प्रतिस्पर्धी म्हणून माधवरावांना पाहून; रवीला आधीच घाम फुटला होता.. केसची सगळी भिस्त आता; सुधाकर मामांच्या किमयेवर होती.. रवीच्या चेहऱ्यावर त्याचा हरवलेला आत्मविश्वास स्पष्ट दिसला तस आशिषने त्याला जवळ बोलवत त्याला कानात काहीतरी सांगितलं होतं..
------------
(भागाची गरज म्हणून आशिष साटम- आशिष आणि छोटा आशिष पाटील- आशु असे समजावे)
--#--
कोर्टाचे कामकाज सुरू झालं होतं.. शर्वरी एकटीच कोपऱ्यात बसली होती तर पलीकडे आशिष आणि त्याच्या परिवारासाठी संध्या, हंसाबाई, आशा, राहुल असा भक्कम पाठिंबा होता.. छोट्या आशिषला एकटे कुठे सोडायचं म्हणून संध्या त्यालाही कोर्टात घेऊन आली होती..
'युअर ऑनर.... मी माधव देशपांडे.. आज एक विशिष्ट प्रकारचे आरोपी आपल्या समोर ठेवू इच्छितो.. तर जज साहेब मला परवानगी असावी..'- माधवरावांनी पठडीतील सुरुवात केली होती..
'परमिशन ग्रांटेड'- जज
'युअर ऑनर, हे मि. आशिष साटम.. या केसमधील मुख्य आरोपी.. यांनी एका स्त्रीच्या हत्येचा प्रयत्न केला आहे.. हो.. हत्या.. कारण भले त्या स्त्रीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसला तरीही तिने जीवन संपवण्यासाठी निवडलेला मार्ग; तिच्यावर लादण्यात आला आहे.. या तरुणाने स्वतःचे विवाहबाह्य सबंध चालू ठेवून; माझ्या मुलीला सॉरी आय मिन माझ्या अशिलाच्या बहिणीला स्वतःच मरण कवटाळायला भाग पडलं आहे.. त्याच्या या गुन्ह्याबद्दल; कोर्टाने कडक शिक्षा द्यावी ही नम्र विनंती..'- माधवराव बोलता बोलता गंभीर झाले होते.. त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता..
त्यांनी आशिषकडे एकवार पहिलं.. तो गालात हसतच होता.. त्याला तस बघून ते अधिकच चिडले होते..
'आणि हे मिस्टर अँड मिसेस साटम, आशिष यांचे आई-वडील.. यांनीही आरोपीला तितकीच साथ दिली आहे.. मुलाला अनैतिक सबंध चालू ठेवण्यापासून अडवण्याऐवजी यांनी मिसेस शरयुलाच कायम बोल लावलेत.. त्यामुळे हे दोघेही तितकेच दोषी आहेत.. यांनाही शिक्षा झालीच पाहिजे..'- माधवरावांनी आपली सुरुवात संपवली..
'हे सगळं खोटं आहे युअर ऑनर.. माझ्या अशिलावर हेतुपुरस्सर चुकीचे आरोप केले जात आहेत..'- रवीने लगेच उठत बचाव मांडायचा प्रयत्न केला तसा आशिषने कपाळावर हात मारला..
'मम्मी.. पप्पा बघ.. पप्पा..'- मागून आशु जोरात ओरडला तसा संध्याने कावरीबावरी होत त्याच्या तोंडावर हात ठेवला.. सर्वांच लक्ष त्याच्याकडे वळलं तसा तिने हात मागे घेतला.. आशूने पुन्हा वडिलांना हात दाखवला.. शेवटी रवीने त्याला तोंडावर बोट ठेवून शांत राहायला सांगितलं तेव्हा कुठे तो शांत झाला.. कोर्टात हलकी हास्याची लकेर उमटली होती..
शर्वरी आज अडीच वर्षांनी भाच्याला बघत होती.. त्याचा निरागसपणा पाहून; तिच्या मुखावरपण हसू फुललं होतं.. ती वाकून वाकून त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत असतानाच; संध्या आणि तिची नजरानजर झाली.. एका अनामिक वैराच्या भरात दोघींनीही मान दुसरीकडे फिरवली..
'मि.. रवी.. कृपया प्रोटोकॉल मोडू नकात.. त्यांना आधी त्यांचं म्हणणं संपूर्णपणे मांडू द्यात.. मि. माधव कृपया केस सविस्तरपणे कोर्टासमोर मांडण्यात यावी..'- जज साहेबानी आदेश दिला..
'येस ऑनर.. '- माधवरावांनी आशिष आणि शरयूमध्ये असलेला तणाव, आशिष आणि संध्याच अफेअर, शरयुला आशिष करत असलेली हाडतुड आणि त्यासाठी साटम काका-काकी पाठिंबा देतात असं सोयीस्कर चित्र कोर्टासमोर उभं केलं होतं..
माधवरावांना केस लढताना पाहायला खूप नवोदित वकिलांनी कोर्टात गर्दी केली होती.. त्यांच्या केसच्या मांडणीला नाही म्हटलं तरी दबक्या आवाजात मागून दाद मिळायची.. आणि तो आवाज कानी पडला की रवीचा आत्मविश्वास खच्ची व्हायचा.. तो खाली मान घालून बसला होता..
काही मिनिटे अशीच शांततेत गेली होती..
'प्रतिवादी वकिलांकडे डिफेन्ससाठी काही आहे की नाही?? की अशिलावरचे आरोप मान्य आहेत??'- जजनीं रवीला उद्देशून म्हटलं तसा तो भानावर आला..
'सॉरी...सॉरी युअर ऑनर..ते..ते..'- रवीला शब्द फुटेनासे झाले तसे कोर्टात नवोदित वकिलांमध्ये हास्यची खसखस पिकली..
रवीला सुचेनासे झालं तसा तो संध्याकडे वळून बघू लागला.. त्याच्या अपेक्षेच्या विपरीत तिने या वेळी हावभावातून त्याला धीर दिला.. तिला तस पाहून रवीला आश्चर्य वाटलं..
'मि. रवी??'- जज
'सॉरी ऑनर.. पुन्हा नाही होणार असं.. माझ्या अशिलावर आणि त्याच्या पालकांवर लावण्यात आलेले सारे आरोप धांदात खोटे आहेत.. त्यांना जाणूनबुजून या सगळया गोष्टींमध्ये गोवलं जातंय..'- रवीने आत्मविश्वासाने बचाव मांडला..
पुढचा बराच वेळ रवी फक्त माधवरावांचे आरोप निव्वळ खोडूनच काढत होता.. त्याच्या अशा बचावाने माधवराव गोंधळले होते.. शेवटी न राहवून त्यांनी त्यांच्याकडचे पुरावे कोर्टासमोर हजर केले होते..
शरयूची डायरी आणि तिच्या हस्ताक्षराची सत्यता पटवण्यासाठी त्यांनी तिच्या हस्तक्षरातील काही जुने डॉकमेंट्ससुद्धा कोर्टासमोर मांडले होते..
'आज आशिषच प्रेम मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सक्सेस झाला नाही .. आज परत तो संध्याबरोबर बाहेर जाऊन आला.. मी जाब विचारला म्हणून त्याने माझ्याशी भांडण केलं.. त्याच्या आई-बाबांनीसुद्धा त्याचीच बाजू घेतली.. मला खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय..'
'आज त्याने माझ्या मरणाची इच्छा व्यक्त केली.. मला जबर मानसिक धक्का बसला.. आजही त्यालाच घरून पाठिंबा मिळाला.. मला कोणीच समजून घेणार नाही.. आता मलासुद्धा जगायची इच्छा उरली नाही.. मी निघून जाणार त्याच्या आयुष्यातून..'
कोर्टाने मजकूर वाचला तशी कोर्टात कुजबुज सुरू झाली..
'ऑर्डर..ऑर्डर.. मि. रवी, यावर तुम्हांला काही आक्षेप??'- जजच्या प्रश्नांवर त्याने नकारार्थी मान हलवली..
माधवरावांनी विजयी मुद्रेने आशिषकडे पाहिलं तर तो अजूनही हसतच होता.. ते चक्रावले..
त्यांनी पुढे साक्षीदार म्हणून खुद्द संध्याला बोलावलं तसे सर्वजण चाट पडले.. अचानक आपलं नाव पुकारले जाताच संध्या बावरली.. तिने आशिषकडे पाहिलं तसे त्याने डोळ्यानेच तिला आश्वस्त केलं.. तिने कोर्टासमोर आशिष बरोबरचे आपले सबंध मान्य केले.. तिची कबुली माधवरावांना जबर झटका देणारी होती.. त्यात रवीनेही उलट तपासणीची गरज नसल्याचे स्पष्ट केले.. त्यांनी विस्मयचकीत होत आशिषकडे पाहिलं.. तो हसतच राहीला..
सर्वात शेवटची साक्ष साटमांच्या शेजारच्या निकमांची झाली.. त्यांनी आशिष आणि शरयूची भांडणे ऐकल्याची आणि त्यात आशिष कायम तिच्या निघून जाण्याची इच्छा व्यक्त करत असल्याची साक्ष दिली..
साक्ष देताना निकमांनी सर्ववेळ साटम परिवाराशी नजर चुकवली होती.. साक्ष दिल्यावरपण ते मान खाली घालून आपल्या जागी बसले..
'युअर ऑनर... कृपया आम्हांला आमच्या बचावासाठी पुरावे गोळा करण्यासाठी एक आठवडा देण्यात यावा..'- रवीचा बचावात्मक कल पाहून माधवरावांना काही सुचेनासे झालं..
कोर्टाने रवीची विनंती मान्य करत त्यांना दहा दिवसांची वेळ दिली.. आशिष आणि त्यांच्या पालकांना हे दहा दिवस; जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी लावायचे आदेश दिले गेले..
--##--
'गुड वन डॅड.. कामच झालं आपलं.. आपले पुरावे बघूनच गार झालेत ती लोकं.. त्यांच्या वकिलाला तर शब्द सुचत नव्हते..'- शर्वरीने बाहेर माधवरावंच अभिनंदन केले..
'हम्म.. घाई करतेस तु.. कोर्टासाठी आणि लोकांसाठी केस जरी रवी लढत असला तरी तो फक्त प्यादा आहे.. आशिषचा डिफेन्स लॉयर स्वतः आशिषच आहे.. ठीक आहे.. हरकत नाही.. त्याला वाटत असेल की मी वकिली विसरलो.. पण त्याच्या लक्षात असायला हवं की मीपण त्याचा गुरू आहे ते.. '- माधवरावांनी हसून म्हटलं..
पुढील दोन आठवडे माधवरावांनी शर्वरीला आशिष आणि रवी; दोघांवर विशेष लक्ष ठेवायला सांगितलं होतं.. दहा दिवसांची मुदत संपायला आली तरी दोघांच्या हालचालीत शर्वरीला काही संशयास्पद वाटलं नव्हतं आणि माधवरावांना नेमकं तेच खटकलं होतं..
--##--
आज दहा दिवसांनी पुन्हा एकदा आशिष साटम खटल्याची सुनावणी चालू झाली होती..
'डिफेन्स वकिलांकडे पुरावे जमले असतील तर ते त्यांनी सादर करावेत...'- जजनीं आदेश दिला तसा रवी उठला..
'युअर ऑनर, मला साटमांचे शेजारी मि. निकम यांच्या सर्व कुटुंबाला एकत्रित साक्ष देण्यासाठी बोलवण्याची परवानगी देण्यात यावी..'- रवीच्या विनंतीला जजनीं होकार दिला तशी सर्व निकम परिवार सदस्य साक्षीदार जागेत येऊन उभे राहिले..
'तर मिसेस प्रज्ञा निकम; तुम्हांला तुमच्या पतींनी दिलेला जवाब पटतो का??'- रवीने निकमांच्या बायकोला प्रश्न विचारताच त्यांच्या चेहरा पडला होता..
'मुळीच नाही.. आशिष सारखा मुलगा असं काही करण्याची किंवा बोलण्याची सुतराम शक्यता नाही.. आणि आम्हालाच कशाला; जज साहेबांनी आमच्या बिल्डींगमधल्या कोणत्याही कुटुंबाला साटम परिवाराबद्दल विचारलं तरी सर्वांचंच हेच मत असेल... राहिला प्रश्न, साटम वहिनी आणि भावोजींचा तर त्यांनी शरयुला कायम आपल्या मुलीसारखीच वागणूक दिली आहे..हे ही तुम्ही कोणत्याही कुटुंबाला विचारावं'- निकमबाईच्या बोलण्याला त्यांच्या दोन्ही मुलींनी दुजोरा दिला...
'मग तुमच्या नवऱ्याने असा जवाब का द्यावा?? काही खास कारण? हा निकम?'- रवीने प्रश्न करताच त्यांचा चेहरा खरकन पडला..
काही मिनिटं शांतता राहीली..
'निकम साहेब तुम्ही माधुरी सुर्वेंना ओळखता का हो??'- रवीच्या गुगलीवर निकम तिनताड उडाले होते..
'ना...नाही.. कोण मधू.. माधुरी?? मी नाही ओळखत..'- त्यांना चाचपडत म्हटलं..
इकडे शर्वरी आणि माधवरावांचीपण विकेट पडली होती.. त्यांनी क्षणात एकमेकांकडे बघितलं.. माधवरावांना आता कुठे आशिषच्या हसण्याचा अर्थ लागला..
'अच्छा असं का.. मला वाटलं.. ओळखता तुम्ही.. पण..'- रवीने बोलायच्या आधीच निकमांच्या तोंडून शब्द बाहेर पडले..-'सॉरी जजसाहेब, मी.. मी चुकलो.. मी खोटी साक्ष दिली..'
या नव्या खुलाशाने कोर्टात कुजबुज सुरू झाली होती.. माधवरावांनासुद्धा दडपण आलं होतं..
'बरं.. का असे?? तुम्ही सांगाल की आम्ही सांगू.. ठीक आहे का ते नका सांगू.. पण कोणाच्या धमकीला घाबरून तुम्ही असं केलंत??'- रवीने त्यांना खडसावले..
'मी..मी ते माझं अ.. अंम..अ..अफेअर जगासमोर येण्याच्या भीतीने खोटी साक्ष दिली.. मला..मला त्या मॅडमनी धमकावले होते..'- निकमांनीं शर्वरीकडे बोट दाखवलं.. माधवरावांनी डोक्याला हात लावला तर उपस्थित पोलिसांनी शर्वरीला ताब्यात घेतलं..
'तुम्ही जाऊ शकता निकम.. धन्यवाद..कोर्टासमोर सत्य कबूल केल्याबद्दल..युअर ऑनर.. कृपया नोंद घ्यावी की या शर्वरी देशपांडे वकिलांच्या जेष्ट कन्या असून मिसेस शरयू यांच्या भगिनी आहेत..या वरून स्पष्ट होतं की या दोघांनी मिळून माझ्या आशिलाला या गुन्ह्यात विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला आहे..'- रवीचा मुद्दा कोर्टाने नोंदवून घेतला होता..
'युअर ऑनर, मला माझ्या पुढच्या साक्षीदाराला साक्षीसाठी बोलवण्याची परवानगी द्यावी.. मला शंभर टक्के खात्री आहे की त्यांनतर कोर्टाला ही केस पुढे चालू ठेवण्याची गरजच लागणार नाही..'- रवीच्या विनंतीला कोर्टाने मान्यता दिली..
काही मिनिटांचा अवधी गेला तरी रवीने साक्षीदाराचे नाव जाहीर केलं नाही तसे माधवराव गोंधळले होते.. शर्वरीलासुद्धा काही सुचेनासे झाले होते..
'मि. रवी कुठे आहे साक्षीदार??'- जज साहेबांनी विचारलं..
'मी साक्षीदार आहे सर..'- आवाजाच्या दिशेने सगळ्यांची नजर वळली तर आशा शरयुला व्हीलचेअरवर बसवून आत घेऊन येत होती..
तिला आत येताना पाहून माधवराव आणि शर्वरीला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला होता.. शर्वरीने पोलिसांना धक्का देत; तिच्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला तसं त्यांनी तिला अधिकच घट्ट पकडून ठेवलं..
'शरू.. बेटा.. तु?? तु कधी शुद्धीवर आलीस?? बाळा..'- माधवरावांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.. शर्वरीलापण बहिणीला भेटायचं होतं.. तिची झटपट चालूच होती..
'मला शुद्धीवर यायचंच होतं डॅड.. नाहीतर माझ्या चुकीमुळे एक निर्दोष परिवार तुरुंगात गेला असता.. आणि तो माझा परिवार आहे डॅड..'- शरयूच्या डोळयातून आसवं टपकत होती.. तिने अजूनही मान वर केली नव्हती..
'मॅडम, तुम्हांला जे काही बोलायचे असेल ते पुढे येऊन बोला..प्लीज..'- जजनीं सांगताच; आशा तिची व्हीलचेअर घेऊन पुढे आली होती..
'जज साहेब, मी लिहिलेली डायरी खरी आहे आणि त्यातले शब्द, लिखाण, त्यातला रागपण माझाच आहे.. पण..पण ती एकच बाजू आहे सर.. दुसरी बाजू तुमच्या समोर मी ठेवते.. दोषी आशिष आणि त्याचा परिवार नाही तर मी..मी आहे.. शिक्षा मला मिळायला हवी..'- शरयू भावुक झाली होती.. तिला पुढे बोलताच येत नव्हतं.. तसं पाठीमागून आशाने तिला धीर दिला..
'सर, हा जवाब मी कोणाच्या दबावाखाली देत नाही आहे.. माझ्यावरच्या प्रेमापोटी; माझ्या माहेरच्या माणसांनी या लोकांना या केसमध्ये अडकवले आहे सर.. हे सर्व निर्दोष आहेत.. निर्दोष आहेत..'- शरयूने डोळे फुसत निश्चयी स्वरात साक्ष दिली होती..
माधवरावांनी शेवटचा प्रयत्न म्हणून काही बोलायचा प्रयत्न केला तसं शरयूने त्यांना अडवलं होतं..
'नाही डॅड.. नाही.. प्लीज.. अजून नका फसवू.. तुम्ही असं नाही करायला हवं होतं डॅड.. आशिषला शिक्षा झाली असती तर मी स्वतःला कधीच माफ करू शकली नसती डॅड.. '- शरयूने कोर्टासमोर सगळा घटनाक्रम उलगडून सांगितला..
माधवराव कपाळावर हात ठेवून हताशपणे खुर्चीवर बसले होते.. शरयूच्या साक्षीने केस फिरणार हे त्यांना कळून चुकलं होतं..
कोर्टाने शरयूची साक्ष ग्राह्य ठरत आशिष आणि त्याच्या कुटुंबाला निर्दोष मुक्त केलं होतं.. माधवराव आणि शर्वरीला पुराव्यांमध्ये चलाखी करत; साटम परिवाराला खोट्या गुन्ह्याखाली अडकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्याचे आदेश पोलिसांना दिले गेले..
आदेशानुसार पोलिस दोघांना अटक करण्यासाठी पुढे सरसावले तसे आशिषने जज साहेबांना त्या दोघांवर कोणतीही कारवाई न करण्याची विनंती केली होती..
त्याच्या अशा पावित्र्याने सगळे चाट पडले होते.. विशेष म्हणजे त्याच्या विनंतीला मान देत जज साहेबांनीपण त्या दोघांची शिक्षा रद्द केली होती.. तरीही त्यांच्या अपराधाची शिक्षा म्हणून ; दोघांना प्रत्येकी पंचवीस हजार दंड आणि तीन महिने समाजसेवेची शिक्षा सुनावण्यात आली होती..
कोर्टातून सर्व जण निघून गेले होते.. शर्वरी आणि माधवराव एका बाजूला तर रवी,संध्या, हंसाबाई, आशिष, साटम काका-काकू दुसऱ्या बाजूला उभे होते.. आशाने शरयूची व्हीलचेअर आशिषच्या दिशेने नेली..
'आय एम सॉरी आशिष.. माझ्या फॅमिलीमुळे तुला त्रास झाला.. आई-बाबा..माफ करा.. या वयात तुम्हांला ही अवहेलना सहन करावी लागली ती माझ्यामुळे..'- शरयूने रडता रडता हात जोडले तशा साटम काकी तिच्याकडे पटकन धावल्या..
'शरयू, तु कालपण माझी लेक होतीस आणि आजही आहेस.. तुझी इच्छा असेल तर पुढेही असशील..'- साटम काकींनी असे उद्गार काढताच सगळे चमकले..
सगळं वातावरण भावुक झालं होतं.. शरयू साटम काकींच्या कुशीत शिरून रडत होती तर साटम काकी स्वतःच्या डोळयातून अश्रू वाहत असतानासुद्धा तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होत्या..
'माधवराव, संध्या बोलत होती की तुम्ही माझ्या नवऱ्याला देव माणूस बोललात म्हणून??'- हंसाबाईनी विषय मुद्दाम वळवला..
'वहिनी..'- माधवराव रडू लागले होते.. शर्वरीच्यासुद्धा डोळयातून पाणी आलं..
'मम्मा.. नको ना ग प्लीज.. डॅडची असे काही करण्याची इच्छा नव्हती ग.. मीच त्यांना भरकटवलं..'- शर्वरीने माधवरावांच्या हाताला धरून म्हटलं..
'तु मला बिल्कुल मम्मी बोलायचं नाहीस शर्वरी.. बिल्कुल नाही.. म्हणे मी भडकवलं.. एका तोंडाने देवमाणूस म्हणायचं आणि त्याच्याच मुलीला त्रास द्यायचा??हा कसला दुट्टपीपणा भावोजी??'- हंसबाई रागीट झाल्या..
माधवराव निशब्द झाले होते.. रडता रडता त्यांनी पुन्हा एकदा हंसबाईनसमोर हात जोडले होते..
क्रमशः
2
© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा