अपराध कोणाचा, शिक्षा कोणाला? - भाग 51

This part is in continuation with earlier series..

'हो बाळा.. तुझ्या बाबांना दिलेल्या वचनाला मी बांधिल आहे म्हणून मी सांगू शकत नाही.. तुझी आई सुद्धा त्याच कारणांसाठी सत्य सांगू शकत नाही.. पण.. पण तुझी ताई सांगेल.. ती सांगणारच.. तुझे आणि शरयूचे डोळे फक्त तिच उघडू शकते.. फक्त एकच सांगतो... तुझ्या बापाने तुझ्यावर आणि तुझ्या आईवर अन्याय केला तो निव्वळ त्याच्या बहिणीच आयुष्य सावरण्यासाठीच ग.. जमलं तर माफ करा त्या देवमाणसाला..'- माधवरावांनी संध्यासमोर हात जोडले होते..

                                     ------------

'काका, हे सगळं सगळं माझ्या डोक्यावरून जातंय.. मला.. मला काहीच कळत नाही आहे..'- संध्याचा तुफान गोंधळ उडाला होता..

'वेळ हा सर्व गोष्टींवर सर्वोत्तम उत्तर देतो संध्या.. बेटा, वेळ आली की तुला आणि शरयुला सर्व प्रश्नांची उत्तरं भेटतील.. आणि तुम्हांला सुद्धा..'- माधवरावांनी संध्या आणि साटम परिवाराकडे पाहत म्हटलं..

पुढे कोणी काही बोलण्याआधीच लहान मुलीच्या रडण्याने सर्वांच्या माना वळल्या होत्या.. आशा; रडणाऱ्या अश्विनीला घेऊन पटापट वार्ड कडे येत होती...

'दादा, अरे हिला घे.. मागचे अडीच तास रडणं चालू आहे हिच.. जोशीकाकी पण हैराण झाल्या हिला सांभाळता सांभाळता.. हिला.. हिला आई पाहिजे आहे हिची..'- रडवलेल्या सुराने आशा बोलताच उपस्थित सर्वांचेच काळीज पिळवटून निघाले होते.. 

आता एका अजाण जीवाला कसं शांत करायचं हे कोणालाच सुचत नव्हतं.. आशिष स्वतः लेकीच्या तोंडून; आई नावाचा धोशा ऐकून एकाच जागी स्तब्ध झाला होता..

'आशु, अरे घे तिला तुझ्याकडे.. '- संध्याने आवाज दिला तसा तो भानावर आला आणि त्याने अश्विनीला आपल्याकडे घेतले.. तिला शांत करण्याचा त्याचे प्रयत्न फोल जात होते.. इवलासा तो जीव; आईच्या आठवणीत स्फुंदून स्फुंदून रडत होता.. तिची तशी अवस्था पाहून सर्वांच्या डोळ्यांत पाणी होतं..

'मि. आशिष?? मॅडम शुद्धीवर आल्या आहेत.. त्यांच्या तोंडात फक्त तुमचंच नाव आहे.. तुम्ही त्यांना भेटून घ्या.. आणि हो.. अजूनही त्यांच्या जीवाला असलेला धोका पूर्णपणे टळलेला नाही आहे.. सो त्यांच्या प्रकृतीवर किंवा मनावर ताण पडेल असं काही करू ऑर बोलू नका.. तुम्ही आत जाऊ शकता..'- डॉक्टरांनीं बाहेर येत म्हटलं तसे सर्वांचे चेहरे पडले.. 

'डॉक्टर आम्ही??'- माधवरावांनी न राहवून विचारलं..

'प्लीज.. सर्वांनी नको.. सध्यातरी नको.. मी आताही कोणाला पाठवलं नसतं.. पण त्या शुद्धीवर आल्यापासून एकच नाव घेत आहेत.. म्हणून.. '- डॉक्टरांनी नकार देताच माधवराव दुःखी होत मागे फिरले होते.. त्यांना धीर दयायला संध्या आणि साटम काका पुढे सरसावले होते..

                          ---##---

शरयू बेडवर डोळे मिटून निपचित पडली होती.. तिच्या चेहऱ्यावर सुकलेल्या अश्रुंचे निशाण स्पष्ट दिसत होते.. अश्विनीच्या रडण्याने तीने खाडकन डोळे उघडले होते.. तिने उठण्याचा प्रयत्न करताच; आशिषने तिला लगेचच रोखले होते.. अश्विनीला त्याने तिच्या बाजूलाच बसवलं होतं तसा शरयूने तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला होता.. तिचे रडणं आवरता आवरता तिला स्वतःला रडू कोसळलं होतं.. आशिषने हळुवारपणे तिच्या हाताला थोपटत तिला शांत राहण्यास सांगितलं होतं..

'शरयू.. डॉक्टर बोलून गेलेत; तु अजूनही डेंजर बाहेर आलेली नाही आहेस.. उगीच ताण नको घेऊस.. मी अश्विनीची काळजी घेईन.. तु तेवढी लवकर बरी होऊन घरी ये.. सर्वजण काळजीत आहेत..'- आशिष म्हटला तशी शरयू खिन्न हसली..

'आणि तु??'- शरयू

'म्हणजे?'- आशिष

'तुला नाही का काळजी?'- शरयू..

'का केलंस शरयू असं?? अश्विनीचा विचार पण नाही केलास?'- आशिषने शेवटी तिला विचारलंच..

'तु केलास कधी तिचा विचार?? ' - शरयू स्वभावाला जागूनच उत्तरं देत होती..

'मी एक बाप म्हणून कुठेच कमी नाही पडलोय आणि पुढेही पडणार नाही.. तुला अजूनही माझ्याशी वाकड्यातच बोलायचं आहे का शरयू??'- आशिष वैतागला होता..

' नाही रे.. तुझ्याशी वाकड्यात बोलली ना की मग ऍटलिस्ट भांडण्याच्या निमित्ताने तु माझ्याशी बोलतोस तरी.. पण ऐ आशु.. सॉरी आशिष.. सॉरी हा..'- शरयू हसत त्याला म्हणाली..

'सॉरी कशाबद्दल? हे आजारपण लपवल्याबद्दल.. '- आशिषने त्रासिक चेहरा करत विचारलं..

'हम्मम..हो.. नाही म्हणजे मला तुझ्या आणि संध्याच्या आयुष्यातून जाता नाही आलं म्हणून.. मला वाटलं होतं की मी यातून वाचनारच नाही.. पण देवपण बघ ना; आपले भोग भोगल्याशिवाय सोडतच नाही कोणाला..'- शरयूचा स्वर जडवला होता.. तिचे डोळे पाणावले होते..

'शरयू वेडी आहेस ग तु.. काय गरज होती तुला असं दुखणं अंगावर काढण्याची??'- आशिष चांगलाच दुखावला होता..

'तुलाच मी नको होती ना रे?? मी मेली तर तुझ्या मागची ब्याद जाईल म्हटला होतास ना?? आठवतं का रे तुला?? मग मीच म्हटलं की आत्महत्या करून तुम्हां सर्वांना अडचणीत टाकण्यापेक्षा असं निघून जाऊ... खूप प्रयत्न केले रे तुला मिळवण्याचे.. पण हरले.. हर मोमेंटला हरले.. त्या दिवशी तुला आठवतं; तुझा आणि संध्याचा डान्स व्हिडीओ वरून मी तुझ्याशी भांडले?? '- शरयूने रडक्या स्वरातच प्रश्न विचारला..

'हा.. त्यानंतर तु बदललीस.. पण हे अस करायला तु बदलशील असे वाटले नव्हते ग...'- आशिषने नकळत तिचा हात धरला होता.. नाही म्हटलं तरी त्याला सुद्धा त्याच एक मन खात होत..

'असाच.. त्या रात्री; असाच तु अचानक लोळत माझ्या अगदी जवळ आलास.. मी मनातून खूप खुश झाली होती रे... तु मला किस केलंस.. तुला आठवतपण नसेल.. तुझा हात माझ्या कंबरेवरून कुठे कुठे फिरला हे मी तुला आता सांगूही शकत नाही.. माझं मन अगदी गार्डन गार्डन झालं होतं.. मी सातवे अस्मानवर पोहचली होतीच की तुझ्या तोंडून; 'लव्ह यु संध्या.. माय लव्ह' असे शब्द बाहेर पडले आणि मी क्षणात संपले रे... त्याच क्षणी मला कळलं की शरयू कधीच संध्या बनू शकणार नाही.. तिला आशिष कधीच भेटणार नाही.. कधीच नाही..'- शरयूचा स्वर हळूहळू मंदावला होता..

तिच बोलणं ऐकून आशिषलासुद्धा तिच्याबद्दल कणव वाटत होती.. आपण नकळत तिला दुखवल्याची खंत त्याला जाणवू लागतं होती.. त्याने डोळे गच्च मिटलेच होते की त्याने कोणत्या तरी शंकेने त्याने ते तितक्याच लवकर उघडले..

'डॉक्टर.. डॉक्टर.. नर्स.. शरयू.. शरयू..'- आशिष वेड्यासारखा ओरडत बाहेर आला होता..

'अरे..अरे काय झालं माझ्या शरयुला??'- माधवराव दडपणाखाली आले होते..

'ती.. ती बोलता बोलता बेशुद्ध झाली..'- आशिषला घाम फुटला होता..

डॉक्टर आणि नर्स आत धावले होते.. शरयूचा रक्तदाब झपाट्याने कमी होत होता.. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले तरी ती शुध्दीवर आली नव्हती.. सरतेशेवटी डॉक्टरांनी तिला चोवीस तास निगराणीखाली ठेवण्याचे ठरवले होते.. 

'मि. साटम आणि मि. देशपांडे, मला तुम्हांला एक वाईट बातमी द्यावी लागतेय.. त्याबद्दल सॉरी.. पण पेशंट जर चोवीस तासात शुद्धीवर आली नाही तर त्या कदाचित कोमात जाऊ शकतात.. लेट्स प्रे फॉर हर.. '- डॉक्टरांच्या हताश उद्गारने माधवराव जागीच कोसळले तसे आशिषने त्यांना सावरले होते..

'काका, सांभाळा स्वतःला.. आणि तुम्ही तिला कमी लेखू नका.. ती नक्कीच परत येणार.. प्रॉमिस केलंय तिने मला तस..'- आशिषने त्यांना धीर देण्यासाठी खोटं म्हटलं होतं..

त्यांच्याशी खोटं बोलताना त्याचाही कंठ दाटून आला होताच.. संध्यालाच त्याची घालमेल कळाली होती.. शेवटी एकमेकांसाठी; नजरेच्या भाषेत बोलण्यात दोघे पारंगत होतेच.. 

आशिषने शेवटी सर्वांनाच घरी जाण्यासाठी सांगितलं होतं.. माधवराव नाही नाही म्हणतानादेखिल आशिषने त्यांना एक दिवस त्यांच्या घरी राहण्याची विनंती केली होती; जेणेकरून त्यांना सावरण्यासाठी आई-बाबा असतील.. अश्विनी झोपी गेली होती.. आशा तिला तिच्या घरी नेणार होती..

'संध्या तु ही निघ.. मी थांबेन इथे..'- आशिष म्हटला तसा तिने मानेनेच नकार दिला..

'उद्या ताई येईल.. पहाटेच आणि जर मी इथे नसली तर ती उगाचच इश्यू करत बसेल.. त्यापेक्षा मी इथेच थांबेन..'- संध्याने माधवरावांकडे पाहत कारण सांगितले तसे माधवरावांनीसुद्धा मान डोलवत तिला समर्थन दिलं होतं..

सर्वजण घरी निघून गेल्यावर; आशिषने संध्याजवळ आपलं मन मोकळं केलं होतं.. तिलाही शरयुबद्दल वाईट वाटू लागलं होतं.. रात्रभर एकमेकांच्या बाजूला बसून ते एकमेकांना धीर देत होतेच की अचानक त्यांचा डोळा लागला होता..

'ओह शीट.. व्हाट नॉनसेन्स..'- संध्या आणि आशिष चेहऱ्यावर कोणीतरी पाणी फेकताच खडबडून जागे झाले होते..

'सो गाईज... कसं वाटतंय आता??'- पहाटे हॉस्पिटलमध्ये येताच; बाहेर लॉबीमध्ये दोघांना एकमेकांच्या बाजूला, एकत्र चिकटून झोपलेलं पाहून शर्वरीला राग आला होता आणि त्याच रागात तिने जवळच्या पाणी बॉटलमधील पाणी त्या दोघांच्या चेहऱ्यावर फेकलं होतं..

'अच्छा ही आहे का ती शर्वरी बाई.. सेम टू सेम संध्याच आहे.. सख्या बहिणी शोभतात बरं.. संध्यापण कॉलेजमध्ये असताना अशीच तर खडूस होती..'- आशिष तिच्याकडे एकटक पाहतच बसला होता..

'ओ मि. आशिष साटम? कुठे हरवलात?? बायको कशी आहे तुमची आता?'- शर्वरीने शांत स्वरात त्याला विचारलं तशी संध्या घाबरली.. कारण तिला माहीतच होतं की पाणी आता आतून उकळायला सुरू होणार; आणि मग एकदाच कड येत समोरचा चांगलाच शेकून निघणार.. पण..पण या वेळेस समोर तिचा आशु होता..ती चांगलीच पेचात पडली होती..

'ताई.. ती शुद्धीवर आली होती.. पण..पण आता परत ती..'- आशिषने आवंढा गिळत तिला सत्य परिस्थिती सांगितली होती..

'किती निर्लज्ज आहेस यार तु?? एवढं सर्व होऊन सुद्धा; तु मला वर तोंड करून सगळं खरं खरं सांगतो आहेस??'- तिचे डोळे आता लाल झाले होते.. मुखचर्या रागीट बनत चालली होती..

'ती जर कोमात गेली ना आशिष.. तर याद राख.. तु जेलमध्ये जाशील.. आय प्रॉमिस.. मला शरयूकडून खूप काही कळलं आहे.. मी तुला आणि तुझ्या सगळ्या माणसांना जेलमध्ये पाठवीन..'- शर्वरी भयंकर संतापली होती..

'ताई, मला वाटतं तु ओव्हररिऍक्ट करते आहेस.. तु निव्वळ एकच बाजू ऐकली आहेस आणि तीही शरयूची.. तु आशिष आणि साटम फॅमिलीचीपण बाजू ऐकणं गरजेचे आहे..'- संध्याने तिच्या वक्तव्याला तीव्र नापसंती दर्शवली होती..

'ओह.. मॅडम आता तुम्ही शिकवणार मला?? मी शरयूची सगळी बाजू ऐकली आहे; अगदी तिची चुकीपण.. तिचा गुन्हा इतकापण मोठा नव्हता की तिने एवढी भयंकर शिक्षा स्वतःला द्यावी..'- शर्वरीचा आवाज चढू लागला होता..

'हो.. शरयू काय चीज आहे ते तुला पण चांगलंच माहीत आहे ताई.. तरीही जर तु तिच्यावरच विश्वास ठेवणार असशील तर अवघडच आहे सर्व..'- संध्याने सरळसरळ टीका केली होती..

'शट अप संध्या...हाऊ डेअर यु टू से लाईक दॅट?? ती माझी बहिण आहे.. आणि तिला कोणी विनाकारण रडवलेलं मी खपवून घेणार नाही..'- शर्वरीने धमकावले..

'विनाकारण??'- संध्या..

शब्दाला शब्द वाढू लागला तसं आशिषने दोघींमध्ये मध्यस्थी करत संध्याला पुढे काही उत्तर देण्यापासून थांबवलं..

'ताई, मला वाटतं की तुम्ही शरयू रिकव्हर झाली की तिला आणि आम्हांला समोरासमोर बसवून सवाल-जवाब केलात तर जास्त चांगलं.. उगाच आता एक बाजू ऐकून तुम्ही कोण चूक अन कोण बरोबर असं ठरवू शकत नाहीत..'- आशिषने अप्रत्यक्षपणे संध्याची बाजू घेत; शर्वरीला ठणकावले होते..

'ते तर मी करणारच आहे.. पण तरीही जर तिला काही बरं-वाईट झालं तर माझ्या नजरेत तूच जबाबदार असणार आहेस..'- आशिषकडे जळजळीत कटाक्ष टाकत शर्वरी बोलली आणि तिला आठवण झाली तशी ती पुन्हा एकदा शरयूच्या वार्डच्या दिशेने फिरली.. अतिदक्षता विभागात ठेवलेली शरयू पाहून; शर्वरीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या...

कशीबशी सकाळ झालीच होती की माधवराव आणि आशिषचे कुटुंब हॉस्पिटलमध्ये हजर झाले होते.. माधवरावांना पाहून शर्वरीच्या मनाचा बांध सुटला होता; तिने धावत जाऊन त्यांना मिठी मारली होती..

'सॉरी बेटा, मी तिला सांभाळू शकलो नाही.. तिच सुख तिला देऊ शकलो नाही.. मला माफ कर..'- माधवराव रडू लागले होते..

'पप्पा, पण तिने एवढं मोठं पाऊल का उचललं ओ?? आपण कोणीच नव्हतो का हो तिचे?? मी तिला यासाठी कधीच माफ करणार नाही पप्पा.. कधीच नाही..'- शर्वरी आणि माधवराव एकमेकांच्या मिठीत रडू लागले होते..

दुपारपर्यंत कोणीच जागच हलले नव्हते.. शेवटी साटम काकांनी जबरदस्ती करून आशिष आणि संध्याला घरी फ्रेश होण्यासाठी पाठवलं होतं.. जाताजाता त्यांनी पाहिलं तर शर्वरी पुतळ्यासारखी बसली होती...तिच्या डोळयातून अखंड अश्रूधारा वाहत होत्या.. तिची नजर शून्यात स्थिर होती.. तिचं असे रूप पाहून संध्याला धडकी भरली होती.. तिला काहीच न बोलता दोघेही बाहेर पडले होते..

संध्याकाळी येताना आशिष आणि संध्या एकत्रच आले होते; सोबत अश्विनीही आली होती; जी संध्याच्या कडेवर बसून मस्ती करत होती.. संध्या तिला घेऊन थेट शर्वरीसमोर जाऊन उभी राहिली होती.. शरयूच्या आठवणीत चेहरा मलूल झालेली शर्वरी; अश्विनीला पाहताच पटकन उठून उभी राहिली होती..

'ही..ही.. शरयूची ना??'- शर्वरीने अधीरतेने विचारलं..

'हो..'- आशिषने मागून उत्तर दिलं..

शर्वरीने तिच्यासमोर तिला घेण्यासाठी हात पसरले तशी तिने मान फिरवली; शर्वरी हिरमुसली होती..

'सोना, मावशी आहे तुझी ती.. जा तिच्याकडे..'- आशिषने लेकीला सांगितलं तशी ती काही क्षण शर्वरीकडे पाहत बसली आणि लगेच तिने तिच्याकडे झेप घेतली.. शर्वरी सगळा ताण विसरून तिच्या भाचीबरोबर खेळण्यात व्यस्त झाली होती..

'आशिष, बरं झालं रे हिला आणलं ते.. आता ज्वालामुखी थोडा तरी शांत राहील...'- माधवरावांनी शर्वरीकडे पाहत म्हटलं...

रात्री उशिरापर्यंत शरयु शुद्धीवर आली नव्हती.. अश्विनी अजूनही शर्वरीसोबत असली तरी आता तिचाही चेहरा गंभीर होत चालला होता.. आशिष आणि माधवराव; डॉक्टरांकडे विचारपूस करायला गेले होते.. अश्विनीने शर्वरीला मात्र जागेवरून हलू दिलं नव्हतं; त्यामुळे ती मागेच थांबली होती..

'डॉक्टर..'- आशिषने त्यांना आवाज दिला..

'या साटम या.. देशपांडे या..'- डॉक्टरांनी त्यांना समोर बसायला सांगितलं..

'तुमच्यासाठी वाईट बातमी आहे.. त्यांच्या शरीरात गुंतागुंत वाढत चालली आहे.. बॉडी उपचारांना बिल्कुल प्रतिसाद देत नाही आहे..आम्हांला भीती आहे की त्या कदाचित कोमातून..'- डॉक्टर बोलता बोलता थांबले होते..

'ती कोमातून बाहेर येईल डॉक्टर.. १००% बाहेर येणार.. तुम्हांला जमत नसेल तर तसं सांगा.. मी तिला दुसऱ्या डॉक्टरांकडे शिफ्ट करेन..'- न राहवून शर्वरी तिथे आलीच होती.. 

'तुमची मर्जी मॅडम.. साटम माझे स्नेही आहेत.. त्यांच्या विनंतीवरून मी आधीच पेशंटची केस अजून एका तज्ञ डॉक्टरांशी डिस्कस केली आहे.. ते आज सकाळी येऊन; पेशंट बघून सुद्धा गेले आहेत.. आणि मी जे मत मांडतोय ते आमच्या दोघांचं एकत्रित मत आहे.. बाकी तुमची मर्जी..'- डॉक्टरांनी सयंतपणे त्यांची बाजू मांडली होती..

'शर्वरी बाळा, हे डॉक्टर स्वतः शहरातले नामांकित डॉक्टर आहेत आणि वरून .. साटम फॅमिलीने शरयुला सर्वोत्तम हॉस्पिटलमध्येच दाखल केले आहे.. शरयूच्या काळजीने तुझ्या बोलण्याचा तोल जातोय बेटा..'- माधवरावांनी सौम्य शब्दांत तिची कानउघाडणी केली तशी ती शांत झाली..

' डॉक्टर हिच्यावतीने मी तुमची माफी मागतो.. ते बहिणीच्या..'- माधवरावांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करताच डॉक्टरांनी त्यांना हसून थांबवलं होतं..

'इट्स ओके देशपांडे... मी समजू शकतो.. चला; आता मलाही निघावं लागेल.. आपण सर्वजण त्यांच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना करूयात..'- सर्वांचा निरोप घेत डॉक्टर बाहेर पडले होते..

                                     --##--
दिवस जात होते परंतु शरयूची प्रकृती काही सुधारत नव्हतीच.. तिच्या कोमातून बाहेर येण्याची लक्षण हळूहळू धूसर होत चालली होती.. माधवराव नाही म्हणूनसुद्धा शर्वरीने तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं होतं पण तिथेही तिच्या पदरी निराशा पडल्यामुळे ती चांगलीच वैतागली होती.. तिची चिडचिड सुरू झाली होती.. एक-दोनदा अश्विनीने नेमकं तिच्यासमोर आईच्या आठवणीत भोकाड पसरलं होतं आणि त्यामुळे तिच्या संतापाचा उद्रेक झाला होता..

तिने संध्या आणि आशिष; दोघांशी जोरदार भांडण केलं होतं.. संध्यासोबत तिची शाब्दिक चकमक जोरदार झाली होती.. तिने संध्या आणि आशिषला  धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता..तिच्या डोक्यात एक भयंकर कारस्थान शिजलं होतं.. पुढचे दोन आठवडे  संध्या आणि शर्वरी; आशिषच्या मुद्दयावर भांडत होत्या.. त्यांना शांत करता करता माधवराव आणि हंसाबाई; दोघांच्या नाकीनऊ आले होते..

आशाला शर्वरी एक-दोनदा; साटम परिवार राहत असलेल्या परिसरात फिरताना दिसली होती... तिने त्याबाबत आशिष आणि संध्या; दोघांनाही सावध केलं होतं.. आशिषने तिच म्हणणं  हसण्यावारी घेतलं तरी संध्या आतून घाबरली होती.. तिने आशाला जमेल तशी आशिषच्या लाईफमध्ये घडणाऱ्या अनाकलनीय घडामोडींची माहिती तिच्यापर्यंत पोहचवण्यास सांगितली होती.. 

                                   ---##---


छोटा आशिष आजकल त्याच्या आईला म्हणजेच संध्याला जास्तच मिस करत होता.. शर्वरीच्या नादात तिला मागचे काही दिवस त्याला भेटता आलं नव्हतं.. परिणामी तो जाम चिडचिडेपणा करत होता आणि त्याचवरून रवी आणि संध्याचं पुन्हा एकदा भांडण झालं होतं.. संध्याने एका क्षणी रवीला त्यांच्या मुलाची कस्टडी तिच्याकडेच राहील म्हणून सांगितलं तसा रवी तिच्यावर वैतागला होता.. त्याने कडक शब्दांत तिची निंदा केली होती.. साऱ्या ताणाचा संध्यावर परिणाम दिसू लागला होता.. तिच चेहऱ्यावरचं तेज कमी कमी होऊ लागलं होतं.. तरी तिचा आशु (साटम) तिच्याशी फोनवरून सतत संपर्कात असल्याने ती काहीशी स्थिर झाली होती..

अशाच एका क्षणी तिला आशा मार्फत कळलं होतं की आशिष आणि त्याच्या कुटुंबियांना पोलिसांनी; शरयूला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली होती..

https://www.irablogging.com/blog/apradh-konacha-shiksha-konala--part-1_4284


क्रमशः

कथा अंतिम टप्प्यात असल्याने आणि  माझ्या मनात आधीच तीन वेगवेगळ्या प्रकारचे शेवट घोळत आहेत.. त्यामुळे मला कदाचित लिखाणात उशीर होईल.. भाग दोन दिवसाआड पोस्ट होतील.. 

© मयुरेश तांबे
कथेचे सर्वाधिकार लेखकाच्या अधिन असून कथा नावासाहित प्रसिध्द करण्यास हरकत नाही..

🎭 Series Post

View all