा मांडला.. शरयूनेही त्याच्या बोलण्याला समर्थन दिलं होतं..

'काही वेळा विपरीत निर्णय घ्यावे लागतात रवी.. प्रत्येक वेळी हॅपी एंडिंग होईलच असे नाही ना रे.. आमचं प्रेम पवित्रच होतं, आहे आणि राहिल.. बट दुर्देवाने बाकी सगळ्यांसाठी तो व्यभिचार ठरला.. आज शर्वरीला आमच्यावर सुड घ्यावा वाटला, उद्या कोणी अजून आम्हांला त्रास देण्यासाठी; आमच्यापैकी कोणाला तरी अडकवेल आणि मग त्याचा मानसिक त्रास सगळ्यांनाच होईल.. आम्ही सर्व बाजुंनी विचार करूनच हा निर्णय घेतला आहे.. आशिषने शरयूला माफ करत; तिच्यासोबत नव्याने सुरुवात करायचं ठरवलं आहे.. बट..बट मला तेवढं लगेच जमणार नाही.. सो.. सध्यातरी तुझ्यासोबत माझी मैत्रीच राहील..आपल्या आशिषसाठी.. त्याच बालपण अबाधित राहावं म्हणून.. पुढचं मला अजून तरी माहीत नाही..'- संध्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या..

तिने शर्वरीला पहिल्यांदा नावाने हाक मारताच शरयू, माधवराव आणि हंसबाई शॉक झाले होते.. संध्याच्या मनात आपल्याबद्दल निर्माण झालेली कटुता लक्षात येताच; शर्वरीला वाईट वाटलं.. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले..

'संध्या... संध्या.. असं नको ना ग करूस माझ्यासोबत.. मी..मी बहीण आहे तुझी..मला माफ कर.. प्लीज.. मी ते रागात..'- शर्वरीने माफी मागण्याचा प्रयत्न करताच संध्याचा चेहरा रागीट झाला..

'शर्वरी, तु माझी बहिण होतीस.. आता नाही.. माझ्याकडून ते नातं मी तेव्हाच संपवलं जेव्हा तु तुझ्या इगोसाठी एका साध्या सरळमार्गी कुटुंबाच्या प्रतिष्ठेची अशी विटंबना केलीस... तुझ्या या अशा मुर्खपणामुळेच सुजय तुला सोडून गेला माहीत आहे ना.. तुझ्यापासून किती दूर गेला तो माहीत आहे ना?? जो आरोप तु आशिषवर लादलास तोच तुला पक्का लागू होतो हे सोयीस्करपणे विसरलीस तु.. '- संध्याचा स्वर रागीट झाला आणि त्याहीपेक्षा तिच्या तोंडून निघालेल्या आठवणींनी शर्वरी खाली कोसळली होती.. ती ओक्सबोक्शी रडू लागली..

'संध्या हे बोलायची गरज नव्हती ग... तु तिच्या सुखलेल्या जखमा अशा उकरून काढायला नको होत्या..'- माधवराव तिला सावरायला गेले होते..

'ती तेच डीझर्व करते सर.. तिच्या याच इगोमुळे सुजयने आत्महत्या केली होती.. फक्त आणि फक्त हिच्या आपलं तेच खरं करण्याच्या वृत्तीमुळे.. कधीच सारासार विचार करायचा नाही; कायम आपल्या मनासारखं वागायचं.. आपल्या म्हणण्यानुसार नाही झालं की असं खालच्या थराला जायचं.. असंच तर जगत आली आहे ती..'- संध्या आज बिल्कुल थांबत नव्हती.. तिच्या प्रत्येक वाक्यागणिक शर्वरी आतल्या आत तुटत चालली होती.. ती आवेगाने जमिनीवर आपले हात आपटत होती.. तिला आवरणं एकट्या माधवरावांना कठीण झालं तशी त्यांनी हंसाबाईकडे मदत मागितली.. त्या आपल्या जागेवरून उठून तिच्यापाशी गेल्या आणि त्यांनी तिला हाताला धरून वर उठवलं.. आपल्या मिठीत घेत; तिला शांत केलं..

'शर्वरी, आता तरी सोड ग असा हेकेखोरपणा.. अजून किती जणांना अशी गमावशील?? आवर स्वतःला..'- हंसाबाईनी धीर देताच शर्वरी बऱ्यापैकी सावरली.. तिने हातांनी आपले सर्व अश्रू फुसले आणि तिने आपले हात जोडले..

'माझ्याकडून जी चूक झाली ती माफीच्यासुद्धा पलीकडे आहे.. त्यामुळे मला आता कोणाचीच माफी मागायची नाही.. माझी फक्त एवढीच विनंती आहे की माझ्या भरकटण्याची शिक्षा, डॅडना मिळू नये.. खरंतर मीच त्यांच्या मनात विष कालवलं, त्यांचे विचार कलुषित केले..'- शर्वरीने बोलायला सुरुवात केली..

'शरयूच्या आजारपणावेळी आशिषने डॅडच्या काळजीपोटी त्यांना मोठया मनाने स्वतःच्या घरी आराम करायला पाठवलं.. पण.. मी त्यांना भडकावून; शरयूची डायरी त्यांना चोरायला लावली..शरयूची डायरी वाचूनच मला त्यांच्या शेजारच्या निकमांच्या अफेअरबद्दल कळाला.. तिथेच मला माझ्यासाठी अजून एक पुरावा दिसला.. समाजनिंदेची भीती दाखवत; मी त्यांना साटमांच्या विरोधात जबानी दयायला लावली.. सगळे सापळे रचले गेले होते.. पण तुम्हांला निकमांच्या साक्षीची सत्यपरिस्थिती कळाली आणि शरयूसुद्धा अगदी वेळेवर शुद्धीवर आली म्हणून आमचा खेळ संपला... बट रवी; मानलं राव तुला.. जबर डोकं लावलं.. सुरुवातीची गोंधळण्याची एकटिंग केलीस तीपण एक नंबर हा..'- शर्वरीने रवीला उद्देशून म्हटलं..

'आपल्यात नव्हती तेवढी हिंमत.. माधव सरांना प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं तिकडेच गळालो होतो मी.. पण आशिषने धीर दिला.. त्यानेच मला तुमच्या खेळाला प्रतिउत्तर म्हणून खेळ खेळायला लावलं.. हा; मी कन्फ्युज होण्याचा अभिनय तेवढा चांगला केला.. त्यामुळेच तर आम्हांला तुमच्या तयारीचा अंदाज आला.. आणि हंसाकाकीमुळे; सुधाकर मामा मदतीला होतेच.. त्यांनीच तर तुमचे सगळे पत्ते आमच्यासमोर उघडले..'- रवीने प्रामाणिकपणे सगळं खरं सांगितलं..

'सुधाकर?? सुधाकर साळवी??'- माधवरावांनी चकीत होत विचारलं..

'हो... माझा भाऊ..'- हंसाबाईनीं हसत म्हटलं..

'अरे देवा, मी फक्त शर्वरीलाच तेजतर्रार कारस्थानी डोकं असल्याचं समजत होतो.. पण इकडे तर तुम्ही तिला वरचढ ठरलात वहिनी.. मी तरीच म्हणत होतो की केसच्या पहिल्या सुनावणीनंतर ; इतक्या वर्षांनी सुधाकरभाऊ माझ्या ऑफिसमध्ये का आले होते.. '- माधवरावांना आता आशिषचं कोर्टातील हसू चांगलंच उलगडलं..

'हो.. आणि तेव्हा त्यांच्यासोबत जी चहा तुम्ही घेतलीत; त्यात झोपेचं औषध होतं.. चहा पिहून तुम्ही झोपी गेलात आणि सुधाने त्याच काम बरोबर साधलं..'- हंसाबाईनी आता सर्व सत्य उलगडलं तसे माधवरावांनी त्यांना सगळ्यांसमोर हात जोडले..

'म्हणजे जगात देव आहे म्हणायचा.. नाहीतर आमच्यातल्या राक्षणांना कोण अडवणार होतं...'- माधवरावांनी आपले जोडलेले हात वेगळे केले नव्हते..

'शर्वरी, माझी तुझ्याकडून काही अपेक्षा नाही फक्त मला तुझ्याकडून एक सत्य कळायचं आहे.. माधवकाका अन मम्मा; त्यांनी डॅडना दिलेल्या वचनामुळे सांगू शकत नाही.. पण तुला ते माहीत आहे.. मंदाकाकी आणि डॅडच नात.. '- संध्याने विषय काढताच सगळेच जण सावरून बसले..

'व्हॉट नॉनसेन्स संध्या.. तुला माहीत नाही का ते दोघे सख्खे बहीण-भाऊ होते.. फक्त नात्याने.. बाकी तुझे डॅड तर...'- शरयू चिडलीच होती की शर्वरीने हात दाखवत तिला थांबवलं..

'शरू, थांब.. तुला पुर्ण सत्य माहीत नाहीये.. तुझ्या माहितीसाठी सांगते, मामा आणि मम्मा एकमेकांना सावत्र होते.. पण मामाने ते नातं सख्ख्या भावापेक्षा जास्त जपलं..'- शर्वरी गंभीर झाली तसे सर्वजण शांतपणे तिच्या पुढे बोलण्याची वाट पाहू लागले..

'काय??'- शरयू किंचाळली तशी अश्विनी घाबरली.. लगेच आशिषने उठून तिला स्वतःकडे घेतलं..

'येस.. शिर्के कुटुंबात मुलगी नाही म्हणून त्यांनी मम्माला दत्तक घेतलं होतं.. आणि बहीण आणण्यासाठी मामाचा हट्टसुद्धा तितकाच कारणीभूत होता.. आजीची प्रकृती गर्भधारणेसाठी तितकीशी चांगली नसल्यामुळे मम्माला एका अनाथ आश्रमातून दत्तक घेऊन; आजोबांनी तिला शिर्के परिवारात आणलं होतं.. पण तिचा त्या घरातला प्रवेश तितकासा चांगला नव्हता झाला.. वयाच्या आठव्या वर्षी घरी आणलेल्या मम्माला; सुरुवातीला खूप त्रास झाला.. आजीने आणि  मोठ्या मामाने तिला कधीच सहन केलं नव्हतं.. त्यांच्यामते त्यांचा विरोध डावलून घरी आलेल्या मुलीला त्यांची माया मिळणारच नव्हती.. तिचा छळ चालूच होता.. अशा वेळी तिच्या बाजूने दोनच व्यक्ती सोबत होत्या.. एक आजोबा आणि दुसरा अरविंद मामा... मामाने तर आपली खोली, आपला पॉकेटमनी, आपले गेम्स अस जे जे काही शेअर करता येईल ते ते मम्मासोबत शेअर केलं होतं.. त्याच्यासाठी मम्मा म्हणजे त्याची जीव की प्राण होती.. आजी आणि मोठ्या मामाने कितीही फूट पाडण्याचे प्रयत्न केले तरी मामाने मम्माची साथ कधीच सोडली नव्हती.. अगदी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत..'- शर्वरी भावुक झाली..

'मग आजीने मला सांगितले ते??'- शरयू कोड्यात पडली होती..

'खेळ खेळली ती तुझ्या बालमनासोबत.. मम्माची साथ देतो म्हणून ती मामाचादेखिल राग करू लागली होती.. मामाने कायमच तिच्या शहाला प्रतिशह दिला होता.. तुझा जन्म होईपर्यंत तिला कधी यश आलं नव्हतं.. मलासुद्धा तिने भडकवण्याचा प्रयत्न केलाच होता; पण मामाने तो प्रयत्न हाणून पाडला होता..'- शर्वरी सांगत होती तसे सगळेजण शांतपणे ऐकत बसले होते.. सर्वांनाच या उलगड्याची उत्सुकता होती..

'मम्माला दिवस गेले आणि आजीला आशेचा किरण दिसला.. तिने बदलण्याच नाटक केलं.. अचानक तिला मम्माची काळजी वाटू लागली होती.. ती मम्माला वरचेवर जाऊन भेटून तिची विचारपूस करत होती.. तिला असं बदलेले पाहून सगळ्यांना आनंद झाला होता.. मम्माचं बाळंतपण आजीनेच केलं; तशी मामालापण तिच्या स्वभावबदलाची खात्री पटली आणि तो निर्धास्त राहू लागला.. तिथेच आजीने डाव साधला होता.. '- शर्वरी बोलता बोलता थांबली..

'पण..पण.. मामाने तिचं अभिनेत्री बनण्याची इच्छा मारून टाकली, तिचं प्रेम तिच्यापासून तोडलं हे खरं आहे ना?? पप्पापण बोललेत मला तसं.. हो ना पप्पा??'- शरयुला अजूनही विश्वास बसत नव्हता..

'मी सांगते तुला.. सगळं अर्धसत्य आहे... संपूर्ण सत्य आणि त्यामागची कारण आज मी सांगते.. मम्माचा अभिनय लोकांच्या नजरेत येऊ लागला तस आधीच सुंदर असलेल्या मम्माच्या अवतीभवती चुकीच्या लोकांचा गराडा पडू लागला होता.. साध्या सरळ मनाच्या मम्माला; त्या लोकांच्या मनातलं कपट ओळखता आलं नव्हतं.. अशाच एका प्रसंगी एकाने तिच्या विश्वासाचा फायदा उचलत; तिच्या बोलण्यात फेरफार करत; तिच्या शरीराचा सौदा करण्याचा प्रयत्न केला होता.. मामाला कळताच त्याने त्या माणसाला बदडून काढलं.. पुढे मागे तिच्या सज्जनतेचा बहुतेक जण फायदा घेऊ लागले.. मम्माला या गोष्टी कळू लागल्या तशी ती निराश राहू लागली.. तिच्या मनातल्या घुसमटीमुळे; ती डिप्रेशनमध्ये गेली.. शेवटी मामाने तिला अभिनयाचा नाद सोडण्याचा सल्ला दिला आणि तो तेव्हा तिने मानलादेखिल होता..'

'तिच्या आणि मामाच्यात एकदाच गैरसमज झाला होता तो प्रशांतच्या निमित्ताने.. ती प्रशांतच्या प्रेमात पडली आणि मामाने त्यावर तीव्र नापसंती दर्शवली होती.. दोघे एकमेकांवर नाराज झाले तसे आजीने त्यात अजून तेल ओतत; त्यांच्यातली दुरी वाढवली.. शेवटी एक दिवस मामाने पप्पांच स्थळ आणत; मम्माला तिच प्रेमप्रकरण बंद करायला लावलं.. पुढे तिच्या कानावर आलं की प्रशांतने आत्महत्या केली तशी ती बिथरली.. मामाने कित्येकदा समजवण्याचा प्रयत्न केला तरी तिने मामाशी नातं तोडलं होत..तुझ्या जन्मापर्यंत मम्मा मामाशी बोलली नव्हती.. कायम गप्प गप्प असायची.. आपले पप्पा आणि तिच्यात मुळात संवादच नव्हता तर दुसरं कोणतं नाते निर्माण होण्याची शक्यताच नव्हती.. तरी पण पप्पांनी तिला सांभाळून घेतलं.. तिला भरभरून प्रेम दिलं.. ती हळूहळू बदलली पण मामाला तिने माफ केलं नव्हतं.. लग्नानंतर तीन वर्षे तिला काहीच मुलबाळ नव्हतं, आपल्या समाजाने तिला वांझोटी ठरवली होती.. एक दिवस नकळतपणे मामीपण तिला बोलून गेली आणि ती हर्ट झाली.. मामाला कळताच त्याने, मामीला तिच्या पायावर डोकं रगडायला लावलं होतं.. मामी त्यावेळेस गरोदर होती.. मामाने माफीच्या बदल्यात काहीही मागण्यास सांगितलं तस रागाने मम्माने मामीच्या पोटातील मुल मागितलं.. आणि यु ओन्ट बिलिव्ह शरयू.. मामाने आपलं मूल तिला दिलं..  तेही कायदेशीर दत्तक..' शर्वरीला तहान लागली तशी ती थांबून पाणी पियाली..

'बट आपल्या घरात आपण दोघीच होतो ना? मग ते मूल?'- शरयूने विचारलं तस शर्वरीला हसू आलं..

' अरविंद आणि हंसा शिर्केनीं देशपांडे कुटुंबाला दिलेली दत्तक मुलगी म्हणजे मी.. शर्वरी..'- शर्वरीने सत्य सांगताच शरयु चाट पडली..

'म्हणजे?? म्हणजे तु.. तु माझी??- शरयुला पुढे बोलवलं नाही..

'येस.. आपण सख्या बहिणी नाही आहोत.. ' - शर्वरीने शरयुजवळ जात तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला..

' तरीही आज तु.. माझ्यासाठी स्वतःच्या सख्ख्या बहिणीच्या विरोधात गेलीस??'- शरयूच्या डोळयांत पाणी आलं..

' कानफट फोडेन शरू, अस काही बोलशील तर... जेव्हापासून मला सत्य कळालं; तेव्हापासून मी तुम्हां दोघींमध्ये कधीच फरक केला नव्हता.. आता.. आताही मी मामाला एक मुलगी म्हणून दिलेलं वचन निभावते आहे..' - शर्वरीच्या खुलाश्याने सगळे गोंधळले..

'वचन??'- संध्याच्या तोंडून खूप वेळानंतर शब्द बाहेर पडला..

'हो.. वचन.. शरू पोटात असताना; गरोदरपणाच्या सातव्या महिन्यात, मम्माला प्रशांतच सत्य कळलं.. तो विवाहित असूनही फक्त शरीरसुखासाठी मुलींना जाळ्यात ओढायचा.. मम्मासोबतपण तेच होणार होतं; पण मामाला आधीच त्याची माहिती कळल्यावर त्याने तिचं लग्न पप्पासोबत लावून दिलं.. मम्माला हे सगळं कळलं आणि तिला प्रचंड धक्का बसला.. मामासोबत इतके दिवस धरलेल्या रागाचा तिला पश्चाताप होत होता पण तिला तो व्यक्त करता येत नव्हता.. त्या वेळेस ती जी कोलमडली ती केव्हाच न सावरण्यासाठी.. तिच्या अंतिम क्षणी तिने मामाची क्षमा मागण्याची हिम्मत केली होती.. मामाने बदल्यात तिला; तिच्या लेकीला म्हणजे तुला तिच्या आयुष्यात हरप्रकारच सुख मिळवून देण्याच कबूल केलं होतं.. अगदी स्वतःच्या दोन्ही लेकीच्या वाट्याचे सुख द्यावं लागलं तरी ते देण्याचं वचन मामाने तिला दिलं.. हेच कारण आहे संध्या, तुझा आशिष तुझा असूनसुद्धा तो शरयूच्या नशिबात आला... मामाला जेव्हा कळलं की शरयूसुद्धा आशिषवर प्रेम करते; तेव्हा त्याने रवीला हाताशी धरून तुला आशिषपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला.. आमचं जेव्हा जेव्हा  बोलणं व्हायचं तेव्हा तेव्हा तो एक बाप, एका भावासमोर हरल्याचं दुःख मांडायचा.. कधी कधी अख्खा कॉल रडायचा.. तुझ्या आयुष्याची धूळधाण केल्याबद्दल मी त्याला ओरडायची, त्याच्यावर चिडायची.. तो अजून दुःखी व्हायचा.. जेव्हा बहिणीवरच्या प्रेमाच्या अतिरेकाने ; त्याने आशिषला शरयूच्या जवळ आणण्यासाठी; त्याला खोट्या केसमध्ये फसवलं; तिथेच त्याच सगळं गणित चुकलं.. एकाच वेळी तो खूप जणांच्या नजरेतून खाली उतरला.. तो एकटा पडला..सगळ्या ताणाचा शेवटी जो व्हायचा तोच परिणाम झाला.. हृदयविकाराने गेला बिचारा.. मम्माचा नायक बाकीच्यांसाठी सदैव खलनायक बनून राहिला..'- शर्वरी बोलायची थांबली तसे शरयू, संध्या, हंसाबाईच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते..

'आणि हा शरयू, तु ते त्याच्या ऑफिसमधून पेपर लिक करत; सुर्वेंना त्याच्या विरोधात भडकवलेलंपण त्याला कळलं होतं बरं.. तुला त्याला त्रास दिल्याचा आनंद मिळावा म्हणून त्याने सुर्वेंना खराखुरा अभिनय करायला लावला होता.. आशिष ती केस तु जिंकलास कारण मामाला तु जिंकवासा वाटलास.. जेणेकरून त्या दुष्मनीचा आधार घेत त्याला संध्या अन तुला एकमेकांपासून तोडता येईल..शीट.. किती विचित्र माणूस होता मामा.. एका व्यक्तीसाठी किती आयुष्य धुळीला मिळवली त्याने.. नॉट फेअर..'- शर्वरीच्या उलगड्यानंतर; कोणालाच काही सुचत नव्हतं.. 

शरयूने हंसबाई आणि संध्यासमोर रडत हात जोडले होते.. त्यां दोघींची क्षमा मागितली होती.. त्या दोघींनींही मोठया मनाने शरयुला मिठी मारत तिच सांत्वन केलं होतं..

खूप वेळाच्या शांततेनंतर; रवीने पुन्हा संध्या आणि आशिषला एकत्र येण्याची विनंती केली होती.. या वेळेस शरयूने त्याच्या मागणीच जोरदार समर्थन करत संध्याला तिचा निर्णय बदलण्याची विनंती केली होती.. खूप विनवण्यानंतर शेवटी, आशिष आणि संध्याने विचार करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ मागितला होता..

सगळं कुटुंब एक झाले होते... काही वेळ बोलाचालीत गेल्यानंतर; सर्व आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले होते..

क्रमशः

© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..